Hich Khari kartvyanishtha books and stories free download online pdf in Marathi

हीच खरी कर्तव्यनिष्ठा...

... हीच खरी कर्तव्यनिष्ठा.... 

   "" आई, गरमागरम पोहे खाऊन घे बरं. तुझ्यासाठी पोह्यांची डिश टेबलवर ठेवली आहे. " असं म्हणत स्वप्नालीने तिच्या आईला आवाज देऊन सांगितले व एका हाताने घाईघाईत स्वतः पोहे खाता खाता ती दुसर्‍या हाताने स्वतःचा टिफिन बॉक्स भरु लागली. स्वप्नालीची अशी रोजचीच सकाळी आॅफिसला जाण्याची घाई असायची. दिसायला सुंदर व नाजुक अशी स्वप्नाली थोडीफार जरी नटली तरी अफलातून सुंदर दिसायची. आकर्षक डोळे व बांधेसूद शरीर असलेली स्वप्नाली जणू एक स्वप्नपरीच दिसायला होती. स्वप्नालीचे वडिल ती वयाची तेरा वर्षांची असतानाच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते. त्यानंतर स्वप्नालीला तिच्या आईनेच काम करुन मोठे केले व ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवले. एकदा कामावरून घरी परतत असताना स्वप्नालीच्या आईचा अपघात झाला व त्या अपघातात तिची आई दोन्ही पाय गमावून बसली.
            नुकतंच ग्रॅज्युएशन झालेल्या स्वप्नालीवर खूपच लहान वयात अपंग आईची व संपूर्ण घराला सांभाळण्याची जबाबदारी पडली. स्वप्नालीला एका आॅफिसमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली. दोघी मायलेकींचा खर्च निघून वरती थोडेफार पैसे शिल्लक राहतील अशा पगाराची नोकरी असल्याने स्वप्नालीने ती नोकरी टिकवून ठेवली होती. खरंतर सकाळी आठ वाजताच आॅफिसमध्ये पोहोचावे लागायचे पण पगार बऱ्यापैकी होता म्हणून स्वप्नाली घरातील सर्व आवरुन  सकाळी आठ वाजताच आॅफिसमध्ये हजर राहायची.
           इतक्या जबाबदाऱ्या सांभाळताना ही स्वप्नाली हसतमुख असायची. बाॅसने सांगितलेले सर्व काम ती वेळेत पूर्ण करायची. आॅफिसमध्ये ही कोणाचे पेंडिंग काम असले की त्यांना ही कामात मदत करायची. अशी कामात तत्पर असणारी व मनमिळाऊ असणारी स्वप्नाली सर्वांची आवडती होती.
          एकदा स्वप्नालीचे बाॅस काही कामानिमित्त बाहेरगावी आठ दिवस गेल्याने आॅफिसमधील जबाबदारी तिच्यावर टाकून गेले. त्याच कालावधीत समीर  मुंबईत नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या उद्देशाने आपल्या काकांना भेटण्यासाठी त्यांच्या आॅफिसमध्ये आला होता. समीरचे काका म्हणजे स्वप्नालीचे बाॅस. बाॅसच्या म्हणजेच आपल्या काकांच्या गैरहजेरीत खूपच छान प्रकारे काकांचे आॅफिस सांभाळणारी स्वप्नाली समीरच्या मनात घर करुन गेली . तो जणू काही क्षणातच तिच्या प्रेमातच पडला. तिच्या बोलण्याचा, तिच्या वागण्याचा तो दिवसभर विचार करत राहिला. स्वप्नाली बरोबरचा फक्त एक तासाचा सहवास... पण स्वप्नालीची आठवण त्याचा काही पीछा सोडेना. आपल्या जीवनात जर ही आपली जीवन संगिनी बनून आली तर हा विचार त्याच्या मनात आला व आठ दिवसानंतर पुन्हा तो काकांच्या आॅफिसमध्ये गेला. 
          त्यादिवशी तर त्याची नजर स्वप्नालीहून बिलकुल हटेनाच. फिक्कट निळ्या रंगाची साडी नेसलेली स्वप्नाली अतिशय सुंदर दिसत होती. केसांमध्ये माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याच्या सुगंधाने त्याला वेडावून टाकले होते. स्वप्नालीच्या डोळ्यातील काजळ त्याच्या ह्रदयाला घायाळ करीत होते व अशातच समीरचा स्वतःवरचा ताबा सुटला अन् त्याने भर आॅफिसात काकाच्या समोर स्वप्नालीला "माझ्याबरोबर लग्न करशील का? असे विचारले. 
           स्वप्नाली समीरच्या या आकस्मिक प्रश्नाने पुरती गोंधळून गेली. तिला काय बोलावे हेच सुचेना. तिने आतापर्यंत कधी लग्नाचा विचार ही केला नव्हता. लग्न केल्यावर आईकडे कोण बघणार म्हणून तिच्या मनाला लग्नाचा विचार कधीच शिवला नव्हता. थोड्या वेळाने ती भानावर आली व तिने लग्नासाठी नकार दिला. समीरने व काकाने स्वप्नालीला लग्नास नकार देण्याचे कारण विचारले. स्वप्नालीने तिच्या घरातील परिस्थिती व अपंग आईचा सांभाळ ती कशाप्रकारे करते हे सर्व सांगितले. लग्नानंतर तिच्या आईचा ही सांभाळ करण्याचे आश्‍वासन समीरने स्वप्नालीला दिले. स्वप्नालीचा आनंद गगनात मावेनासा झाला व आईच्या संमतीने ती लग्न करण्यास तयार झाली.
          समीर दिसायला खूपच रुबाबदार होता. त्याचे आईवडील पुण्यात असायचे. समीरचे आॅफिस नव्यानेच मुंबईत सुरु झाल्याने त्याने मुंबईतच बंगला घेतला होता. आईवडिलांना एकुलता एक असल्याने त्याला कशाचीही कमतरता नव्हती. स्वप्नाली बरोबर लग्न झाल्यावर स्वप्नाली, तिची आई व समीर असे तिघे बंगल्यात राहू लागले. समीरने स्वप्नालीला काकाच्या इथली नोकरी सोडायला सांगितली. आता स्वप्नाली समीरला त्याच्या बिझनेसमध्ये मदत करु लागली. 
           नव्याचे नऊ दिवस गेल्यावर समीरने आपले खरे रुप दाखविण्यास सुरुवात केली. तो स्वप्नालीला तिच्या आईवरुन त्रास देऊ लागला. त्यांना वृद्धाश्रमात ठेवू या असे टुमणं स्वप्नालीच्या मागे त्याने लावलं. स्वप्नाली या गोष्टीला तयार होईना. त्यामुळे ती अस्वस्थ बेचैन राहू लागली. आईला हळूहळू परिस्थिती समजू लागली पण तिने स्वप्नालीला त्रास होईल म्हणून काहीच कळू दिले नाही. पण लेकीच्या सुखासाठी काय करावं हे तिला समजेनाच. एके दिवशी दुपारनंतर स्वप्नाली एका मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. तिला रात्री घरी परतायला उशीर होणार होता. संध्याकाळी समीर आॅफिसमधून घरी आला. 
             स्वप्नालीच्या आईने त्याला बोलावून घेतले व सांगितले की, "मला इथे जावयाच्या घरी राहणे योग्य वाटत नाही. इथे माझी खूपच घुसमट होत आहे. मला कुठेही एखाद्या अनाथालयात किंवा वृद्धाश्रमात सोडून द्या." हे ऐकताच समीरला मनातून अतिशय आनंद झाला. पण वरवर त्याने नकार देऊन स्वप्नालीला वाईट वाटेल असे सांगितले. स्वप्नालीच्या आईने समीरला हात जोडून विनंती केली की स्वप्नाली घरी परत येण्याच्या आधी मला कुठेही सोडून या. 
           समीरने स्वप्नालीच्या आईला एका वृद्धाश्रमात सोडले व स्वप्नाली घरी परत येण्याच्या आधी तो ही घरी परतला. रात्री जेव्हा स्वप्नाली घरी पोहोचली तेव्हा तिने आईची खोली रिकामी पाहिली. आईला सर्व खोल्यांमध्ये शोधले. आई... आई... म्हणून जीवाच्या आकांताने हाका ही मारल्या. ती वेडीपिशी होऊन समीरला आई कुठे आहे म्हणून विचारू लागली. समीर तिला म्हणाला की आई सुखरूप आहे. तिला मी एका वृद्धाश्रमात सोडून आलोय. हे ऐकताच तिचे हातपाय गळाले व समीरला म्हणाली की, "आत्ताच्या आत्ता मला माझ्या आईकडे घेऊन चल समीर. मी आईशिवाय जगूच शकत नाही." समीर स्वप्नालीला वृद्धाश्रमात आईकडे घेऊन गेला. 
           स्वप्नाली आईला पाहताच तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडायला लागली. तिचे अश्रू थांबायचे नाव घेतच नव्हते. थोड्यावेळाने ती स्थिरस्थावर झाली व तिने उठून आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून समीरच्या हातावर टेकवले व त्याला सांगितले की, "समीर, मला आईशिवाय या जगात कोणीही प्रिय नाही. मी वडिल वारल्यावरच आईची मरेपर्यंत जबाबदारी स्वीकारली होती. ती माझी जबाबदारी मी अशी अर्धवट सोडू शकत नाही. म्हणून मी आईला घेऊन आमच्या घरी जात आहे. मी व माझी आई सुखात एकत्र राहू. तूला आईवडिल या नात्याची कदर नाही. ज्या व्यक्तीला आईच्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीबरोबर मी संसार करु शकत नाही. 
            स्वप्नालीने आईला बरोबर घेतले व ती तिच्या घरी निघाली व समीर तिच्या पाठमोर्‍या मुर्तीकडे शून्य नजरेने पाहतच राहिला..... 

.... © सौ. गीता विश्वास केदारे..... 
              मुंबई