Massagist books and stories free download online pdf in Marathi

मसाजिस्ट… !

मसाजिस्ट…!

हॉस्पिटलच्या आवारातून भव्य इमारतीत आलो. आपल्या मित्राला भेटायला मजला आणि खोली क्रमांक समजून घेऊन लिफ्ट चालू केली. तिथे पोहोचायच्या वेळेत पेशंटला चित्त प्रकृती आनंदी ठेवायचा प्रयत्न करावा, असे हातातल्या फळांची परडी सांभाळत मनात म्हणत त्याच्या खोलीचे दार हळूवारपणे टकटक करून आत प्रवेश केला…

चित्र विचित्र होते. आत त्याच्या शिवाय कोणी नव्हते. पायाभूत इमारत कमरेत जायबंदी होती. तंगडीला आरामात लटकवलेल्या अवस्थेत पाहून मित्राची ठणठणीत असतानाची छबी राहून राहून आठवत होती. हवाईदलातील नोकरीमुळे मधे बराच काळ न भेट होता लोटला होता. तरीही मी विचारपूस करायला आवर्जून आल्याने फुले आणि फळांचा स्वीकार करून त्याने आनंद व्यक्त केला. काय झाले? कसे झाले? वगैरे समजून घेऊन सांत्वनासाठी चूक दुसर्‍याची होती तुला उगाच गोवले गेले आहे असे म्हणायचे असते तसे म्हणून झाले…

गप्पा रंगात येऊ लागल्या. कॉलेजच्या दिवसात आम्ही केलेल्या मज्जांची उजळणी होत होती.

शश्या, तुला आठवतं का रे ती? कोण रे उत्सुकता वाढून माझ्या डोळ्यासमोर बर्‍याच जणींचे चेहरे, शारीरिक ठेवण, बोलायच्या ढबी तरळल्या.

हरणाच्या डोळ्याची का रे? त्याच्या मनातल्या पोरींच्या आवडीच्या चेहर्‍याला शोधत मी म्हणालो.

गुलाम चोर खेळताना नको असलेले पान ओढले तर कसा विरस होतो? तसा चेहरा करून तो म्हणाला, लेका, ती बरी तुला आठवते?

आपला कॉमन क्रश होता ना? आजकालच्या तरूण पिढीतल्या सीरियल पाहून सरावलेल्या शब्दात मी म्हणालो.

तू सांग, तुला ती गोबऱ्या गालाची आवडायची? ती नंतर मला अमेरिकेत टकल्या नवर्‍याबरोबर भेटली होती. तिनेच मला ओळखत विचारले? सांगलीच्या चिंतामणराव कॉमर्स कॉलेजमधून? काय मस्त दिसत होती!

जाऊदे रे, चालायचंच… मित्राला ती या वयात ते ही अमेरिकेत कशी मारू दिसली असेल याची कल्पना करत मी चिंतनात गेलो. तो वर त्याने मागवलेली स्टारबक कॉफी आली. अतिशय गरम पेय जीभ न भाजता पिणे ही कला आहे याची जाणीव ठेवून मी हलकेफुलके चुस्के घेत राहिलो.

तेवढ्यात एक नर्सिग करणारी चुणचुणीत मुलगी येऊन रीडिंग घेऊन गेली.

ती परतताच मित्र म्हणाला, ‘काय रे काय मजा यायची जयश्री थेटरात इंग्रजी पिक्चर पहायला’! नव्या महिन्याचे पंचांग म्हणून पुढील येणाऱ्या सिनेमांची तपशीलवार माहिती आम्हाला परिक्षेच्या रिझल्ट पेक्षा जास्त महत्वाची वाटत असे. लांबट चेहरा करून इकॉनॉमिक्सची तत्वे सांगणार्‍या दाभोलकरांचा तास, चिं ग वैद्य यांच्या बँकींग पीरियडला टांग मारली तर दि ग्रेट रेस पहायला कोणी आड येणार नाही. शिवाय घरी चुगल्या करणारे मोठे, धाकटे बंधूंच्या नजरेतून सटकले की जमेल इतपत प्लानिंग करता करता ती तारीख जवळ आली की पैशाची जुळणी करून आम्ही थेटरात आवर्जून उपस्थित होत असू. सुंदर सुंदर चेहर्‍याच्या नट्यांचे मोहक चाळे, अन त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या हीरोंचा आम्हाला राग असे.

लुळ्या बावळ्या पुळचट हावभावातील चॉकलेट हीरो, ‘रात अकेली है’ म्हणत म्हणत ‘जो भी चाहे ‘कहिये’(तेथे शब्द दुरुस्ती करून ‘करिये’ असे आम्ही म्हणत असू) म्हणते ते पाहून आमच्या पैकी एका मित्राने थेटरातच ‘आता जा की रे खेमड्या, नाहीतर मी जातो म्हणून’ पुकारा केला होता!

‘पल भर के लिए कोई हमे प्यार कर दे’ असे करत स्वप्न सुंदर हेमाच्या सौंदर्याचा अपमान करताना पाहून आमच्या शरीराचा तीळपापड झाला नाही तरच नवल!

तेवढ्यात एक केरळी चेहर्‍याची नर्स आत डोकावून गेली.

आयला या कलूट्यांच्या! सात्विक संताप व्यक्त करत मित्र म्हणाला, आठवत का रे! ते जेम्स बाँड पिक्चर मध्ये तो एकदा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला उताणा पहुडला आहे. गाऊन घालून एक सुंदरी येते. गाऊन खुंटीला गेल्यावर, ‘007बाँड, जेम्स बाँड’ च्या पिळदार शरीराकडे पहात, ‘मी मसाजिस्ट’ म्हणून ताबा घेते. पुढे वाकून मसाजचे दाब देताना कपाळावरच्या बटा जेम्सच्या ओठांशी चाळे करतात, गालाला गाल लागतील असे ओणवे करून घेतलेले शॉट्स, ओथंबलेल्या टाईट ब्रातून पटकन अंबा तोडायची हाव सुटावी असे वाटत असतानाच एका हाताने तिचा हात पिरगाळून लपवलेली सिरींज पकडून तिला ढकलून मोकळा होतो. तिला जाता जाता चुंबनाची खुमासदार चव द्यायला तो विसरत नाही! जेम्स बाँडच तो’...

मित्राच्या आठवणींचा कढ मलाही आठवून त्या सीनमध्ये रंगायला झाले… न बोलता बोलले जात होते…

तुला ती आठवते का रे? ती रे? आपण जेम्सच्या पिक्चर पाहून आलो असू. कॉलेजच्या वाटेवर बसची वाट पहात असताना एक पोरगी होती? तिच्या नावाशी आम्हाला काय कर्तव्य होते?

‘ती, पोनी टेल मधे सारखी असायची? आठवली का?’

‘म्हणजे ऽऽ स्कर्ट आणि वर टाईट ब्लाउझमधे यायची ऽ ती?

‘यस तीच ती… सँडल्सचा ‘टॉक ऽऽ टॉकऽऽ’ करत तोऱ्यात जायची रोज समोरून?

‘म्हणजे आठवतय रे तुला पण’! तिला आठवून बाळ्या इनामदारची आठवण झाली. तो मजेशीर नामकरण करण्यात पटाईत होता. तो म्हणाला होता, ‘ए ती बघ, ती ऽऽ मसाजिस्ट आहे बाँडच्या पिक्चरची…’!

‘ती स्कर्टवाली जर गाऊन घालून हॉस्पिटलमध्ये आली आहे आणि गाऊन काढून ‘मी मसाजिस्ट’ म्हणून आपल्या बोटांनी आरामात दाब द्यायला लागली आहे असे मी मनातल्या मनात चित्र रंगवतो’ मित्र खंत काढून बोलता झाला.

नेमक्या त्याच वेळी मरतुकड्या, नाहीतर फदामावश्या कारणं काढून येतात! उद्या लाखो रुपयांचा खर्च करून बरा होऊन गेलो तरी त्या स्कर्ट वाल्या कॉलेजच्या पोरीची मसाजिस्ट छबी काही जात नाही रे डोक्यातून!

मित्राची व्यथा अनेकांना आपापल्या आठवणी जाग्या करून असे भावनिक आनंदी क्षण अनुभवायला लावतील.

.....