Jugari - 2 books and stories free download online pdf in Marathi

जुगारी - (भाग - 2)

मागील भागावरून पुढे.....


तिच्या बाजूला बसून राज ती शांत होण्याची वाट बघत होता. काहीवेळानी ती शांत झाली.

" सॉरी... मी मगाशी खूप जोरात मारली नां ? "

" ह्म्म्म... अजून पण डोळ्या समोर काजवे चमकत आहेत.." आपला गाल चोळत तो म्हणाला..

" बघू.." तिने खजील स्वरात म्हंटले.

" जाऊदे.... तुझी स्टोरी काय आहे? "

" माझी स्टोरी ? " तीने न समजून विचारले.

" ह्म्म्म... म्हणजे बघ कोणत्याही धंदेवालीला असे म्हणालो असतो तर तिला राग आला नसता पण तू तर चक्क माझ्या कानाखाली मारलीस म्हणून मला असे वाटतेय कि माझ्या समजण्यात काही चूक झालीय.. "

" खरंय तुझे.... त्या बाईला बघितलेस नां मगाशी , ती माझ्या साठी एखादा चांगला माणूस बघतेय जो माझ्या शरीराच्या बदल्यात पाच -सहा लाख रुपये देईल. पण असे मला माझ्या मजबुरीने करावे लागते आहे. ह्या आधी मी कधीही असे काही केले नाही. "

" अशी काय मजबुरी आहे कि तू ह्या नरकात उतरायला तयार झालीस? "

त्यावर सुषमाच्या डोळ्यात पाणी आले.. आपलें अश्रू पुसत तिने पुढे सांगायला सुरवात केली.

" राज... तीनचार महिने झाले माझी आई वारली. बाबा तर आधीच वारले होते. आता मी आणी माझा लहान भाऊ दोघेच समतानगर झोपडपट्टीत राहतो. माझ्या भावाला एक लहान ट्युमर आहे आणी त्याच्या ऑपरेशन साठी मला पाच ते सात लाख रुपये हवे आहेत. आई पश्चात काही पैसे होते ते त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या , रिपोर्ट ह्यामध्ये गेले. काही नातेवाईकान कडून मला काही पैसे मिळाले पण ते पुरेसे नाहीत... आणी जर तीन ते चार महिन्यात जर माझ्या भावाचे ऑपरेशन झाले नाही तर त्याच्या जीवाला धोका आहे. आणी त्या मुळे नाईलाजाने मला हा मार्ग पत्करावा लागला.. मला काही पैशाची हाव आहे , छानछोकीत राहायचं आहे म्हणून नव्हे रे पण माझ्या भावाचा जीव वाचवायला म्हणून मी हा मार्ग पत्करावा..." ती परत एकदा आपले डोळे पुसू लागली.

" तू मला भला वाटलास... नाहीतर गेल्या काही दिवसा पासून मी इथे येते , बघते. लोक किती घाणेरड्या नजरेने बघतात. नको नको ते कमेंट मारतात. मुद्दाम जवळीक करण्याचा प्रयत्न करतात.. पण तू तसा नाहीस... मी खूप वेळ तुझे निरीक्षण करत होते. त्यामुळे मला तुझ्याशी गप्पा मारायला , तुझ्याशी मैत्री करायची इच्छा झाली. तू सोबत असलास तर कोणी माझ्या कडे वाकड्या नजतेने बघणार तरी नाही.... आणी आता ह्या दोघांचे तर उदाहरणं आहेच समोर. बघितलेसच तू... कसे पळाले.... "
राजच्या मनाला खूप लागले. एका चांगल्या मुलीला तो वेश्या ठरवून मोकळा झाला होता. ह्यातून तिला आपणच बाहेर काढायचे त्याने मनाशी ठरवले..

" बघ.. मी मगाशी जे बोललो त्या बद्दल मला माफ कर.. मला काहीही माहित नसताना मी असे बोलायला नको होते... " राज म्हणाला. त्याचा भरलेला कंठ त्याच्यातील सच्चेपणाची जाणीव करून देत होता.

" असुदे... आता तुला माहित नव्हते म्हणून तू असे बोललास.. मी तो विषय डोक्यातून काढूनच टाकला. "

" ठीक आहे. ह्या सगळ्यातून मी तुला बाहेर काढीन. असे समज कि माझ्या चुकीचे प्रायश्चित आहे ते. मला सांग तुझ्या जवळ पैसे आहेत नां ? "

" आहेत..पाच सहा हजार आहेत. पण ते कशाला हवेत..?"

" ठीक आहे... चल मग उशीर झालाय बाकीचे नंतर सांगतो... "

" अरे पण कुठे ? "

" तुला माझ्या वर विश्वास आहे नां ? जर मी सांगतो तशी वागलीस तर तुला कधीही असे घाणेरडे काम करण्याची गरज पडणार नाही... चल... " आता तिला बोलायला काही उरलेच नाही. ती गुपचूप त्याच्या मागे चालू लागली. रस्त्यावर येऊन त्याने आपली बाईक काढली.

" बस.." ती बसल्यावर त्याने गाडी भरधाव आरे च्या जंगलाकडे वळवली.. दहा मिनिटात त्याने तेथील एका ठिकाणी बाईक थांबवली...

" हे बघ... मी सांगतो ती गेम समोर मटक्याच्या अड्डयावर जाऊन टाक.. "

" ए... नाही हा.... मी कधी अशी अड्ड्यावर गेली नाही... मला नाही जमणार... "

" जमेल... हाच एक मार्ग आहे... मी सांगतो तसे कर. " त्याने भरभर एका कागदावर काही आकडे लिहले आणी तिच्या जवळ दिले..

" कल्याण मध्ये 550/ हा पाना टाकायचा आहे हजार रुपयांनी पाना आणी सिंगल मेंढी (0) दोन हजार रुपयांनी टाक आणी जोडी टाक 05 पाचशे रुपयानी..." साडेतीन हजार होतील.. सगळे ह्यावर व्यवस्थित लिहले आहे.. काही प्रॉब्लम आला तर माझे नाव सांग.. राज प्रोफेसर ची गेम आहे असे सांग.. जा पटकन... वेळ कमी आहे... "

" अरे पण...? "

" तू जा यार.... आल्यावर सगळे समजावून सांगतो.. अशी समोर गेलीस कि पहिल्या गल्लीत उजवीकडे वळायचे समोरच अड्डा आहे.... जा पटकन.. "
नाईलाजाने ती निघाली.. राज अधीरतेने तिच्या परत येण्याची वाट बघत होता. काही वेळानी ती परत आली..

" टाकलीस.. "

" हो.... "

" बघू..." त्याने एकदा चिट्टी नीट बघून घेतली.. ती नवीन असल्यामुळे त्याने तसें केले. छान... चल आता कुठे तरी शांत जागी बसू.. तिथे तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरे देतो..
आणी तिला घेऊन तो एका शांत जागी जाऊन बसला.

" ह्म्म्म.... सुषमा.. आता तुला काहीच कळले नसेल कि मी काय करतोय ? मला एव्हडा कॉन्फिडन्स कसा काय?
हो नां..? "

" ह्म्म्म... "

" सुषमा , मी एक गेसर आहे.. म्हणजे मटक्याच्या आकड्या बाबत मी अंदाज काढतो.. आणी बहुतेक वेळा माझे जजमेंट योग्य असते.. त्यातून लोक खूप पैसा कमावतात.. आणी गेम पास झाली कि त्यातील काही वाटा मला पण देतात.... आता तुला वाटत असेल कि ह्याचे जजमेंट एव्हडे चांगले आहे तर हा स्वतः का खेळत नाही. बरोबर नां ? "
तिने मान हलवली..

" त्याचे काय आहे कि , मी खेळलो कि हमखास माझी गेम फेल होते. पण तेच जर दुसरे कोणी खेळले तर पास होते. हेच कारण आहे कि आता पण गेम टाकायला मी तुला पाठवले... आले लक्षात...? "

" अरे.. ! पण जुगार? .. जुगार मग तो कोणताही असो तो वाईटच नां ? "

" हो ते तर आहे... पण काही लोकांना दैवीदेणगीच असते. मग अश्या लोकांनी काय करावे.. आणी अशी बरीच कामे आहेत जी वाईटच पण तरीही लोक करतातंच नां ? आणी जुगारी काही कोणाला लुटत नाही , कोणाला फसवत नाही , कोणाला इजा करत नाही , अड्डेवाला गेम घेतो म्हणून तो टाकतो...झालेच तर त्याचे स्वतःचे आपल्या कुटुंबाचे नुकसान करून घेतो.. पण इतर कोणाला त्याचा काही त्रास नाही .. "

" मला काही पटत नाही.... "

" असुदे... तुला पटावे म्हणून मी सांगत नाही.. आपले काम झाले कि तुला परत ह्या बाजूला वळण्याचे कारण नाही... बस्स काय चालले आहे ते तुला कळावे म्हणून सांगत होतो.. काल रात्री एक छान गेम काढली आहे.. त्या गेम प्रमाणे आता तो कल्याण ला 550/ पान्यानी मेंढी मारणार असा माझा अंदाज आहे.. "

" हे काय कल्याण ? मगास पासून ऐकतेय कल्याण, कल्याण ...? "

" अग.. कल्याण हा एक बाजार आहे. तसाच मेन हा पण एक बाजार आहे..." तो तिला समजावून सांगत होता. आता ते दोघे एकमेकांना सहज अरे तुरे करत होते.

" बघ तुला सगळं समजावून सांगतो.. खबर यायला अजून वेळ आहे तर सगळे सांगतो तुला... "

" कसली खबर ?" तिने पुन्हा विचारले.. एकूण सगळे प्रकरण तिच्या डोक्यावरून जातं होते हे कळत होते. म्हणून राज तिला शक्य तितक्या सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगत होता.

" खबर म्हणजे... कोणता आकडा आला त्याची माहिती.. ती खबर मोबाईल वर येते.. पण मटक्याच्या भाषेत तिला वर्षानुवर्ष खबरच म्हंटले जाते.. "

" तर... तसें खुप बाजार आहेत. पण त्यात महत्वाचे असे दोनच बाजार आहेत . एक कल्याण आणी एक मेन मुंबई.. हे दोन बाजार सगळ्यात जुने आणी मोठे बाजार आहेत.. कल्याण बाजारची सुरवात कल्याणजी भगत ने केली. हा बाजार सकाळी चालतो. त्याच्या नंतर त्याचा मुलगा सुरेश भगत आणी त्याच्या नंतर सुरेश भगत ची बायको जया भगत हे आज पर्यंत कल्याण चे काम बघत आहेत.. आता राहिला मेन मुंबई.. मेन मुंबई हा बाजार रात्री चालतो..त्याची सुरवात रतन खत्री ह्या माणसाने केली.. त्याच्या नंतर आता पर्यंत पप्पू सावला ह्या बाजाराचे कामकाज बघत आहेत..
ह्या व्यतिरिक्त अजून पण काही बाजार आहेत जसे जनता , वरळी वैगरे पण ते लहान बाजार आहेत. कल्याण आणी मेन मध्ये कितीही मोठे वळण असले तरी तुला भेटणारच त्यामुळे ह्या दोन बाजारावर लोकांचा खुप विश्वास आहे.. "

" तू कसा काय ह्यात पडलास... राज प्रोफेसर...? " ती मुद्दाम त्याची मज्जा घेत म्हणाली.

" हा.. हा... " तो हसला..

" अग.. फार पूर्वी मला एक गुरु भेटला होता. तो पण खुप मोठा गेसर होता. त्याच्या बरोबर माझे मस्त जमायचे त्याने मला खुप काही शिकवले... आणी मला काही लुख्खा समजू नकोस.. बीएससी... झालो आहे फ्रॉम कीर्ती कॉलेज दादर... चांगला कामाला होतो.. पण बायकोला हे आवडायचे नाहीं म्हणून ती सोडून गेली आणी माझे वाईट दिवस चालू झाले.. मी गेम तर कडक काढतो पण मी खेळलो तर येत नाही. दुसऱ्याला दिली तर अचूक येते.. म्हणून आता मी माझे जजमेंट लोकांना देतो. गेम पास झाली कि ते लोक मला पैसे देतात... त्यावर माझे चालते.. "

" ह्म्म्म... आणी हे काय आहे पाना , जोडी वैगरे ? "

" मटका खेळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.. पाना म्हणजे तीन नंबर चा एक सिक्वेन्स ज्याची टोटल होऊन जोडी मधील एक आकडा येतो. आता पान्यात पण प्रकार आहेत sp/ dp/ संगम.. ते तुला कळणार नाही म्हणून तू त्यात लक्ष देऊ नको. लक्षात काय ठेवशील कि पान्याची टोटल मिळून जोडीचा नंबर येतो. ओपन ला एक नंबर येतो आणी दोन तासांनी क्लोज ला एक नंबर येतो... "

" असे वेगवेगळे का येतात? एकदम का देत नाहीत..? "

" जे लोक ओपन ला लॉस झालेत त्यांना लॉस कव्हर करण्यासाठी मध्ये दोन तास दिले जातात.. ह्या दोन तासात परत लोक खेळू शकतात... "

" मला तर काहीच समजत नाही आहे.... "

" बरोबर आहे... सगळ्यांनाच जर समजायला लागले तर मग गेसर ची गरजच काय ? हो नां..? असो.. बघू या काय होतेय.. जर आज आपला आकडा आला तर तुला पटेल मी काय बोलत होतो ते... लवकरच तू आपल्या भावाचे ऑपरेशन करू शकतेस ते ही कोणतेही घाणेरडे काम न करता.. "

" ह्म्म्म.. "

चार ला पाच मिनिटे बाकी होती आणी राज उठला..

" चल खबर आली असेल.. " आणी तिला घेऊन तो मटक्याच्या अड्डयाच्या दिशेने चालू लागला.. मधेच एक माणूस त्याला भेटला.. तो त्याला ओळखत होता..

" स्वामी क्या आया ? "

" 379 से 9 " त्याने सांगितले..

" नव्वा कसा आला... कल्याण ला " राज स्वगत पुटपुटल्या सारखे म्हणाला..

" कल्याण मै नही.. राज... जनता मै.. कल्याण मै तो 550 से मेंढी आयी है... " ते ऐकून राज चा चेहरा उजळला..

" ये हुवी नां बात..." खुशीत तो म्हणाला. आणी त्याने विजयी मुद्रेनं तिच्या कडे पाहिले.

" काय झाले ? " तिने अधीरतेने विचारले...

" आपली गेम पास झाली... कल्याण ला 550 पाना आणी सिंगल मेंढी पास झाली.. "

" मग आपल्याला आता पैसे भेटतील ? "

" हो.. मग भेटतीलच... चल.. "

" किती पैसे ? एक मिनिट हं.. " त्याने मनातल्या मनात हिशोब केला.. " पान्याचे अडीच लाख आणी सिंगल चे अठरा हजार.. टोटल दोन लाख अडसष्ट हजार रुपये... "

" बापरे एव्हडे पैसे...? " ती चकित झाली..

" ह्म्म्म... तुला म्हणालो होतो नां कि ह्या सगळ्यातून मी तुला बाहेर काढीन म्हणून.. फक्त माझ्या वर विश्वास ठेव.." राज तिला म्हणाला.. आणी चालत दोघे अड्डयावर आले. त्याला बघून भास्कर अण्णा चकित झाला. कारण राज कधी अड्डयावर येत नसे..

" तरी मी विचार करत होतो कि ही कोण नवीन मुलगी ? आणी एव्हडी मोठी गेम टाकतेय.. आता आले लक्षात.. नशीब मी गेम वर फिरवली होती... " भास्कर अण्णा राज ला म्हणाला..

" हं.. भास्कर अण्णा आज पासून हीच गेम टाकायला येईल.काही गडबड असेल तर लक्ष राहू दे... "

" काळजी करू नको.. राज.. दे चिट्ठ्या दे... "

" अण्णा ला चिट्ठ्या दे.. " राज ने सुषमा ला इशारा केला..

" ह्म्म्म.. दोन लाख अडसष्ट हजार चे वळण निघते आहे.." भास्कर अण्णा हिशोब करत म्हणाला.

" ह्म्म्म.. "

" आता सिंगल चे पैसे घेऊन जा... dp पान्याचे उद्या घे.. अजून वरून पैसे आलेले नाहीत.. "

" चालेल अण्णा... आणी त्याने अठरा हजार रुपये मोजून तिच्या हातात दिले.. " तिने ते थरथरत्या हाताने घेतले..

" चल..." राज तिची अवस्था बघून हसत होता..

" काय झाले हसायला ? " तीने रागाने त्याला विचारले..

" अग, पैसे घेताना तुझे हात थरथरत होते ते बघून मला हसायला आले. उद्या अडीच लाख घ्यायचे आहेत तेव्हा तर मला वाटते चक्कर येऊन पडशील... "

" काही नाही.. असे पण मला उद्या लवकर येता येणार नाही .. मला हॉस्पिटल ला जायचे आहे. "

" बरं मला चिट्ठी देऊन ठेव मी पैसे घेऊन ठेवतो.. माझ्यावर विश्वास आहे नां..?" त्याने पुन्हा गमतीने विचारले तसें तिने पुन्हा रागाने त्याच्या कडे पाहिले.

" हे पैसे पण तुझ्याकडे राहूदे... माझ्या इथे खूप चोऱ्या होतात.. उद्या मी आले कि ठरवू आपण काय करायचे ते.."

" तू समता नगर मध्ये राहतेस नां ? "

" हो.. का रे ? "

" तुमच्या इथे अब्द्दुल अजून आहे का ? त्याला एकदा जाम चोपला होता. अजून पण माझे नाव सांग, बोल महाराष्ट्र नगर वाला राज भेटला होता.. बघ काय बोलतो.. "

" मी नाही अश्या गुंडाच्या नादाला लागत.. "

" बरं.." त्याने ते पैसे आपल्या खिशात टाकले..

" राज एक विचारू... " ती अचानक म्हणाली..

" हा विचार नां ? "

" तुझे गेंसींग इतके चांगले कसे ? " ती त्याच्या आजच्या कामगिरीने खूपच प्रभावित झाली होती. ते चालत चालत काहीश्या एकांत जागी आले होते..

" बस्स... कसे आहे नां कि , मटका चालवणार मग तो कॊणी का असेना कल्याणजी भगत असुदे नाहीतर रतन खत्री हे आपल्या फायद्यासाठी चालवतात. जर त्यात फायदा नसेल तर ते कशाला चालवतील बरोबर नां...? "

" ह्म्म्म... "

" त्यामुळे कधी ही आकडा असा येणार जो देण्यात त्यांना लॉस होणार नाही... म्हणून आपण कधीही असेच आकडे खेळायचे म्हणजे आपले आकडे पास होत राहतात.. "

" पण कोणत्या आकड्यावर किती खेळले आहे ते आपल्याला थोडीच तो सांगणार आहे.. "

" हे पण बरोबर आहे.. पण त्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीने आपण खेळलो तर शक्यतो आपण लॉस मध्ये जातं नाही... त्याने तिला नीट समजावून सांगितले...
आता हळूहळू तिच्या डोक्यात प्रकाश पडला.. तिला त्याचे अजब वाटत होते.. तो खेळत तर जुगार होता. पण त्या साठी किती खोलवर विचार आणी गेम काढण्यासाठी किती मेहनत होती..

" मला भूक लागली आहे राज... " ती म्हणाली..

" बरं चल आज तुला मस्त गरमागरम पावभाजी खायला देतो.. " ते दोघे निघणार एव्हढ्यात हवालदार सावंत तिथे आला..

" काय सावंत साहेब... आज इकडे कुठे...? " राज ने त्याला विचारले..

' अरे राज... काही नाही भास्कर अण्णा ला भेटायला आलो होतो.. तुला तर माहित आहे.. " तो हफ्त्या बद्दल बोलतोय हे कळायला राज ला वेळ लागला नाही.

" ह्म्म्म... "

" आज तुझ्या नावाची खूप बोंबाबोंब आहे.. अड्ड्यावर..." सावंत लोचट हसत म्हणाला...

" हे... हे... बरं सावंत साहेब.. ही सुषमा आहे... कधी कधी ही येत जाईल अण्णा कडे.. जरा लक्ष ठेवा... "

" बस का... राज, तू बोललास म्हणजे झाले नां..." सावंत आपले हात उगाचच चोळत होता.. त्याच्या मनात काय आहे हे चाणाक्ष राज च्या बरोबर लक्षात आले होते. असे पण त्याला वळण लागल्याची बातमी आता पर्यंत सगळ्यांना लागली होती.

" सावंत साहेब.. हे घ्या ठेवा... " पाचशे ची एक नोट काढून राज ने त्याच्या हातात सरकवली..

" बरं... येऊ का? "

" ह्म्म्म... " आणी मग राज आणी सुषमा सावंत गेला त्याच्या विरुद्ध दिशेला निघाले..

" तू त्याला कशाला पैसे दिलेस ? "

" अग.. पोलिसांशी कायम दोस्ती ठेवायची.. मटक्याच्या अड्ड्यावर कधी कधी पोलिसांची धाड पडते.. मग अश्या वेळेला ही दोस्ती कामी येते... म्हणून तर सगळ्यांना मुद्दाम तुझी ओळख करून दिली आहे... नंतर उगाचच तुला त्रास नको.. "

"बापरे... पोलिसांची पण धाड पडते अड्ड्यावर ? आणी तरी तू मला तिथे पाठवलेस? ":तीने डोळे मोठे करत त्याला विचारले. तिच्या त्या कृतीने राज चमकला. ती त्याला अगदी सहज अरेतुरे करत होती. त्याच्यावर खोटेखोटे रागावत होती. त्यावर विश्वास पण ठेवत होती. तिच्या ह्या प्रत्येक अदानी तो आतल्या आत घायाळ होत होता.

" अग तसें काही नाही... जर सेक्शन गरम असले तर भास्कर अण्णाच धंदा बंद ठेवतो.. त्याला तशी टीपच येते आणी तसेच काही झाले असते तर मी होतोच कि , माझ्या साठी हे रोजचेच काम आहे. " तो कसाबसा म्हणाला. पण आता तिच्या नजरेला नजर देणे त्याला शक्य नव्हते. मग पावभाजी खाऊन दोघे परत अड्डयाच्या आजूबाजूला बसून राहिले. संध्याकाळी त्यांची जोडी पण पास झाली... त्या मुळे अजून पंचेचाळीस हजार चे वळण लागले... आता उद्या त्यांना दोन लाख पंच्यानव हजाराचे वळण घ्यायचे होते.. मग सगळे ठरवून राज ने तिला निरोप दिला....


पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे..