Gokul Ashthmi books and stories free download online pdf in Marathi

गोकुळअष्टमी

गोकुळाष्टमी

जन्माष्टमी म्णजे गोकुळ अष्टमी हा कृष्ण जन्माचा दिवस.
श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे.
. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे.

श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी आहे
कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं.
देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे.
तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे.
कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती.
म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य असलेल्या कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं होतं व त्या जागी एक वेगळे बालक ठेवले होते .
त्यालाच कृष्ण समजून कंसाने मारून टाकले व कंस निर्धास्त झाला .
नंतर मात्र नंद यशोदेकडे वाढत असलेल्या कृष्णाने कंसाचा वध केला .
भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते.

महाभारत हा ग्रंथ भारतातील एक प्राचीन आणि धार्मिक ग्रंथ आहे. महर्षी व्यासांनी या ग्रंथाची निर्मिती केली. महाभारत ही पांडव आणि कौरवांच्या महायुद्धाची कथा आहे. महाभारतामध्ये कृष्णाचे कार्य महत्त्वाचे आहे. कारण कृष्णाने अर्जुनाला योग्य वेळी अचूक उपदेश केल्यामुळेच पांडव महाभारतातील धर्मयुद्ध जिंकू शकले.

महाराष्ट्रातील कृष्णजन्म गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो.
गोकुळाष्टमीला उपवास केला जातो. रात्री बारा वाजता कृष्णाच्या मुर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही-दूधाचा प्रसाद दाखवला जातो.
कृष्ण जन्मावर आधारित पाळणे आणि गवळण गाऊन कृष्णाची पूजा आणि आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सवदेखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो.
कृष्णाचे आवडते दही आणि काही पदार्थ शिकांळ्यामध्ये अडकवून दहीहंडी उभारण्यात येते. गोंविदापथक थरावर थर लावून ही दही हंडी फोडतात. जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हंडी फोडतात त्यांना बक्षीस दिले जाते.
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

दहीकाला..

काला हा पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत.
याला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.

गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील कृष्ण जन्म मोठया उत्साहात साजरा केला जातो. यासाठी कृष्णाची मंदिरे सजविली जातात. रात्रभर भजन आणि रासलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

ओडीसा आणि बंगालमध्ये देखील कृष्ण जन्माला एक वेगळंच स्थान आहे.
लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवलं जातं.
कृष्ण जन्मावरील नृत्याविष्कार सादर केले जातात.

दक्षिण भारतात कृष्ण जन्म हा एक मोठा सण असतो. या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात.
भगवान कृष्णासाठी विशेष नैवेद्य केला जातो.
भगवतगीतेचे वाचन केले जाते.
मथुरा, वृंदावन त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची राजधानी असलेल्या द्वारका नगरीत हा सण विशेष मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. मध्यरात्री पाळण्यात श्रीकृष्णाची छोटी मूर्ती घालून सजवलेला पाळणा हलविला जातो, विविध गाणी, भजने गाऊन, रासलिला खेळून जन्मोत्सव साजरा होतो.
उत्तरप्रदेशात या दिवशी रासलिला खेळली जाते. रंग उडवून आनंद व्यक्त केला जातो. दुसरे दिवशी नंदोत्सव साजरा करतात..

गोपाळकाला याचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय.

`काला’ हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. `काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रीकरण

अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.
अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर सर्वांनी कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.
गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.
कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
गोकुळाष्टमी’ या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो असे मानतात .
दही हंडी यावर असलेली गाणी अनेक हिंदी व मराठी चित्रपटात आहेत.
भारताप्रमाणे भारताबाहेरील अनेक देशांमध्ये देखील कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो