Swaraja Surya Shivray - 24 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 24

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग चोविसावा

॥॥ एकानंतर एक.....॥॥

शिवरायांना राज्याभिषेक झाला. अत्युच्च आनंदाचा क्षण रयतेने अनुभवला. परंतु तो आनंद फार टिकला नाही. तो क्षण, स्वप्नपूर्तीच्या आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अत्यंत समाधानाने जिजाऊ माँसाहेबानी या जगाचा निरोप घेतला. लाडक्या शिवबाला दुःखाच्या महासागरात लोटून देत आऊसाहेब निघून गेल्या. शिवरायांच्या जीवनात माँसाहेबाचे स्थान काही वेगळेच होते. एक माता म्हणून, एक मार्गदर्शक, एक स्फूर्तीमय व्यक्तिमत्व, चैतन्यमयी माता इत्यादी अनेक भुमिकांमधून त्या शिवरायांना, मावळ्यांना सतत कार्यमग्न ठेवताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत कायम तेवत ठेवत होत्या. शिवरायांना अवर्णनीय असे दुःख झाले होते. परंतु त्यांना दुःख करायला वेळ तरी कुठे होता? स्वराज्याप्रती, रयतेपोटी असलेले कर्तव्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते, स्वस्थ बसता येत नव्हते. शिवरायांनी कठोरपणे दुःख बाजूला सारले.

शिवरायांनी एक गोष्ट हेरली की, आपल्या राज्याभिषेकाने जशी स्वराज्यातील काही मंडळी नाराज आहे तसेच काही शत्रूही नाराज आहेत. शिवरायांनी आपली दृष्टी मुघल साम्राज्याकडे वळवली. महत्त्वाचे म्हणजे आदिलशाहीकडून औरंगजेबाचा प्रमुख सरदार दिलेरखानाचा जबरदस्त पराभव झाला होता म्हणून चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरखानाला माघारी बोलावले आणि त्याच्या जागेवर बहादूरखान या सरदारास सुभेदार म्हणून दख्खनचा सुभा दिला. बहादूरखानाने पुण्याजवळ असलेल्या पेडगाव या ठिकाणी स्वतःची छावणी उभारली. तिथे त्याने एक किल्लाही उभारला आणि त्या किल्ल्याला स्वतःचेच नाव दिले...बहादूरगड! या बहादूर गडावर त्याने सोबत आणलेली प्रचंड धनदौलत, जडजवाहीर होते. हेरले. शिवाजी महाराजांनी आपले सावज हेरले. शिवरायांनी नवीन मोहिमेची सुरुवात बहादूरखान पर्यायाने औरंगजेबावर हल्ला करून करण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी त्यांनी काही प्रमुख सरदारांची नेमणूक केली. हे सरदार नऊ हजाराची फौज घेऊन निघाले. या सरदारांनी आपल्या फौजेची दोन गटात विभागणी केली. पहिल्या गटात दोन हजार सैनिक तर दुसरा गट सात हजार सैनिकांचा! सात हजार सैनिकांचा जो गट होता तो खानाच्या छावणीपासून थोड्याशा अंतरावर ठेवला. दोन हजाराची तुकडी खानाच्या छावणीवर चालून गेली. ही बातमी बहादूरखानास समजली. त्याने गडावर आणि छावणीत असलेले आपले सैन्य जमवले. वेळ न दवडता खानाचे सैन्य मराठी फौजेवर चालून आले. परंतु मावळ्यांना कुठे त्याच्याशी लढायचे होते. शिवरायांच्या शिलेदारांनी घाबरून पळत असल्याचे नाटक केले आणि तिथेच खान चक्रव्युहात सापडला. मराठे पळत होते. खान त्यांच्या मागावर होता. असे करता करता मराठा फौज पेडगावपासून पंचवीस कोस दूर पळवले.

जशी खानाची फौज मावळ्यांच्या पाठलागावर निघाली तसे सात हजार मावळे कार्यरत झाले. तेवढी मोठी फौज बहादूर गडावर चालून गेली. छावणीत किंवा गडावर होतीच अशी कितीशी फौज. त्या अत्यल्प शत्रूचा फडशा पाडून मावळ्यांनी तिथली सारी संपत्ती, धनदौलत, घोडे सारे सारे काही ताब्यात घेतले आणि लगोलग रायगडाकडे कुच केले. दोन हजार मराठी सैनिकांचा पाठलाग करून बहादूरखान आणि त्याची फौज थकली. मराठे आता आपल्या हाती लागत नाहीत हे जाणून खान बहादूर गडावर परतला. तिथे त्याच्यासाठी वाढून ठेवलेले 'ताट' पाहून त्याचे मस्तक गरगरू लागले.स्वतःच्या मुर्खपणाचा त्याला खूप राग आला. पण काही उपयोग नव्हता. शिवरायांनी त्याला चातुर्याने हातोहात फसवले होते. युद्ध न लढता त्याला चारीमुंड्या चीत केले होते. हाती लागलेला तो फार मोठा खजिना पाहून शिवराय अत्यंत खुश झाले होते. नवीन मोहिमेचा शुभारंभ दणदणीत झाला होता.

त्यानंतर शिवरायांनी आपले लक्ष इंग्रजांकडे वळवले. खानदेशातील धरणगाव येथे इंग्रजांची एक वखार होती. शिवराय धरणगावच्या दिशेने येत आहेत ही बातमी वखारदारांना समजताच त्यांचा थरकाप उडाला. या भागात कुतुबुद्दीनखान हा फौजदार काम पाहात होता. त्यालाही ती बातमी समजली. तसा तोही मनातून घाबरला परंतु तसे न दाखवता तो मावळ्यांना अडवायला चालून गेला. परंतु आडवा येईल त्याला आडवा करून पुढे जायचे ही नीती शिवरायांची असल्यामुळे त्या फौजदाराचा जबरदस्त पराभव करून त्याला पळवून शिवरायांचे शिलेदार वखारीवर चाल करून गेले. इंग्रजांकडून फारसा प्रतिकार झालाच नाही. वखारीत असलेला सारा माल मावळ्यांनी हस्तगत केला. फार मोठी रक्कम आणि ऐवज शिवरायांच्या हाती लागला.

मोहिमा, लढाया, तह हे सारे करीत असताना आदिलशाहीवर वचक बसावा, औरंगजेब काही महिने शांत बसावा यासाठी शिवरायांनी एक चाल खेळली. शिवरायांना फोंडा, कारवार ताब्यात घ्यायचे होते. औरंगजेबाचा एक सरदार बहादूरखान हा स्वराज्यावर फार मोठी चाल करण्याची तयारी करत असल्याची कुणकुण शिवरायांना लागली. शिवरायांनी बहादूरखानाशी आणि पर्यायाने औरंगजेबाशी नमते घेण्याचे ठरवले. त्यांनी बहादूरखानास पत्र लिहिले की, 'मी बादशहासोबत तह करु इच्छित आहे. मी माझ्या ताब्यातील सतरा किल्ले औरंगजेबाकडे सुपूर्त करायला तयार आहे. शिवाय माझा पुत्र हाही बादशहाकडे चाकरी करण्यासाठी तयार आहे...'

शिवरायांचे ते पत्र म्हणजे सरळसरळ शरणागती आहे असे समजून खान अतिशय खुश झाला. आपण शिवाजीच्या विरोधात काहीही केलेले नसताना शिवाजी शरण येत आहे. सतरा किल्ले घाबरून स्वाधीन करत आहे हा आपण मिळवलेला फार मोठा विजय आहे. मुघल दरबारासाठी ही आपण केलेली फार मोठी सेवा आहे. या तहाला औरंगजेबाची परवानगी मिळावी आणि महत्त्वाचे म्हणजे शिवाजी आपल्यामुळे शरण आला, सतरा किल्ले बहादूरखानाने मिळवून दिले हे समजताच बादशहा खूप खुश होईल आणि आपणास फार मोठे बक्षीस देईल या आशेने खानाने शिवरायांचे पत्र औरंगजेबाकडे रवाना केले. शिवराय जाणून होते की, आपण पाठवलेले पत्र औरंगजेबाच्या दरबारी जायला आणि त्याची परवानगी मिळायला अडीच-तीन महिने लागणार. या दरम्यान बहादूरखान शांत राहील आणि हा तह होतोय म्हणजे औरंगजेब-शिवाजी हा दोस्ताना आपल्याला भारी पडू शकतो या विचाराने आदिलशाही स्वस्थ बसेल हा त्या पत्रामागचा शिवरायांचा हेतू होता. झालेही तसेच. ही संधी साधून शिवराय फोंड्याच्या दिशेने निघाले. दुसरीकडे मावळ्यांनी कोल्हापूर जिंकून शिवरायांचा हेतू तडीस नेला. शिवरायांनी फोंडा किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदार महंमदखान किल्ला लढवत होता. दोन्ही बाजूंनी डाव-प्रतिडाव, चाली रचल्या जात होत्या. दरम्यान विजापूरहून महंमदखानाच्या मदतीला बहलोलखानास मोठी फौज देऊन पाठवले. अशी शक्यता गृहीत धरून शिवरायांनी आधीच एक योजना करून ठेवली होती. मिरजेपासून फोंड्याच्या वाटेवर असणाऱ्या डोंगरी रस्त्यावर मावळ्यांनी मोठ मोठी झाडे टाकून तो रस्ता बंद करून टाकला होता. शिवाय बहलोलखानाचे सैन्य पुढे येण्याचा प्रयत्न करु लागले तर त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी ठिकठिकाणी सैन्य लपवून ठेवले होते परंतु बहलोलखान पुढे आलाच नाही. तिथूनच मागे परतला. ही गोष्ट महंमदखानास समजली. तो हताश, निराश झाला. त्याचा फायदा घेऊन मावळे गडावर पोहोचले. स्वतः महंमदखान मावळ्यांच्या हाती लागला. फोंडा किल्ल्यावर भगवे निशाण फडकले.

पाठोपाठ शिवरायांनी कारवारसह अंकोला, शिवेश्वर आणि काद्रा या भागांवर चढाई करून हा सारा भाग स्वराज्यात समाविष्ट केला. अशाप्रकारे दक्षिणेकडील मोहीम यशस्वी झाली. यासोबतच कोकणचा भागही जिंकून शिवरायांनी फार मोठी बाजी मारली.

तिकडे शिवरायांचे ते पत्र औरंगजेबास मिळाले. मजकूर वाचून तो आनंदला. छत्रपती झालेल्या शिवाजीला शरण आणणे ही सोपी गोष्ट नाही. भल्याभल्यांना जे जमले नाही ते बहादूरखान या बहाद्दराने करून दाखवले म्हणून औरंगजेबाने त्यास एक हत्ती दिली. त्याचा सन्मान केला. औरंगजेबाच्या त्या कृपेने अत्यानंद झालेल्या बहादूरने शिवाजी महाराजांकडे एक वकील पाठवला. मोठ्या ऐटीत एक फर्मान पाठवून लिहिले की, बादशहाने तहास मान्यता दिली आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे सतरा किल्ले ताबडतोब आमच्या ताब्यात द्यावेत. ते पत्र वाचून शिवराय आपण खेळलेल्या चालीत बहादूरखानासह औरंगजेबही फसला हे जाणून मनोमन खूप खुश झाले. शिवरायांनी त्या वकिलाकडे विचारणा केली, 'तह कोणता? आम्ही तुमच्यासोबत तह का करावा? असा कोणता पराक्रम तुमच्या बहादूर नावाच्या बहाद्दराने किंवा औरंगजेबाने केला की आम्ही शरण यावे? जा. निघून जा. '

भयंकर अपमान पदरी घेऊन तो वकील बहादूरखानासमोर उभा राहिला. शिवरायांचा निरोप जशाच्या तसा ऐकविला. शिवाजीने आपणास मुर्ख बनविले ह्या जाणीवेने, झालेल्या अपमानाने त्याची मान खाली गेली. तो स्वतःवर खूप चिडला, रागावला, संतापला. पण काहीही उपयोग नव्हता. शिवरायांनी बाजी मारली होती, समोरासमोर कुस्ती न खेळता औरंगजेबाचा बहादूर चारीमुंड्या चित झाला होता.तिकडे हाआगळावेगळा परंतु दणदणीत पराभव औरंगजेबाच्या जिव्हारी लागला. त्याने सारा राग, संताप बहादूरखानावर काढला.......

सातत्याने चालणाऱ्या मोहिमा, त्याची आखणी, नियोजन, प्रत्यक्ष लढाया, कधी वेढ्यात अडकून पडणे, कधी वेढा घालणे तर कधी औरंगजेबासारख्या निर्दयी, क्रुर शत्रूला भेटायला जाऊन त्याच्या नजरकैदेत राहणे, तिथून सुटण्याची यशस्वी धडपड, प्रसंगी येणारी चिंता, राग, अगोदर पित्याचा मृत्यू, पत्नीचा मृत्यू आणि शेवटी माँसाहेबाचे निघून जाणे या सर्व गोष्टींमुळे शिवराय खूप थकले होते, मनाने आणि शरीरानेही. एकदा सातारा येथे असताना झालेल्या प्रचंड दगदगीने शिवराय आजारी पडले. झाले. कुणी, कशी, कुठून अफवा पसरविली कोण जाणे परंतु अफवा अशी पसरली की, शिवरायांचे आणि संभाजीराजांचे पटत नसल्यामुळे, त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होत असल्यामुळे संभाजीराजेंनी शिवरायांना... प्रत्यक्ष जन्मदात्या बापाला विष घालून ठार मारले. अफवा पसरायला वेळ कितीसा लागणार? ती बातमी ऐकून एकजात सारे स्वकीय, परकीय शत्रू आनंदले. त्या अफवा पसरवण्यामागे दुसरा हेतू असाही होता की, अशी खोटी बातमी पसरवून पिता-पुत्रामध्ये फुट पडावी. ही नीती इंग्रजांची असावी कारण अशा चाली खेळण्यात ते पटाईत होते. शेवटी अफवा ती अफवाच! असे अफवांचे पिक जास्त दिवस तग धरत नाही. परंतु जेवढे दिवस राहते तेवढे दिवस सणसणी पसरवते, होत्याचे न होते करून जाते. बातमी खोटी आहे हे ऐकून स्वराज्यात आनंद पसरला. तिथे शत्रूच्या गोटात भीतीचे काळे ढग जमू लागले. त्यांचे चेहरे काळवंडले. बायाबापड्या म्हणाल्या,'मझा राजा मरणाच्या दारातून परतला ग बाई. साक्षात दारी आलेल्या यमाला बी पळून लावल आपल्या राजानं '

काही दिवसात शिवराय आजारातून बरे झाले. पुन्हा स्वराज्याच्या कामात लक्ष घालू लागले.स्वस्थ बसणे त्यांना माहिती नव्हते. तिकडे औरंगजेबाने एक जबरदस्त, महत्त्वाकांक्षी अशी चाल खेळली. शिवरायांचा पराभव करायचा असेल तर काट्याने काटा काढण्याची जुनी चाल त्याने पुन्हा खेळली. एखादा मातब्बर मराठा शिवरायांवर सोडावा हा विचार तो करीत असताना एक नाव त्याच्यापुढे आले. तो काटा नव्हता ते एक महाअस्त्र होते, ठेवणीतले... अत्यंत निर्वाणीच्यावेळी बाहेर काढून शत्रूला नामोहरम करणारे, चितपट करणारे असे ते अस्त्र होते. त्याचे नाव..मुहम्मद कुलीखान! कोण बरे हा कुलीखान? स्वराज्याची नस नस ओळखणारा, स्वराज्याचा काना कोपरा डोळे झाकून ओळखणारा, शिवाजी महाराजांच्या सर्व चाली, डाव, गनिमीकावा सारे सारे काही जाणून असलेला, त्यांच्या साऱ्या डावपेचांना त्याच भाषेत देणारा उत्तर देणारा असा एक वीर औरंगजेबाने शोधून काढला... मुहम्मद कुलीखान! होय! शिवरायांचा एके काळचा जिगरी दोस्त, जीवाभावाचा सखा, फौजेचा सरसेनापती.... अगदी बरोबर! नेताजी पालकर! साधारण नऊ वर्षांपूर्वी शिवरायांच्या मदतीसाठी सैन्यासह वेळेवर न पोहोचल्याबद्दल शिवरायांनी सरसेनापती या पदावरून कार्यमुक्त केल्यानंतर शिवरायांची साथ सोडून आधी आदिलशाहीला जाऊन मिळालेला, मुस्लीम धर्म स्वीकारून मुहम्मद कुलीखान झालेला, औरंगजेबाच्या आश्रयाला गेलेला शूरवीर, मर्दमराठा आता आपल्या जिवलगाचा... छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड करायला,कधीकाळी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्वस्व देण्याची तयारी असलेला, स्वकष्टाने स्वराज्य स्थापन करण्यासाठी बहुमोल योगदान देणारा एक महापराक्रमी योद्धा त्याच स्वराज्याचा घास घेण्यासाठी येत होता. असेच प्रश्न नेताजी नव्हे कुलीखान यास पडत होते, सतावत होते. कुणाशी लढू मी? ज्याने घासातला घास दिला, भावाप्रमाणे प्रेम लावले त्या राजासोबत लढू? ज्या माऊलीने पुत्रवत माया केली, पाठीवर सदोदित आशीर्वादाचा हात ठेवला त्या माऊलीने पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा करु? कसे जाऊ? कोणत्या तोंडाने जाऊ? जाणे तर भाग आहे. बादशहाचा हुकूम मानावाच लागणार, पाळावाच लागणार. निघाला. शेवटी नेताजी पालकर निघाला. नेहमीच्या संशयी स्वभावाला औरंगजेब जागला. त्याने कुलीखानावर लक्ष ठेवण्यासाठी दिलेरखानाची नेमणूक केली. तीही मुख्य सरदार म्हणून आणि कुलीखान त्याच्या हाताखाली... फारतर सोबती! नऊ वर्षानंतर नेताजीने महाराष्ट्राकडे प्रयाण केले. पण त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते. विचारांचे काहूर माजले. जावे का महाराजांपुढे? स्वीकारतील का महाराज? घेतील का पुन्हा सामावून? काय म्हणतील? काय विचारतील? काय उत्तर देऊ? पटेल का त्यांना?अशा विचारांच्या वावटळीत सापडलेला नेताजी महाराष्ट्रात आला. त्या भूमीच्या दर्शनाने, स्पर्शाने तो हरखून गेला. त्याचा स्वाभिमान जागा झाला.त्याच्या अंतर्मनाने कौल दिला, आतला आवाज आला. ठरला. निश्चय झाला. जायचे. महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. ते देतील ती शिक्षा स्वीकारायची. शिवरायांनी देहदंडाचे प्रायश्चित्त सांगितले तरी ते निमुटपणे स्वीकारायचे.

एक निश्चय करून नेताजी पालकर.... मुहम्मद कुलीखान निघाला. दिलेखानाला सुगावा लागू न देता, त्याच्या छाताडावर पाय रोवून निघाला. शिवराय राजगडावर होते. कसलीही सुचना न मिळता, मनीमानसी नसताना अचानक नेताजी पालकर शिवरायांच्या समोर उभा राहिला. त्यांचे पाय धरून कदाचित असे म्हणाला असेल, "महाराज, चुकले माझे. पदरात घ्या. माफ करा."

छत्रपती शिवाजी महाराज! अनाथाचे नाथ! दीनदुबळ्यांचे कैवारी! आपल्या सख्याला, जीवलगाला कशी शिक्षा देणार? ज्याने खांद्याला खांदा लावून स्वराज्याच्या कामासाठी सर्वस्व दिले त्या मित्राच्या कळत नकळत घडलेल्या चुकीलाही प्रायश्चित्त होते. त्याप्रमाणे नेताजी पालकर पुन्हा विधियुक्त रीतीने, धर्मसंमत रीतीने पुन्हा स्वराज्यात आला. ही बातमी ऐकून तिकडे औरंगजेब चडफडला. परंतु काय करणार होता? पुन्हा एकदा शिवरायांनी औरंगजेबास आस्मान दाखविले होते...…

नागेश सू. शेवाळकर