Mitra my friend - 14 books and stories free download online pdf in Marathi

मित्र my friend - भाग १४

" तू कोण ठरवणार केशव बरोबर नाही ते... तू नाही ओळखत त्याला.... खरं सांगायचं झालं तर, तूच त्याचा तिरस्कार करतोस... कॉलेजमध्ये असल्यापासून... तेव्हा सुद्धा सांगायचा तू... केशव सोबत राहू नको म्हणून.. तो तुझ्यापेक्षा पुढे गेला म्हणून जळतोस त्याच्यावर... आणि हो... उपकारच केलेस माझ्यावर...मित्र आहेस ना... मित्रच रहा.. देव बनण्याचा प्रयन्त करू नकोस... ",

" प्रिया !!! " विवेकचा हात उठला प्रियाला मारायला.. पुन्हा विजेचा जोरदार आवाज झाला.. थांबला विवेक तसाच. संदीप दारात उभा राहून बघत होता हे सर्व.

" ok... fine... उपकार केले ना...ठीक आहे... उद्या सकाळीच त्याला भेटायला जाऊ... हा शेवटचा उपकार केला कि माझी जबाबदारी संपली... " विवेक एवढं बोलून बाहेर निघून गेला. संदीप दारातच उभा.. प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेली. कोणाला समजावू मी.. संदीप मनात बोलला. संदीप विवेकची वाट बघत बसून राहिला. रात्री ११.३० सुमारास विवेक आला. तसाच झोपी गेला.. संदीपला बोलायचं होतं परंतु विवेक गप्प होता. संदीप झोपला. विवेक उशिरापर्यत जागा होता. बाजूच्या रूममध्ये प्रिया.. आधी केशवला भेटणार म्हणुन आणि नंतर विवेक बरोबर भांडण... यामुळे जागीच होती.. बाहेर पाऊस सुरूच... संदीप बरोबर बोलला, दिल्लीला पाऊस खूप... त्या पावसाकडे पाहत बेडवर पडून होती.. रात्री २-३ च्या सुमारास डोळा लागला तिचा.

सकाळी लवकर उठून तिघांनीही तयारी केली. संदीप तयार नव्हता तरीही विवेकने तयार केलं त्याला...

"तुला यावंच लागेल संदीप... प्रियाला केशवकडे सोडलं कि मी लगेच निघणार आहे...." ,

" विवेक... विसरून जा कालच.. प्रिया रागात बोलली... रागाला डोळे नसतात. कान नसतात आणि तोंडही नसते.. माहित आहे ना तुला... कशाला असं करतो आहेस... " संदीप विवेकला समजावत बोलला.

" संदीप ... प्लिज थांबवू नकोस... आणि मी थांबणार ही नाही... मी आजचं निघणार आहे मुंबईला.. कालच मी एका ठिकाणी चौकशी केली... ट्रेनने जाणार आहे... ",

"अरे पण !!! " ,

" हो.. माहित आहे.. खूप वेळ लागतो ते... तरीही जाणार आहे.. " विवेक बोलता बोलता रुमध्ये असलेल्या टेबलाजवळ आला.

" याच्या ड्रॉवर मध्ये १०,००० ठेवले आहेत.. विमानाचे तिकीट मिळून जाईल तुमच्या दोघांचे.. चल ... निघूया... " विवेक बाहेर जाऊ लागला... संदीपने त्याला अडवलं.

" तुझं काही चुकलं नाही विवेक.. केशव बद्दल जे काही बोललास ते ऐकलं मी... प्रियाला "फक्त मैत्रीण" मानतो , हेही माहित होतं मला.. खरंतर माझं चुकलं.. प्रियाला आधीच सांगायला पाहिजे होते... ",

" जाऊ दे... संदीप... तिला भेटायचं आहे ना... भेटू दे.. चल... मी खाली वाट बघतो आहे.. " विवेक त्याचं सगळं सामान घेऊन खाली गेला. प्रियाही बाहेर आली. संदीप तिची वाट बघत होता.

" प्रिया .. बोलू जरा... " प्रिया थांबली.

" केशव बद्दल काही बोलणार नाही... कारण तो कसा आहे.... हे तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो.. पण विवेक... त्याला तरी त्या भाषेत बोलायला नको होतास तू... ",

" what do you mean .... ?? " ,

" एवढ्या वर्षांची मैत्री तुमची.. कधीपासून सोबत आहे तुझ्या.. कधी काही तक्रार केली का त्याने.. तुझा बालिशपणा सदैव सहन केला त्याने.. विवेकची परिस्तिथी तुला माहित होती.. दोन वेळेचे जेवायला कसंबसं मिळायचं... तरीही तू जेवायला गेलीस ,तरी स्वतः वाढायचा जेवायला... काय गरज होती त्याला... आताही, तुझा जीव वाचवला... पोलीस स्टेशन, हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारल्या... कोणासाठी, मुंबई वरून सातारा, तिथून दिल्लीला... त्यातून तुझं सामान ,कपडे चोरीला गेले... त्यानेच नवीन घेऊन दिले ना... किती पैसे खर्च झाले असतील त्याचे... तुझा हट्ट म्हणून इथपर्यंत घेऊन आला.. हे काय फक्त "उपकार" म्हणून केलं का त्याने... उपकाराची भाषा.. त्याला काय वाटलं असेल... एवढी काळजी कोण घेतं... हे, प्रत्येक गोष्टीत फक्त " तुझं बरोबर आहे " असं म्हणणारे, मित्र कधीच नसतात... चुकीच्या वेळेला कान पकडणारे, दुःखात सुद्धा साथ देणारे मित्र असतात ... विवेक सारखे..." प्रियाला सगळं आठवलं .. लहानपणापासूनचे.. प्रिया काहीच बोलू शकली नाही.

" चल... विवेक वाट बघतो आहे खाली.. " दोघे खाली आले. बसने जावे लागणार होते ना... सकाळीच निघाले म्हणून बस मध्ये गर्दी भेटली. प्रियाला जागा भेटली बसायला. पुढच्याच बस स्टॉपवर विवेकला सुद्धा तिच्या शेजारी जागा मिळाली. दोघेही गप्पच. बाहेर पावसाने रिमझिम सुरुवात केली. रात्रीची अपुरी झोप आणि खिडकीतून येणार थंड वारा.. प्रियाला झोप लागली. सवयीप्रमाणे , विवेकच्याच खांद्यावर डोकं ठेऊन झोपली. संदीप बघत होता ते. केशवचे घर आणखी थोड्या अंतरावर होते , पण एका धक्क्याने बस थांबली. त्या धक्क्यानेच प्रियाला जाग आली. आपण विवेकच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपलो आहेत, हे लक्षात आलं तिच्या, पट्कन आवरून बसली.

बस बिघडली आहे, पुढे जाणार नाही... असं समजल्यावर सगळ्यांना उतरावे लागले. पाऊस थांबलेला तोपर्यंत... " पुढे १५ मिनिटावर घर आहे त्याचे.. चालत जाऊ आपण.. " विवेक संदीपकडे बघत म्हणाला. प्रियाकडे बघायचे नव्हते त्याला.. हातातली बॅग खांद्याला लावली आणि दोघांच्या पुढे चालू लागला. प्रियाला कळलं होतं कि विवेक रागावला आहे ते.. पण आता बोलून काय फायदा.. ५ मिनिटंच झाली असतील... पाऊस पुन्हा सुरु झाला... संदीपने छत्री उघडली. प्रियाकडे काहीच नव्हते. विवेकला आठवलं, संदीपने त्याच्या सामानात एक छत्री ठेवली होती.. पट्कन बाहेर काढली आणि प्रियाला दिली. स्वतः बाजूला एका टपरी खाली जाऊन उभा राहिला .. प्रिया बघत राहिली विवेककडे.. संदीप सुद्धा छत्री बंद करून विवेकच्या शेजारी जाऊन उभा राहिला. प्रिया जागच्या जागी छत्री उघडून उभी पावसात... एवढं काही बोलली त्याला, तरी मी भिजू नये म्हणून त्याची छत्री मला दिली त्याने... प्रियाला मनापासून वाईट वाटले.

पुढच्या १० मिनिटात पावसाने आटोपतं घेतलं.. तसे तिघेही निघाले... " केशवच्या घरी गेलो तर त्याच्या कुटुंबाला आवडेल कि नाही ते माहित नाही.. मी केशवला बाहेर बोलवतो.. " असं बोलून विवेकने त्या दोघांना पुढे एका मोकळ्या जागेत उभं राहायला सांगितलं. विवेकची बॅग बघितली प्रियाने.. संदीपला विचारलं तिने...

" तो निघतो आहे लगेच... म्हणून निघताना सामान घेऊनच निघाला. ",

" आणि मला कोण घेऊन जा.... " प्रिया बोलता बोलता थांबली. विवेककडे असं हट्टीपणाचे बोलणं करतो आपण... संदीप बरोबर नाही...

" त्याने पैसे ठेवले आहेत रूमवर... आपल्या तिकिटासाठी... तीही व्यवस्था करून ठेवली त्याने .. " प्रियाला आता कसंतरी वाटतं होते.

पुढच्या ५ मिनिटात समोरून विवेक, केशव येताना दिसले... केशवला बघून प्रथम संदीप पुढे गेला, प्रिया जागच्या जागी उभी. विवेक तिच्या जवळ आला. प्रियाने हातातली छत्री विवेक समोर धरली. " राहू दे.. तुला जास्त गरज आहे... मी निघतो.. सांभाळून राहा... " म्हणत विवेक त्याची बॅग उचलून झपझप निघून गेला. मागे वळून बघायचेही नव्हते त्याला.. मनात खूप विचार, जास्त करून प्रियाचे... काय होईल नक्की.. केशव काय बोलेल तिला... घरी जाईल ना नक्की ... या सर्व विचारांसहित त्याने मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेनचा प्रवास.. खुप वेळ घेणारा.. रात्री २- २.३० च्या सुमारास विवेक मुंबईच्या घरी पोहोचला.

=========== क्रमश : ================