Pathlag - 14 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग – (भाग-१४)

जेंव्हा दीपक आणि स्टेफनी दिल्लीला जायची तयारी करत होते तेंव्हाच युसुफ कोणाशीतरी बोलण्यात मग्न होत. युसुफचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. नकळत तो हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत होता. त्याच्या समोर बसलेली व्यक्ती मात्र कमालीची शांत होती. डोळ्यावर गॉगल असला तरीही त्या व्यक्तीची रोखलेली नजर युसुफला अस्वस्थ करत होती.

“गुड वर्क युसुफ़.. “, बऱ्याच वेळाच्या शांततेनंतर ती व्यक्ती म्हणाली
“थॅक्यू जॉनी भाय… “, युसुफ
“थोडीपण होशियारी दाखवायची नाय कळला ना? माझा नेम कधीच चुकत नाही, माहितेय तुला~..” जॉनी
“नाही भाई, तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल सगले… “, युसुफ

“चल निघ आता, तुझी जरूर पडली कि परत तुला बोल्वेन…”, जॉनी
“भाई एक विचारू?”, युसुफ
“……”
“भाई, दिपकला टपकावणे काहीच अवघड नाही…. मग हा उंदीर मांजराचा खेळ कश्यासाठी?”, युसुफ

“दिपकला मारायचे तर आहेच…. पण इतक्या सहजी नाही… तडपावून मारणार त्याला…. आगे आगे देखो होता है क्या. फक्त तू मला साथ दे…. आणि एक लक्षात ठेव, जर का दीपकला सावध करायचा प्रयत्न केलास… तर परिणाम तुला ठाऊक आहेत….”, जॉनी
“हो भाई..”, उदासपणे युसुफ म्हणाला..


दिपक दिल्ली स्टेशन वर उतरला तश्या त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. २ वर्षांपूर्वी २६ जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्याची त्याला संधी मिळाली होती. राष्ट्रपतींना मानवंदना देताना, फडकणाऱ्या तिरंग्याला सलाम करताना त्याचा उर भरून आला होता

आज मात्र तो दिल्लीमध्ये परत आला होता ते कायद्याची लेखी असलेला एक गुन्हेगार म्हणुन.

दिल्ली मेट्रो स्टेशन नेहमीप्रमाणे माणसांनी खचाखच भरलेले होते. कामावर जाणारी नोकरदार मंडळी, शाळा-कॉलेजसाठी धावणारा विद्यार्थी वर्ग, कंत्राटी कामगार, बिझीनेसमन्स, सेल्समन्स आणि अनेकजण त्या गर्दीचा घटक होते. तुरुंगातुन पळाल्यानंतर दिपक प्रथमच असा उघड्यावर येत होता. त्याच्या मनामध्ये धाकधुक चालु होती. कोणी ओळखले तर? पोलिसांनी पकडले तर. दचकत सावकाशपणे तो एक एक पाऊल टाकत होता.

पण त्या गर्दीच्या लेखी दिपक असाच कोणी एक व्यक्ती होता. कित्तेक लोक त्याला बाजुला ढकलुन पुढे गेले. समोरुन येणारे अनेकजण त्याला धडकुन निघुन गेले. दिपकच्या अस्तीत्वाची दखल घेणारे तेथे कोणीच नव्हते.. निदान त्याच्या मताप्रमाणे तरी….

स्टेशन शेजारीच असलेल्या एका साध्याश्या हॉटेलं मध्ये त्याने मुद्दामच दोन वेगवेगळ्या खोल्या घेतल्या. दिपक-स्टेफनीमध्ये जे काही नातं होतं ते चार भिंतींच्या आड होते. दिपकला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. समाजाच्या दृष्टीने दोघंही मालक आणि नोकर होते आणि दोघांचेही एकाच खोलीत रहाणे, ते सुध्दा मालकाचा मृत्य झाल्याची बातमी कळाल्यावर.. म्हणल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असत्या.

रूमवर सामान ठेऊन दिपक स्टेफनीला घेऊन तडक पोलिस स्टेशनला गेला.

गेल्या ३ दिवसात त्याने आपला प्लॅन पुन्हा पुन्हा स्टेफनीला समजावून सांगितला होता. कोठेही चूक होऊन चालणार नव्ह्ते.

थोड्याच वेळात दिपक आणि स्टेफनी सब-इन्स्पेक्टर त्रिपाठींसमोर बसले होते. ठरल्याप्रमाणे स्टेफनीचे रडुन लालसर झालेले डोळे अश्रुंनी डबडबलेले होते. केस विस्कटलेले होते.

दिपकने आपल्याजवळील ‘त्या’ बातमीचे प्रिंटाऊट त्रिपाठींसमोर धरले.

“मी.. मी ओळखतो ह्यांना…”, बातमीमधील फोटोवर बोट ठेवत दिप‍क म्हणाला..
त्रिपाठी मख्ख चेहर्‍याने दिपककडे बघत होते.

“ह्या स्टेफनी परेरा, थॉमससरांच्या पत्नी…”, स्टेफनीकडे बोट दाखवत दिपक पुढे म्हणाला.

त्रिपाठींनी एकवार स्टेफनीकडे कटाक्ष टाकला आणि मग ते दिपकला म्हणाले.. “आपण??”

“मी.. मी दिपक.. सरांबरोबर त्यांच्या हॉटेलमध्ये काम करतो.. ही बातमी वाचली तसे आम्ही धावत इकडे आलो…..”

“बॉडी एकदा आयडेंटीफाय करुन घ्या..मग आपण बोलु.. चला माझ्याबरोबर..”, असं म्हणुन त्रिपाठी उठुन बाहेर पडले.

दिपक आणि स्टेफनी मागोमाग त्यांच्या जिपमध्ये जाउन बसले. ठरल्याप्रमाणे स्टेफनी सतत नाकाला आणि डोळ्याला रुमाल लावुन रडण्याचे सोंग करत होती.

काही वेळातच त्रिपाठी त्या दोघांना घेऊन सरकारी शवागरात गेले. बाहेरच्या रजिस्टरवर सह्या वगैरे करण्याचे सोपस्कार पार पडल्यावर तिघंही जण त्या अंधार्‍या, थंडगार शवागरात शिरले.

त्रिपाठींनी एकवार हातातल्या कागदावरील क्रमांक पाहीला आणि ते जिथे बॉडी ठेवली होती तेथे गेले. एकवार त्यांनी दिपक आणि स्टेफनीकडे पाहीले आणि मग मयताच्या चेहर्‍यावरील कापड बाजुला केले. चेहरा दृष्टीस पडताच स्टेफनीने टाहो फोडला, तर दिपक भुत बघीतल्यासारखा थिजुन जागच्या जागी उभा राहीला.

त्रिपाठी प्रश्नार्थक नजरेने दिपककडे पहात होते. दिपकने एकदाच होकारार्थी मान हलवली आणि तो स्टेफनीला घेउन बाहेर पडला.

त्रिपाठींनी काही जुजबी सुचना बाहेरच्या सिस्टरला दिल्या आणि ते जिपमध्ये येऊन बसले. काही वेळातच तिघेही पुन्हा पोलिस स्टेशनला पोहोचले. जिपमध्ये कोणीच कुणाशी बोलले नाही.

“नक्की काय झालं? कश्यामुळे अपघात झाला?”, दिपकने विचारले..
स्टेफनी अजुनही फुसफुसतच होती.

“एका खाजगी बसची धडक बसली. दवाखान्यात जाईपर्यंत त्यांचे निधन झाले होते..”, त्रिपाठी म्हणाले.
“….”
“नक्की कधी आले होते थॉमस दिल्लीला? त्यांच्याबरोबर आणखी कोणी होतं? आणि कुठल्या हॉटेलमध्ये उतरले होते?”, त्रिपाठी
“साधारण मागच्या सोमवारी.. ८-१० दिवस झाले त्यांना.. एकटेच आले होते.. हॉटेल!.. काही कल्पना नाही कुठल्या हॉटेलमध्ये उतरले होते..”, दिपक

“हम्म.. त्यांची काही मौल्यवान वस्तु वगैरे बरोबर होती? कारण आम्हाला आयडेंटीफाय करता येईल असे काहीच त्यांच्याकडे मिळाले नाही..”, त्रिपाठी.

“हो म्हणजे निदान मोबाईल, पाकीट, थोडेफार पैसे, घड्याळ…”, दिपक
“नाही, त्यांच्या अंगावर तसे काहीच नव्हते… पण तुम्हाला हरवलेल्या वस्तुंची तक्रार नोंदवायची असेल तर…”, त्रिपाठी.
“नाही.. त्याची काहीच आवश्यकता नाही. सरच जर आमच्यात नाही राहीले तर त्यांच्या वस्तु काय कामाच्या..”, निराशेच्या स्वरात दिपक म्हणाला.

काही क्षण शांततेत गेले…

“बरं बॉडी आम्हाला परत कधी मिळेल?”, दिपक
“मी फॉर्मालिटी कंम्प्लिट करायला सांगीतले आहे.. तो पर्यंत तुम्ही थॉमस ह्यांचे काही आयडेंटीफिकेशन प्रुफ दिलेत तर बरं होईल… नाही म्हणजे मी समजु शकतो ही योग्य वेळ नव्हे.. पण सरकारी कागदोपत्र.. तुम्हाला माहीती आहेच…”, त्रिपाठी..

“सरांचे ड्रायव्हिंग लायसन्स, ए.टी.एम. कार्ड, पॅन कार्ड वगैरे त्यांच्याबरोबरच त्यांच्या पाकीटात होते.. त्यामुळे सध्यातरी आमच्याकडे काहीच नाही…”, दिपक

“पण त्याशिवाय बॉडी देता येत नाही..”, त्रिपाठी म्हणाले..
“हो मला कल्पना आहे त्याची.. पण आमचा नाईलाज आहे.. डुप्लीकेट्स काढायचे म्हणले तरी महीना जाईल…”, दिपक म्हणाला..
“तुम्हा दोघांव्यतीरीक्त अजुन कोणी बॉडीची ओळख पटवु शकेल…?”, त्रिपाठी..
“हा.. कोल्हापुर डीस्ट्रिक्टचे कमीशनर कदम सरांच्या चांगल्या ओळखीचे होते.. तुमच्याकडे त्यांचा नंबर असेल तर तुम्ही फोन करुन सरांचे वर्णन विचारु शकता..”,दिपक म्हणाला..

“हरकत नाही…”, त्रिपाठींनी हवालदाराला कमीशनर ऑफ कोल्हापुर डिस्ट्रीक्टचा फोन नंबर लावुन द्यायला सांगीतले..

कमीशनर कदम हे जसे थॉमसच्या चांगल्या ओळखीतले होते तसेच ते स्टेफनीच्याही ओळखीचे होते. मादक शरीराच्या स्टेफनीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच एक सॉफ्टकॉर्नर होता.

“हॅलो?? कदम सर?”, त्रिपाठींनी विचारले..
“येस्स..”, पलीकडुन एक भारदस्त आवाज आला..

“सर, मी सब इन्स्पेक्टर त्रिपाठी बोलतोय, दिल्ली पोलिस..”
“येस्स बोला…”
“सर… आपण मि.थॉमस परेरा ह्यांना ओळखता का? गोकर्ण मध्ये एक हॉटेल आहे त्यांचे..”
“येस्स.. ओळखतो.. का? काय प्रॉब्लेम झाला??”
“प्रॉब्लेम नाही सर.. अ‍ॅक्च्युअली, त्यांचा दिल्लीत एक अपघाती मृत्य झालाय..”
“व्हॉट? आर यु शुअर??”,

“सर त्यांच्या पत्नी स्टेफनी इथे बसल्या आहेत.. सर मयताच्या बॉडीवर ओळख पटवणारे आम्हाला काहीच सापडले नव्हते म्हणुन आम्ही लावारिस शव म्हणुन एक जाहीरात दिली होती पेपरमध्ये.. ती पाहुनच त्या इथे आल्या आहेत….”
“ओह माय गॉड.. प्लिज त्यांना फोन द्या…”

“हॅलो सर… “, स्टेफनीने शक्य तितक्या रडवेल्या आवाजात फोन घेतला…
“आय एम सो सॉरी स्टेफनी.. फार दुर्दैवी घटना आहे ही..”, कदम..
“येस्स सर.. सर एक तुमच्याकडुन फेव्हर हवी होती…”
“हो. बोला ना.. काय मदत करु शकतो मी…”
“सर.. थॉमसचे आयडी प्रुफ आत्ता आमच्याकडे काहीच नाहीये.. आणि त्या शिवाय बॉडी सुध्दा मिळणार नाही.. काय करु शकतो सर…”
“हम्म.. एक काम करा तुम्ही त्रिपाठींना फोन द्या.. मी बोलतो त्यांच्याशी….”

स्टेफनीने फोन त्रिपाठींकडे दिला..

“येस्स सर..”, त्रिपाठी
“हे बघा त्रिपाठी.. मी थॉमस ह्यांना चांगले ओळखतो. चांगलाच जाडजुड बांधा.. भले मोठ्ठे पुढे आलेले पोट, तुरळक केसांचे टक्कल असा काहीसा त्यांचा बांधा होता.. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फारसे खोलात न शिरता बॉडी त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करावीत..”

“पण सर.. कायद्यानुसार.. आपल्याला काही तरी प्रुफ असणं आवश्यक आहे नाही का?? अगदी सरकार मान्य नसले तरी त्यांचा एखादा घरगुती फोटो सुध्दा चालु शकेल मला..”

“त्रिपाठी.. आता तुमच्यासारखे सब-इन्स्पेक्टर कमीशनरना कायदा शिकवणार का? अहो डेड बॉडी घेऊन ते काय पैसे कमावणारे वाटले का तुम्हाला? तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा.. मी दिल्ली कमीशनरशी बोलुन घेतो हवं तर..”, कदम काहीश्या रागीट स्वरात म्हणाले..

“स्वॉरी सर..काही हरकत नाही.. मी बॉडी द्यायची व्यवस्था करतो..”, त्रिपाठी..
“गुड.. जरा फोन त्यांच्या पत्नीकडे द्या…”

त्रिपाठींनी फोन स्टेफनीकडे दिला..

“हे बघा स्टेफनी.. मी त्रिपाठींशी बोललो आहे.. ते बॉडी तुम्हाला देतील.. परत काही अडचण आली तर मला नक्की फोन् करा.. थॉमससाठी आणि तुमच्यासाठी मी एव्हढे नक्की करु शकेन..”

“थॅक्यु सर…”, स्टेफनी म्हणाली.. “सर थॉमसची बॉडी आम्ही परत तिकडे नाही आणत.. आधीच ८ दिवस ती शवागरात पडुन होती.. इतके लांबचे अंतर मृत शरीर घेउन करायचे.. मला शक्य नाही सर…”

“ओह येस.. बाय ऑल मिन्स.. तुमची जी इच्छा असेल ती.. काही मदत लागली तर नक्की कळवा .. ओ.के?? काळजी घ्या.. भगवान थॉमस ह्यांच्या आत्म्यास शांती देओ..”, असं म्हणुन कदमांनी फोन ठेवुन दिला…

दिपक आणि स्टेफनीच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सर्व काही प्लॅननुसार घडले होते.

“सर.. “, दिपक म्हणाला… “आम्हाला पोस्ट-मार्टम रिपोर्ट आणि पोलिसांकडुन एक पत्र लागेल.. त्या शिवाय इथे अंत्यसंस्कार विधी करता यायचे नाहीत.. शिवाय डेथ-सर्टीफिकेट मिळवायला सुध्दा हे पेपर्स लागतील…”

“मी अ‍ॅरेंज करतो.. तुम्ही बसा बाहेर.. तो पर्यंत अ‍ॅम्ब्युलंन्स थॉमस ह्यांचे शव घेऊन येईलच..”, त्रिपाठी म्हणाले..

दिपक आणि स्टेफनी शांतपणे खुर्चीतुन उठले आणि बाहेरच्या बाकड्यावर जाऊन बसले….


थॉमसच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एक पोलिस हवालदार बरोबर होता. संध्याकाळपर्यंत डेथ-सर्टीफिकेट आणि इतर काही कागदपत्र पुर्ण करुन त्रिपाठींनी ती दिपक-स्टेफनी उतरले होते त्या हॉटलवर पाठवुन दिले.

दिपकने डेथ सर्टीफिकेट निट नजरेखालुन घातले आणि त्यात काहीही त्रुटी नसल्याची खात्री करुन घेतली. सर्व कागदपत्र निट फाईलमध्ये ठेवुन आणि डमी थॉमसचे अस्थी विसर्जन करुन दुसर्‍याच दिवशी दोघं परत आपल्या हॉटेलवर परतले.

थॉमसच्या मृत्युची बातमी समजताच हॉटेलवर शोककळा पसरली. अनेकांना थॉमसचे अंत्यदर्शन न झाल्याची हुरहुर लागुन राहीली. परंतु काळापुढे सर्वच हतबल होते. स्टेफनीने आठवड्यानंतर थॉमसचे डेथ सर्टीफिकेट बॅंकेत दाखवुन अकाऊंट्सचे सर्व अधीकार स्वतःच्या नावावर करुन घेतले. हॉटेलचे सर्व अडकलेले व्यवहार मार्गी लागत होते. महीन्याभरातच अनेकांना थॉमसचा विसर पडला.

सर्व काही सुरळीत चालु होते.. दिपकने आखलेला प्लॅन व्यवस्थीत पार पडला होता.. जर स्टेफनीने ती गोष्ट दिपकला आधीच सांगीतली असती. दिपकच्या नकळत स्टेफनी एक चुक करुन बसली होती.. ती खरंच चुक होती का दिपकला अंधारात ठेवुन स्टेफनीने ते केले होते.. आणि त्याचे झंजट लवकरच दोघांवर येणार होते..

काय केले होते स्टेफनीने? कळेल लवकरच पाठलागच्या पुढच्या भागात…

[क्रमशः]