toch chandrama - 8 books and stories free download online pdf in Marathi

तोच चंद्रमा.. - 8

इंटरव्ह्यू

आठवडा उलटून गेला मध्ये. म्हणजे पार्टी नंतर. दोन तीन वेळा बाहेर गेलो मी. एकदा बागेत .. एकदा असेच भटकत.. नि काहीवेळा अख्ख्या रेसिडेंशियल काॅलनीत. उगाच वर्षा कुठे भेटतेय का ते पहायला. हे चूक आहे हे कळत होते मला पण वळत नव्हते.

शेवटी मला एकट्याला गाठून राॅबिन ने कानउघडणी केली..

"ब्रो, व्हाॅट आर यू अप टू?"

"कुठे काय? मी जस्ट इकडे तिकडे हिंडतोय.."

"अंबर, डिअर, डोन्ट लाय टू मी. तू मला नाही फसवू शकत आणि स्वत:ला ही. हे बघ तुला नव्याने सुरूवात करावीच लागेल. ज्या गावाला जायचेच नाही त्याचे तिकिट काढतोच कशाला? ज्या गोष्टीचा लाॅजिकल शेवट माहित आहे ती गोष्ट का करावी?"

"खरेय.."

"तू फक्त बोलतोस.. आणि परत ये रे माझ्या मागल्या."

"वा! मराठी म्हणी पण शिकलास.. छान! प्रगती आहे!"

"ते ठीक. विषय बदलू नकोस ब्रो.. उगाच खड्ड्यात पडशील!"

"यू आर राईट राॅबिन. तू म्हणतोस ते खरेच. आय प्राॅमिस, या पुढे वर्षा प्रकरण शंभर टक्के बंद. पडदा.."

"पडदा म्हणजे?"

"कर्टन्स!"

"ओह!"

"पण थ्यांक्स राॅबिन, त्या मशिनीत न शोधता डायरेक्ट मला विचारलेस.."

"हुं.. उगाच भय्या सारखा अर्थाचा अनर्थ नको म्हणून!"

थोडक्यात त्या नंतर मी वर्षाला डोक्यातून हद्दपार केले. इतके की ती समोर अाली तरी एक ओळखीची व्यक्ती असावी इतपतच मनात विचार येतील.. ही पुढची गोष्ट. पण एकदा ती समोर असताना राॅबिनने ब्रेन मॅपिंग करून कन्फर्म केले ते! असो. तर माझ्यापुढचे मुख्य काम म्हणजे इन्टरव्ह्यू! लोढा आणि गुंदेचा बिल्डर्स कडे. प्रायव्हेट जाॅब असला तरी इकडे पगार चांगला. आणि अजूनतरी आपल्यासारखी काँपिटिशन नाही .. आपल्यासारखी म्हणजे पृथ्वीसारखी!

लोढा नि गुंदेचाचे आॅफिस म्हणजे एक मोठा तंबू होता. बाहेर स्पेससूट काढून ठेवा. आत विस्तीर्ण आॅफिस. आत टीव्हीवर त्यांच्या विविध प्रोजेक्ट्सवर

आधारित फिल्म सुरू. लोढा नि गुंदेचा चंद्रावरचे पहिले बिल्डर्स म्हणून त्यांच्या प्रोजेक्टची नावे 'आर्मस्ट्राँग प्रोजेक्ट'ने सुरू होणारी. म्हणजे आर्मस्ट्राँग हेवन्स.. आर्मस्ट्राँग मूनलाईट .. आर्मस्ट्राँग गार्डन्स वगैरे. या चंद्रावर एकही झाड उगवत नसताना हे गार्डन्स वगैरे नाव ठेवणे म्हणजे जरा अतिच होते पण बिल्डरच्या व्यवसायास शोभेलसे होते! आॅफिसात स्टाफहून जास्त ह्युमनाॅईड्स. आत गेलो तर गेटवर वेलकम म्हणणारा नि तिथे वाट पाहात असताना कपात चहा आणून देणारा.. दोघेही रोबोच.

इतक्यात एक हर्ली नावाचा बॅज लावलेली मुलगी बाहेर आली,

"अंबर राजपूत?"

"यस.."

"फाॅर इंटरव्ह्यू?"

"यस मॅडम."

"वेट फाॅर अ व्हाईल."

म्हणून ती आत गेली. मुलगीच होती ती. रोबो नव्हती.

मी वाट पाहता पाहता आर्मस्ट्राँग प्रोजेक्ट्स पाहू लागलो. पृथ्वीवरचे प्रोजेक्ट्स करून झाले म्हणून लोढा नि गुंदेचा इकडे शिफ्ट झालेले दिसतायत.

त्या हर्लीने मला मग बोलावून घेतले अातल्या केबिनमध्ये.

"प्लीज बी सीटेड.. सर विल बी देअर इन अ मोमेंट!"

तिचे इंग्रजी उच्चार पाॅलिश्ड होते अगदी पृथ्वीवरून आल्यासारखे. खरेतर हा विचार चुकीचा. इकडचा प्रत्येक जण तिकडूनच आलाय ना! गेल्या चार वर्षात इकडे कुणीही आलेय ते तिकडूनच की नाही?

थोड्या वेळातच एक साहेबी पोशाखातला कुणी येऊन बसला. मि. कृष्णन नाव त्याचे, ते नंतर कळले मला. लोढा नि गुंदेचा म्हणे नव्या प्रोजेक्ट्सच्या परवानगीसाठी दिल्लीला गेलेत. जमीन जुमला नि बिल्डर म्हटले की राजकारण्यांशी संबंध यायलाच पाहिजे त्यांचा! मग तो चंद्रावरचा बिल्डर का असेना!

"यस यंग मॅन. गुड माॅर्निंग."

"माॅर्निंग सर.."

मग जुजबी माहिती झाली विचारून. माझी सर्टिफिकेटस् पुरेशी स्ट्राँग असावीत म्हणून की काय विषय सोडून प्रश्न आले.. त्यात महत्त्वाचा .. 'इथे कशासाठी आलायस?'

इथे म्हणजे चंद्रावर!

माझे आईवडीलच इथे आहेत म्हटल्यावर खूश झाले ते. कधीपासून जाॅईन होणार हा प्रश्न आला नि मला धक्का बसला. म्हणजे बघता बघता एक एज्युकेटेड अनएम्प्लाॅइड आता एम्प्लाॅइड झालाय! बघता बघता बेरोजगारी कमी झालीय.. एकाने. म्हणजे रोजगार निर्मितीसाठी पृथ्वीवरच्यांनी इथे यायला हरकत नाही!

म्हणजे नोकरी मिळाली, कुणाचा वशीला नाही की ओळख नाही .. पगार चांगला, आणि जेवण आॅफिसचेच.. वा! काय टर्मस आणि कंडिशन्स!

आपल्या बेरोजगारीचे दोन चार दिवस एंजाॅय करावे म्हणून म्हटले दोन दिवसांनी जाॅईन व्हावे. तसे मि. कृष्णन म्हणाले, "बाय आॅल मीन्स यंग बाॅय. सी यू आफ्टर टू डेज. यू रिपोर्ट टू मी डायरेक्टली."

"यस सर.."

मी म्हणालो नि आनंदात निघालो. घरी सांगायला हवे.. ज्या नोकरीसाठी आलोय इथवर ती मिळालीय मला. आनंदाच्या भरात तंबू बाहेर पडू लागलो तर चारी बाजूनी 'सूट अॅलर्ट' म्हणत तंबूचे दरवाजे धाडकन् बंद झाले. अातून सगळे रोबोज नि ती हर्लीपण बाहेर आले. मी उत्साहाच्या भरात सूटशिवाय बाहेर पडत होतो! मी वरमून सर्वांना 'साॅरी' म्हणालो नि गुपचाप सूट घालायला लागलो. उगाच कुणीतरी 'नया है वह' म्हटल्याचा भास झाला मला. पण तिकडे दुर्लक्ष करत मी सुटात शिरलो.. हेच खरेय.. हे अंगाबोंगा सूट आपण घालायचे नसतात, तर त्याच्या आत आपल्याला जायचे असते!

घरी आलो नि ही गूड न्यूज दिली सगळ्यांना. आता नुसताच सुशिक्षित नव्हे तर नोकरीला लागलो होतो.. कमावता झालेलो! या गोष्टीचा अर्थ कसा निघावा? इंग्रजीत रिपरकशन्स म्हणतात तसे परिणाम काय व्हावेत? ते मला राॅबिनने दुसऱ्याच दिवशी सांगितले!

झाले काय की सकाळी आम्ही त्या कृत्रिम बागेत गेलेलो. पाय नि मन दोन्ही मोकळे करायला .. थोडी व्याकरणीय चूक.. हे दोन्ही मोकळे मला करायचे होते.. राॅबिन्याला काय.. मन असेल तर मोकळे करेल ना!

तर दोघे आम्ही त्या बागेत बसलेलो..

"काँग्रॅट्स बाॅस, यू आर नाऊ अ पार्ट आॅफ वर्किंग मेन्स असोसिएशन आॅफ मून इंडिया .."

"थ्यँक्स यार. असे खरोखरीच काही असोसिएशन आहे की उगाच काही लपेट?"

"आहे.. लपेटचा अर्थ मी शोधत नाही पण आय कॅन मेक आऊट

फ्राॅम द काॅटेक्स्ट. आणि एक अजून.. तुझा स्वोर्न फ्रेंड त्याचा अध्यक्ष आहे!"

"स्वोर्न फ्रेंड? राँग इंग्लिश यार. यू मीन एनिमी?"

"नो.. तुझ्या एक्स वर्षाचा नवरा.. मि. रघुवीर सीताराम कांदळगावकर .."

"तुला कसे माहिती?"

"नाऊ यू आर अंडर एस्टिमेटिंग मी.. या चंद्रावरचे.. कमीत कमी मून इंडिया वरचे.. नाहीतर अगदीच काही नाहीतर या मून इंडियाच्या इस्टर्न भागातले मला माहिती नाही... असे काय असेल?"

"किंवा या बागेतले.. किंवा आपल्या घरातले.. "

"ओह! डियर ब्रो.. ताणू नकोस आणि डोन्ट चॅलेंज मी!"

"ओह! तर सांग हू इज हर्ली? नाही माहिती तर हरली .. नाही हरलास सांग!"

"ओह! द्याट गर्ल! ती तुझ्या त्या बिल्डरच्या आॅफिसात आहे. पण ती चायनाहून आलीय."

"चायनीज?"

"नाही. इंडियन. आधी मून चायनाच्या आॅफिसात होती. आता इकडे शिफ्ट झालीय."

"म्हणजे?"

"अरे लोढाचे एक आॅफिस होते तिकडे, ते चायनीज पाॅलिसीमुळे बंद पडले नि इकडे ही हर्ली आली. तारीख सांगू ती कधी आली त्याची?"

"नको. धन्य धन्य तो राॅबिन.. जशी दोऱ्याने भरली बाॅबिन.. तसा ब्रेन तुझा.. साॅरी नो ब्रेन .. पण जे काही आहे ते धन्य आहे तुझे! थ्यांक्स फाॅर इन्फो.."

"यू आर वेलकम.. तर सांगायची गोड गोष्ट अशी.. त्या असोसिएशनचा तू प्रेस्टीजियस मेंबर होशील आता."

"ओके.."

"ओके नाही. काल रात्रभर तुझे आई आणि बाबा प्लॅनिंग करत होते.."

"कसले?"

"मी एक सीरियलमध्ये ऐकलेला डायलाॅग बोलू?"

"विचारतोयस काय.. बोल.. बिनधास्त."

"आई म्हणाली, अजी सुनते हो, बेटा अब सयाना हो गया है.. पढालिखा है.. नौकरी भी है.. उसके हाथ अब पीले किए जाए .."

"म्हणजे?"

"त्या सायलीबद्दल विचार करताहेत ते. त्यांनी तिच्याशी बोलताना पाहिले तुला."

"सायली? पण मला ती काय.."

"आवडत नाही .. एवढेच ना? आवडेल हळूहळू!"

"राॅबिन, मला काय वाटते ना.. ती अशी आवडली पाहिजे की बघता बरोबर वाटले पाहिजे .. हीच ती आणि तीच ही!"

"ते ठीक आहे. पण या चंद्रावर तुझ्यासाठी अजून चाॅईस कुठून मिळणार तुला?"

"मिळेल. तुला कशी मार्था आहे, क्युरी आहे.. झालेच तर मॅग्ना आगे आणि हॅझेल पण!"

"वा! कुठून माहिती तुला?"

"तुला काय वाटले तूच माझ्यावर नजर ठेवतोस? मी पण तेच करतो. लाजू नकोस .. सांग, अॅम आय लाईंग?"

"तू ना कहर आहेस यार.."

"पण काल कृष्ण कन्हय्या कुठे चालला होतास? होत्या ना या सगळ्या गोपिकांबरोबर?"

"जाऊ देत. पण ते लक्षात ठेव. लवकरच दोनाचे चार हात.. आणि यू मेक अ रेकॉर्ड.."

"रेकॉर्ड?"

"येस. तुझे हे चंद्रावरचे पहिले लग्न असेल!"

"म्हणजे? इथेच की पृथ्वीवर जाऊन दुसरे? अरे एक मिळताना मारामार .. आणि दोन?"

"ओह! साॅरी. राँग डिक्शन. चंद्रावरचे तुझे लग्न हे इकडचे पहिलेच लग्न असेल! अाणि वुई ह्युमनाॅईडस आर डाईंग टू सी दॅट!"

"हे बघ राॅबिन, जब तक उसे देखकर दिल के तार नहीं छेडे जाते.. मैं शादी नहीं करूंगा!"

"ओके.. बाॅस. सांगतो मी साहेबांना."

"काय?"

"तीन ली.. वन अाॅफ लीस.. साय.. ली नाहीतर ए.. ल्ली नाहीतर ह.. र्ली?"

"चूप .. नन आॅफ द अबव्ह.."

"ओके. सांगतो.. यू डोन्ट वाँट टू गेट मॅरिड! एव्हर!"

"राॅबिन्या.. तुझ्या प्रोग्राम मध्ये गडबड झालीय काहीतरी. तुझी जीभ फार लांब होत चाललीय..!"

"लाँग टंग?"

"यस.. तू फार टंग.. नाही टांग खेचायला लागलायस माझी!"

"हुं.. पण खोटंय का ते?"

उद्यापासून जाॅईन व्हायचे.. माझ्या मेहनतीची पहिली कमाई! आणि मगच बनेन किसीका जमाई!

विचार करूनच आली जमाई म्हणजे जांभई!