Mrugjal books and stories free download online pdf in Marathi

मृगजळ

मृगजळ

जुईला काही सुचत नव्हतं. मयंक आयुष्यातून असा अचानक निघून जाईल तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. एक दोन नाही तर सहावर्षांचा संसार किती सहजपणे सोडून गेला हा. माझा नाही निदान पिहूचा तरी विचार करायचा. आता ती शाळेतून आल्यावर मी तिला काय सांगणार? तिचा बाबा कुठे गेला.... आपल्याला सोडून गेला. त्या क्षणी राग आवरत तिनं आईला फोन केला.
"हॅलो आई, संपलं ग सगळं " जुईने घडलेला वृत्तांत आईला सांगितला.
" काळजी नको करू बाळा. मी उद्या सकाळच्या फ्लाईटने पोहचते. पिहूसाठी स्वत: ला सावर." आईनं तिला धीर देत म्हंटलं
मेघनाला फोन करुन सांगायला हवं होतं. तिच्याशी बोलायचा धीर झाला नाही. म्हणून तिनं तिला मॅसेज टाकला. ती आणि पिहू येईपर्यंत तिला थोडा मोकळा वेळ हवा होता.

दोघांनी मिळून लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेल्या त्या सोफ्यावर बसत तिनं तिच्या आयुष्याची सीडी रिवाइंड केली.

यु.एस.वरुन एम एसकरुन आल्यावर एका बड्या आय टी कंपनीतून तिला जॉबची ऑफर आली. या कंपनीनत तिची ट्रेनींगदरम्यान मयंकची ओळख झाली. योगायोगाने पोस्टींग एकाच ठिकाणी बंगलोरला मिळालं. आधी मैत्री मग या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. वर्षभर ते लिव इन रिलेशनशिपमध्ये होते. नंतर लग्नाचा निर्णय घेतला.
सुरवातीचा काळ खूप आनंदात गेला. मोठा फ्लॅट घेतला. दोघांनी मिळून तो सजवला. घरातील प्रत्येक फर्निचर, प्रत्येक वस्तु त्या दोघांनी हौशीने घेतल्या होत्या. दोन वर्षांनी पिहूच्या येण्याची चाहूल लागली. खरं तर मयंकला एवढ्यात मुल नको होतं. त्याला घराचे हप्ते भरायला वेळ हवा होता. घरच्यांचा आग्रह आणि माझ्या हट्टापुढे त्याचं काही चाललं नाही.
सहा महिन्यांची मेटरनीटी लीव्ह संपली. वर्क फ्रॉम होम करून पुढचे सहा महिने ढकलले. वर्षाची झाल्यावर पिहूला कंपनीतील डे केअर सेंटरला ठेवलं. आई बाबा गरज पडेल तेव्हा येत होते. त्यात मयंकच्या परदेशी वाऱ्या वाढत गेल्या. प्रत्येक विकेंड धावपळीत जात होता. सासु सासरे यांचे आजारपण, नणंदाची लग्न, सणवार यात पैसापरी पैसा खर्च होत होता. माहेरपण म्हणजे आई-बाबांना घरी बोलावणं. प्रपंच सांभाळतांना आणि जवाबदारी पेलताना माझी फरफट होत होती.
मी हे सारं आनंदानं आणि मुकाट्याने करावं सर्वांची हीच अपेक्षा होती. या अपेक्षांचं ओझं जेव्हा सहन झालं नाही तेव्हा माझा बांध फुटला. जुजबी वादावादी भांडणात बदलली. कधी काळी राजकारणवरुन चर्चा, तर कधी जुन्या गाण्यांवर लागलेली पैज, सारे आनंदी क्षण कुठं हरवले कळत नव्हतं.
मयंकला त्यांच्या कॉलेजच्या रियुनीनच्या दिवशी त्याची जुनी मैत्रीण भेटली आणि तुलनात्मक चाचण्या सुरु झाल्या. तिची सर मला नव्हती....हे ऐकल्यावर माझा इगो दुखावला. इथेच सहा वर्षांच्या संसाराला तडा गेला. जो मी भरुन काढण्याचा खूप प्रयत्न केला. मयंकने प्रयत्न केला असता तर कदाचित भेगा बुजल्या असत्या. मयंकच वागणं बदलत गेलं. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारा आता घरात राहेनासा झाला.

" मॅडम, आपके गेस्ट है." सिक्युरिटी केबीनमधून इंटरकॉम वाजला
"हां, भेज दो...."जुईनं चिडत उत्तर दिलं

मेघना पिहूला घेऊन आली होती. डोळे पुसत तिनं दार उघडलं.
आई........पिहू तिला बिलगली.
तिचं दप्तर काढलं. शाळेतील धमाल सांगता सांगता दूध पिऊन ती झोपली.
मेघना......म्हणत जुईनं जीवाभावाच्या मैत्रीणीच्या कुशीत दाटलेल्या हुंदक्यांना मोकळं केलं.

महिना दोन महिन्यांपासून त्यांच्या कुरबुरी सुरु असल्याचं मेघनाला माहिती होतं. भांडण विकोपाला जाऊन अशी काही परिणीती होईल कोणाला वाटलं नव्हतं. कोण चूक कोण बरोबर यांवर चर्चा करण्यापेक्षा आता दोघींना सावरायला हवं हे मेघनाला वाटत होतं.
"कॉफी घे, बरं वाटेल." मेघना तिच्या हातात कप देत म्हणाली
"मयंकच्या अचानक निघून जाण्यानं आयुष्यात जी खूप मोठी पोकळी तयार झाली, यात मी कुठेतरी हरवून जाणार" जुईला अनामिक भीतीने कंप सुटला.
"पिहू... तुझ्या जगण्याचं बळ आहे." मेघना
संमिश्र भावनांनी हताश जुईला सारखं गहिवरून येत होतं.

आई-बाबा आल्यावर परत सगळ्या घटना उगाळत बसलो.

"तुमच्या दोघांमधला भावनांचा ओलावा संपला. आता पुढे काय करायचं हे ठरवायला हवं." बाबा
"घटस्फोट...." जुई
"अगं, असं घाईघाईने निर्णय नको घेऊ." आई
"आधी तू स्वतः ला सावर. मन आणि तुझ्या डोक्यात चाललेला विचारांचा गोंधळ शांत होऊ दे. मग आपण बोलू" मेघना
"सासू- सासरे, नणंदा काय म्हणतात?" बाबा
"त्यांच्या दृष्टीने माझं चुकलं आहे. सासरे म्हणाले मी बोलतो मयंकशी. पण मला वाटत नाही तो ऐकेल. तो तिच्याकडे रहातो आहे." जुई
"घर माझ्या नावावर आहे. त्या बाबतीत तो काही करु शकत नाही." जुई

विचार विमर्श केल्यानंतर सर्वांनी आत्याकडे भेटायचं ठरलं.
मयंक त्याच्या मतावर ठाम होता. नणंदना त्याचं वागणं पटलं नाही. वादविवाद.... इमोशनल ड्रामा सर्व आटोपल्यावर जुईने मयंकला ठणकावून सांगितलं की घटस्फोट झाल्यानंतर तो पिहूला कधीच भेटणार नाही.
"मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. तिला आज जरी काही कळत नसलं तरी मोठी झाल्यावर तिचा बाबा तिला का सोडून गेला हे जाणून घ्यायचा अधिकार आहे." जुई
"आणि हो, ते घर माझं आहे. मी माझ्या पगारातून घर आणि पिहूची काळजी घ्यायला समर्थ आहे." जुई
"पिहू माझी पण मुलगी आहे. मी तिला भेटायला येणार." मयंक चिडून म्हणाला.
"आहे न. मी तुझा हक्कही नाकारत नाही. ज्या मृगजळामागे तू धावतो आहेस त्याची झळ माझ्या पिहूला मी लागू देणार नाही." जुई
"दादा, आम्ही बहिणी वहिनीच्या पाठिशी आहोत. जिच्यासाठी तू वहिनीला सोडतो आहे खुशाल जा तिच्याकडे" सरोज
"वहिनी डिझर्व मच मोर बेटर दॅन यू." संध्या
"सॉरी वहिनी. आम्ही तुला तेव्हा समजून घेतलं नाही. काल आत्याशी चर्चा करतांना सर्व लक्षात आलं. " सरोज

दोन्ही नणंदा आपल्या पाठीशी बघून जुईला बरं वाटलं.
आई वडील, बहिणी, आत्या,मावशी सर्वजण मयंकला वारंवार समजवून सांगत होते. तो मात्र कोणाचा विचार न करता निघून गेला. हताश जुई आपण नेमकं कुठे चुकलो हा विचार करत त्याला मृगजळामागे धावतांना बघत होती.


विनीता देशपांडे