Remenbrance of Air Force Life books and stories free download online pdf in English

Remenbrance of Air Force Life

माझ्या हवाईदलातील आठवणी

अनुक्रमणिका

प्रकरण 1. हवाई दलात कसा गेलो?

प्रकरण 2. चंदीगढ –पहिले पोस्टींग ७२-७३

प्रकरण 3. श्रीनगरच्या ७३ पहिल्या पोस्टींगची मजा

प्रकरण 4. कानपुरचा हिसका

***

On retirement that’s how I was!

From AFAC to 9 Wing AF Halwara

First to last Unit

प्रकरण 1. हवाई दलात कसा गेलो?

हवाईदलाचे काहींना जात्याच आकर्षण असते तर काहींच्या घराण्यात परंपरेने सैनिकी पेशा पुढील पिढीत चालवण्याची प्रथा असते. माझ्या बाबतीत यापैकी काहीच घ़डले नाही. ना मला बालपणापासून हवाईदलात भरती होऊन विमान चालवण्याचे वे़ड होते ना आमच्या ओकांच्या घराण्याची तशी शानदार परंपरा होती. नाही म्हणायला माझे चुलत काका स्व. पुरुषोत्तम नागेश ओक यांनी आजाद हिंद फौजेमधे भरती होऊन तारुण्यातील काही काळ मिलिटरीतील सेवेत काढला होता. तर एक दूरस्थ पुतण्या माझ्यानंतर हवाईदलात आला. असो.

मी बी.कॉम साधारण मार्कांनी पास झालो. नंतर आमच्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सला एम. कॉमच्या वर्गाला आणखी जागा मिळाल्याचे ऐकून मी एम.कॉमसाठी पुन्हा कॉलेजात रुजु झालो. मित्रांच्या बरोबर माधवनगरातून सकासकाळी बसने सांगलीच्या पोस्ट ऑफिस स्टॉपवर उतरावे. मग मिरज रस्त्यावरील विलिंग्डन कॉलेजच्या पुढच्या स्टॉपला उतरून कॉलेजचे तास आटपावे. मग लायब्ररीत तळ ठोकून अभ्यास करीत बसावे. कधी कधी जेवणाचा डबा घाईने खाऊन इंग्रजी सिनेमा पाहून घरी परतताना चार-पाच वाजत. सभ्यतेच्या सीमेत राहून थोडी टिंगल टवाळी केली पण माझा बाज तसा जास्त बकबक न करण्याचा. घरी आले की घरातील कोर्टवर रिंग टेनिस खेळावे. नंतर रेल्वे स्टेशनवर मित्रांच्या सोबत फिरायला जाउन ७.३०ची पुण्याहून येणारी ट्रेन पाहून परतावे असा संथ पण मजेचा दिनक्रम चालला होता. जनता हॉटेलातील चार आण्याच्या झणझणीत चवीच्या अंबोळीला डिग्री सर्टीफिकेट प्रमाणे सुरळी पॅककरून घेतलेला आस्वाद आजही जिभेवर घोळतो.

आमचे माधवनगर गाव होते छोटेसे पण टुमदार. सांगली पासून ४ कि.मी दूर. नातू शेठजींच्या मालकीची कॉटन मिल व स्व. वसंतदादा पाटलांच्या श्रमांने उभी शुगर फॅक्टरी आमच्या माधवनगराची शान होती. पूर्वीच्या पुणे - बंगलोर मीटरगेज मार्गावरील सांगलीला उतरणाऱ्यांसाठी सोईचे ते स्थानक होते. शिवाय रिटायरमेंट नंतर मिळालेल्या पुंजीच्या भांडवलावर चार-चार पॉवरलूमची छोटी युनिटे टाकून चांगल्यापैकी उत्पन्न मिळवून राहणारा सुखवस्तू ब्राह्मण समाज तेथे बराच होता. टांगे व बसेसची सोय होती. रिक्षांचा सुळसुळाट नव्हता.

साल होते १९७०. अशाच एके दिवशी मी व माझे मित्र कॉलेजातून घरी परतत असताना मला हाक आली, ’तुम्हाला साहेब बोलावत आहेत’.

छोट्या मागधारकांकडून धोतीचा माल विकत घेऊन तो तमिळनाडूच्या विविध भागात लुंग्या व धोतरे म्हणून घाऊक विक्रीचा वडिलांचा धंदा होता. आमचे गोडाऊन कम ऑफिस बस स्टॉपच्या समोर होते. मी दादांसमोर - वडिलांना दादा म्हणायचो - उभा. समोर टाईप केलेले काही फॉर्म होते ते मी फुली केलेल्या जागी सही करून परत दिले.

त्या संध्याकाळी मला दादा म्हणाले, ‘कालचा टाईम्स वाचलास का?

‘हो!’ मी झोकात उत्तर दिले. ‘पुन्हा वाच. पहा काही महत्वाची जाहिरात सापडते का’. आमचे टाईम्स वाचन स्पोर्ट्स पानावर चालू होऊन आर के लक्ष्मणच्या कार्टूनवर संपे! पेपर पुन्हा वाचूनही खास काही वाटले नाही. मग दादा पुन्हा म्हणाले, ‘अमक्या पानावरील हवाईदलाची जाहिरात पहा त्यातील जागांसाठी तू सकाळी अर्ज भरलास. उद्या सर्व सर्टीफिकिटे व मार्कशीट्स आणून दे’. तसे मी केले. पुढे बरेच दिवसांनी घरात चहा पिता-पिता गप्पांच्या ओघात त्या अर्जाची आठवण झाली व ज्याअर्थी काहीच कळाले नाही त्या अर्थी माझ्या नावाच्या अर्जाला कचऱ्याच्या टोपलीत जागा मिळाली असणार असे आम्ही म्हणत होतो. त्याच दिवशी टपालाने हवाईदलाकडून इंटरव्ह्यूसाठी म्हैसूरला जाण्यासाठी पत्र आले. अवधी होता. पण नंतर लक्षात आले की माझी परिक्षा इतकी जवळ आली असताना मला त्यासाठी तयारी करायली वेळ मिळणार नव्हता. माधवनगरात कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते. एक दोन जणांशी विषय काढला तर त्यांनी मला वेड्यात काढले. म्हणाले, ‘एकुलता एक तू. लष्करात जायचे कसले ठरवतोस. बापाचा धंदा चालव. मजा कर. तुझ्याच्याने ते निभणार नाही’. एक म्हणाले, ‘मी तर नोकरी सोडायच्या विचारात आहे’. मीही फार उत्साही नव्हतो. घरी वडील मात्र म्हणाले, ‘अरे नाही म्हणून काय मिळेल? जा मिलीटरीतील निवडीचा अनुभव तरी मिळेल! नाही झालास सिलेक्ट तर बिघडले कुठे. जा त्या निमित्ताने म्हैसूर फिरु आलास असे होईल’. ते मला भावले. आमच्या घरी वडिलांचे मित्र मुकुंदराव परांजपे म्हणून यायचे. त्यांनी पोंक्षे म्हणून एक नाव सुचवले. म्हणाले, ‘ते मिलिटरीतून निवृत्त होऊन मिरजेत स्थायिक झालेत. भेट एकदा’. त्यांच्या सांगण्यावरून मी ’सूरज’ बंगल्यात त्यांना भेटायला गेलो. बाहेरच्या पाटीवर ले. कर्नल पोंक्षे असे झोकात लिहिलेले होते.

भारदस्त व्यक्तिमत्व. १५ मिनिटातच मला त्यांनी काही वाचायला दिले. काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मी धीटपणे सांगितली. मग म्हणाले, ‘मी कोल्हापुरातील सिलेक्शन बोर्डातून रिटायर झालोय. त्यामुळे तुला मार्गदर्शन करीन. ते तू लक्षपूर्वक समजून घे. वेळ कमी आहे. पुन्हा एकदा भेट’. दुसऱ्यांदा भेटलो. त्यांनी काही चित्रे दाखवली. काही संभाषणातील टिप्स दिल्या. जायची वेळ झाली तेंव्हा म्हणाले, ’मी तुझा वक्तशीरपणाची परीक्षाही केली. जा तू सिलेक्ट होशील. माझे तुला आशीर्वाद आहेत’.

मला वाटले माझे मन राखायला ते म्हणत असावेत. अशा बिन तयारीच्या मुलाला कोण सिलेक्ट करणार? आणि झालेही तसेच! मी म्हैसूरला स्टेशनवर पोहोचलो. एकेकाची ओळख करून घेता घेता माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही की आपला पाड लागणार नाही. एक नागपूर युनिव्हर्सिटीतला फर्स्ट, एक गोव्यातील बोर्डात पहिला. एक मद्रासी सीए करून आलेला. काही जण आधी दोनदा धडका देऊन परत गेलेले. काहींनी यासाठी व्यायाम करून शरीर कमावले होते. बऱ्याच जणांचे फाडफाड इंग्रजी ऐकून मी मनात ठरवले की आपण एम.कॉम परिक्षेसाठी आणलेली पुस्तके वाचण्यात रमावे. जमले तर वृंदावन गार्डन वगैरे पाहून चालले जावे.

३-४ दिवसांत बऱ्याच कसोट्या झाल्या. पळापळ. धावा धाव. ड्रम, बल्ली, रस्सी वगैरच्या सहाय्याने आपल्या नेतृत्वाखाली एकेकाला काही अडथळे पार करणे, दोरखंडावरून लटकून अंतर पार करणे वगैरे... आता थोडे थोडे आठवते. मात्र खरा कस लागला तो इंटरव्ह्यूला. खूप वेळ चालला. सोशॅलिझम, कॅपिटॅलिझम, मार्केट इकॉनॉमी, प्राईस डिटरमिनेशन, इंडियन इकॉनॉमी. जे विचारले त्यावर दणकून बोलत होतो. खूश होतो मी, आमचे प्राचार्य देवदत्त दाभोळकर दणक्यात कामाला आले म्हणून. शेवटी जायचा दिवस आला. सांगण्यात आले की जे सिलेक्ट होतील त्यांनी मेडिकल चेक अपसाठी बंगलोरला जाण्यासाठी थांबावे. बाकीच्यांनी आपापले भत्ते व लंच पॅकेट घेऊन परतावे. रिझल्ट सांगायला एक जण आला. म्हणाला, ‘निराश होऊ नका. जीवनात असे प्रसंग येतात. त्यातून शिका. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. नक्कीच सफल व्हाल’ वगैर, वगैर... मी मनात म्हणत होतो, पटकन आवरा. म्हैसूर-वृंदावन पाहण्यात वेळ गेला तेवढा पुरे. मला तयारी करायची आहे फायनल परिक्षेची. एका चिठ्ठीवरील नंबर वाचत तो म्हणाला, ‘ओनली चेस्ट नं. २३ अँड ४५ आर सिलेक्टेड’. मला सगळ्यांनी गराडा घातला व शेकहॅंड व्हायला लागले तेंव्हा मला भान आले की मी - चेस्ट नं.२३- सिलेक्ट झालो होतो! सगळे चित्रच बदलले. मला थांबून राहावे लागले. वॉरंटवर मी बंगलोरला गेलो. तेथे कोणी ओळखीचे नव्हते. पुर्वी महाराष्ट्र मंडळात राहिल्याचे आठवले. तेथे राहिलो. सकाळी ७.३० ला त्यांनी सांगितल्याप्रमाणे हजर झालो. तो होता शनिवार. सगळ्या टेस्ट झाल्या. शेवटी कमांडींग ऑफिसर इंटरव्ह्यू घेणार असे सांगण्यात आले. दीडला ऑफिस सुटणार असे सांगण्यात येत होते. शेवटची दहा मिनिटे उरली. माझी उलाघाल वाढली. कारण शनिवारचा दिवस गेला तर सोमवार पर्यंत अडकून बसावे लागणार होते. मला ते परवडणारे नव्हते. होता होता अगदी पाच मिनिटे उरली असताना आम्हाला आत बोलावले गेले. (त्यावेळी तिथल्या सुभेदाराने केलेले वक्तव्य माझ्यासाठी पुढे मोठे काम करून गेले. तो म्हणाला होता, ‘साहेब अगदी जायला निघाले की पुढे ठेवलेले कागद जादा कटकट न करता पटापट सही करतात’! हा कानमंत्र मी लक्षात ठेऊन माझ्यावरिष्ठांवर तो प्रयोग करीत असे. मात्र माझ्या समोर आलेले कागद मी उद्या पाहू म्हणून लांबवत असे! असो.)

एका भारदस्त व्यक्तिमत्वाने आमचे पेपर पाहून, ‘वेल बॉईज, यू हॅव पास्ड मेडिकल एग्झॅम. गो अँड वेट फॉर फरदर ऑर्डर्स’ म्हणून सही ठोकून एक पत्र आमच्या हातात ठेवले. ‘थँक्यू’ कसेबसे म्हणत बाहेर पडताच मी एका ट्रकमधे उडी मारून बसलो. स्टेशनवरून दुपारची तीन वाजताची मिरजेची ट्रेन पकडली. घरी मी सिलेक्ट झाल्याने खूप आनंद झाला. माझी परिक्षा ही छान गेली. मला हायर सेकंडक्लास मिळाला. कॉलेजला सुट्टया लागल्या होत्या. ले. कर्नल पोंक्षेंची वाणी खरी ठरली.(खरे तर मला त्यावेळी रॅंकच्या नावांचा गंध नव्हता. पण ले. कर्नल ही दारावरची पाटी वाचून ती रॅंक मला माहित झाली होती. ‘ले फुलस्टॉप कर्नल’ तेंव्हा मी म्हणे! ले हा लेफ्टनंटचा शॉर्ट फॉर्म आहे. हे नंतर मला यथावकाश कळले.) तेही फार खुश झाले. हवाईदलात जायचे की नाही ते अजूनही नक्की होत नव्हते. पण देशातील विविध भागातून आलेल्या, हुशार व तयारी करून आलेल्या हजारो मुलांतून आपली निवड झाली याचेच मला अप्रूप होते. म्हैसूरच्या वास्तव्यात माझी एका पुण्यातील कुलकर्णी नावाच्या मुलाशी गाठ पडली. मराठी बोलणारा म्हणून गट्टी जमली. तो सांगे, त्याने महाराष्ट्र मंडळातील कॅप्टन शि. वि. दामल्यांचे मार्गदर्शन घेतले असल्याने त्याचे सिलेक्शन झाल्यातच जमा आहे. फक्त त्याच्या नावाची घोषणा म्हैसुरातील केंद्रातून होण्याची किरकोळ बाब उरली आहे! त्या मित्राला माझ्या नावाची घोषणा ही चेष्टा वाटली. त्याचे नाव कसे आले नसावे याबद्दलचे त्याचे तर्क इतके अजब होते! म्हणाला, ‘शश्या खर सांग, तुझा कोणाचा वशीला आहे? कारण त्याशिवाय तू कसा सिलेक्ट होणार?’ मी त्याला म्हणालो, ‘अरे माझ्या ऐवजी जर तू सिलेक्ट झाला असतास आणि मी तुला वशिल्याचे तट्टू असे म्हणालो असतो तर ते खरे असते काय़? ते जर खरे नसेल तर माझी निवड बिनवशिल्याची आहे, हे तुला मान्य व्हावे!’ नंतर एक-दोनदा तो पुण्यात भेटला. पुढे बँकेतून रिटायर झाला. त्याचे मिलिटरीत जायचे स्वप्न त्याने गालावर झुपकेदार दरारा वाटाव्या अशा मिशा राखून त्याने पुरे केले असावे. असो.

त्यावेळचा आणखी एक किस्सा आठवतोय. मला ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठितांचे संदर्भ द्यायला लागतात. त्यासाठी मी चिंतामणराव कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य चिं. ग. वैद्य व माधवनगर कॉटन मिल्सचे जनरल मॅनेजर केळकरांचे संदर्भ दिले होते. ते मी विसरूनही गेलो होतो. एक दिवस केळकरांनी हाक मारुन म्हटले, ‘अरे शशी, तुझे एक पत्र आले होते. ऑफिस मधे ये. काय आहे ते पहा!’ मी पहातो तर ते हवाईदलातून मी दिलेल्या संदर्भाच्या व्यक्तींकडून माझी चौकशी करणारे ते पत्र बऱ्याच दिवसापूर्वी आले होते! त्यांनी योग्य ते लिहून सही करून मला दाखवले. म्हणाले, ‘तूच पोस्टात टाक. आधीच उशीर झालाय. आणखी नको व्हायला!’ ते पत्र घेऊन मी तडक कॉलेज गाठले. प्राचार्यांना भेटून माझ्यासाठी पत्र आल्याची विचारणा करता त्यांनीही ड्रावर मधून लिफापा काढून म्हटले, ‘पहा हे तर नाही? तेच पत्र होते! त्यांनीही योग्य ते लिहून सही केली. ते दोन्ही लिफाफे माझ्या हाताने पोस्टाच्या लालडब्यात टाकले व ‘हुश्श’ असा निश्वास सोडला. पत्राबाबत दोघांनी दाखवलेली तत्परता(?) पाहून वाईट वाटले. नंतर हा किस्सा मी माझ्या मित्रांना रंगवून सांगत होतो. शेवटी मला ती पत्रे पोष्टात टाकावी लागली असे म्हणत पॅंटच्या खिशातून हात बाहेर काढला तर तीच दोन्ही पत्रे माझ्या हातात होती! मी चक्रावलो. ‘काय रे काय झाले?’ मित्र म्हणाले. चेहऱ्यावर काही न दाखवता मग त्या दिवशी मी पेटीत काय टाकले? याचा विचार करत राहिलो. गुपचुप ती पत्रे पेटीत नीट टाकली खरी पण आता तर मला कॉल येण्याची शक्यता मुळीच नाही. असा समज करून मी मनाला समजावले. आठवडे उलटले. एक दिवस एक जाडजूड लिफाफा हातात आला! ‘१९ जुलै १९७१ला कोईमतूरच्या एयर फोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमधे रुजू व्हा’ असा आदेश व आणखी सूचनांची लांबलचक यादी होती!

हवाईदलात जावे की नको यावर फार चर्चा झाली नाही. वडिलांनी ‘तुच ठरव’ म्हटले. आई म्हणाली, ‘सध्याची धंद्याची घडी पहाता नोकरी करणे शहाणपणाचा आहे. आलेली संधी सोडू नकोस. कर्तव्यात कसूर करू नकोस. सचोटी व शहाणपणाने वाग. जोखमीची नोकरी आहे. पैशाशी खेळ आहे. तु आहेस धांधरट. सावधपणे रहा. आम्हाला अभिमान वाटेल असे नाव कमव. जा’ आणि मी कोईमतूरला ट्रेनिंगला पोचलो.

***

प्रकरण 2 कॅडेटशिपचे दिवस ...

... ७१-७२ – इंग्रजीची बोंब- रंगनाथनची साथ, कुंडू कुंडू मूर्ती - कुकरी वाला हरालू, देवकर, बाकीचे साथी- अल्ब्युमिनची सफर दैय्या या मैं कहाँ आ फसी कारवाँचे गाणे...

Figure 1 फ्लाईट कॅडेट शशिकांत

Figure 2 nivarutti nantar कोल्हापुरी बाजात शशिकांत

आज दिनांक १७ जून २००८, मंगळवार. कमिशन मिळून मला बरोबर ३७वे वर्षे लागले. आज माझ्या विमाननगरच्या चौथ्यामजल्यावरील फ्लॅटमधे कॉम्प्युटरवर आरामात बसून हवाईदलातील माझ्या स्मृती चाळवताना - लिहिताना विलक्षण आनंद व समाधान वाटते. मात्र १९७२च्या जून १७ला मात्र परिस्थिती वेगळी होती. पहाटे उठून युनिफॉर्ममधे तयार होण्याला बराच वेळ लागला होता. कारण त्या दिवशीचा नट्टापट्टा वेगळाच होता. कांजी केलेली कॉटनची कडकडीत खाकीपॅंट व शर्ट, पायात सफेद ऐंकलेट्स, कमरेला करकचून बांधलेला पांढरा पट्टा, ब्रासोपॉलीशने रगडून चकचकीत केलेले त्याच्या पितळी पट्टयांना व ऑर्डर्ली रामासामीने थूक मारून मारून पॉलिश केलेले जड जड बूट, उजव्या हाताच्या मधल्या बोटाने तोलून धरलेली ३०३ डमीरायफल. खाडखाड करत आमची फ्लाईट मैदानात पोचली. फॉर्मेशन झाले. एयर कमोडर लॅझॅरस आले. आमच्या खांद्यावरील ईगलच्या पांढऱ्या पिप्स काढून निळ्या रिबिनीला काळी बॉर्डरच्या हवाईदलातील पायलट ऑफिसरच्या रॅँकची पिप्स त्यांनी आपल्या हाताने लावल्या आणि आमच्या कॅडेटशीपचे दिवस संपले.

Figure 3 कमिशनिंग परेडमधे एयर कमोडर लॅझॅरस अप्पण्णाशी हस्तांदोलन करताना, त्याच्या पुढे जे. बी. गुप्ता, नंतर मी व शेवटचा कौशिक

एकेक आठवू लागले... मिरजेला मला पाठवणी करायला स्टेशनवर आमच्या रिंग खेळातील दोस्त मोहन्या जोशी आला होता. माझी काळ्यारंगाची जड ट्रंक, त्यातील यादी बरहुकुम कपड्यांचे जोड व अन्य वस्तू असा मी निघालो. बंगलोरला बदललेल्या गाडीत माझ्या डब्यात आणखी एक जण चढला. त्याला पोहोचवायला आलेले घरचे अनेक लोक, नमस्कार-चमत्कार पाहून माझी बोळवण तशी जरा कोरडीच झाली असे वाटले.

गाडी पहाटेपहाटे कोईमतुरात पोचली. एका ट्रक वजा खटाऱ्यातून - त्याला थ्रीटनर म्हणतात असे नंतर कळले – आम्ही जमलेले एएफएसी - “एयर फोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजच्या” कॅडेट मेसमधे जमलो. अकाउंट्स, एडमिन (खरे तर 'अ' च्या डोक्यावर चंद्रकोर हवी पण कॉम्पवर तसे सध्या काढता येत नाही म्हणून जशी ‘ऱ्या’ ची जोडणी खटकते तसेच होणार आहे पण समजून घ्या) व लॉजेस्टिक्स अशा तीन ब्रांचेससाठी, आमची नं.५० जीडीओसीची पन्नासच्या आसपास मंडळी जमली. त्यात माझ्यासारखे डायरेक्ट एन्ट्रीवाले १४ एक्स-एनडीएतून काही ना काही कारणांनी गळालेले २६ व उरलेले ११ एक्स-एयरमन अशी ५१ जणांची विभागणी होती. माझ्यासारखा कॉलेजात एनसीसी मधेही न गेलेला अगदी कोरा कररकरीत मी एकटाच होतो. त्यामुळे मला बुजल्यासारखे वाटे. पण मी शाळेत ड्रिल, पीटीत लीडरचे काम करीत असे. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला ड्रम वाजवणे, झेंडा उभारणी आदी कामाचा सराव मला होता. पण इथे रायफल हाताळण्यापासून तयारी होती.

इंग्रजी बोलण्याचा सराव मुळीच नव्हता. त्यामुळे मला खूप चोरट्यासारखे होई. बर मला येत तर सर्व होते पण तोंड उघडायचा संकोच व इतरांच्यात मिसळून बोलण्याचे साहस होत नसे. पुढे लवकरच त्यावर तोड निघाली. एक्स-एयरमन रंगनाथनशी माझी दोस्ती झाली. तो एजुकेशन इन्सट्रक्टर म्हणून एयरमनच्या ग्रेडमधून भरती झाला होता. पुढे सार्जंट पर्यंत नोकरी झाल्यावर हुशारीमुळे तरुणपणातच त्याची ऑफिसर ग्रेडसाठी निवड झाली होती. तो तमिळ असल्याने १३वर्षे सर्व्हीसमधे राहूनही त्याला हिंदीचा सराव नव्हता. मला इंग्रजीचा नव्हता. आमची गट्टी जमली. माझी भीड चेपली.

Figure 4 कॅडेट मित्र आर रंगनाथन

मी धडाघड गप्पा मारु लागलो. ब्लडी, फकिंन, क्लाऊन, डफर, असे शब्द मराठीतील नेहमी वापरातील च्य़ायला सारखे माझ्या जिभेवर दर वाक्याला नाचू लागले. यू सी, यु नो, आय से, असे आपले प्रस्थ माजवणाऱ्या जोडगोळी शब्दांनी माझ्या संभाषणाला जोर येऊ लागला.

दडपून बोलायचे, असा खाक्या असलेले नंतर मला कितीतरी भेटले. आमच्या अकाउंट्स खात्यात कोणत्याही बाबीची एथॉरिटी कोट केल्या शिवाय जोर येत नाही. एयर फोर्स ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स, लॉमधील पीनलकोडचे सेक्शन्स, ट्रॅव्हल रेग्युलेशन्स, फिनान्सशियल रुल्स, रेग्युलेशन्स, काही अंतच नाही. एखादा क्लेम, पे ऑर्डर, अन्य कामे, का करता येणार नाहीत यासाठी समोरच्याशी वा बॉसशी वादावादीला त्या सर्व एथॉरिटीज तोंड पाठ असणे अतिआवश्यक असते. ते माझ्या अंगवळणी पडले. पण ते कोणापुढे पाजळावयाचे याचे तारतम्य हवे. यावरून एक किस्सा आठवला. पुढे एकदा कानपुरात असताना एक अकाउंट्स ऑफिसर महाशय होते. त्यांना तोंडाला येईल त्या एथॉरिटीज समोरच्यावर फेकून इंप्रेस करायची सवय जडली होती. एकदा तो आम्हा इतर अकाउंट्सच्या मित्रांसमोर बोलताना असेच आपले पोपटपंची ज्ञान ‘फेकू’ लागला. तेंव्हा त्याला आमचे सीनियर्स म्हणाले, “ओए यू इडीयट, स्टॉप दॅट क्रॅप. यू कॅन इंप्रेस आदर्स. डोंट थ्रो दोज एथॉरिटीज, रुल्स एँड रेग्ज टू अस. वी नो मोअर दॅन यू” (अरे मुर्खा, थांबव तुझी बकवास. इतरांना तू कायदे कानूनतोंडावर फेकून प्रभावित करशील. आमच्या समोर ती थेरं नकोत आम्ही तुझ्यापेक्षा ते जास्त जाणतो.) असे अधुन मधून त्याला खडसवावे लागे!

Figure 5 डावीकडून बसलेले मुखर्जी, मिश्रा, स्क्वाड्रन लीडर केके मुर्ती, अप्पण्णा, क्लार्क मेनन. पहिल्या रांगेत उभे चपरासी अय्यप्पन, अरोरा, राजीव कुमार गुप्ता, ..., जेटली, नायडू, गणेशचंद मागे उभे - अशोक पुरी उपेंद्र कौशिक, शशिकांत ओक, वेणूगोपाल, सरदार पुरी...

अकाऊंट्सच्या विषयासाठी खास इन्स्ट्रक्टर होते. स्क्वाड्रन लीडर केके मुर्ती म्हणून. त्यांना आम्ही ‘कुंडू कुंडू’ म्हणायचो. ते एक सॅडिस्ट अर्क होते. तोंडात चिरुट वा सिगारेटींचे धुराडे. रात्री रमचा ग्लास हातात. तोंडाला मा-भा च्या शिव्यांपासून वाक्याची सुरवात करण्याची सवय. आमच्या कमरेचा पट्टा काढून आम्हाला फटके लगवायी तर कधी आम्ही पेपर लिहिताना पंच मशीनच्या अडकित्याने आमच्या शर्टाच्या बाह्यांना भोके पाडण्याची खोड. येता जाता प्रत्येकाला काही ना काही म्हणून खिजवायची आदत. असे ते आमचे आदर्श!

एक्स एनडीएतील मुलांच्या एकी व दादागिरीमुळे आम्हाला जाब विचारणारा कोणी नाही अशी परिस्थिती होती. दोन दिवस रॅगिंगचे प्रकार झाले. पण आमच्या सीनियर्सची ‘डाल गळेना’ म्हणून रॅगिंग थंडावले. मला आठवते आम्ही सगळे ओळीने उभा होते. एकेकाला सिगरेट्स तोंडात कोंबून दीक्षा दिली जात होती. माझ्य़ासारखा नवा माल, सिगरेटीचा अनुभव नाही म्हणताच त्यांना चेव चढणार हे दिसत होते. पण काय झाले कोणास ठाउक माझ्या पर्यंत बारी येण्याच्या आधीच त्यांची रॅगिंगची तलफ गेली व मी सिगरेटी फुंकायच्या शिक्षेपासून बचावलो. तो इतका की पुढे आयुष्यात कधी सिगरेट फुंकली नाही. एकदा नाटकातून काम करताना चेन स्मोकर असलेल्या नायकाची भूमिका करताना मी सिगरेट नुसती ओठांवर ठेऊन वेळ मारून नेत असे. पण सिगरेट ओढायची वेळ कधी आली नाही. मला वाटते की माझ्या वडिलांना पान-तंबाखुचा नाद होता. त्यांच्यासाठी मला पानपट्याच्या ठेल्यांवर जावे लागे. त्या तेथील वातावरण, पान बनवण्यातील अस्वच्छता याचा एक परिणाम माझ्यावर झाला असावा. त्यामुळे मला एक प्रकारचा तिटकारा आहे त्याचा. आजही मी पान-विडा खातो पण चेहरा वाकडा करत.

काही काळानंतर मी रुळलो. मेसमधील जेवण आवडीने खाऊ लागलो. कोईमतूरमधे राहणारे वागळे नावाचे एक प्रोफेसर व कुलकर्णी नावाच्या कुटुंबियांशी ओळख झाली. कुलकर्णीच्या आदरातिथ्याचा पाहुणाचार आमच्यासारखी दर कोर्सेस मधील नवखी मराठी मुले घेत. काहींचे किस्से फार मजेचे होते. इंग्रजीची बोंब, घरच्या जेवणाची, वातावरणाची, आईवडिलांची आठवण येऊन, रॅगिंगच्या जाचाला कंटाळून पळून जाण्याचे विचार अनेकांनी त्यांच्या घरी मनमोकळे केले होते. कुलकर्णी कुटुंबियांच्या आस्थेवाईक स्वभावामुळे कित्येकांना धीर मिळाला. घरी परतायचे विचार मागे पडले. पुढे तेच कॅडेट्स मोठमोठ्या ऱँकचे ऑफिसर होऊन त्यांनी त्यावेळी दिलेल्या मानसिक व भावनिक आधाराचा स्नेहपूर्ण उल्लेख करत आवर्जून भेटून जात. माझ्या घरच्यांना पासिंगआऊट परेडला येणे जमणार नसल्याने मी त्यांनाच विशेष अतिथी म्हणून बोलावले होते. पुढे १९७९मधे मी व मला एक वर्ष सीनियर सुहास केळकर एडव्हान्स अकाऊंट्सचा एक कोर्स करत असताना त्यांना असेच आवर्जून भेटून आलो. तेंव्हा ते थकलेले वाटले. नंतर ८९-९१ सालच्या सुलूरच्या पोस्टींग मधे त्यांनी घर बदलून दूर गेल्याचे कळले. नंतर प्रत्यक्ष कधीच भेट झाली नाही. असो.

अल्ब्युमिनचे किटाळ!

कॅडेट असताना मी एकटाच असा होतो की ज्याने एकदाही ‘सिक रिपोर्ट’ केले नव्हता. मुद्दाम मी काहीच केले नव्हते. शरीर ठणठणीत जर होते तर मी काय करणार? काही जणांना मात्र परिक्षा, परेड टाळायला आजारी असल्याचा बहाणा करावा लागे. मात्र त्याचे उट्टे मला वार्षिक परिक्षेच्या अगदी ऐन वेळी हॉस्पिटलची वारीकरून भरावे लागले. त्याचे झाले असे की, आमची फायनल मेडीकल ड्यू होती. ब्लड-युरीन सॅंपल देऊन झाल्यावर मला पुन्हा बोलावण्यात आले. पुन्हा टेस्ट झाली. मग रिपोर्ट आला की अल्ब्युमिन नावाचे द्रव्य माझ्या सॅंपलमधे सापडले असून त्याची आणखी सखोल चाचणी घेण्याला मला वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमधे जावे लागेल. मित्रांच्या सांगण्यावरून ती टेस्ट मी बाहेरच्या लॅब मधून करून आणली ती पुर्ण नॉर्मल होती. परिक्षा ८-१० दिवसावर आली होती. मूर्तींनीही सांगून पाहिले. बाहेरचे रिपोर्ट दाखवले. पण मेडिकलवाले हट्ट सोडेनात. शेवटी मी वेलिंगट्नच्या हॉस्पिटलात भरती झालो. तेथे ऑफिसर वॉर्डातील व्यवस्था पंचतारांकित होती. दुसऱ्यामजल्यावर बसून कुनूर व्हॅलीची सिनरी पाहाणे एक जीवनातील अद्वितीय अनुभव होता. मी पुस्तके घेऊन बसे पण फुकट या झंझटात अडकलो असा वाटून वैताग येई. होता होता माझी सुखरूप सुटका झाली. मात्र अभ्यासाचा वेळ वाया गेला व मला तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या पर्यंत घसरावे लागले. असो.

त्या काळातील आठवणींमधे मजेशीर प्रसंग आठवताना कुकरीवाल्या भयंकर हरालूची, दिवसअन् रात्र गिटार वाजवत बसणाऱ्या पॅक्कियम, अत्यंत खोडकर म्हणून प्रसिद्ध देवकर, दादागिरी करुन मला छेडणारा एस पी सिंग, असे एक्स एनडीचे नग होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते उगाच नाही. यांचे कर्तृत्व कॅडेट असतानाच दिसत होते. नंतरच्या नोकरीत यांच्या पैकी प्रत्येकाने असे दिवे पाजळले की काही विचारू नका. नागालँडचा एकुलता एक म्हणून शेफारलेला 'हरलू' दोनदा कोर्टमार्शल होऊनही हवाईदलात तब्बेतीत राहात होता. त्याच्या अचाट कारवायांमुळे नंतर लोकांनी त्याचे नाव ‘हरामी हरालू ' असे ठेवले. देवकरच्या खोड्यांना उत येऊन आग लावण्याचे पर्यंत मजल गेल्याने ला रस्टिकेट केलेले असताना देखील त्याने एनडीएत असताना 'गोल्डमेडलिस्ट' होतो याचे भांडवल करून एयर चीफ पर्यत लग्गा लाऊन तो पुन्हा आमच्या नंतरच्या बॅच मधून कमिशन मिळवून हवाईदलात ठाण मांडून बसला. नंतर बायकोला फसवून व काही चोऱ्या करून कारावासाची शिक्षा भोगत असताना तेथून परदेशात पळाल्याचे ऐकिवात आले. माझ्याशेजारच्या रुम मधेराहणाऱ्या पॅक्कियमला गिटारपुढे काही सुचत नव्हते. 'आम्हाला एनडीएतून फ्लाईंगसाठी सिलेक्ट केलेले होते पण तेथून काढल्याने आम्ही फ्रस्ट्रेट झालो आहोत. आम्हाला या पुळचट शिक्षणाची गरज नाही'. असे तो कधी कधी म्हणे. त्याला काढून टाकल्यावर स्टेशनवर सोडून आल्याने निश्वास सोडाणाऱ्या स्टाफला माहित नव्हते की तो पुढल्या स्टेशनात उतरून परत ट्रेनने एएफएसीतील कॅडेट मेसमध्ये दोन महिने आरामात राहात होता. असे दोनदा झाल्यावर तो एकदाचा परत गेला. गोव्यात कुठेतरी एका बँडमधे तो इंग्रजी गाण्याचे कार्यक्रम करत असे असे कोणी म्हणे. असेच एक महाभाग होते. 'आय जे' (इंदरजीत) सिंग. पायाला फारसे काही झालेले नसताना वर्षभर पट्टी बांधून फिरणारा आयजे घोड्यावरचा पटू होता. एकदा पडण्याचे निमित्त झाले व नंतर स्वारीने आयुष्यभर नाटक केले. लग्न झाले. बायकोशी पटेना. पैशावरून भांडणांचा कळस झाला. आमचे काम पगाराचा वाटप करण्याचे असल्याने अशा केसेस आम्हाला नेहमीच हाताळाव्या लागत. मात्र आयजेला वाटे की मी त्याचा कोर्समेट असल्याने मी त्याची बाजू घेऊन नेहमीच मदत करावी. तशी केलीही. पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच तसे दरवेळेला मदतीचा हात मी नाकारला की तो माझ्यावर खवळे.

हरालू चंदिगडला व नंतर कानपुरच्या पोस्टींगला माझ्या बरोबर होता. 'एयर फोर्सच्या पैशाच्या सेफची चावी दे रे' असे मला तो खुणावे. 'चल भाग चलते है' असा त्याचा होरा असे. अधुन मधुन माझ्याकडून खाजगीत पैशाची मागणी करून ‘पगाराच्या पैशातून परत घे’. असे मी कित्येकदा त्याला कोर्समेटच्या इमानामुळे हातउसने दिले. कधी नाही म्हटले तर माझ्यावर गुरकारायला तो कमी करीत नसे. मग मला ती आठवण येई... आजही आठवले की थरकाप होतो. एकदा आमच्या कोर्सचा कॅडेट-इन-चार्ज व अकाऊंट्सचा कॅडेट पी एन मिश्रा एकदम जीव घेऊन पुढे पळतोय. त्याच्या मागे फुटभराचा जंबिया घेऊन हरालू वाटेत येणाऱ्या झाडाझुडपांना सपासप तोडत त्याच्या मागे मारायला धावतोय. नेमके आमच्या बिलेटमधे येउन हरालूने मिश्राला गाठले. काही क्षणांचा उशीर झाला असता तर काही भलतेच घडणार होते. मात्र आमच्या सारख्यांनी त्या हरालूला गच्च धरून ठेवले. मिश्राला लांब नेले गेले व वेळ टळली.

लग्नानंतर त्याच्या घरी जेवणात फक्त भाताचे डेचके व कुत्र्याच्या तंगडीचे मटन पाहून मला शिसारी येणार नाहीतर काय? माझे मित्र सांगत तो इस्टमधे असताना तेथील कुत्री हा दिसला की जीव घेऊन पळत. तो नेम मारून खेकडे, झुरळे, सापांना त्याच्या पोटाचा घास बनवत असे. कानपुरात नंतरच्या भेटीत नवीन पोरीची, “ही माझी बायको“ म्हणून ओळख करुन दिल्यावर माझ्या उंचावलेल्या भुवयांना पाहून म्हणाला, “ये नया माल है”. असो.

असे 'कोर्टमार्शल मटेरियल' आमच्या समोर दिसत असे तेंव्हा वाटे की हे कसले 'जंटलमन कॅडेट'? हे तर राक्षस! पुढे जंगल कॅम्पला त्यांची महती आम्हाला कळली. विरप्पन फेम मुरुडूमलाई जंगलात रोज जेवणाला मिळणारे नॉनव्हेज पदार्थ त्यांनी केलेल्या शिकारीले प्राणी असत. जंगल कॅम्पातील प्रत्येक वॉरगेम त्यांनी लीलया जिंकली. तेंव्हा हळूहळू लक्षात आले की सेनेला असेच विक्षिप्त जवान हवे असतात. त्याना पोसण्याचे एक असेही कारण असते की हेच 'एक्सेंट्रिक' लोक युद्धातील “करो या मरो” स्थितीतील जिगरबाजीची कामे करतात. युद्धातील पराक्रमाची कामगिरी करताना अशाच लोकांची साहसी मनोवृत्ती कामी येते. अनेकदा सिनेमातही एरव्ही कामातून गेलेले 'कडके दारूबाज' विलक्षण मरदुमकी गाजवताना दाखवतात ते असेच असते. असो.

आमचे शिक्षण अर्धे झाले व ४ डिसेंबर १९७१ला भारत-पाक युद्ध सुरु झाले. रोज बातम्या ऐकताना आम्हाला सांगण्यात आले की जर लढाई रेंगाळली तर लगेच म्हणजे एका वर्षांऐवजी सहा महिन्याच्या ट्रेनिंग नंतर कमिशन देण्याची कुणकुण होती. मात्र तसे झाले नाही. बांगलादेशची निर्मिती झाली व आमची मिड-व्हेकेशन मात्र सहा आठवड्या वरून दोन आठवड्यांची झाली. आमचा युद्धाच्या काळातील सेवेचा चान्स हुकला तो निवृत्त होईपर्यंत.

कमिशन मिळाल्यानंतर माझ्यात झालेला बदल घरच्या सर्वांना जाणवला. नवा उत्साह, तडफ व आत्मविश्वास जाणवला. बोलण्यात सफाई आली. वागण्यात एटीकेट्सचा प्रभाव पडला. खाताना काट्या चमच्यांचा वापर आवडू लागला. ओठांवर ”ब्लडी फेलो” सारखे तकियाकलाम घोळू लागले. प्रि.वैद्यांना, प्रा. देवदत्त दाभोळकरांना भेटायला मी मुद्दाम कॉलेजात गेलो होतो. अकाऊंट्न्सी शिकवणारे आमचे प्रोफेसर सुरेश दातार अकडबाज असामी. उत्साह व मेहनत दांडगी. देव आनंद टाईप केसांचा फुगा, शत्रुघ्न सिन्हा स्टाईल उगाच छाती फुगवुन ताठ्याची चाल, अमेरिकन नटांप्रमाणे ओठ मुडपुन तिरकस इंग्रजीत ते बोलत, पण कधी कधी मराठीतून त्याच ढंगात बोलणे. क्रिकेटमधे विकेटकीपिंग स्पेशालिस्ट, बॅटींग करताना चुकलेला बॉल मारण्याच्या एक्शन रिप्ले करण्यात त्यांचा वेळ जास्त जायचा. ते एनसीसीचे ही इनचार्ज असत. एकदोन परेडमधून एनसीसीतील हडेलहप्पी कारभाराचा मला तिटकारा आला. कॅडबरी चॉकलेटचा मोह सोडून परेड करण्याला दूर अंतराचे कारण सांगू सवलत मागितली. तेंव्हा ती देताना त्यांच्या कपाळावर खूप आठ्या होत्या. ते लक्षात ठेऊन दरवेळी तासात रोल नं ६७ असे म्हणून उभे करून मला मुद्दाम प्रश्न विचारत. म्हणत,”परेड करत नाही मग आता अभ्यासाला खूप वेळ मिळत असेत तर उत्तर सांग”. मीही कमी नव्हतो. माझे उत्तर तयार असे. असो. स्टाफरुममधे दातार सराची मुद्दाम भेट घेतली. पेढा हातात ठेवत म्हणालो, ‘सर, परेड करताना मला तुमची आठवण येत असे. तेंव्हा ते खुष झाले. पण एनसीसीत परेड केली नाही तरी मला काहीही त्रास झाला नाही.’ मला आशीर्वाद देताना त्यांनी कंजूषी केली नाही. पुढील कारकीर्दीत मला अनेक प्रतिष्ठित परेड कमांड करायला मिळाल्या. नवी दिल्लीतील २६ जानेवारीच्या गणतंत्रदिवसाच्या परेडला वरिष्ठांच्या नकारामुळे मला सहभागी होता आले नाही पण नंतर अनेक वर्षांनी माझ्या जीवनातील सत्यघटनेवर आधारित ‘मन में है विश्वास’ या सीरियलमधे त्याचा कथानायक ‘स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक’ २६ जानेवारीच्या गणतंत्र दिवसाच्या परेडमधे दिमाखात सामिल असतो. २६ जानेवारी २००७ ला त्या एपिसोडचे प्रसारण झाले.तो संपुर्ण किस्सा नंतर येईल.

Figure 6 SU 30 in formation in my last posting in Pune Air Base.

Figure 7 AN 12 in the skies of Chandigarh Air base.

***

प्रकरण 3. चंदीगढ –पहिले पोस्टींग ७२-७३

... पहिले पोस्टींग, पहिला पगार, पहिली २०० रुपयांची चाट – पहिली बर्फातून हवाई सफर...

‘गुडमॉर्निंग सर’, माझ्या कडक सॅल्युटला रिटर्न सॅल्युट देत, स्क्वाड्रन लीडर ओ पी चतुर्वेदींनी माझे चंदिगढच्या नंबर १२ विंगच्या अकाऊंट्स सेक्शनमधे, ‘वेलकम यंग मॅन’, असे म्हणत स्वागत केले व तात्काळ लांबलांब दणकट किल्यांचा एक जड जुडगा हाती देत मला सांगितले, ‘आजपासून तू या किल्या सांभाळायच्यास’. माझ्या बरोबरचे रिपोर्टींगला आलेले कोर्समेट्स सरदारजी गुम्मन व हरालू परतले अन् मी जो कामाला चिकटलो तो चिकटलोच. सकाळची एयरमनची सेक्शन रिपोर्टींग परेड घेणे, युनिफॉर्म, हेअरकट, शूपॉलिश, लेट कमिंग, सिक रिपोर्ट सर्वाचा अहवाल तयार करून बॉस विंग कमांडर एम पी नायरांना त्वरित देणे, यापासून ते रोजच्या रोज हजारो रुपयांचे पे व अलौन्सेस, टीए क्लेम्स वगैरे रोख पैसै देण्याचे व सर्वात शेवटी त्याचा रोजचा हिशोब नीट लागल्याशिवाय स्ट्रॉंग रुम न बंद करणे वगैरे गुंतागुंतीच्या कामाला जुंपले. काम जोखमीचे, पाच नव्यापैशाचा फरक देखील शोधून काढावा लागे. सध्यासारखे कॅलक्युलेटर्स, नोटांचे काऊंटींग मशीन असे नखरे तेंव्हा नव्हते. प्रत्येक नोटांची शंभराची पुडकी बांधून त्याला रबर बँडने पॅक करताना मला बँकेतील कॅशियरची आठवण येई. नाण्यांच्या २०-२०च्या ढिगांना कागदाच्या सुरळ्यात पॅक करणे म्हणजे एक दिव्य काम होते. हात काळे पडत. कोणीही हाताळलेल्या घाणेरड्या कळकट फाटक्या कुबट वासाच्या नोटांना वागवणे मला अतिशय जिवावर येई. सगळा सेक्शन गेला तरी पैसे टॅली होईपर्यंत हाताखालचे एक-दोन एयरमन व मी पुन्हापुन्हा नोटा मोजणी करणे, पेड- नॉटपेड व्हाऊच्रर्सचा घोळ सोडवणे, एखाद्याला जादा पैसे गेले आहेत असा संशय आला तर त्याला परत बोलाऊन पैसे मोजायला लावणे आदी किचकट व जिकिरीची कामे मला रोजचीच झाली. मेसमधे रोज दुपारच्याजेवणाला उशीर रुमवर परतलो की आधीच्या राहाणाऱ्यांनी भिंतीवर अति कमी वस्त्रातील ललनांचे उत्तान फोटो लाऊन सजवल्या होत्या त्यांच्या रुपाचा आस्वाद घेत पडून राहायला लागे. कारण रुममधे आम्ही तीन जणांच्या कॉट्स सोडून फक्त चालत दरवाज्याला जाण्याची जागा शिल्लक उरे. जुलैची उमसभरी घामाची चिकचिक वाढवणारी गर्मी. रात्रीच्या जेवणाला ऑफिसर्स मेस रुलप्रमाणे पांढऱ्या शर्टपँटवर कंपलसरी टाय होता. नसेल तर सिनियर्स परत पाठवत. मला बारमधे रस नव्हता. कधी कधी मी कोक, लिमका, ऑरेंज सॉफ्टड्रिंकची चव घेत भोजनाला जात असे. असे पहिले आठवडे गेले व माझ्या जीवनातील पहिली मंथली पे परेड आली ३१ जुलैला. मी नवा म्हणून माझ्या नेक्स्ट सीनियर - फ्लाईट लेफ्टनंट आर स्वामिनाथनने ऑफिसर्सच्या पगार वाटपाचे सोपे काम दिले. प्रत्येक आधिकाऱ्याची पगाराची पाकिटे बनवून तयार केली गेली होती. मला फक्त ती त्यांच्या हातात देऊन एक्विटन्स रोलवर त्याची मिळाल्याची सही घ्यायची होती. मोठ्या हॉलमधे माझ्या हाताखाली ३-४ एयरमनही होते. नेमक्या त्या दिवशी मला २० रुपयाच्या कोऱ्याकरकरीत शेंदुरी नोटाही ज्यांचा पगाराचे पॅकेट बनवले गेले नसेल त्याला देण्यासाठी वेगळ्या दिल्या होत्या. काही वेळ सर्व सुरळीत चालले होते. मात्र नव्या शेंदुरी रंगाच्या नोटा पाहून प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटायला लागल्या. तेवढ्यात एस. ए. ओ.(सिनियर अकाऊंट्स ऑफिसर) विंग कमांडर नायरांना एओसीनी ताबडतोब बोलावले. त्यांच्या जवळ पीक कॅप नव्हती. तेंव्हा सर्वात जवळ ऑफिसर्स मेस म्हणून मला त्यांनी मला रुमवर पिटाळले. मी ‘बॉसची आज्ञा’ म्हणून धावत पळत पीक कॅप आणून दिली. त्या मधल्या काळात त्यांनी स्वतः जातीने २० रुपयांच्या नोटांचे-पैशाचे व्यवहार केले. ते कॅप घेऊन गेले. मी सर्व काम झाल्यावर उरलेले पैसे मोजत राहिलो. २००रुपये कमी होत होते! त्य़ा दिवशी मला पहिला पगार मिळाला होता. ४०० रुपये! खूप शोधाशोध करूनही काही कळले नाही कसे पैसे गेले. शेवटी खिशातून २००रुपये परत सेफमधे ठेवत मी माझा पगार सेलिब्रेट केला! काम किती जोखमीचे आहे. क्षणार्धाचे दुर्लक्ष झाले तर काय अवस्था होते, ते मी पहिल्या फटक्यात अनुभवले. ( फोटोत दिसणारी हीच ती पीक कॅप कॅडेट असताना घेतली होती...)

पुढेही असे काही वेळा पैसे गमवायचे प्रसंग आले. पण अर्धा पगार गमावण्याचा धसका काही और होता. घरी कळाले तेंव्हापासून आई म्हणे, ‘तुझ्या पगाराचा दिवस आला की अजुनही मला काळजी वाटते’. या सगळ्यातून मी वेळात वेळ काढून एम कॉमच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत असे. ते पाहून मित्र म्हणत, ‘बस कर यार. ऐश कर. दारू पी. कसला अभ्यास आणि काय. चल पिक्चर चलते है’ त्यांच्या आग्रहाखातर सिनेमा थेटरात आम्ही पोचत असू.तेंव्हा सेनेतील लोकांना टॅक्स माफ असे म्हणून उण्यापुऱ्या दीड रुपयात बाल्कनीची तिकिटे आरामात मिळत. चंदीगडच्या १७ १८सेक्टर मधील केसी, --- सिनेमाघरात आवडलेल्या गाण्यांकरता मी पाकिजा, धर्मेंद्र-तनुजाचा - दो चोर दोनदा पाहिला. रात्री गोडसर दही व स्टफ्ड पराठे हा ठरलेला मेनु असे. शेवटी ‘मिठी लस्सीदा बडा गिलास’ ओठांवरून पुढे सरकला की टाकी फुल्ल! ( अशा पिक्चरची न्यारी सफर आजही आमच्या चर्चेचा विषय बनते जेंव्हा एयर कमोडर म्हणून नंतर रिटायर झालेले अनंत महाबळेश्वरकर सर विमाननगरच्या जॉगर्स पार्कमधे भेटतात अन अशाच जुन्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो झालं...)

एकदा माझी ओळख माधवनगरच्या आमच्या शेजारच्या केळकरांच्या नातेवाईक रमेश जोशीशी झाली. त्यांना एयरमन क्वार्टर न मिळाल्याने ते नवरा-बायको १९ सेक्टरच्या एका आउट हाऊसमधे राहायचे. त्या दोघांना अगत्य दांडगे. ऑफिसरअसूनही त्यांच्या आदरातिथ्यात मी रंगून जायचो. हवाईदलातर्फे दरवर्षी मनवल्याजाणाऱ्या गणेशचतुर्थीसाठी मराठी नाटकाच्या तालमी त्या वेळी त्यांच्या घराच्या अंगणात होत असत. मला त्यावेळी तालमी पहाण्यात मजा वाटे. मात्र त्यावेळी हे माहित नव्हते की काही वर्षांनी मी ही नाटकात इतका बुडून जाईन! असेच एक-दोन महिने गेले. ७१ ची लढाई नुकतीच सरली होती. लोकांचा सेनेवरील विश्वास द्विगुणित झाला होता. त्या सुमारास चंदीगडला हवाईदलाचा गणपती व महाराष्ट्र मंडळाचा गणेशउत्सव एकत्र होता. त्यांनी मराठी नाटक ठीकठाक बसवले होते. चंदिगढसारख्या पंजाबी मुलखात सेनादलाच्या गणेशपुजेची विसर्जनाची लांबच लांब मिरवणूक मी प्रथम अनुभवत होतो. मोठमोठ्या ट्रकवरून ५० पेक्षा जास्त गणेश मूर्तींची स्थापना झालेल्या गाड्या विविध आर्मी युनिट्च्या फेटेवाल्या मराठी जवानांच्या समावेत लेझीम-ताशा- हलगीच्या दणदणाटात निघाल्या होत्या. हजारोंच्या संख्येने स्थानिक लोक, प्रामुख्याने सरदारजी बेभान होऊन नाचत होते! सुखना लेकमधे गणपती बोळवताना लेकचा काठ गुलालाने व ‘गणपती बप्पा मोरया’ गर्जनेने दणाणून गेला होता.

एक दिवस मला बॉसनी बोलाऊन सांगितले, ‘तुला नंबर ८ विंग आधमपुरला ५० दिवसच्या टीडीवर जावे लागेल’. टीडी म्हणजे टेंपररी ड्युटी - ९० दिवसापेक्षा कमी काळासाठी दुसऱ्या स्टेशनवर कामासाठी जाणे. झाले मी गाशा गुंडाळून बसने जालंधरवरून होशियारपुरच्या मार्गावरील आधमपुरला पोहोचलो. तेथील एका अकाऊंट्स आधिकाऱ्याला हॉस्पिटलमधे एडमिट केले होते. तर दुसऱ्याला अर्जंट सुट्टीवर पाठवले होते. तिथे माझे बॉस होते, ‘स्क्वाड्रन लीडर कोठारे’. मी पोहोचल्यानंतर आजारी पडलो. तेथे होती अति थंडी. मी नवखा असल्याचे व थंडी बाधल्याचे त्यांनी ताड़ले. ते स्वतः आपल्या घरी घेउन गेले. स्वेटर व रजयांची मोठी गुंडाळी मला मिळाली. पुढे मी बरा झालो. मित्र जेबी गुप्ता भेटला. नंतर कानपूर व श्रीनगरला असताना आम्ही एक रुम शेअर कली.

एकदा त्यांच्या घरी एका मुलाच्या बर्थ डे पार्टीला त्यांनी मला आवर्जून बोलावले. मजा अशी की त्यांच्या त्याच मुलाच्या बरोबर मी सन ९६ -९७ मधे तिसऱ्यांदा श्रीनगरला मेसमधे एकत्र राहात होतो. तो तोवर हवाईदलात एनडीएतून भरती होऊन फ्लाईंग ब्रांचमधे शशांक कोठारे विंग कमांडर रँकवर पोहोचला होता. तोवर त्याचे वडील वारले होते.

कोठाऱ्यांनी काही टिप्स दिल्या. एकदा मला म्हणाले, ‘या एयरमन लोकांवर सर्वस्वी अवलंबून राहू नये. ते केंव्हा तोंडघशी पाडतील नेम नाही.’ एकदा मजा झाली. म्हणाले, ‘सेफच्या किल्ल्यासाठी फार जागरुक राहावे. नेहमी लक्षात असू दे की किल्ल्या एक तर सेफ उघडलेली असेल तर त्या सेफलाच लटकवलेल्या हव्यात. सेफ बंद केली असेल तर नेहमी त्या आपल्या खिशात हव्यात. दुसरीकडे कुठेही असता कामा नयेत’. असे म्हणत मला सेफची चावी देण्यासाठी त्यांनी आपल्या खिशात हात घातला. शर्ट-पँटचे खिसे चाचपायला चालू केले. पटकन आलोच म्हणून घरी जाऊन किल्ली आणून मला दिली. मग म्हणाले, ‘पहा आधीचा युनिफॉर्म धुवायला टाकताना त्यात किल्ल्या तशाच राहून गेल्या! अस तुझ्या हातून व्हायला नको बर का !

ते बोलायचे इंग्रजीत, मात्र ‘बट’ म्हणायची वेळ आली की हमखास ‘परंतु’ एवढाच शब्द मराठीतून म्हणत. त्यामुळे मजा वाटे. त्यांना काहीतरी आठवून पटकन फोन डायल करायला आवडे. पण रिंग वाजायच्या आत त्यांना आपण कोणाला फोन लावणार होतो त्याचा विसर पडे. रिंग वाजायला लागली की बऱ्याचदा ते समोरच्याला विचारायचे, ‘कायरे मी आत्ता कोणाला फोन लावला आहे?’ आता समोरच्याला काय माहित ते कोणाला फोन करणार होते ते! एकदा एका ऑफिसरनी पैसै हरवल्याने कमी पडायला लागले म्हणून वैतागाने माझ्या टेबलावर पैशाची बॅग फेकली. त्यातील नोटा-नाणी खाली पडली. तो सीनियर. त्यात सरदार. मला उर्मटपणाने म्हणायला लागला, ‘तूच उचल. वादावादी झाली. कोठारे आले. त्यांनी त्याला दम भरला. म्हणाले, ‘तो तर उचलणार नाहीच, पण आता तू बऱ्या बोलाने पैसे उचलून त्याच्या हातात दिले नाहीस तर तुला आत्ताच्या आत्ता सेल (जेल) मधे टाकीन.’ तो वरमला. मात्र नंतर एका पार्टीत दारू पिऊन मला मागून येउन धडक दिलीन. मारायला धावला. मी त्याच्या पोटात गुद्दे मारुन पाडला. नंतर मात्र तो दोस्त झाला.

साधारण नोव्हेंबर १९७२ च्या सुमारास ते एकदा मला म्हणाले, ‘कायरे तुला होशियारपुरला यायचे आहे काय़ भृगु संहिता पाहायला’? तेंव्हा मी म्हणालो होतो, ‘छे, मला भविष्य पहाण्यात मुळीच रस नाही’. मात्र त्यानंतर जवळजवळ २३ वर्षानंतर नाडी भविष्यात मला विलक्षण रस निर्माण झाल्यावर होशियारपुरची भृगु संहिता पहायला तांबरमहून मुद्दाम २५००कि मी अंतर काटून जाण्याचा योग आला तेंव्हा त्यांच्या त्या विचारण्याची प्रकर्षाने आठवण झाली. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ यावी लागते हेच त्यावरून सिद्ध होते. हेच कोठारे नंतर विंग कमांडर बनून माझे कानपुरात काही काळ बॉस होते. पार्टीत त्यांच्या सारखे ग्रेसफुल डान्स करणारे ‘कपल’ नव्हते. तासंतास डान्स फ्लोअरवर त्यांची उपस्थिती असे. तरुणपणी या नाचच्या बळावर त्यांनी विग आडनावाची पंजाबी तरुणी गटवली होती असे ते केंव्हातरी म्हणाले होते. कानपुरात असताना ते आमच्या नाटकांच्या तालमींना अधुन मधुन हजर असत. एकंदरीत चंदिगढला परतल्यावर मी बराच शहाणा झालो होतो....

प्रकरण 4. श्रीनगरच्या ७३ पहिल्या पोस्टींगची मजा

– टायपेक्सची कोर्ट ऑफ इन्क्वायरी – पुनम, टीटा कौल

Figure 8 -Typex machines were carried in this type of IL 14 in one of the trips to Srinagar Air base in 1972

नंबर १२ विंगच्या मूळ कामाच्या जागी परततोय तेवढ्यात ती घटना झाली. स्क्वाड्रन लीडर ओ पी चतुर्वेदींच्या हातून २० रुपयांच्या नोटांचे एक बंडल चुकून वाटले गेले. २ हजाराचा गंडा बसला. भरपाई म्हणून आम्ही इतरांनी ४शे रुपये एकत्र करून ते भरले. मी पुन्हा रिकाम्या खिशाचा झालो. ‘तू तो अभी बच्चा है। ऐसे हादसे होते रहते हैं।’ खांदे उडवत ते म्हणाले. जणु काही झालेलेच नव्हते. फक्त मी स्वतः पैसे न गमाऊन चालणार नव्हते. त्यांच्या भरपाईत हातभार लावणे ही त्यात समाविष्ट होते. इतरांच्या अशा गफलतींना सुद्धा आपलेसे मानुन त्याची भरपाई देखील सर्वांनी एकत्र करायची असते आदी धडे मी तिथे शिकलो. माझ्या अभ्यासाची कोणाला फारशी तमा नव्हती. थोड्याच दिवसात पुन्हा श्रीनगरयेथील अकाऊंट्स ऑफिसरला सुट्टीवर जाण्यासाठी मला त्याच्या जागी रवाना करण्यात आले. दोन महिन्याचा अवधी होता.

Figure 9 This is MI 8

मला मी-८ नावाच्या एका मोठ्या हेलिकॉप्टरमधून जाण्याची संधी आली. डिसेंबरचा महिना, कोवळ्या उन्हात हिवाळयाचा निळ्या वुलनच्या कापडाच्या ड्रेसात1 मी आत चढलो. आत आणखी ६ जण होते. चमत्कारिक नजरेने त्यांनी मला पाहिले. ‘पागल हो क्या? अभी क्यों इतनी ठंड में जा रहे हो?’ असा त्यांच्या चेहऱ्यावर भाव होता. उधमपुरला2 पहिला हाल्ट झाला. काही क्षणांत हवामान बदलले व मुसळधार पावसाला सुरवात झाली. चायपानी पुन्हा झाले. एटीसी (एयर ट्रॅफिक कंट्रोल) रूम आमच्या विमानाला बॅड व्हेदरमुळे पुढे जायला परवानगी देईना. आम्ही अडकून पडलो. वातावरण निवळले. पुन्हा बरीच बोलाचाली झाली. आमचा पायलटच मास्टर ग्रीन कॅटॅगरीचा होता. म्हणाला मी जाणारच. बरीच बोलाचाली झाली व चॉपरची (हेलीकॉप्टरचे लघुकरण) पाती गरगरू लागली! रामबन गेले आणि ढगांच्या तांड्यात भरकटायला झाले. गायरो काम करेनासा झाला. उंची किती त्याचा नक्की अंदाज येईना. पायलटच्या अनुभवाची कसोटी होती. बसलेल्यांना घाम फुटला होता. मी मात्र अनभिज्ञ होतो. मजेत बाहेरील बर्फाच्या चादरीतून व ढगातून दिसणारी गंम्मत पहात होतो. कारण आत काय चालले आहे याची मला कल्पनाच नव्हती! बनिहाल पास आला व गेला याचे मला भान नव्हते. एक दोन जण हुश्श करून बसले तेंव्हा मला कळाले फारच बाका प्रसंग होता! बनिहाल गेले व एकदम ढग कुठे पसार झाले कळले नाही. उंचच उंच सुरुची झाडे, त्यावर बर्फाच्या लादीचे थर. झेलम नदीची सर्पाकृती पाण्याची पट्टी पाहिली आणि काश्मिरला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय आला. अवंतीपुरचा रनवे गेला व शंकराचार्य हिलचा शेंडा दिसायला लागला. नुकताच बांधून कोसळलेल्या दूरदर्शन टीव्हीच्या टॉवरचे दर्शन झाले. वेगाने गिरक्या घेत आम्ही एच असे लिहिलेल्या हेलिपॅडवर उतरलो. खाली पावले बर्फात रुतली. सर्वांनी पायलटचे शेकहँडकरून ‘बच गए’ म्हणत आभार मानले. पण ती तोंडी गोष्ट होती. उनी कपड्याच्या आत सर्वांचे शर्ट भितीने ओले झाले होते. असा थंडवारे, शरीराचे बोचकारे काढत होते. पायांची बोटे लाकूड झाली होती. ‘सलाम सर, आपका सरीनगरमे सवागत है!’ तेवढ्यात एका बुटक्या आसामीचे दर्शन झाले. तो होता अब्दुल! अकाऊंट्स सेक्शनचा चपरासी. (हाच अब्दुल पुढे 1998च्या पोस्टींग व नंतर 2003 पर्यंत भेटत गेला.)

सामान गोळा करत त्याने जवळच असलेल्या सेक्शनमधे मला नेले. तेथे गरमागरम चाय वाट पहात होता. सेक्शनचे बाकी लोक आले. मला तात्काळ एक भारी भरकम फर असलेला ‘कोटपरका’ नावाचा ओव्हर कोट चढवला गेला. काही वेळात स्क्वाड्रन लीडर राव साब आ गए. सॅल्यूटचे आदानप्रदान झाले. बच्चा आ गया! याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्यांची सुट्टी सुरु झाली होती. पण रिलीव्हर न आल्याने ते अडकून पडले होते.

ऑफिसर्स मेसला जाणारी बस आली आणि आम्ही तासाभराने मेसमधे पोहोचलो. ‘हाय आय एम फ्लाईंग ऑफिसर फॉली मेजर!’ रुममेटची ओळख होत होती. मी गोंधळून विचारले फ्लाईंग ऑफिसर की आर्मीतला मेजर? मग तो म्हणाला, ‘माय नेम इज मेजर. आय एम ए पारसी फेलो! ’ (तेच सन २००७ पासून भारतीय हवाईदलाचे प्रमुख चीफ ऑफ एय़र स्टाफ – एयर चीफ़ मार्शल फॉली मेजर झाले.)

(३ मार्च २०११ ला केले लिखाण) हळूहळू नव्या मित्रांची ओळख झाली. त्यात पायलट ऑफिसर रघुवीर यादव माझा रुम मेट होता. तर त्याचा कोर्समेट अशोक वाधोनेशी माझी लगेच गट्टी जमली. त्याच्याशी नुकतीच लग्नहोऊन आलेली सुनंदा. गोगजीबागेतील त्यांचा संसार. त्याला व विशेषतः सुनंदाला रात्री-अपरात्री पिठल-भात करायला लावणारे आम्ही. ज्यांच्याकडे कॉल ऑन करायला जावे तेथे ओल्डमॉंक – हरक्युलिस ब्रांडचे रमचे ग्लासच्या ग्लास तयार! हे नेहमीचे दृष्य असे.

टीडीचे (टेंपररी ड्युटीचा शॉर्टफॉर्म) पगाराव्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे मिळणार होते अशी खुशीची गाजरे खिलवत मित्र मला खाओ-पिओ-घूमो-फिरो करायला भरीला घालत. मीही मागेपुढे न पहाता खर्चाला नाही म्हणत नसे. मग काय मित्रांचे डोंगळे जमायला काय वेळ! मनात आले की कँटॉनमेंटमधील बदामीबागच्या ऑफिसर्स मेसमधे एम्बॅसेडरवाली टॅक्सी मागवून लाल चौकातील पॅलाडियमला, नाहीतर जवळच्या ब्रॉडवेत किती-कितीदा सिनेमे पाहिले. तिकिटे काढताना खिडकीजवळ हात येण्यासाठी लाल लाल गालवाल्या गोरेपान काश्मिरी तरुणांची एकमेकांच्या खांद्यावरून पालथेपडून तिकिटे काढायची चुरस पाहून हसायला येई. थेटरातील अंधारात पेटवलेल्या सिगरेट्सच्या लाल लाल ठपक्यांनी व त्याच्या गडद धुराने पडद्यावरचे चित्र अंधुक दिसे. अनेकांच्या मुंगफली फोडताना होणारा बारिकसा कट कट असा पडद्यावरील संवादांचा विरस करणारा आवाज नंतर अंगवळणी पडला.

शालिमार, निशात बागांत मनसोक्त फिरणे. चश्मेशाहीचे थंडगार पाणी व लाल चौकातल्या एका सरदाराच्या ठेल्यांवरील तळलेले मासे अजुनही त्या दिवसांची झिंग वाढवतात. पहलगाव-गुलमर्गच्या सहली. शांत दाललेक मधील रम्यरात्रीच्या शिकाऱ्यातील सफर. तर शंकराचार्य हिलवर झपझप चढत जायची लावलेल्या शर्यती. मी व यादव ने तेथे २०-२० रुपयात विकत घेतलेले चकचकीत शूजचे चार चार जोड. या भाऊ गर्दीत मला अभ्यास करायची हुक्की मधेच येई पण मित्रांच्या, “कहां जाना है तेरे को फॉरेन पोस्टींग? तेरी तो ऐश है यार! तू तो अकौंट्स का बंदा है!”। सब तेरे आहे पीछे दौडेंगे। आदि मुक्ताफळे मला खुलवत. मी ही खिशातील उरलेल्या पैशांचा हिशोब पहायला कंटाळा करे.

आता देखील अशोक रिटायर होऊन तळेगावला सेटल झाला व नुकताच वारला (2106 मधील भर). त्याआधी लोणावळ्याच्या एयर फोर्स स्टेशनचा कमांडिंग ऑफिसर असताना त्याने केलेला पाहुणचार. नंतरही त्याची भेट अधून मधून होते. तेंव्हा श्रीनगरच्या आठवणींना ऊत येतो. असो.

१९७२साली कमांडिंग ऑफिसर होते. ग्रुप कॅप्टन आर एस सनॅडी. (सनदी खरे नाव) तर पीव्ही राव माझे डायरेक्ट बॉस होते. ते सुटीवर चालले होते म्हणून माझी रवानगी श्रीनगरला झाली होती. त्यावेळी एक आणखी मजेशीर व्यक्तिमत्व होते स्क्वाड्रन लीडर अमरीक सिंग. त्यांच्या अपरोक्ष त्यांना ‘हरजिंदर कमिशनवाले’ म्हणून टिंगल करत. मला त्याचा उलगडा कानपुरच्या पोस्टींगमधे झाला. ती गोष्ट बाद में कभी. मेसमधे रोज बारला हजेरी लावल्यानंतर विषयांतरकरून बोलायची त्यांना भारी हौस. आधी सरदार त्यात मद्य प्यालेला. मग काय प्रत्येक विषयांवर आपली खास मते प्रदर्शन करायला त्यांना विशेष ऊत येई. ‘यु सी ओक, धिस नेशन हॅस नो फ्युचर. त्यांचा नेहमीचा रिमार्क. त्यांना चावी मारायला आम्ही तयार. मग काय. ‘व्हेन आय वॉज’ असे म्हणून त्यांची जीवनातील कहाण्यांना सुरवात झाली की किती ग्लास रिचले त्याची मोजणी विसरली जाई! एकदा आम्हाला कळले त्यांना दोन देखण्या पोरी आहेत. ते माझे काही काळ बॉस म्हणून त्यांचा माझी दोस्ती जादा. मग यादव म्हणे, ’यार, चलो उसके घर’ मग तर आम्ही मुद्दाम त्यांच्या घरी आवर्जून जाऊ लागलो. एकदा आठवतेय, आम्ही गुलमर्गला अकौंट्स सेक्शनच्या पिकनिकला गेलो होतो. त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या गंडोलावर मी व त्यांची पुनम एकत्र बसलो होते त्यावेळा मी तिला इतकी जवळून पाहिली, तेंव्हाच वाटले, दिसायला काय मस्त मुलगी आहे. त्यांची ती पोरगी नंतर काही वर्षांनी पुनम धिलौं म्हणून पडद्यावर चमकली आणि आमचे डोळेच फिरले.

मी आलो होतो श्रीनगरला फक्त ५० दिवसांसाठी. पण माझा मुक्काम वाढता वाढता ४ महिने झाला. बॉस रावांच्या पत्नीचे एक ऑपरेशन त्यांनी कमांडला सांगून मला दडपुन थांबवत उरकुन घेतले. मीही रावांवर खुश होतो. ते महा ‘ठंड’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या ठंडेपणाचे किस्से फार मजेचे. ते खरे तर बॉस. पण मला ते आवर्जून त्यांच्या म्हणजे बॉसच्या खुर्चीत बसवत. कारण मग त्यांना आलेले फोन व क्वेरीज मला सॉर्ट आऊट करायला लागायच्या. ते मात्र एक कोर्टमार्शलच्या सामानासाठीचा लोखंडी बॉक्स होता त्यावर २-३ ब्लँकेट्सची घडीकरून त्या आसनावर स्थिर बसायचे. हातात सारखी सिगरेटची धुनी. रुम गरम करायला दगडी कोळशावर चालणारी ‘बुखारी’ नावाची शेगडी असे. बाहेर फुटफुट भर बर्फ आणि आत लाल बुंद झालेल्या बुखारीच्यालोखंडी पत्र्याला हलकेच सिगरेट लाऊन पेटवलेल्या फुकणीचे झुरके मारत व अधुनमधुन ‘अब्दुल चाय लाना’, अशी फर्माईश करता दिवसभर ते मजेत असायचे. घरी संध्याकाळी रमचे लाल पाणी! मजा होती त्यांची.

टायपेक्स मशीनचा घोळ आणि पहिली कोर्ट ऑफ एन्क्वायरी!

मित्र पायलट ऑफिसर अशोक वाधोने मला एकदा म्हणाला, ‘शश्या जायचय का पुण्याला? प्रथम मला चेष्टा वाटली मग मी तात्काळ हो म्हटले!’ मी तेंव्हा एकटा सेक्शन मधे एकटा होतो. कमांडिंग ऑफिसरांना मी 8 महिने झाले घरी गेलेलो नाही हे माहित होते. ते म्हणाले, परमिशन देतो पण आठ दिवसात परत आले पाहिजे. मी हो ला हो म्हणालो. काही कारणानी नादुरुस्त चार टायपेक्स मशीन्स साधारण प्रत्येकी 100 किलोची अशी 4 वेगवेगळ्या लाकडी भरभक्कम पेट्यात ठेवलेली होती ती मी व माझ्याबरोबर एका सार्जंट एस्कॉर्ट म्हणून पुण्यातील 9 बीआरडीत नेऊन द्यायची व त्याच्या बदल्यात नवी दुरुस्त असलेली तशीच चार मशीन्स परत श्रीनगरला आणायची होती. ती सीक्रेट ग्रेडिंगची असल्याने ऑफिसरची नेमणूक असे व शिवाय मदतीस सार्जंट रँकचा एयरमन बरोबर असे. माझ्याबरोबर रिव्हॉल्व्हर, अन सार्जंट लाईट मशीनगन अन अनेक काडतुसे असा सरंजाम होता. मला त्या पेट्या पाहून धडकी भरली. त्या उचलणार कोण? आम्ही दोघे हातातील हत्यारे सांभाळणार की त्या पेट्या? मी मित्राला विचारले ते म्हणाला, ‘ते तू बघ. ऑफिसर आहेस तुला कसे मॅनेज करायचे ते तुझे कसब आहे!’ म्हणून तो नामानिराळा झाला... नंतर ते प्रकरण भलतेच चिघळले. पॅरा 790 काय असतो तेही कळले. फटका खाऊनही नंतरच्या सर्व्हीसमधे ही टायपेक्स मशीन्स मला पुण्याला जायला खुणावत व मीही मोहाला बळी पडून असाच अडकत असे... ते किस्से नंतर.

हे प्रकरण जरा लांबलचक आहे. ते नंतर वेगळे सांगण्यात मजा येईल म्हणून इथे फक्त उल्लेख करून पुढे जातो...

त्या काळात मी आणखी एका कामासाठी ‘मशहूर’ होतो. माझ्या हातून ‘प्लॅंचेट होते’ ही बातमी माझ्या सख्यामित्रांनी एका पार्टीत कौतुकाने पसरवली. तेंव्हापासून आस्मादिकांचा भाव वधारला. मला सीनियर ऑफिसर्सच्या बायकांची रात्रीच्या जेवणाला निमंत्रणे येऊ लागली. तुस्त भोजनानंतर निवांत वेळी कॅलेंडरच्या मागील गुळगुळीत भागावर ABCD… 1.. 2.. 3… 9… 0, Yes, No, वगैरे काढून प्लॅंचेटमधून अनेकांची मनोगते मला कळत. ऑफिसर लोक आपली बायको अशा फालतू थेरांच्या नादी लागलेली पाहून तिच्यावरील राग ते माझ्यावर काढत. म्हणत, ‘तुच बोटाने उत्तरे घडवून आणतोस’ असे वादावादीचे प्रसंग क्वचित येत. प्लॅंचेट सुरु करायच्या आधीच मी त्यांना कटाक्षाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे काय काय येतील ते नोंद करायच्या अटीवर करायला बसत असे. याबाबतचा एक किस्सा आजही आठवतो, मेजर साठे यांच्या मिसेस बाबतचा. त्यांची ओळख झाली एयर ओपीच्या कॅप्टन विनायक पाटणकरांच्या घरी. (पुढे ते २००२-३च्या सुमारास लेफ्ट्नंट जनरल रॅंकवर श्रीनगरहून महत्वाच्या पदावरून रिटायर झाले. आणि गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी माझ्या प्रयत्नात 2015 पासून त्यांच्याशी संपर्क आला.) एकदा आम्ही त्यांच्या घरी एकत्र आलो होतो. माझी किर्ती ऐकून मिसेस साठ्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळी त्यांचा मुले सुटीवर आली होती. त्यांचे शिक्षण व पुढील करीयर बाबत त्यांनी काही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे ही नोंद करून ठेवली होती. पुढे अनेक वर्षांनी त्यांची भेट अचानक भेट झाली. त्यावेळी गप्पांच्या ओघात, ‘ओक तुमचे प्लॅंचेट मी विसरलेली नाही! आपल्याला आठवते का ते नाही माहित, पण त्यावेळी आमच्या मोठ्यामुलाला आपण त्याला मेडिकलला नाही पण डेंटलला एडमिशन मिळेल व तो नंतर परदेशात जाईल हे कथन अगदी जुळले. तेंव्हांपासून लक्षात ठेऊन तुम्हाला सांगेन असे ठरवले होते. सध्या तो डेंटिस्ट म्हणून ब्राझीलला (किंवा असेच कुठेतरी दुरस्थ देशात) स्थाय़िक झाल्याचे सांगताना आठवते. नाडीग्रंथांचा शौक मला चढल्यानंतर एकदा त्या पुण्यात एका भृगुसंहितावाल्यांच्याकडे ही घेऊन गेल्या होत्या. असे अनेकांनी नंतर हवाले देऊन काही काही कथने बरोबर आली असे सांगितले. तेंव्हा खुप बरे वाटले.

एकदा मला माझे बॉस स्क्वाड्रन लीडर राव आढ्यतेने म्हणाले होते. ‘घरी येरे, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला!’ झिरो ब्रिज ओलांडून करननगरच्या पॉश कॉलनीत ते तेंव्हा राहात. मी त्यांना त्यावेळी एक अट घतली होती की लोक मला चिडवतात की मीच माझ्या बोटाने हव्या त्या अक्षरांवरून कपाला ढकलत ढकलत कपाच्या कानाने दाखवली जाणारी अक्षरे जुळवून विचारणाऱ्याला खुश करायला उत्तरे देतो. त्या आक्षेपाला मी तो कप फिरवत नाही असे सांगुन कोणाचे समाधान होत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज एक प्रयोग करू या का? आपण आहात कानडीगा. मला कानडीचा गंध नाही हे आपण जाणता. तरी कॅलेंडरच्या मागील कोऱ्या भागात आपण कानडी मधून अक्षरे लिहावीत आणि आपण आपले प्रश्न कानडीतून विचारावेत. त्याची उत्तरे समजा मला माहित असली तरीही भाषेच्या अज्ञानामुळे ती देता येणार नाहीत. असे असूनही जर काही अक्षरे, काही काही शब्द-वाक्यरचना दर्शवून उत्तरे येतात का, कशी? आली तर त्यातून काही अर्थ बोध होतो का ते पडताळून पाहू. त्यांनी ते आनंदाने मान्य केले. मी पोहोचायच्या आधीच ते अक्षरांचा तक्ता करून तयार होते. प्रश्न कानडीतून विचारले गेले. त्यानंतर कप हळूहळू कानडी अक्षरांवरून फिरु लागला. त्यातून काही अक्षरातून अर्थवाही वाक्ये येऊ लागली. त्या शब्दांचा काय अर्थ असेल असा पति-पत्नीत खल होई. त्यातून त्यांनी निवाळा दिला की आम्हाला कानडीत अर्थवाही उत्तरे मिळत आहेत. तुझ्यामुळे कप फिरतो. त्याला गती येते हे नक्की. पण तू अक्षरे, शब्द, वाक्ये बनवत उत्तरे देतोय असे होत नाही असे खात्रीलायकपणे आम्ही सांगतो. आमचे संपुर्ण समाधान झाले की तू त्या उत्तरांना बनवून सूचित करत नाहीस! असो. (प्लँचेट वरील माझा वेगळा संपूर्ण लेख आहे त्यात या घटनेचे अधिक तपशीलवार वर्णन केले आहे.)

मात्र जसे ब्रिज खेळात डाव संपला की त्यावरील गरमागरम चर्चा फार होते तसे प्रकार प्लॅंचेटचा व्हायला लागलेला पाहून मी ते प्रकरण आवलरते घेतले. अशा कटकटीमुळे पुढे मी ब्रिजचा, रमी, पपलू-टिटलू, तीनपत्ती आदीचा नाद धरला नाही. आणि माझ्या प्लॅंचेटच्या विद्येबाबत जास्त वाच्यता केली नाही!

सेनेतील नोकरीत सुंदर सुंदर मुली पहायला ही मिळणे अशक्य होते. मात्र मला ती संधी ऐतीच आली. व्हायचे असे की आम्हाला पगार वाटपाला पैसे स्टेट बँकच्या लाल चौक शाखेतून काढायला वरचेव जावे लागे. तिथल्या ऑफिसात एकाहून एक अती सुंदर गुलाबी गालाच्या, नितळ गोऱ्या गोऱ्या कांतीच्या मुली कामात गर्क असत. मी ऑफिसर म्हणून मला काऊंटरच्या आत बोलावून चहापाणी करायची रीत होती. भिभिरत्या नजरेने पोरीही मला पाहताना खूष व्हायला होई. त्यात होती एक टीटा. काश्मिर की कली म्हणावी अशीच. नजरानजर करून मी तिला थरथरत्या आवाजात हाय हॅलो करून म्हणे. ती ही मानेने होकार देत पुन्हा कामात दंग असल्याचा बहाणा करत आहे असा मला भास होई. मला धीटपणा शिकवायला माझे मित्र संध्याकाळी बारमधे बसून भरीला घालत, म्हणत ‘गटव तिला’.. ‘मी ही तावात, ‘हो हो’ म्हणून, ‘आता पहा पुढील भेटीत तिला मेसच्या पार्टीत बोलावतो’ म्हणून भाव खात असे. मात्र तसे घडले नाही. मी थोडासा उदास झालो श्रीनगर सोडताना तिला आठवून. ( 2012 मधील भर - नंतर 1977 ते 1979 मधे दुसऱ्यांदा पोस्टींगवर मी पुन्हा बँकेत कामाला गेलो तोवर तिला सिनियॉरिटीप्रमाणे केबीनमधे स्थान मिळाले होते. तिच्या कपाळावर माँग भरलेली होती. काश्मिरी पद्धतीचे कानांना लटकणारे सोन्याचे आभूषण तिच्या सौभाग्याची खूण सांगत होते. जुजबी शिष्टाचाराच्या गोष्टी बोलून मी हसून निरोप घेई. एकदा चहाचा कप मागवून तिने माझी जास्त विचारपूस केली. तेव्हा माझ्या जीवनात घडलेल्या उलथापालथीची कल्पना दिली, तेंव्हा तिला ते धक्कादायक वाटले. 1996 ते 1998 च्या माझ्या तिसऱ्या पोस्टींग मधे मला चकीत व्हायची वेळ आली. कारण पंडितांच्यावर जी भयानक देशोधडीला जायची पाळी आली त्यात तिचे कुटुंबिय श्रीनगर सोडून गाझियाबादला स्थलांतरित झाल्याचे कळले.)

1 हिंदी सिनेमातील हवाईदलातकार्यरत दाखवलेले हीरो - राजकपूर संगममधे, आराधनातला राजेश खन्ना आदी...याच सेरिमोनियल ड्रेसमधे दिसतात. तर कधी कथानकाच्या सोईसाठी इंटरव्हलपर्यंत देशासाठी शहीद होऊन नायिकेला खऱ्या हीरोकडे आकर्षित करण्याला मदत करतात.

2 उधमपुर हे जम्मुपासून ६० कि मी दूर. सुप्रसिद्ध वैश्णोदेवीच्या कटरा गावाजवळ. तेथे मिलिटरीचा मोठा तळ आहे. मी आधी गेलेल्या पंजाबातील जालंधर जवळील एयर फोर्स स्टेशन आधमपुरच्यापेक्षा हे गाव वेगळे.

***