YOUR ARE MY FRIEND books and stories free download online pdf in Marathi

मित्र असशील माझ्या मित्रा

मित्र असशील माझ्या मित्रा

मैत्री हा शब्द उच्चरताच आपल्या मनात एक विशिष्ट संकल्पना उभी राहते.कुठल्याही शब्दकोषात जिचा अर्थ सापडणार नाही ! अशी मैत्री म्हणजे एक विलक्षण गूढ नातं आहे. नातं फक्त रक्ताचे असते असे नाही.. तर ते मना-मनाचे सुद्धा असते. ह्या मतलबी जगात नातं पैशासाठी,स्वार्थासाठी जोडलेले असते. कित्येक वेळेला हि नाती आपल्याला नकोशी वाटतात.. पण तरीही या नात्यांच्या फाफट पसाऱ्यात सर्वांगसुंदर मैत्रीचं नातं मात्र प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं . मनाच्या अगदी जवळचं वाटणारे हे निर्मळ आणि निस्वार्थी मैत्रीचं नातं सर्व नात्यांतून उठून दिसते.

सर्वव्यापी परमेश्वराने आपल्या आजूबाजूची रक्ताची भावनिक नाती निर्माण केली...काही वेळा रक्ताची नरी आपण फक्त नाईलाजाने स्वीकारतो..मैत्रीचं नातं मात्र तसे नसते...ते सर्वस्वी आपणच निर्माण करतो...अगदी निरखून पारखून ते नातं आपण तयार करतो..किंबहुना हे नातं स्वयंभू आहे...दोघांची वेव्ह-लेंथ जुळल्याशिवाय मैत्री आकाराला येत नाही...लोणचं नाही का जितके मुरेल तितके चांगले...तसेच मैत्रीचं आहे...

अनेकदा मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचं होऊन बसते...सख्खी बहीण किंवा भाऊ आपल्याला जेवढे समजुन घेत नाहीत..पण एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्या मनातले अचूक ओळखतात.. मनकवडे असतात... कित्येक वेळेला आपल्याला नात्यात मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही पण मैत्रीत मात्र बोलायची गरजच नसते...पण मैत्रीतही काही बंधन जरूर पाळावी लागतात..जसे एकमेकांच्या मतावर आक्रमण न करणे.. त्या व्यक्तीला आहे तसे स्विकारणे..खोटेपणा..असत्य..भंपकपणा अश्या गोष्टीना तिचे अजिबात थारा नसतो..मैत्रीचं नातं जितके शुद्ध असेल तेवढीच ते मनाची खोल भूक भागवतं. मैत्रीतही फरक असतो सगळेच मित्र किंवा मैत्रिणी ... एकाच पायरीवरच्या नसतात ...आणि समान विचाराच्याही नसतात..तेव्हा आपल्याला पण त्या पायरीवर किंवा त्या विचारांवर येऊन नातं टिकावावे लागते. आज " फ्रेन्डशिप डे" चे प्रस्थ वाढते आहे..हातावर तीस - चाळीस रिबिनी बांधून किंवा त्या मिळाल्या नाही तर हातावर,चेहऱ्यावर आपले नाव लिहून मैत्रीचं ओंगळ प्रदर्शन नकोसे वाटते.. त्या तीस-चाळीस रिबिनीमधून दुसऱ्या दिवशी आपण ठामपणे सांगू शकतो का हाच माझा खरा मित्र किंवा मैत्रीण...किंवा त्यातली १० नावं तरी आपण चेहऱ्यासकट ओळखू शकतो का???

आपण इतर नात्यांना संज्ञा देऊ शकतो किंवा नात्याच्या एका विशिष्ट चौकटीत बंधू शकतो ... पण मैत्रीचं नातं तसे नाही...आभाळाला भिडणाऱ्या एका पक्षाप्रमाणे स्वछदी नातं आहे ते .

मैत्रीचं नातं कसं असतं ?

आयुष्याच्या मरुभूमीत मृगजळ असतं

मैत्रीचं नातं असं असतं !

दोघांना पडलेलं अवखळ स्वप्न असतं.

मैत्रीचं नातं कसं असतं ?

कच्या -पक्क्या धाग्यांनी बांधलेलं बंधन असतं

मैत्रीचं नातं असं असतं !

दोघांनी जमवलेले एक फक्कड गाणं असतं

मैत्रीचं नातं कसं असतं ?

शब्दांच्या चिमटीत न येणारे फुलपाखरू असतं

मैत्रीचं नातं असं असतं !

कुठंल्याही काळांत सत्यम शिवम सुंदरम असतं

मैत्रीचं नातं कसं असतं ?

आकाशातल्या "मित्रा" सारखं शाश्वत असतं

मैत्रीचं नातं असं असतं !

चंद्रमाच्या प्रकाशाहून शीतल असतं

मैत्रीचं नातं कसं असतं ?

निळ्या सागरासारखं अथांग असतं

मैत्रीचं नातं असं असतं !

भाव-भावनांच्या क्षितीजापलीकडलं असतं !

मैत्रीचं नातं म्हणजे

तुला न कळले , मला न कळले

कसे मैत्रीचे धागे जुळले

(वरील कविता माझी आहे...कधी काळी कोणालातरी इम्प्रेसससससससस करायला लिहिली होती)


निःस्वार्थ,निरालंस, निर्मळ असं हे नातं . या नात्याविषयी बोलतांना अरुणा ढेरे आपल्या एका मित्राला म्हणतात...

माझं अर्धवट फुललेलं बोलणं ऐकून तू हसलास तर तू मर्द असशील,

माझ्यासाठी स्वप्न धरायला धावलास तर तू प्रेमिक असशील,

स्वप्नच झालाच तर परमेश्वर असशील,

ते स्वप्न हाती देशील तर पती असशील,

पण

चालशील जर माझ्यासोबत

त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे

समजून हेही कि ते हाती येईल न येईल

आणि माझा विश्वास कि माझे मलाच लढता येईल

तर मग तू कोण असशील???

- मित्र असशील माझ्या मित्रा