Swaraja Surya Shivray - 20 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 20

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग विसावा

गड जिंकला तान्हा गेला

आग्रा येथून सुटका होऊन तीन-साडेतीन वर्षांचा काळ लोटत होता. शिवरायांनी या कालावधीत तसा संपूर्ण विसावा घेतला. स्वराज्याची विसकटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्रदयात एक जखम तीव्रतेने सलत होती ती म्हणजे पुरंदरचा तह! मिर्झाराजेंसोबत केलेल्या तहात गेलेले तेवीस किल्ले स्वराज्यात कसे येतील, कसे आणता येतील या संबंधीचा विचार शिवरायांना अस्वस्थ करीत होता. एकेदिवशी शिवराय आणि माँसाहेब राजगडावर बसले होते. राजगडापासून दूरवर असलेला कोंढाणा किल्ला दिसत होता. माँसाहेब तिकडे लक्ष लावून पाहात असताना अचानक शिवरायांकडे बघून म्हणाल्या,

"शिवबा, समोरच्या कोंढाणा किल्ल्यावर मुघलांचे निशाण फडकताना पाहून कसेसेच होते आहे."

"समजलो. माँसाहेब, समजलो. माझ्याही मनात तीच सल आहे. मीही तोच विचार करतोय. पण आऊसाहेब, कोंढाणा घेणे वाटते तितके सोपे नाही. उदयभानासारखा अत्यंत क्रुर, पराक्रमी किल्लेदार त्या गडावर आहे. कुणाला पाठवावे हाच विचार मी करतो आहे....." शिवबा बोलत असताना सेवकाने वर्दी दिली. 'तान्हाजी मालुसरे' आले आहेत. ते ऐकून शिवरायांना अत्यंत आनंद झाला.'सापडला.उदयभानाशी तेवढ्याच ताकदीने टक्कर देणारा वीर सापडला.बोलावल्यासारखा अचानक हजर झाला. हा तर शुभशकूनच की...' असे मनात म्हणत शिवराय आणि जिजाऊ दरबारात हजर झाले. तान्हाजी आणि शेलारमामा दोघेही आले होते. शेलारमामा हे तान्हाजीचे मामा होते. शिवरायांचा चेहरा थोडासा विचारात असलेला पाहून तान्हाजीने विचारले,"काय झाले राजे? काहीतरी विचार चालू आहे?"

"नाही. तसे काही नाही. बोला. तुम्ही अचानक कसे काय आलात? काय काम काढले आहे?"

"महाराज, रायबाचं लगीन धरलया. चार दिसावर आलय म्हणून आमंत्रण घेऊन आलो."

"तान्हाजी, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. असे करा, तुम्ही लग्न घ्या आटोपून. आम्ही जरा कोंढाण्याचं बघतो..." शिवराय बोलत असताना तान्हाजी मध्येच म्हणाला,

"काय म्हणालात राजे? तुम्ही मोहिमेवर जाणार? हा तान्हा जिवंत असताना? कसं शक्य आहे?"

"अरे, पण तान्हा लेकराचं लगीन धरलं म्हणतोस आणि..."

"आऊसाहेब, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं? काय म्हणता मामा?"

"तान्हा, माझ्या तोंडचा शब्द बोललास बघ. महाराज, स्वराज्य आहे तर समद काही आहे. तान्हाजी म्हणतो ते खर हाय. आम्ही आधी कोंढाणा जिंकून येतो आणि मग रायबाचं लगीन लावतो." ऐंशी वर्षे वयाचे काटक, ताठ शेलारमामा वेगळ्याच उत्साहाने, आत्मविश्वासाने, निर्धाराने आणि छातीठोकपणे म्हणाले. "आता आलं लक्षात तुम्ही कोंढाण्याचा विचार करीत होतात ते. महाराज, विचार, चिंता, काळजी सोडा. कोंढाणा आपल्या ताब्यात आलाच म्हणून समजा." तान्हाजीही वेगळ्याच आवेशात म्हणाला.

"तान्हा, गडावर उदयभान किल्लेदार आहे. महाधूर्त, हुशार, पराक्रमी आहे. गडावर पंधराशे कडवे सैनिक आहे, असे म्हणतात."

"राजे, आम्हाला घाबरवता की काय? कितीबी ताकदीचा असू द्या तो उदयभान. नाही त्याला लोळवले तर तोंड नाही दाखवणार परतून. आणि त्याची फौज पंधराशे असो नाहीतर पंधरा हजार असो. हा तान्हाजी भिणार नाही. आपले मावळे काय कमी आहेत होय? एक-एक मावळा दहा जणांना भारी पडेल. पाचशे कडवे लढवय्ये घेऊन जातो आणि रातोरात भगवा फडकवून येतो का नाही ते बघा." असे म्हणत तान्हाजीने माँसाहेबाना आणि शिवरायांना मुजरा केला. शिवरायांनी तान्हाजीला मोहिमेचा विडा दिला. आग्रा येथून परतल्यावर हा पहिलाच संग्राम होता. जवळपास साडेतीन वर्षांनंतरची पहिली मोहीम आणि ती राबविणार होता, फत्ते करणार होता...तान्हाजी मालुसरे हा रांगडा, ताकदवर, लढवय्या,चलाख मुत्सद्दी वीर! तान्हाजी हा शिवरायांचा लहानपणापासूनचा मित्र. दोघेही सोबत खेळलेले. शिवरायांवर निष्ठा, भक्ती, निर्व्याज प्रेम असलेला दिलदार, जीवाला जीव देणारा असा सवंगडी! मोहिमेचा विडा घेऊन तान्हाजी आणि शेलारमामा दोघेही दरबाराच्या बाहेर आले. तिथूनच तान्हाजीने घरी असलेल्या लहान भावाला सूर्याजीला निरोप पाठवला, आपले पाचशे मावळे घेऊन ताबडतोब राजगडावर ये. बाकी काहीही सांगितले नाही. घरी लग्नाची तयारी सुरू. लग्न चार दिवसांवर आलेले आणि अशावेळी वरपिता स्वतःच्या भावाला, मामाला घेऊन लढाईवर निघाला होता. घरी जाऊन सांगायलाही वेळ नव्हता. सूर्याजी हा नात्याने लहानभाऊ परंतु जणू दुसरा तान्हाजीच. तितकाच ताकदवान, कमावलेल्या शरीराचा धनी. दादाचा निरोप आलाय ना मग निघायलाच पाहिजे असे मनाला बजावत मावळे जमवून सूर्याजी निघाला....राजगडाच्या रोखाने. सूर्याजी येईपर्यंत तान्हाजीने गोंधळ्याचे रुप घेतले आणि सरळ गेला कोंढाणा गडावर ! कशासाठी? असे धाडसाचे, जीवावर बेतेल असे काम कशासाठी? तान्हाजीला माहिती मिळवायची होती गडाची. गडावर सैनिक किती आहेत? पहारा किती जणांचा असतो? गडावर जाण्यासाठी दोन दरवाजे होते परंतु इतर कुठून जाता येईल? त्या मार्गावर कुठे कुठे पहारे आहेत? कुणीकडून जाणे सोईस्कर होईल? गडावर तोफा किती आहेत? त्यांची तोंडं कोणत्या दिशेने आहेत? सारी बारीकसारीक आणि हल्ला करण्यासाठी योग्य अशी माहिती गोळा करून तान्हाजी लगोलग परतलाही. तोपर्यंत सूर्याजी फौजेसह आला होता. तान्हाजीने ठरविले. चढाई करायची पण वेढा देणे, राहून राहून हल्ला करणे, समोरासमोर लढाई करणे असले प्रकार नको. एक घाव दोन तुकडे म्हणजे गनिमीकावा! आला...आला.. समजेपर्यंत, शत्रू जागा होईपर्यंत कापून काढायचे आणि गडावर भगवे निशाण फडकवून मोकळे व्हायचे. ठरले. सारे नियोजन झाले. गडावर राजरोसपणे जाण्यासाठी दोन दरवाजे होते. एक म्हणजे पुणे दरवाजा आणि दुसरा कल्याण दरवाजा म्हणून परिचित होता. गडाची पश्चिम बाजू अतिशय उंच होती. वरतून खाली पाहिले तर भोवळ येण्यासारखी परिस्थिती! झाडाझुडुपांनी, काट्याकुट्यांनी गच्च भरलेला भाग. दिवसाकुणी गडाच्या त्या बाजूने जायचा प्रयत्न करीत नसे. त्यामुळे त्या बाजूला ना तटबंदी होती, ना सजग पहारा कारण तशा अवघड बाजूने येणे म्हणजे मरणास आमंत्रण देण्यासारखे! रात्रीच्या अंधारात तर कुणी येईल ही सुतराम शक्यता नव्हती. परंतु शिवरायाच्या शिलेदाराने, जीवलग मित्राने, निधड्या छातीच्या तान्हाजी नामक शूरवीराने पश्चिमेकडे असलेला तोच तट, किल्ल्याच्या त्या उंच आणि अत्यंत अवघड अशा मार्गाने गडावर जायचे ठरवले तेही केंव्हा.... भयाण रात्री...मध्यरात्री! विंचूकिडे, रातराणी यांच्या संगीतमय साथीने.... किल्ल्याचा तो भाग डोणगिरीचा कडा म्हणून ओळखला जात होता. हाच डोणगिरीचा कडा मावळ्यांना इच्छित स्थळी, इच्छिलेले कार्य करण्यास मदत करणार होता. त्याच्या रक्षणासाठी ना चौक्या होत्या, ना हत्यारबंद शिपाई होते…

निघाले.... निघाले.... शिवरायांचे शूरवीर, पराक्रमी, धाडसी वीर निघाले. तान्हाजी, सूर्याजी, शेलारमामा आणि त्यांचे पाचशे रांगडे, हिंमतवान गडी निघाले. शिवरायांना हवे ते मिळवून देण्यासाठी, माँसाहेबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, शिवरायांसोबतचा तह मोडून धोका देणाऱ्या औरंगजेबाला सणसणीत धडा शिकविण्यासाठी मराठावीरांची फौज निघाली. काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरला होता. परंतु त्या परिसरात लहानाचे मोठे झालेल्या त्या मावळ्यांना रस्ता पाठ होता, पायाखालचा होता, सरावाचा होता. गड जवळ येताच तान्हाजी सूर्याजीला म्हणाला,

"तू अर्धे मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी उरलेले मावळे घेऊन कडा चढून वर येतो. लगोलग कल्याण दरवाजा उघडतो. तुम्ही गडावर आले की, सगळे मिळून एकदाच हल्ला करू. शत्रूला पळता भूई थोडी करू."तान्हाजी आपल्या मावळ्यांना घेऊन डोणगिरीच्या बाजूने गेला. घनघोर अंधार, सर्वत्र झाडी, जणू काटेरी रस्ता. तान्हाजीने जाड, मजबूत, लांब दोर देऊन दोन मावळ्यांना वर जायला फर्मावले. त्यानुसार दोन निष्ठावान वीर तशा अंधारात, दगडांच्या, चिऱ्यांच्या सांदीत आधी हातांची बोटे घालून, नंतर पाय ठेवत हिंमतीने निघाले. फार मोठ्या जोखमीचे काम होते ते. दिवसाढवळ्या उजेडात कुणी गडावरून खाली पाहण्याची हिंमत करत नसायचे अशा अवस्थेत ती अत्यंत बिकट वाट हुशारीने, सावधपणे चढत ते दोन मावळे कड्यावर पोहोचले. तोवर खाली थांबलेल्या सैनिकांचा जीव थाऱ्यावर नव्हता. बोट निसटले, पाय निसटला, कप्पा नाही सापडला तर ...तर... अशा भीतीने सारे जण भवानीमातेचा, महादेवाचा धावा करीत होते. आराधना करीत होते. यशाची भीक मागत होते. आला. आला. वरतून दोरखंड सरसर करीत खाली आला. काम फत्ते. त्या दोघांनी वर जाऊन तो दोरखंड एका मजबूत झाडाला पक्का बांधून त्याचे दुसरे टोक खाली सोडले होते. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली होती. यशाचा रस्ता दाखवला होता. दोरखंड खाली येताच नंतरचे काम त्या दोघांप्रमाणे अवघड नव्हते. अर्धी लढाई जिंकल्याच्या आनंदात मावळे एकानंतर एक तो दोरखंड पकडून स्फूर्तीने, आवेशाने वर चढू लागले. तान्हाजीचे साथीदार गडावर पोहोचले आणि तितक्यात घात झाला. कुणाला तरी डोणगिरीच्या बाजूला काहीतरी गडबड असल्याचा सुगावा लागला त्याने कांगावा केला. शत्रू सावध होतोय हे पाहून मावळ्यांनी गर्जना केली..... 'हरहर महादेव!' आणि सुरू झाली... हाणामारी. कापाकापी. मावळ्यांच्या तलवारी प्रचंड वेगाने, भरपूर ताकदीने शत्रूच्या शरीराचा वेध घेऊ लागल्या. काहीही समजत नव्हते. कोण आले? कुठून आले? कसे आले? असे प्रश्न पडण्यापूर्वी, चर्चा करण्याची संधी मिळण्याच्या आधीच तलवारीचा घाव शरीरावर पडू लागला.उदयभानाच्या सैन्याची तारांबळ सुरु झाली. धावाधाव सुरु झाली. उदयभानाला समजले. शिवरायांचे बछडे धावून आले आहेत. त्याला आश्चर्य वाटले, अशा घनघोर अंधारात ही वानरसेना गडावर पोहोचलीच कशी? तो खूप चिडला. संतापला. स्वतःची तलवार उपसून धावला. बाहेर घनघोर लढाई सुरु होती.ढालींनी झेललेल्या तलवारींच्या वारांचा आवाज आसंमत दणाणून सोडत होता. वार करतानाचा मानवी आवाज, घाव बसताच बाहेर पडणाऱ्या किंकाळ्या आणि शस्त्रास्त्रांचे आवाज घुमत होते. झोपलेला गनीम जागा झाला. हाती पडेल ते शस्त्र घेऊन रणांगणावर धावला. पेटलेल्या मशाली घेऊन काही सैनिक इकडून तिकडे फिरत होते. त्या उजेडात आपला कोण, शत्रू कोण हे समजत नव्हते. काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तलवारी उपसून दरवाजा उघडण्याची वाट पाहणारे सूर्याजी आणि त्याचे साथीदार वेगाने आत शिरले.दिसेल त्या शत्रूला आडवे पाडण्याची जणू स्वराज्याच्या भक्तांमध्ये चढाओढ लागली. वेळ तसा जास्त नाही, आपल्या मानाने शत्रू अधिक आहे हे सर्वांना माहिती होते त्यामुळे वेळ न दवडता जो तो आपले सावज हेरून त्याला टिपू लागले. रणकंदन माजले, हलकल्लोळ माजला. मावळ्यांच्या त्वेषापुढे, जबरदस्त आघातापुढे संख्येने जास्त असलेल्या शत्रुची डाळ शिजेनाशी झाली. 'दिसला गनीम ठेचला.' अशीच नीती मावळ्यांनी अवलंबिली होती.शत्रू दणादण धरतीवर पडत होता..…

युद्ध भडकलेले असताना जणू दोन सिंह, चवताळलेले दोन वाघ, मदोन्मत्त होऊन झुंजणारे दोन हत्ती समोरासमोर आले. रक्ताळलेल्या डोळ्यांनी एकमेकांना पाहताच राग उफाळून आला, संताप शिगेला पोहोचला, कपाळाची शीर तडतडू लागली. तान्हाजी आणि उदयभान हे खंदे वीर समोरासमोर आले. खुनशी नजरेने एकमेकांना पाहिले. एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी बाहू फुरफुरु लागले. दोघेही बेहोश होऊन वार करु लागले. दोघांच्या हातात असलेल्या ढाली तलवारींचे घाव सोसून धन्याला वाचवताना स्वतःच रक्तबंबाळ होऊ लागल्या. त्या ढालींना जीव असता तर त्यांनी त्या घावांच्या ताकदीचा जोर, शक्ती वर्णन केली असती. न दिसणाऱ्या परंतु खोलवर झालेल्या जखमा दाखवल्या असत्या, न ऐकवणारा आक्रोश केला असता परंतु मुक्या बिचाऱ्या ढाली निमुटपणे ढाल बनून आपल्या धन्याचे रक्षण करीत होत्या. तान्हाजी, उदयभान जणू संतापाने पिसाळले होते. मागचा पुढचा विचार न करता पूर्ण शक्तीनिशी एकमेकांवर जोरदारपणे घाव घालत होते. तितक्यात अनर्थ झाला, अपशकून झाला. पराभव समोर दिसत असल्यामुळे संतापलेल्या, बिथरलेल्या, पिसाळलेल्या उदयभानाच्या तलवारीने घातलेल्या एका प्रचंड शक्तीशाली तडाख्याने तान्हाजीच्या ढालीचाच जीव घेतला. विपरित घडले, अकल्पित घडले. तान्हाजीच्या ढालीचे तुकडे झाले. दुसरी ढाल घ्यायला वेळ कुठे होता? समोरून उदयभान घावावर घाव घालत होता. तान्हाजीची ढाल तुटली हे पाहून आपण हरत चाललेले युद्ध जिंकू शकतो ही जाणीव त्याला झाली. अंगी सहस्त्र हत्तीचे बळ आले. तो पूर्ण जोमाने, शक्तीशाली वार करत होता परंतु समोर तान्हाजी मालुसरे हा खंदा वीर होता. ढाल तुटली म्हणून तो बाजूला झाला नाही, जीवाच्या आकांताने पळत सुटला नाही. उलट तोही चवताळला. ढाल नसली म्हणून काय झाले, आपला डाव हात आहेच की या विचाराने तान्हाजीला संजीवनी मिळाली. तोही त्वेषाने, जोशाने घावावर घाव घालू लागला. काय योगायोग असतो ना त्या दोन्ही शूरवीरांचे मरण त्या दोघांच्या हाती लिहिले होते म्हणूनच एक क्षण असा आला की, दोघांनीही पूर्ण ताकदीने, जोरदार शक्तीचा एक घाव एकमेकांवर घातला. दोघांच्या घावांनी समोरच्याच्या शरीराचा अचूक वेध घेतला. ते वार शरीरावर झेलून दोघेही एकदाच खाली कोसळले. धारातीर्थी पडले. कर्तव्य बजावताना कोसळले. विजय कुणाचा, पराभव कुणाचा हे न समजताच आपण आपल्या शत्रूला मारले या समाधानात धरतीमातेच्या कुशीत शिरले. मरणोपांत दुश्मनी संपली आणि म्हणून कदाचित दोघेही हातात हात घालून पुढल्या प्रवासाला निघाले असावेत .....अंतिम प्रवासाला!

दुसऱ्याच क्षणी 'सुभेदार पडले. तान्हाजी पडले.' ही बातमी कर्णोपकर्णी मावळ्यांना समजली. मावळ्यांचा धीर खचला. हात आखडला. जोर कमी झाला. जोश थंडावला. घाबरले. चला. चला. असे एकमेकांना म्हणत सारे पळत असताना त्यांना सामोरा आला तो सूर्याजी मालुसरे! तान्हाजीचा सख्खा लहाना भाऊ! मोठा भाऊ पडला म्हणून क्षणभर दुःखी झालेला परंतु दुसऱ्याच क्षणी सावरलेला, भावाच्या मरणाचे दुःख आत गिळून कर्तव्याला सामोरा जाणारा सूर्याजी पळणाऱ्या मावळ्यांना आडवा आला. अत्यंत त्वेषाने गरजला,"कुठे पळताय भ्याडांनो, तुमचा बाप, सुभेदार इथं मरुन पडलाय आणि तुम्ही पळताय? तान्हाजी- दादांना काय वाटेल याचा विचार केलाय? शिवाजीमहाराजांची शिकवण विसरलात? नायक पडला तरी हिंमत न हारता शत्रूचा मुकाबला करायचा हेच सांगतात ना महाराज आपल्याला? असे रणांगण सोडून कोण पळते? नामर्द पळतात. अरे, तान्हाजी पडला म्हणून काय झाले? प्रत्येकाने मी स्वतः तान्हाजी आहे असे समजून गनिमांना ठेचून काढा. 'जिंकू किंवा मरू' याप्रमाणे लढा." सूर्याजीच्या त्या बोलण्याने मावळ्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत फिरला.ते दुप्पट ताकदीने शत्रूवर तुटून पडले. यावेळी त्यांचा जोर गड तर घ्यायचाच परंतु सुभेदाराला मारणाऱ्या शत्रूचा बदला घ्यायचाय असा. त्या विचाराने मावळे दिसेल त्याला कापत सुटले. त्यांचा आवेश, जोम, शक्ती पाहून उदयभानाचे सैन्य घाबरले. आधीच उदयभान हा आपला किल्लेदार पडल्यामुळे त्यांचा शक्तीपात झाला होता परंतु तान्हाजीच्या मरणामुळे मावळे पळू लागले हे पाहून सुखावणारा शत्रू पुन्हा हवालदिल झाला. त्याच्या हातापायायील त्राण गेले. त्यांचा भीतीने थरकाप उडाला. अशा खचलेल्या, मनाने पराभूत झालेल्या शत्रूला संपवायला मावळ्यांना फारसा वेळ लागला नाही. एक मोठा विजय मिळाला. कोंढाण्यावर भगवा फडकला.…

तिकडे राजगड का झोपला होता? शिवराय जागे होते. राजगडावरून त्यांची नजर कोंढाण्यावर लागली होती. 'काय झाले असेल? कसे झाले असेल? मावळे सुखरुप असतील ना? तान्हाजी गड तर घेणारच पण कसा? समोर उदयभानासारखा किल्लेदार आहे. महापराक्रमी आहे तो. अर्थात तान्हाजी काही कमी नाही म्हणा. तो शेरास सव्वाशेर आहे. पण अजून गडावरून इशारा का होत नाही? काही गडबड तर नसेल ना?...' अशा विचारात असणाऱ्या शिवरायांना हवे ते दिसले. ते आनंदले. तरीही त्यांनी ते स्वप्नात नसल्याची स्वतःच खात्री करून घेतली. त्यांचा आनंद द्विगुणित झाला कारण कोंढाणा किल्ल्यावर दिसत असलेला जाळ तान्हाजी मालुसरे आणि मावळे जिंकले असल्याचे सांगत होता. मराठ्यांच्या विजयाचा प्रकाश सर्वत्र पसरत होता, आभाळाला कवेत होता.

राजगड आनंदी होता. शिवराय समाधानी होते. माँ जिजाऊ प्रचंड आनंदात होत्या. चार वर्षानंतर मिळालेला तो पहिला विजय शिवरायांसह रयतेला उत्साही करत होता. शिवराय गडावरुन येणाऱ्या निरोपाची वाट पाहत होते. तितक्यात सांगावा घेऊन घोडेस्वार आला. शिवरायांना मुजरा करून म्हणाला,"महाराज, काम फत्ते. कोंढाणा जिंकला. मुघल पळाला. उदयभान पडला...पण.."

"पण? पण काय? सांग लवकर." शिवरायांनी विचारले.

"महाराज, आपले सुभेदार... तान्हाजीही पडले..."

"काssय? तान्हाजी गेला..आम्हाला सोडून गेला? ....." असे विचारणारे शिवराय माँसाहेबांना म्हणाले, "ऐकले का आऊसाहेब, आपण गड जिंकला पण तान्हाजी नावाचा गड गमावला..."

शिवरायांना अतीव दुःख झाले........ परंतु पाठोपाठ एक आनंदी घटना घडली. शिवरायांच्या राणीसाहेब सोयराबाई यांनी एका पुत्राला जन्म दिला. सर्वत्र पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु त्याचबरोबरीने हलक्या आवाजात एक कुजबूज सुरु झाली की, 'राजपुत्र पालथा जन्माला आला.' सर्वांचे चेहरे काहीसे काळवंडले असताना शिवराय म्हणाले,

"राजपुत्र पालथा जन्माला आलाय हा शुभशकूनच आहे की, हा मोठा होऊन दिल्लीची पातशाही पालथी घालील, उलटवून टाकील. " ते ऐकून राजगड पुन्हा हसला. आनंदला. समाधान पावला..…

नागेश सू. शेवाळकर