Mala Kahi Sangachany - 19-3 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय...- १९-३

१९. स्मृति remaining - 2

हात आणि पायाची जखम बरी व्हायला तीन चार दिवस लागले ... त्यामुळे सायकल घेऊन फिरवायला बाहेर गेलो नाही , पायी पायी कबीर जवळ मात्र रोजच जात होतो , त्याच्या सहवासात वेदनांची जाणीव जरा कमी व्हायची.. मी तिथं जाऊन पुस्तक वाचत बसायचो मध्येच तिचा विचार मनात आला की कबीरला तिच्याबद्दल सांगून मन मोकळं करत होतो ... कॉलेज सुरु व्हायला अजून वेळ होता म्हणून वाचनालयात असलेली नावाजलेली बरीच पुस्तक वाचून काढावी अस ठरवलं ... सर्व मस्त चाललं होतं ..


जवळपास एक आठवडा मला त्रास सहन करावा लागला , मला बरं वाटायला लागलं ... मग काय , दुसऱ्याच दिवशी सायकल घेऊन जरा वेळ फेरफटका मारून यावा म्हणून घरून निघालो ... त्या सात आठ दिवस सुजितला भेटलो नव्हतो म्हणून सरळ त्याच्याघरी गेलो त्यानेही माझ्यासोबतच अकरावीला प्रवेश घेतला होता ... तसं आमचं आधीच ठरलं होतं ... मग नवीन कॉलेज बद्दल आणि इतर गप्पागोष्टी करत बराच वेळ निघून गेला ... पहिल्या दिवशी सोबतच कॉलेजला जायचं अस ठरवून मी त्याचा निरोप घेतला अन मी घरी परत जायला निघालो ... तर ती वाटेत भेटली , यावेळी तिनेच मला थांबवलं ... मी सायकल वरून खाली न उतरताच सवयीने एक पाय खाली टेकवून तिच्याजवळ सायकल उभी केली . तिचा पहिला प्रश्न ......


" कसा आहेस कुमार ? म्हणजे पायाला त्यादिवशी लागलं होतं ना , आता ठीक आहे ना ..? "


मला वाटलं होतं की तिला या गोष्टीचा विसर पडला असावा ... " हो , मी ठीक आहे "


" पण त्यादिवशी तू अचानक कसा पडला ? "


मी विचार करत होतो की आता हिला कसं सांगावं कि तिच्याकडे पाहत असताना मी खांबाला धडकलो म्हणून ...

" रस्त्यात मोठा दगड होता , त्याला चुकवायला गेलो तर माझा तोल गेला आणि मी पडलो ... "


" अस झालं तर ... "


त्यावर मी मानेनेच होकार दिला ...


ती आणखी काही विचारणार म्हणून मी तिला " येतो मी " म्हणत पायाने सायकल पुढे लोटत तेथून निघालो ... घरी परत आलो ...


दहा पंधरा दिवस गेले आणि माझं कॉलेज सुरु झालं . सर्वकाही नवीन वाटतं होतं , कॉलेज , शिक्षक , सारं सारं अगदी एका वेगळ्या दुनियेसारखं मला भासत होतं .. नवे मित्र जुळायला जरा वेळ लागला अन संपूर्ण दिवस कॉलेज मध्ये निघून जायचा... त्यामुळे एक दोन दिवसाआड तर कधी कधी सुटीचा दिवस रविवार आला की स्वतःहून तिला भेटायला म्हणून जात होतो , कॉलेजच्या गमती जमती सांगत बसायचो ... आमची कोणत्या कोणत्या निमित्याने भेट व्हायची , बोलणं व्हायचं .. दिवसामागून दिवस जात होते , जीवन कितीतरी पटीने सुंदर होत चाललं होतं आणि आमची मैत्री आणखी घट्ट होत होती ... तसे सारे दिवस सारखेच पण सणासुदीचे आणि सुटीचे दिवस सर्वांना आवडतात . त्या निमित्ताने सर्व परिवार वेगळाच आनंद अनुभवत असतो आणि मैत्रीचे बंध आणखी घट्ट होत असत.. तसंच काहीसं आमच्या मैत्रीत घडत होत ....


या सर्व गोष्टी इतक्या लवकर आणि झपाट्याने घडत होत्या कि ते वर्ष कधी संपलं कळलं नाही ... नवीन वर्ष्याला सुरुवात झाली , इतरांना शुभेच्छा दिल्या तश्याच तिच्या घरी जाऊन तिलाही दिल्या .. त्यांनंतर तिच्या घरी जाणं येणं अगदी एक रोजची सवय झाली होती ...


तेव्हा नवीन पर्वाला सुरुवात झाली होती , तीच दहावीचे वर्ष , सराव परीक्षा सुरु होणार होती .. तिने तिच्या अभ्यासात मदत करशील म्हणून मला विचारलं तर मी लगेच होकार देऊन टाकला आणि मी जमेल तितकी मदत तिला करत होतो ... सराव परीक्षा पार पडली , इकडे माझे कॉलेजचे गृहपाठ सबमिट करायला सुरुवात झाली होती . काही दिवस गेले आणि दहावीची बोर्ड परीक्षा सुरु झाली , मी रोज न चुकता तिला बेस्ट ऑफ लक विश करत होतो , तर ती पेपर देऊन परत आल्यावर पेपर कसा गेला ते विचारायला सुध्दा ......


परीक्षा संपली होती ... दहावी आणि पाठोपाठ अकरावी अशा दोन्ही... शाळा आणि कॉलेजला किमान दोन महिने सुटी होती , मग काय सकाळी लवकर उठून तयार झालो कि खेळायला , खेळून दमलो कि आंबे , संत्री , चिंचा तोडायला सगळे मित्र मिळून जात होतो ... दुपारी कबीरच्या सहवासात पुस्तकाचे वाचन आणि संध्याकाळी सायकल फिरवायला निघालो की तिच्याशी गप्पा... असे मजेत सुटीचे जात होते ... अन तो दिवस उगवला , दहावीचा निकाल लागला ... मी सायकल घेऊन सुजीतकडे जात होतो तर ती बाहेर अंगणात होतीच . मी जरा लक्ष नाही असं दाखवत समोर जात होतो तर तिने मला आवाज दिला ...


" कुमार ... कुमार ... "


मी सायकल बाजूला घेत " किर्तीप्रिया ... "


" तुला घाई असेल तर जा नंतर भेटू ..."


" बोल ना "


" थांब हा , आलेच मी " म्हणत ती घरात गेली आणि हातात पेढ्यांचा डबा घेऊन आली ... दोन पेढे मला देत


" कुमार पेढे घे "


" पेढे ..? प्रसाद आहे का ? "


" अरे तुला ठाऊक नाही वाटते , माझा निकाल लागला आज , मी पास झाले "


" वाह अभिनंदन " हातात हात मिळवत मी तिला शुभेच्छा दिल्या .. " पण दोन पेढे का बरं ? "


" तू मला अभ्यास करताना मदत केली ना म्हणून ... "


" ठीक आहे " म्हणत मी त्यातला एक पेढा तोंडात टाकला ... जरावेळ काहीच बोललो नाही ...


न राहवून ती म्हणाली " तु मला किती टक्के मिळाले विचारलं नाही .. "


मी एक क्षण वाया न घालता लगेच ... " ६४ पॉईंट काहीतरी .... % " इतकं बोलून थांबलो , दुसरा पेढा खात सायकल वरून खाली उतरून , स्टँडवर लावायच्या बहाण्याने नजर चुकवत मी पाठमोरा उभा राहिलो ...


नकळत बोलून तर टाकलं ... पण आता काय होणार म्हणून मी हळूच वर नजर केली तर तिचा चेहरा बघण्यासारखा होता ... डोळे किंचित मोठे झालेले , भुवया उंचावलेल्या , एक हात कमरेवर ठेवून तर दुसरा हात हनुवटीला लावून ती माझ्याकडे पाहत होती .... काही क्षण ती तशीच उभी होती ... भानावर येऊन


" तुला कस माहित ..? मी तर फक्त घरी सांगितलं मला किती टक्के मिळाले ते .."


मनात विचार करत , आता काय बोलावं ? अन पटकन तिच्या कडे नजर वळवून " खरं कि काय ? ६४ % मिळाले तुला ? मी तर सहज गंमत म्हणून बोललो.. "


पण तिला ते पटलं नाही हे माझ्या लक्षात आलं तरी मला तिचे टक्के माहित नाही असं दाखवत तिच्याकडे पाहत होतो ... ती काहीएक बोलली नाही तेव्हा मीच तिला विचारलं ..


" सॉरी हं , बरं सांग किती टक्के मिळाले ? "


दोन्ही हातांची घडी घालून " ६५ % "


" अरे वा ! पुन्हा एकदा , अभिनंदन "


" धन्यवाद .. पण ......"


त्यावर ती काही बोलणार इतक्यात .....

" बरं येतो मी , जरा काम आहे ... " म्हणत मी तेथून निघालो , म्हणजे मी तेथून पळ काढला ... मला ठाऊक होत की तिचं माझ्या उत्तराने समाधान झालं नाही .


त्याचं अस झालं की मला आधीच माहिती होत की उद्या निकाल लागणार ... दुपारी बारा वाजता निकाल वेबसाइट वर पाहता येणार होता. मी ११.३० वाजताच इंटरनेट कॅफेत हजेरी लावली होती ... तिच्या आधी मी तिचा निकाल कॉम्पुटर वर पाहिला होता , तिला ६४.७८ % मिळाले होते आणि तिचा रोल नंबर , एकदा तिच्याशी बोलत असता मी तिच्या नकळत हॉलतिकीट वरचा वाचला होता . दोन तीन वेळा आठवण केला आणि तो नंबर माझ्या लक्षात राहून गेला .... ... ...

अचानक तिचा मोबाईल वाजला आणि ती त्या डायरीच्या दुनियेतून वास्तव्यात परत आली ... तिने मोबाईल हाती घेतला तर कस्टमर केयरचा फोन असल्याच तिला कळलं . " केव्हाही फोन लावतात " स्वतःशीच बोलत कॉल न उचलताच तिने कट केला ... तर वाचत असतांना बराच वेळ निघून गेला आणि कामं तशीच खोळंबली आहेत हे तिच्या लक्षात आलं , खरं तर ती डायरी पूर्ण वाचावी अस तिला वाटत होतं पण धुनी भांडी सगळी कामं व्हायची असल्याने तिने मोह आवरता घेतला ... डायरी जिथपर्यंत वाचून झाली त्या पानाच्या मधात बोट ठेवून ती बेडरूम मध्ये गेली , ड्रेसिंग टेबल वर पडलेलं एक विसीटिंग कार्ड उचलून तिने ते डायरीत खूण म्हणून ठेवलं . तिथेच आरश्यासमोर डायरी ठेवून ती कामाला लागली ... पटापट काम आवरून कधी एकदा परत डायरी वाचते अस तिला होऊन गेलं . ...


ती काम फक्त शरीराने करत होती पण तिचं मन मात्र कुमारने जे काय लिहिलं त्यातच गुंतलेलं होतं ... मध्येच कितीतरी विचार तिला नकळत परत परत कुमारच्या डायरीत जे काय तिने वाचलं तिकडे भूतकाळाच्या दिशेने घेऊन जात होते ... तिला आणखी बेचैन करत होते तर दुसरीकडे एक प्रश्न तिला पडला ...


" कुणाला पूर्णपणे समजून घ्यायला हे आयुष्य पुरेसं आहे का ... ? "