Maitrin Part 1 books and stories free download online pdf in Marathi

मैत्रीण भाग १





मैत्रिण....

मैत्रिण... बराच दिवस विषय मनात रेंगाळत होता.
खुपदा अस वाचनात आलाय की, आयुष्यात एखादी तरी मैत्रीण ही असावीच. तिने आपल्याशी बोलाव,हसावं, उगाच चालावं, आपल्याला समजून घ्यावं.
अनेकांची मैत्रिण ही त्यांची बहीण असते. पण तिथेही मर्यादा येतातच की. आता आमचं म्हणाल तर मला ही अस वाटायचं की, आपल्याही आयुष्यात एखादी मुलगी मैत्रिण म्हणून असायला हवी. आता अस म्हणून मी माझ्या मित्रांना कमी लेखत नाही. जिवाभावाचे माझेही काही मित्र आहेत. पण एखादी मुलगी मला आवडली तर हे साले तिच्यावर लाईन मारतात. इतके ते बारा xxx {तीन फुल्यांचे} आहेत. मग अशा ठिकाणी एक मैत्रीण असणं नितांत गरजेचं असतं.
माझे काही मित्र असे आहेत की , त्यांच्या नोट्स त्यांच्या मैत्रिणी काढून देतात. एकदा सहज कट्ट्यावर बसलेलो असताना नित्याची मैत्रिण कट्ट्यावर आली आणि त्याच्याकडे एक वही देऊन गेली. मला आश्चर्य वाटलं. मी नित्याला विचारलं, " काय रे नित्या, काय दिल रे तिने." 

नित्या म्हणाला,  " वही "

मी म्हंटल " ते मला माहित आहे, कसली ते सांग."

तो म्हणाला, " अरे नोट्स आहेत. तो कामठे तुला माहीत आहे ना.  वर्गात आला ना... इतकं लिहून देतो, इतकं लिहून देतो की, बास रे बास. जस काय अख्या जगाचं लिखाण याच्या माथी मारण्यात आलेलं आहे आणि हा आपल्या कडून  पूर्ण करून घेतोय. "

कामठे सरांच्या नावाने नित्याने बराच वेळ बोटे मोडली.
मी म्हंटल, " पण त्याच इथं काय..?"

नित्या म्हणाला, " त्याच इथं काय म्हणजे ? एवढ्या नोट्स मी लिहितोय व्हय. वर्गात नुसता  टाइमपास करायचा. ही आपल्याला नोट्स लिहून देते नंतर.."

नित्याचा मला त्या वेळी प्रचंड हेवा वाटला. मी त्याला म्हणालो, " तुला आशा किती मैत्रिणी आहेत ?"

तो म्हणाला," ही धरून पाच. पाच जणींकडे पाच विषय दिलेले आहेत. आणि एक आपल्याकडे ठेवलाय."

मी आपसूकच म्हणालो, " कोणता..?"

"Account.." नित्या मोठ्या अभिमानाने म्हणाला.

"का... ? Account तुला फार आवडतो का..?"
' नाही ' हे माहीत असतानाही मी उगाच विचारलं.

तो म्हणाला, " काय... ढेकळ कळतंय व्हय आपल्याला त्यातलं. ?"

Real, Personal, Nominal, Debit, Credit, Assets , Liability यांच्या स्पेलिंग व्यतिरिक्त आपल्याला त्यातला काय बी येत नाय. पण मॅडम साठी जीव तुटतो रे.."

मी मोठया आतुरतेने विचारलं, " का..?"
तो म्हणाला , " अरे काय दिसतात राव मॅडम... त्या शिकवायला लागल्या की, मी पार हरवून जातो. एक दिवस तिला मैत्रिण बनवून नाही तिच्याकडून Account च्या नोट्स काढून घेतल्या ना...  नाव सांगणार नाही.. नितीन सरंजामे..!!!"

नित्याचे विचार ऐकून माझ्या डोक्याला मुंग्याचं यायच्या त्या बाकी होत्या.

मला त्याचा कायम हेवा वाटायचा. दिसायला तिडतीडीत... कुणी साधा हात जरी लावला तरी दहा फूट लांब पडेल एवढं बलदंड शरीर. रंग सावळा, डोक्याची केस रोज वेगवेगळ्या चित्र विचित्र स्टाईल ने नटलेली असायची. अंगात रंगेबिरंगी फुलांचा प्रिंटेड शर्ट, तसलीच लाल, निळी, पिवळी पॅन्ट. दिसायला एकदम जोकर दिसायचा. तरी याला एवढ्या मैत्रिणी कशा काय याच गुपित काय मला आजतागायत उमगलं नाही.

त्यांनंतर मलाही खुप वाटायला लागलं, नित्याला पाच पाच मैत्रिणी आहेत. आपल्याला किमान एक तरी हवी. पण मुलींशी बोलायचं कस, गैरसमज करून घेतला तर..? असे एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालू लागले.  पण मैत्रीण असायलाच हवी असा पक्का निश्चिय झाल्या नंतर मी ते सर्व गोंधळ बासनात गुंडाळून ठेवले.
कॉलेज नव्यानेच सुरू झाल्याने विशेष कोणाशी ओळख नव्हती. नितीन तेवढा दगडा पेक्षा वीट मऊ या भूमिकेत होता. नित्याला मी माझी व्यथा सांगितली. अश्मयुगातील माणसाने थेट कलियुगात जन्म घेतल्यावर ज्या विलक्षण दृष्टिकोनातून आपण त्याला पाहू त्याच दृष्टिकोनातून नित्या माझ्याकडे पाहत होता.  आणि मैत्रीण नसणे म्हणजे हे फार मोठं सामाजिक मागासलेपण आहे असं मला वाटायला लागलं.   हेच सामाजिक मागासलेपण राज्य मागास आयोगाच्या लक्षात आणून देऊन आरक्षण पदरात पाडून घ्यावं असा क्रांतिकारी विचार माझ्या मनात येऊन गेला. पण जे आरक्षण मागताहेत त्यांनाच आरक्षण मिळत नाही म्हणून मी माझी मागणी  तूर्तास बाजूला ठेऊन आपला नित्याकडेच पाठपुरावा सुरू केला.

मी म्हणालो, " नितीन तुला अरे पाच पाच मैत्रिणी आहेत. मला किमान एक तरी असावी अशी अपेक्षा आहे. मला काही तिच्याशी प्रेम वैगेरे करायचं नाही पण मैत्रिण असावी असं खुप वाटत. "
नितीन मनाशी कसला तरी निश्चिय करत उठला. माझ्या खांद्यावर हात ठेवत अत्यंत तळमळीने तो मला म्हणाला, " बस्स सम्या बस्स, तुझं दुःख मी माझ्या हृदयाच्या मंचकावर ठेवलं आहे. आता तुझं दुःख म्हणजे माझं दुःख. जो पर्यंत तुला मैत्रिण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.
आता एकच पक्ष... पोरींवर लक्ष...
सम्या... भेटली तुला मैत्रिण...
कारण विडा उचलतोय हा नितीन...!!!"

प्रत्येक शब्दा गणिक नित्याचा आवाज आकाशाशी स्पर्धा करत होता. त्यामुळे आजूबाजूचे प्राणी नक्की कोणत्या नजरेने आमच्याकडे पाहतायेत याची शहानिशा करण्यासाठी मी माझं लक्ष नित्यावरून इतरत्र हलवलं. तर एक सुखद धक्का बसला.

एक सुंदर मुलगी, रंग गोरा, बांधा सडपातळ, काळेभोर केस, हातात सोन्याचं ब्रेसलेट, पांढरा शुभ्र ड्रेस, पायात उंच टाचांचे सँडल.... ती आमच्या कडे पाहून हसली आणि तशीच गर्रकन मागे फिरली.. ती मागे फिरताच कोणीतरी  माझ्यावर फुलांचा वर्षाव करत असल्याचा  भास मला झाला. त्या नादमधुर वातावरणात असतानाच रेल्वेच्या भोंग्या प्रमाणे खेकसत नित्याने मला भानावर आणलं.

" अरे तिकडे कुठे पाहतोयस... आता लक्ष केंद्रित कर.... आपल्या ध्येया कडे पहा. आपल्याला मैत्रिण मिळवायचिये...!! चल आज पासून तुझा मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू.."
नित्याचा तो उत्साह पाहून मला एकदम कांदा-पोह्याच्या कार्यक्रमाची आठवण झाली. मला मैत्रीण मिळवून देण्याच्या नादात हा माझं लग्नच लावून देतो की काय असं मला वाटायला लागलं.

दोन तीन दिवस असेच मुली पाहण्यात गेले. पहिल्या मुलीशी बोलताना नित्याने थोडी डेरिंगच दाखवली.  कारण, नित्याच्या चावटपणा मुळे तिने त्याच्या खाडकन कानाखाली वाजवली. त्याची गुंज अख्या कॉलेज भर गेली. माझ्या हातातली पुस्तके थरथरली.
मुलगी तर निघून गेली पण नित्या तसाच उभा होता.
आता मात्र नित्या हा कार्यक्रम सोडून देईल आणि तु तुझं बघ अस म्हणून निघून जाईल म्हणून मीच त्याला म्हंटल, " जाऊदे नितीन, आपण हे सोडून देऊ, नको मला मैत्रिण नाही जमणार आपल्याला.."

ज्या गालावर गणपती विराजमान झाला होता त्या गालावर हात चोळत चोळत नित्या म्हणाला,
" नाही जमणार हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाहीये.  अरे भल्या भल्या क्रांतीकारकांना अन्याय अत्याचार सहन करायला लागला, तिथे हम किस झाड की पत्ती है । असले अत्याचार हे सहन करावेच लागतील त्या शिवाय की काय क्रांती घडणार आहे..? हे मुला, तु तुझं लक्ष तुझ्या लक्ष्यावर केंद्रित कर. तुला मी मैत्रीण मिळवून देणारच...!!!"

नित्याचा तो आवेग पाहून माझ्या हातातली पुस्तके आता न थरथरताच खाली पडली. त्या पुढे नतमस्तक होऊन त्याच दर्शन घ्यायचंच काय ते मी बाकी ठेवलं होतं.

दोन तीन दिवस आम्ही बऱ्याच हाल अपेष्टा सहन केल्या. नित्याने माझ्यासाठी तीन चार मुलींच्या कानठळात खाल्या. एवढं करून शेवटी नित्याने माझ्या साठी एक मुलगी शॉर्टलिस्टेड केली. नित्या आज तिची आणि माझी भेट करून देणार होता.
आम्ही कट्ट्यावर तिचीच वाट पाहत बसलो होतो. तेवढ्यात ती आली. तिला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
ती अतिशय स्टाइलिश मुलगी होती. ती समोरून चालत येत होती. बऱ्याच नजरा तिच्यावर खीळल्या होत्या. नित्या तिला सामोरा गेला. तिचा हात थेट हातात घेत तो म्हणाला, " Hey , Jenny you looooking very gorgeous and pretty, you know..!!"

" I know..!!" ती मोठ्या तोऱ्यात म्हणाली.

कारण ती सुंदर होती का हा प्रश्न मला पडला होता.
चेहऱ्यावर दोन तीन कंपन्यांचे क्रीम व्यवस्थित लपले होते. केस कुरळे आणि चिमणीच्या घरट्यागत दिसत होते. कपडे घातलेच कशाला असा प्रश्न ही ती'कडे पाहुन पडत होता. तिची ती पांढरी फटक देहयष्टी नित्याला कुठल्या अँगलने सुंदर दिसत होती कोण जाणे.

नंतर दोघेही माझ्याकडे वळले. नित्या तिच्याशी माझी ओळख करून देऊ लागला. तेवढ्यात ' ती ' मुलगी जी माझ्याकडे आणि नित्याकडे पाहून हसून निघून गेली होती ती मला दिसली. तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि हलकस स्मित करून पुढे निघून गेली.   माझं नित्या आणि जेनीबाई वरच लक्ष हललं आणि मी तिच्या मागे मागे जाऊ लागलो.  मला जाताना पाहून नित्याही माझ्या मागे येऊ लागला. कुठे निघालास म्हणून विचारू लागला मी तसाच पुढे पुढे जाऊ लागलो.
ती लायब्ररीत गेली. मीही लगबगीने लायब्ररीत गेलो. आणि ती एकदम माझ्या समोर उभी राहिली. मी पार हरवून गेलो, मनात आलं मैत्रिण असावी तर अशी.......

थोडा वेळ तसाच गेला. नंतर ती म्हणाली, " Hi"
तिच्या इतकाच तिचा आवाजही कोमल आणि सोज्वळ होता. तो कानातून थेट काळजात घुसला. तिचं Hi ऐकून मला काय बोलाव तेच समजेना.
आणि मी नकळत बोलून गेलो, "Bye"

आणि ती खुदकन हसली. 

Hi ला bye च उत्तर दिल्यामुळे ती हसली होती.  माझी उडालेली धांदल नित्या पाहतच होता. तो पुढे होऊन म्हणाला, " Hi... मी नितीन आणि हा समीर"

ती नित्याला म्हणली, " तु फार फनी दिसतोस रे.."
नित्या मोठ्या मोठ्याने  हसायला लागला . नित्याला त्याची तारीफ आवडली होती.  मी अजुनही तिच्या कडेच पाहत होतो.

ती माझ्याकडे पाहत म्हणाली,  " समीर रिलॅक्स.. एवढा काय हायपर होतोस. मी मुलगी आहे कोणी डायन नाही..."
आणि तिने भोssss अस केलं. आणि पुन्हा हसली.

मग मी थोडा शांत होत तिला म्हणालो,
"  Hi.... ते एकदम तु बोललीस म्हणून कस रियाक्ट व्हावं तेच समजलं नाही. By the way तुझं नाव काय..?"

" मी स्नेहा.. मला वाटत आपण मित्र व्हायला काहीही हरकत नाही. "
अस म्हणत तिने तिचा हात माझ्या समोर केला आणि म्हणाली, "Friends...?"

मी ही हातात हात देत म्हणलो, " Friends..!!!"

नित्या हे पाहत होता. आमच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला," मलाही घ्या ना तुमच्यात."

आम्ही हो म्हणत खळखळून हसलो.
त्या वेळी लायब्रेरियन डोळे वटारून आमच्याकडे पाहत असतानाचा सीन मला चांगलाच आठवतोय.
तेवढ्यात बेल वाजली आणि आम्ही क्लास च्या दिशेने वळलो.
नित्या भलताच खुश होता. स्नेहा आनंदी वाटत होती. मी सुखावलो होतो. कारण मला मैत्रिण मिळाली होती....

पण एका भेटीत ती मला समजली होती का ?
हाच प्रश्न मनात ठेवून मी ती'कडे पाहिलं,  ती आणि नित्या खळाळून हसताना मला दिसले, भलतेच सुंदर दिसत होते ते...!!!

क्रमश.....

----------------------------------- सत्यशामबंधु