Cover fatlenl pustak - 3 books and stories free download online pdf in Marathi

कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III


कवर फाटलेलं पुस्तक
भाग-III

मी-"बसने नको जाऊ, रस्त्याकडेला उभा राहून लिप्ट माग, कुणी ना कुणी लिप्ट देईल."
त्याने हळूच हात खाली केला आणि काहीच उत्तर न देता निघून गेला.त्याला वाईट वाटले असेल पण माझ्याकडे पर्याय नव्हता.
मी चहा बिस्किटे घेउन हॉस्पिटलच्या आवारात गेलो आणि तिच्या नवऱ्याला फोन केला पण फोन स्विच ऑफ लागत होता.
मी दवाखान्यात शितलला अॅडमिट केले होते त्या रूममध्ये गेलो पण तिथं ती दिसली नाही,माझा जीव कासावीस झाला, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधायची
हिला?
मी रुममधून बाहेर आलो आणि एका नर्सला विचारले,"इथला डिलेव्हरी पेशंट?"
नर्स-"सगळे पेशंट चौथ्या मजल्यावर शिफ्ट केले आहेत.
लिफ्ट कुठे आहे हे माहीत नव्हते  म्हणून मी धावत वर गेलो,रूम शोधून काढली, रूममध्ये गेलो तर ती भिंतीकडे तोंड करून झोपली होती, मी हळूच एक स्टूल घेऊन बसलो आणि चहा बिस्किटे ख्वॉटवर ठेवून
"शितल उठ, ही घे,चहा बिस्किटं."
ती हळूच उठली आणि तिने प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा ओतून घेतला आणि चहात बिस्कीट बुडवून खात बोलली
"सुभाषभाऊ ,आयची लय आठवण यीत्या."
पुन्हा तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले.
(मी तिच्या आईला कॉल केला)
"हॅलो, सुभाष बोलतोय,
पुण्यातून,
शितलच्या आईला फोन द्याल का?."

फोनवरून रिप्लाय आला,
"मी सकाळी तुमचा निरोप दिला पण त्यांनी सांगितले की 'साडेपाच वाजता सुट्टी होईल, तेव्हा बघू'.तुम्ही सहा वाजता फोन करा."

"त्यांना सांगायचं ना,की तिच्याजवळ कुणीच नाही."

"सांगितले पण त्यांनी सांगितले की,'आत्ताच जाऊ शकत नाही."

     "का?"

"मला नाही माहित, तुम्ही सहा वाजता फोन करून त्यांनाच विचारा."असे म्हणून तिकडून फोन ठेवला.
मला शितलच्या आईचा खूप राग आला.
पोरगी एकटीच आहे म्हणून सांगितले तरी इकडं यायला तयार नाही उलट 'संध्याकाळी बघू' म्हणतेय.कसली ही आई दगडाच्या काळजाची.
"शितल, ही तुझी सख्खी आई आहे की सावत्र?."

"माझी सख्खी आई आहे,का काय झालं?."

"काय झालं ते संध्याकाळी फोन केल्यावर कळेल,तुझी आई आत्ताच येऊ शकत नाही."
हे ऐकून ती शुन्यात हरवून गेली.बिस्कीट घेतलेला हात कपात तसाच राहिला.
थोडावेळ निरव शांतता पसरली.
मी-"शितल,आराम कर, मी येतो थोड्यावेळात."
शितल-"सुभाषभाऊ, तुम्ही कुठं लांब जाऊ नका,ते(मिस्टर) येतील."
मी-"बरं होईल,तुझे मिस्टर आल्यावर तुला आधार वाटेल."
शितल-"कशाचा आधार, मुलगी झाली आहे म्हटल्यावर ते खर्चाला पैसेही देणार नाहीत.तुम्ही आहे म्हटल्यावर तुमच्या धाकाने थोडेफार पैसे देतील तरी."
"लांब नाही जात,जरा खाली मोकळ्या हवेत जाऊन येतो."असे म्हणून मी रूममधून बाहेर पडलो.
शितल ही माझ्यासाठी अनोळखी विवाहित स्त्री होती तरीही मी तिला एकेरी नावाने बोलवत होतो कारण ती रूमवर डबा आणून देत होती.आणि कधी मी उपाशीपोटी झोपलो किंवा मला भूक नाही म्हटले तरी ती निःसंकोचपणे रूममध्ये येवून दंडाला हलवून उठवायची आणि जेवणासाठी आग्रह करायची,"भाऊ उठा, थोडं खाऊन घ्या, उपाशीपोटी झोपू नका."
आईनंतर इतक्या प्रेमाने खाऊ घालणारी शितल,कधी परकी वाटलीच नाही, त्यावेळी तिचं नाव माहीत नव्हते, पण तिनं माझ्या लहान बहीणीची  कमतरता कधी वाटून दिली नाही.
मी अनेक ओळखी-अनोळखी लोकांना एकेरी नावाने बोलायचो, याचं कारण धाक बसवणं नव्हता तर आपुलकी वाढावी हा होता.
मी खाली येऊन एका झाडाखाली ठेवलेल्या बेंचवर बसलो.रात्रभर जागरण झाल्यामुळे बसल्या बसल्या झोप लागली.दुपारी बारा वाजता झोपलो ते चार साडेचार वाजता दचकून जागा झालो.झोपून उठल्यावर तोंडातून एकच शब्द निघाला,"शितल!!"
तसाच डोळे चोळत पळत सुटलो, पण आत जाण्याच्या मार्गावर जागोजागी गेट होते ते सर्व बंद केलेले होते.दोन तीन ठिकाणी सिक्यूरिटीगार्डने विनंतीवरून आत सोडले पण एक ठिकाणी सिक्यूरिटीगार्ड सोडेचना. मी त्याला विचारले,"काका,किती वाजता आत सोडणार."
त्यावर त्याने सांगितले,"सहाच्या आत गेटपासशिवाय एकालाही सोडणार नाही."
सहा वाजेपर्यंत मी तिथेच येरझारा घालू लागलो.सहा वाजले अन् गेट उघडले तसा मी पटकन आत शिरलो आणि पटपट चालत शितलला अॅडमिट केलेल्या रुमकडे गेलो.आत गेलो तसं शितल गहिवरून रडू लागली.
"सुभाषभाऊsss."

"काय झालं?,तुझे मिस्टर आले होते का?"

"नाही"

"मग काय झालं?."

"काही नाही,ते(मिस्टर)अजून आले नाहीत आणि इथं एकटीला पाण्याच्या खोल डोहात गटांगळ्या खाल्ल्यासारखं, बुडाल्या सारखं वाटतंय"

"काळजी करू नकोस,मी आहे ना.थांब तुझ्या आईला कॉल करतो"
मी कॉल केला
"हॅलो, मी सुभाष,
पुण्यातून बोलतोय.."
माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आत तिकडून आवाज आला,"हा थांबा शितलच्या आईकडे देतो,(पुढे शितलची आई बोलली)
'हा काय काळजी करू नकोस मी यीतीया' "
मी-"अहो कधी येताय."
तिकडून काही बोलणार इतक्यात शितलने फोन मागितला आणि बोलली,"आये...(ती पुन्हा रडू लागली),आये कधी येणार हायस,________बर,_______हा___हा_____बर"
तिने फोन कट केला आणि माझ्याकडे दिला.
मी-"काय झालं काय म्हणत होती तुझी आई."

"काय न्हाय,तास-दिडतासात इथं पोहचीन असं म्हणत होती."असे म्हणून तिने कॉटवर पाट टेकली आणि कुस बदलून भिंतीकडे तोंड करून रडू लागली.
"काय झालं ?"

ती डोळे पुसत,"काय न्हाय."

"मग का रडतेस?
तुझे मिस्टर आले नाहीत म्हणून?,
की तुला मुलगी झाली म्हणून."

नकारार्थी मान हलवत,"न्हाय."
बस एवढंच ती बोलली.
नंतर मीही काही प्रश्र्न विचारले नाहीत.पाच दहा मिनिटे झाल्यावर मीच बोललो,"शितल,तुझी आई नक्की येणार आहे ना?."

"हो, माझी आय येणार हाय, तुम्ही जा, तुम्हाला उद्या आफीसला जायचं असल, आणि रूमवर गेल्यावर माझ्यारूममध्ये भाताचं तांदूळ आसत्यालं ते करून खावा."
हे सगळं ती न रडता शांतपणे स्पष्ट बोलली त्यामुळे माझ्या मनाला विश्वास पटला की तिची आई नक्की येणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही म्हणून जाताना मी तिला म्हणालो,
"शितल, येतो मी,काही अडचण वाटली तर फोन कर, येऊ का."

"हां"
इतकंच बोलली.नंतर मी गेलो की नाही हेही तिने पाहिले नाही.
तिने एकदा भिंतीकडे तोंड केले होते ते मी रूममधून बाहेर पडेपर्यंत भिंतीकडेच होते.
साडेसहा वाजले असतील मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि तडक चालत चालत मेन रोडवर आलो, खिशात फक्त दहाच रुपये होते.एका कारला हात केला,नशिब मला जिथं जायचे होते तिथंपर्यंत कार मिळाली.माझा स्टॉप आल्यावर त्याने कार थांबवली आणि पैसे मागितले, मी दहा रुपये त्याच्या हातात टेकवले आणि न काही बोलता रस्ता पार करू लागलो.कारवाला पाठीमागून आवाज देत होता,'दहा नाही वीस रुपये होतात‌. पण मी एकदाही पाठीमागे वळून पाहिले नाही.कारण पाठीमागे पाहिले तर तो हुज्जत घालणार अन् हुज्जत घालूनही त्याला काही मिळणार नाही, त्यापेक्षा मागं वळून न बघितलेलं बरं असं मनाशी ठरवून तसाच पुढे चालत राहिलो.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे मी ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आल्यावर सायंकाळी तिची आठवण आली पण नवीनच जॉब मिळाला होता त्यामुळे सारखं ऑफिसला दांडी मारता येणार नव्हती त्यामुळे मी पुन्हा हॉस्पिटलला गेलो नाही.
नंतर तिची आई किती वाजता आली? कि आलीच नाही,देव जाणे.कारण तिची आणि माझी कधीच भेट झाली नाही. ती ज्या भाड्याच्या रूममध्ये राहत होती तिथेही ती कधी आली नाही.रुममालकाने दोन महिने वाट बघितल्यानंतर रूममधली संसाराची भांडी बाहेर काढून गोणी भरून मैदानात ठेवली.आठ दिवस भांडी मोकळ्या जागेत तशीच पडून होती.नंतर समजलं की कोणीतरी एका टेंपोमध्ये भरून भांडी घेऊन गेले.भांडी नेमकं कोण घेऊन गेले, कुणालाच माहीत नाही.

"सुभाषभाऊ...सुभाषभाऊ..."
असा दोन वेळा आवाज आला तसा मी भानावर आलो.
मी-"हो,भाऊच आहे तुझा, भावना शुन्य भाऊ,तु अडचणीत असताना शेवटपर्यंत साथ न देणारा भाऊ,खाल्लेल्या अन्नाला न जागनारा भाऊ"
शितल-"आसं कसं म्हणताय भाऊ,उलट तुम्ही माझ्या सोबत होता म्हणून मी आज तुमच्या समोर आहे.नाहीतर माझं काय झालं आसतं परमेशराला माहीत "

"माझं चुकलंच,मी माझा स्वार्थी विचार करून तुला एकटीला सोडून आलो,किमान तुझी आई येईपर्यंत तरी मी थांबायला पाहिजे होतं."

"तुम्हाला पण नविन नोकरी लागली हुती. माझ्या अडचणी सोडवण्याच्या नादात तुम्हीच अडचणीत आला आसता,म्हणून मी त्या दिवशी माझी आय येणार न्हाय हे माहीत असूनही तुम्हाला खोटं बोलली."

"म्हणजे,त्यादिवशी तुझी आई आली नाही!? मला वाटतंच होतं, की ही तुझी सख्खी आई नाही.कसली ही आई बिना काळजाची."

"तसं काय न्हाय, माझ्या आयचा माझ्यावर लय जीव हाय."

"तु एकटीच आहे सांगितले तरी ती तुझ्या आधाराला आली नाही,तरी तु तिच्याच बाजूने बोलत आहेस."

"आयचा नाईलाज हुता,दुकान मालकानं पैसं दिल्याबिगर कसं येणार मोकळ्या हातानं, दुकान मालकानं सकाळी पैसं दिलं,तवा ती आली."

"आणि तुझा नवरा?."

"ज्या व्यक्तीला आपण आपलं समजून जीव लावला, त्यानं आपल्या भावनांची कधीच कदर केली नाही,ज्यात आपुलकी, जिव्हाळा नाय,ते नातं काय कामाचं, ते आलं न्हायत ते एक बरंच झालं,बाहेरचा सगळा आधार संपला तवा माझ्या आतल्या आधारानं मला सावरलं."

"शितल, त्यावेळी पैसे नसल्यामुळे तुला मदत करू शकलो नाही आणि आत्ता पैसे असूनही तुझ्या नोकरीसाठी मदत करू शकत नाही.आमच्या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या मुलींना नोकरी दिली जात नाही, तसा इथला नियमच आहे"

"सुभाषभाऊ, मी नोकरीसाठी आलेली न्हाय,परवा तुम्हाला कारमधून हाफिसच्या गेटमधून आत जाताना बघितलं आणि तुम्हाला भेटायची इच्छा झाली, अन् तुम्हाला भेटता यावं म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं.
मनातून लय उदास वाटायचं. या जगात गरीबाचं कुण्णी कुण्णी नसतं.
आत्तापर्यंतच्या अनुभवातनं असं जाणवलं होतं की,'डोळ्यातलं पाणी पुसायला लोकं येतात पण ते त्याचाही सौदा करतात' म्हणून डोळ्यातलं पाणी स्वतःच पुसलं.कोणी जोडीदार मिळावा ही इच्छा तर मी कधीच मागं सोडली होती,कोणासोबत राहण्यापेक्षा मला माझं आयुष्य मुलींसोबत जगायला आवडेल आणि त्याबद्दल माझ्या मनात अजिबात दुःख असणार नाय.आता नवीन आयुष्य जगायला लागू अश्या विचारात मी होती पण ते नवीन आयुष्य काय पद्धतीनी जगावं हे मात्र मला समजत नव्हतं. माझ्या मनात गोंधळ चालू होता."

मी-""अशावेळी तु इथं आलीस तेव्हा बरं झालं, आता तु माझ्या घरी चल कायमचं,आता तुला जादा कष्ट करण्याची गरज नाही.तुझा भाऊ तुला कशाचीच कमतरता होऊ देणार नाही."

"त्याची काय गरज पडणार नाही,त्या गोंधळापासून पळण्यासाठी शेवटी मी डोळे मिटून घेतलं आणि जादू झाली.माझ्या मनातून सगळेच विचार दूर गेले. त्या विचारांची जागा मी पाहिलेल्या स्वप्नांनी घेतली.ते(पहिले मिस्टर) गेल्यानंतर स्वावलंबी होण्याचं पहिलं स्वप्न होत ते खानावळ सुरू करण्याचं(मेसच),तो विचार आल्या आल्या मी डोळे खाडकन उघडले.मला आलेली सगळी मरगळ मागे पडली. आता मला काय करायचं ते माहिती होत. चालायचं म्हटल्यावर कधीतरी ठेच लागणारच म्हणून का  कुणी चालायचं थांबतं का, म्हणून मी पुन्हा मेस चालू केली आणि त्यानंतर नुसती धावतंच होती ते फक्त पैसे कमवायला. पैसे मिळाले पण आनंद मात्र कुठेतरी मागेच राहिला. सगळीच सुखं पैश्यांनी विकत घेता येत नाहीत ते मला जाणवलं‌.मी माझ्या मुलींना माझ्याकडे आणायला गेली.त्यावेळी सासूने माझी अवस्था पाहिली आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली, सासू म्हणाल्या,"तरूणपणी माझा मुलगा गेला अन् माझं भान हरपून गेलं,त्याच्या माघारी तु तरणीताटी पोर, पांढऱ्या साडीत उभं आयुष्य घालवणार,हे माझ्या मनाला रोज टोचत राहीलं असतं,म्हणून तुझं दुसरं लग्न व्हावं,तु सुखात रहावं,म्हणून मी तुला मनात नसतानाही घराबाहेर हाकलून दिलं,पण काय करणार, करायला गेले एक अन् झालं भलतंच.तुझ्या जीवनाची जी तारांबळ झाली आहे त्याला मीच कारणीभूत आहे.आता तु कुठे जायचे नाही माझ्याजवळच राहायला यायचं आणि मला सासूबाई म्हणायचं नाही,आई म्हणायचं,आई"

"जगायचं म्हटल्यावर दुःख हे येणारच म्हणून का कुणी जगायचं सोडतं का."
खरंच, सासूबाईंच्या रूपानं मला दोन दोन आया मिळाल्या, दोन दोन आया मिळायला पण भाग्य लागतं,भाग्य.
मी त्यांना माझ्याकडे मी नविन घेतलेल्या घरी घेऊन आली,त्यांनी दिलेला त्रास मी कधीच विसरून गेली होती.
आता मात्र मला माझी चूक उमगली. आता मी जगणार,ते पैसे मिळवण्यासाठी नाही तर अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी.माझ्या अशिक्षितपणामुळं माझी जी अवस्था झाली ती माझ्या मुलींची होऊ नये यासाठी,मी तिघींना खूप शिकवणार आणि स्वावलंबी बनवणार. आता ती माझी चूक सुधारणार."

तिची जीवन जगण्याची निष्ठा पाहून माझा उर भरून आला.
"शितल,तु रिशेप्शनमध्ये थोडं थांब मी हे interviewचे पेपर HR ऑफिसमध्ये जमा करून येतो,मग आपण माझ्या घरी जाऊ.", असे म्हणून मी तिथून बाहेर पडलो आणि HR ऑफिसमध्ये पेपर जमा केले, त्यासोबत दोन दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि गडबडीत  reception मध्ये शिरलो पण तिथं शितल दिसली नाही मग मी ऑफिसच्या गेटवर गेलो, तिथेही ती दिसली नाही, मी securityला विचारले,"इथं कुणी ladies येवून उभी राहिली होती का?."
सिक्यूरिटी-"नाही सर ."
मग मी त्यावेळीचे CCTV footage चेक करायला लावले,त्यात ती एका हातात पर्स आणि दुसऱ्या हाताने डोळे पुसत लगबगीनं बाहेर पडताना दिसत होती.
CCTV footageमध्ये तिला रडताना पाहून माझ्या ह्रदयात कालवाकालव सुरू झाली, नेमकं काय झालं असेल?
ती खरंच स्वावलंबी झाली असेल...
की तिला नोकरीची आवश्यकता होती.‌..
कि मला त्रास नको म्हणून ती पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोलली...
हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत,

हे मात्र नक्की कि,तिच्या जीवनात नवरा नावाचं छत्र (कवर)फाटलं नसतं तर तिच्या जीवनाचा(पुस्तकाचा) असा चोळामोळा झाला नसता.
तिनं कुठेही रहावं पण सुखी समाधानी रहावं असं मनापासून वाटतंय,
              ???

                          _सुभाष आनंदा मंडले
                           (9923124251)