Jugari - 5 books and stories free download online pdf in Marathi

जुगारी - (भाग - 5)

मागील भागावरून पुढे......


दुसऱ्या दिवशी तो लवकरच उठला. उठला म्हणण्यापेक्षा त्याला जाग आली असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अगरबत्तीच्या सुगंधाने त्याला जाग आली होती. त्याने उठून पाहिले तर देवाची साग्रसंगीत देवपूजा झाली होती. देव्हाऱ्यात निरंजन लावले होते . अगरबत्ती लावली होती. त्याने कधीच अशी लवकर उठून पूजा केली नव्हती. त्यामुळे त्याच्या देवाला तरी एव्हड्या लवकर पूजेची सवय होती कि नाही माहित नाही. सुषमा आपले ओले केस टॉवेल मध्ये बांधून किचन मध्ये काही करत होती.

" काय चालले आहे ? " त्याने किचन मध्ये येत विचारले.

" नाश्ता करतेय.." कांदेपोहे आवडतात ना तुला ?

" हो आवडतात... छान दिसतेस आज.." तिला निरखत त्याने पुष्टी जोडली.

'खरंच..." तिने लाजत नजर खाली झुकवली.

ह्म्म्म... बरं काल रात्री एक छान गेम काढली आहे. आपल्याला जाऊन टाकायची आहे. आज जर गेम पास झाली तर तुझ्या भावाचे ऑपरेशन सहज होऊन जाईल..
माझे आटोपले कि आपण निघू... "

" अरे मग जेऊन जाऊया ना... दुपारीच खबर येते ना... मग तीन वाजेपर्यंत गेम टाकली तरी चालेल नां ? " ती आता बरंच काही शिकली होती.

" ह्म्म्म... ठीक आहे.. " तो म्हणाला... त्या नंतर त्याने अंघोळ वैगरे आटपून नाश्ता केला.

" राज.. मी काय म्हणतेय... "

" ह्म्म्म... "

" आपण माझ्या साठी रूम शोधून ठेऊया कां ? "

" कां ? इथे तुला काही प्रॉब्लम आहे. "

" प्रॉब्लम असा नाही. पण लवकरच समीर चे ऑपरेशन होईल. मग तो पण घरी येईल. म्हणून म्हणतेय कि आता पासून रूम बघून ठेवली तर पुढे प्रॉब्लम नाही येणार.. आयत्या वेळी धावाधाव नको... "

" हे बघ तुम्ही दोघे ही इथे राहिलात तरी मला काहीच प्रॉब्लम नाही . तुझ्या मुळे किती वर्षांनी मला गेम लागली. त्यामुळे तु इथेच राहावेसे असे मला वाटते. पण जर तुला इथे राहायला काही अडचण वाटत असेल , माझ्या पासून काही भीती वाटत असेल तर मग.... बघू आपण एखादी रूम.. " तो म्हणाला. तिच्या मुळे त्याचे नशीब पालटले होते. तिला असे सहजा सहजी जाऊन दयायला तो बिलकुल तयार नव्हता.

" तस नाही रे... मला काही भीतीभीती वाटत नाही. तुझ्यावर खुप विश्वास आहे. फक्त तुझी अडचण नको. आणी आजूबाजूवाले काय म्हणतील ह्याचा विचार करून मी बोलली. " ती त्याला समजावत म्हणाली.

" तुला प्रॉब्लेम नाही ना मग झाले. बाकी कोणाचा मी अजिबात विचार करत नाही. तुम्ही दोघे आत किचन मध्ये झोपू शकता. आजच मी तिथे फॅन लावून टाकतो. म्हणजे तुम्हाला अजिबात गरम वैगरे होणार नाही.

" अरे कशाला फॅन ? आम्हाला सवय आहे. "

" असुदे.. नको असेल तर नका लावू फॅन... पण मी लावून ठेवतो.. " तो म्हणाला.

दुपारी दोन वाजता दोघे त्याच्या बाईक वर निघाले. ती दोन्ही बाजूने बाईक वर बसली होती. आधाराला तिने एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला होता. त्याने अड्ड्यावर जाऊन कालचे वळण घेतले. आणी आजची गेम टाकली. आज त्याने खूप मोठी गेम टाकली होती. पाच हजार ची तर जोडीच होती. त्या शिवाय त्याने चार पाने काढले होते ते त्याने हजार हजार रुपयांनी OTC टाकले होते.

गेम टाकून दोघे त्याच्या नेहमीच्या बसण्याच्या जागी जाऊन बसले.

" राज... तुला एक विचारू ? "

" ह्म्म्म... "

" तुला तुझ्या बायकोची आठवण येत नाही कां ? "

" नाही येत... मला फक्त माझ्या मुलाची पार्थ ची आठवण येते. "

" मग त्याला भेटायला नाही जातं ? "

" पहिले जायचो..पण मी त्याला भेटलेलो मुग्धाला म्हणजे माझ्या बायकोला आवडत नाही म्हणून आता जातं नाही. "

" ती परत येणार नाही ? तु काहीच प्रयत्न केला नाहीस ? "

" तुला काय वाटते मी काहीच केले नसेल कां ? पण ती स्वतःच्या मनाने गेली आणी आता तिला बिलकुल परत येण्याची इच्छा नाही. परतीचे सगळे मार्ग बंद झालेत......जाऊदे हा विषय मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो. "

" ओह.. सॉरी..." ती म्हणाली.. त्या नंतर दोघे शांत बसून होते. शेवटी चार वाजता दोघे अड्ड्याच्या दिशेने चालू लागले. त्याचा पानां पास झाला होता. त्यामुळे त्याच्या जोड्या पण रनींग मध्ये होत्या.

" आता मस्त काम झाले.... आज निश्चित सांगतो आपली जोडी पास होणार.. " तो खुशीत म्हणाला.

" कसे काय ? "

" अग , ही एक जुनी लाईन आहे. ही लाईन मागील वर्षभरापासून बंद होती. पण मागील दोन चार दिवसापासून तो ज्या गेम करतोय ते बघता मला आधीच अंदाज आला होता कि तो ही लाईन पुन्हा चालू करणार आहे. आता पण बघ लोकांना.... आपण खेळलेली गेम कोणी खेळणार नाही कारण कोणालाच ह्याची कल्पना नाही.. " तिला दाखवण्यासाठी दोघे काही वेळ रायटर च्या बाजूलाच उभे राहिले आणी लोकांची गेम बघत होते. खरं तर असे कोणी उभे राहिले तर खेळणारे वैतागतात. पण त्यांना कोणी त्यांना हटकले नाही कारण राज चा तेव्हडा अधिकार आणी वकूब होताच.

थोडावेळ निरीक्षण करून तिने पाहिले राज म्हणतो त्यात तथ्य होते.

" चल..." तिला घेऊन तो अड्ड्यावरून बाहेर पडला.. दोघे चहा वैगरे घेऊन इकडे तिकडे फिरत होते. दोघे ही फिरत होते गप्पा मारत होते पण दोघे अधीर मनाने खबरची वाट पाहत होते. शेवटी सहा वाजता खबर आली. त्यांची जोडी पास झाली होती. खुप मोठे वळण त्यांना मिळणार होते.

" चल आता तु समीर चे ऑपरेशन करायला मोकळी झालीस. उद्या पैसे मिळाले कि सरळ हॉस्पिटलला जाऊ आणी पैसे भरून टाकू.. " बाईक वर बसता बसता तो म्हणाला..

" जाताना एखाद्या दुकानातून पेढे घ्यायला विसरू नकोस.." ती हळूच त्याच्या कानात म्हणाली. पण ते सांगायला तिला पुढे झुकावे लागले . त्यावेळी तिच्या मांसल उरोजाच्या झालेल्या स्पर्शाने तो मोहरून गेला.

" ह्म्म्म " म्हणून त्याने बाईक पुढे काढली. दोघे घरी आले. येताना त्याने पेढे घेतले होते . तसेच त्याने येताना एका दुकानातून एक चांगला फॅन पण घेतला.. तिला घरी सोडून तो तसाच बाहेर गेला. एक मोठी गादी त्यावर टाकायला दोन बेडशीट्स, दोन ब्लॅंकेट सगळे सामान घरी पोचवायला सांगून आला.

तिने अंघोळ करून देवाला निरंजन लावले. अगरबत्ती लावून देवाला नैवद्य दाखवला. आज देवाच्या कृपेने तिच्या भावाच्या ऑपरेशन साठी लागणार पैसा उभा राहिला होता.
त्याचे आभार मानण्यास ती कशी विसरेल.. खरंच ती खुप देवभोळी होती.

चहाचा कप घेऊन दोघे बसले होते. त्याच वेळी एक माणूस गादी, बीडशीट्स आणी ब्लँकेट घेऊन आला. तिला ह्या बद्दल काहीच माहित नव्हते.

" आता हे आणी कशाला ? " तिने विचारले.

" असुदे.. उद्या समीर आला तर दोघांना आत झोपायला कोणतीही अडचण नको म्हणून मी त्या मागवल्या आहेत..... फॅन बसवायला पण माणूस येतोय." त्याने पुढे तिला सांगितले. ती त्याच्या कडे कौतुकाने बघत होती. तो तिची किती काळजी करत होता. काय हवे नको ते बघत होता. तिच्या साठी हे सगळे नवीनच होते.

काही दिवस असेच गेले. त्यांनी हॉस्पिटल मध्ये पैसे भरून टाकले. समीरचे ऑपरेशनची तारीख ठरली आणी ठरलेल्या वेळी त्याचे ऑपरेशन पण झाले. आठवडाभर हॉस्पिटल मध्ये अंडर ऑबजर्वेशन ठेऊन त्याला घरी सोडण्यात आले. आता त्याची प्रकृती झपाट्याने सुधारत होती.

सुषमा आपलेच घर असल्यासारखी तिथे रुळली होती. सकाळी देवपूजा , जेवण , कपडे सगळे ती बघत होती. काही लागणार असेल तर तो घेऊन येत होता. त्यांचे एकदम मस्त चालले होते.

आणी एके दिवशी सकाळी दरवाजा वाजला म्हणून सुषमाने दार उघडले. दरवाज्यात एक छान दिसणारी स्त्री उभी होती. तिच्या बरोबर एक सात आठ वर्षाचा मुलगा पण उभा होता.

" राज आहेत कां ? "

" हो.. आपण ? "

" मी मुग्धा... " ती म्हणाली.. आणी अचानक सुषमाच्या डोक्यात प्रकाश पडला.. अरे, ही तर राज ची बायको..

" या ना... आत या... " दरवाज्यातून बाजूला होत सुषमा म्हणाली. पार्थ तर आत शिरताच सरळ राज च्या अंगावर पप्पा.. पप्पा..म्हणत जाऊन बसला . त्याच्या अंगावर बसण्याने आणी पप्पा म्हणण्याने राज ने पटकन डोळे उघडले..

" अरे पार्थ......" त्याने पटकन त्याला आपल्या छातीशी लावले. त्याचे पटापट मुके घेत राज ने त्याला डोळे भरून पाहिले. नंतर त्याचे लक्ष मुग्धा कडे गेले. ती कौतुकाने बाप लेकाचे प्रेम पाहत होती.

" तु आज कशी काय इकडे ? " त्याच्या स्वरातील कडवट पणा लपत नव्हता. आणी तिच्या ही ते लक्षात आले. तोपर्यंत सुषमा चहा घेऊन आली. तिच्या हातातून कप घेऊन मुग्धा ने घरावरून एक नजर फिरवली. सगळी कडे टापटीप दिसून येत होती. सगळ्या गोष्टी जागच्या जागी. देव्हाऱ्यात दिवा लावलेला होता. अगरबत्तीचा सुगंध घरभर दरवळत होता. तिने एकदा सुषमाकडे कौतुकाने पाहिले. तिच्या अनुपास्थितीत तिने घर आणी राज दोघांनाही व्यवस्थित ठेवलेले दिसत होते.

" मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते..." एक नजर सुषमा कडे टाकत मुग्धा म्हणाली. ही तिची नेहमीची सवय. कोणी असेल तर ती राज ला अहो जाओ करायची. पण फक्त दोघेच असले तर त्याला अरे तुरे करूनच बोलायची.

" आता काही बोलायला राहिले आहे ?" त्याने प्रतिप्रश्न केला.
त्यावर ती काही बोलली नाही. पण सुषमा समंजस होती.

" तुम्ही निवांत बोला.. मी मुलांना घेऊन बाजूला गार्डन मध्ये जाते. " तिने त्या दोघांना व्यवस्थित बोलता यावे म्हणून तोडगा काढला.
काही वेळानी सुषमा समीर आणी पार्थला घेऊन गार्डन ला निघून गेली.

" ह्म्म्म... बोल... काय म्हणणे आहे तुझे ? पण आधीच सांगून ठेवतोय सुषमा बद्दल काही एक ऐकून घेणार नाही. असा ही आता तुझा ह्या सगळ्याशी काही एक समंध नाही. "

" सुषमा नाव आहे काय तिचे..? " मुग्धा ने विचारले..

" ह्म्म्म... "

" छान आहे मुलगी... छान घर ठेवले आहे. कधी पासून आली इथे राहायला...? "

" साधारण दोन तीन महिने झाले... "

" ह्म्म्म... "

" तु कशाला आलीस ते सांग... "

" राज..मला माहिती आहे कि मी खूप मोठी चूक केली आहे. आणी आता ती चूक दुरुस्त होण्या पलीकडे निघून गेली आहे..." एव्हडे बोलून ती थांबली. तिचे डोळे पाणावले.
तो शांत बसून तिचे बोलणे ऐकत होता.

' राज , मला ब्रेस्ट कँसर झाला आहे. " ती खोल आवाजात म्हणाली. आणी ती काय बोलली ते कळायला राज ला काही क्षण लागले. पण समजल्यावर तो एकदम स्तब्ध झाला.

" काय ? " काही क्षणानंतर त्याच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. तिने पाणावलेल्या डोळ्याने मान हलवली.

" तु काही काळजी करू नकोस... आपण मोठ्या , स्पेशलिस्ट डॉक्टर ची ट्रीटमेंट करू.. तु लवकर बरी होशील..." तो तिच्या जवळ बसत म्हणाला. खरं तर त्याचा तिच्यावर खूप राग होता. पण आता तिच्या आजाराचे ऐकून तो पण स्वतःला सावरू शकला नाही.

" राज, आता वेळ निघून गेली आहे... फारतर सहा ते आठ महिने आहेत माझ्या जवळ... "

" काही होत नाही तुला.." त्याने आवेगाने तिला आपल्या मिठीत घेतले. आणी त्याच्या मिठीत शिरताच तिच्या डोळ्याचा बांध फुटला. दोघे बराच वेळ एकमेकांच्या कुशीत आसवे गाळत बसली होती.

" राज मला माझे काही वाटत नाही... पण पार्थ चे काय म्हणून मी इथे आली आहे.." शेवटी डोळे पुसत ती त्याच्या कुशीतून बाहेर पडत म्हणाली.

" त्याची काळजी करू नकोस.. मी आहे ना... "

" माझी एक विनंती आहे कि , माझ्या नंतर तु पार्थ ला व्यवस्थित संभाळ करावास.. "

" अग असे काय बोलतेस.. तुला काही होणार नाही.. आणी पार्थ काय माझा मुलगा नाही कां ? त्याला काय मी असाच वाऱ्यावर सोडणार नाही... तु एक काम कर.. तुम्ही दोघे आता इथेच राहा.. "

" नको , नको... आमच्या मुळे तुमच्या दोघात प्रॉब्लम नको.. "

" हे बघ मुग्धा तु समजतेस तसे काही नाही.... सुषमा जरी इथे रहात असली तरी आमच्या दोघात काहीच नाही.. ती आणी समीर दोघे आत झोपतात मी इथे बाहेर झोपतो. मी तिला कोणताही शब्द दिला नाही.... त्यामुळे तुला इथे राहण्यात काहीही हरकत नाही... हा आता तुझ्या अनुपस्थितीत तिने घर चांगल्या प्रकारे सांभाळले होते. त्यामुळे आता तु आलीस तर काही दिवस कुठे तरी दुसरी सोय पहा असे बोलणे मला पटत नाही. त्यामुळे तिला काय सांगायचे ते मी सांगीन. सगळे एकत्र राहू. तुला काळजी करण्याचे कारण नाही.. राज तिला समजावत म्हणाला.. पण ती काही बोलली नाही.

" आता जास्त विचार करू नकोस... मी नंतर तुझ्या माहेरून तुमचे दोघांचे कपडे आणतो. "

" बरं ठीक आहे. " शेवटी ती म्हणाली. काही वेळाने सुषमा आली. पार्थ खूप खुश होता. त्याला सुषमा आंटी खूप आवडली होती. आल्या आल्या त्याने घोषा लावला. मम्मी आपण इथेच राहू या.. त्याला प्रेमाने जवळ घेत राज ने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" आता तुम्ही दोघे इथेच राहणार आहात... " राज त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतानाच म्हणाला.

ते ऐकून एक विशादाची छटा सुषमाच्या चेहऱ्यावर उमटून गेली. अर्थात त्याची बायको परत आलीय म्हणल्यावर असे काही तरी घडू शकते ह्या बद्दल तिने आधीच आपल्या मनाची तयारी केली होती. तिच्या मनात त्या बद्दल वाईट वाटत नव्हते. खरंतर राज खुप चांगला माणूस होता. तो बाहेर कसा पण असला तरी तिच्याशी तो अत्यंत मर्यादेने वागे. त्याच्यामुळे तिच्या भावाचे ऑपरेशन व्यवस्थित झाले होते. त्यासाठी लागणारे पैसे त्याने तातडीने उभे केले होते. अत्यंत गरजेच्या वेळी ती न सांगता त्याच्या कडे राहायला आली होती. आणी त्याने पण तिला कोणतीही अट न घालता आसरा दिला होता. त्याच्या घरात ती खूप सेफ होती. त्याने कधीही तिच्या मजबुरीचा फायदा घेतला नाही . आपल्या स्वतःच्या घरात असल्यासारखी ती इथे रहात होती. एव्हड्या दिवसाच्या वास्तवात तिला तीच ह्या घरची मालकिन असल्याचा फील तिला येत होता. त्याने ही कधी तिला काहीही करायला मनाई केली नव्हती. तिला जे वाटत होते ती ते बेधडक त्याला न विचाराता करत होती. तो बिचारा तिचे ते वागणे , तिचा आपल्यावर हक्क गाजवणे सगळे, सगळे सहन करत होता. हळूहळू ती स्वतःला त्याच्या पत्नीच्या रूपात बघत होती . आपले घर समजून ती सगळे प्रेमाने आणी कर्तव्य ह्या भावनेतून करत होती. पण आता अचानक मुग्धा ताई आली म्हंटल्यावर तिच्या स्वप्नाना काहीसा धक्का बसला होता. अर्थात राज ने तिला कोणतेही वचन दिले नव्हते कि कोणत्याही गोष्टीचा फायदा ही घेतला नव्हता. त्याबाबतीत तो एकदम चांगला होता. त्यामुळे तिच्या मनात त्याच्या बद्दल असलेला आदर आणी प्रेम कायम होते . आपण आपल्यात असलेले चांगले समंध अबाधित राखत त्या दोघातून बाजूला होणे हाच एक त्यातून योग्य मार्ग होता. शेवटी ती आपल्या निर्णयावर पोहचली.
बस आता वेळ बघून आपला निर्णय त्याच्या कानावर घालावा एव्हडेच काम राहिले होते.


पुढील भाग लवकरच........

© सर्वाधिकार लेखकाकडे..