Pritilata - ek paris sparsh - 2 books and stories free download online pdf in Marathi

प्रितिलता - एक परिसस्पर्श - 2

भाग-I पासून पुढे...


"चल, तिला येवढं काय झालंय माझ्या पोराला येवढं मारोस्तवर",
असे म्हणून रागात तावा- तावानं शामची आई शंकरच्या घरी आईजवळ आली आणि म्हणाली,
"चल गं कमळे ,त्या मास्तरणीचं एवढं काय बिनसलंय बघू चल."

शामची आई शंकरच्या आईला जशीच्या तशी घेऊन शाळेकडे निघाली.शाम रस्त्याकडेला बसला होता.शामच्या आईने शामला उठून पोटाशी कवटाळले.रडूनरडून सुकलेल्या तोंडावरून हात फिरवला आणि शाम, शंकर आणि शंकरची आई शाळेकडे चालू लागल्या.
शाळेसमोर येऊन एका मुलीला शामची आई बोलली,
"कुठाय मास्तरीन?,बोलव तिला.पोराला येवढं मारत्या,काय झालंय तिला"

इतक्यात वर्गातून खबाले बाई आल्या.बाईंचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता.बाई दिसताच शामची आई," ये हिकडं.तुच का ती मास्तरीन, काय झालंय गं तुला, पोराला येवढं मारत्यास?तुझी साडीच फिडती,ये."

बाई घाबरुन बोलल्या,"अहो शामची आई मी नाही मारलं शामला"
शामची आई,"पोराला मारून खोटं बोलत्यास व्हय गं.मारून कट्ट्यावरून का ढकललंस?"
बाई घाबरतचं," अहो, मी नाही मारलं आणि ढकलूनही नाही दिलं."
शामची आई तंबी देतच होती," पुन्हा माझ्या पोराला परत हात लावलास तर बघ.मी हाय आणि तू हायस."
इतक्यात एका वर्गातून एक बाई आल्या.त्यांनी थोडं ऐकले होते,"अहो,आम्ही मुलांना शिकवतो.आमचं लक्ष असतंय.तुमचंही लक्ष असावं म्हणून आम्ही मुलांना पालकांना घेऊन यायला सांगतो."
शामच्या आईचं लक्ष नवीन बाईंकडे गेले आणि म्हणाली,"पदमे,तू हितं? मास्तरीन झालीस व्हय."
नवीन बाई गडबडल्या.त्यांच्या लक्षात येत नव्हते, कोण ही बाई?माझं नाव कसं काय घेतेय?
इतक्यात शामची आई बोलली,"अगं,मी. तुझी लहानपणीची मैत्रीण.आपूण न्हाय का, मेंढरं राखायला जायाचो.तुझ्या आणि माझ्या बाबांची मेंढरं हूती."
बाईंच्या लक्षात आले,"हा आठवलं, तुला इथे दिलंय होय.मेंढ्या आहेत की विकल्या दादांच्या."
सगळं विसरून दोन लहानपणीच्या मैत्रीणी गप्पा मारत बसल्या.त्या वेळ-काळाचे भान विसरून बोलत होत्या.
इतक्यात शामने आवाज दिला,"आयं, दुखतंय." शामची आई शामकडं बघत,"व्हय बाळा. चल घरी.(नवीन बाईंकडे बघत) पदमे, पोराकडं लक्ष असू दे‌.ये वस्तीवर कधी चहापाणी करायला.चल,यीती."असे म्हणून शाम, शामची आई, शंकर, शंकरची आई घराच्या दिशेने चालू लागल्या.

तिसऱ्या दिवशी, नेहमी प्रमाणे शाम आणि शंकर शाळेला निघाले.वस्तीवरून गावात शाळेत जायला अर्धा तास लागायचा.आज ते वेळेवर निघाले होते.त्यामुळे ते प्रार्थनेला पोहोचले.वर्गशिक्षिका 'प्रितीलता खबाले' बाईंनी हजेरी घेतली आणि शिकवायला सुरुवात केली.शिकवत असताना त्यांची नजर शामवर पडली.शामने शाळेचा गणवेश, पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी , डोक्यावर गांधी टोपी घातली होती.पण ती टोपी गोलाकार झाली होती.बाईंनी शामला पुढे बोलावले आणि म्हणाल्या,"तुझी टोपी दे मला."
शाम घाबरतच बोलला,"माझ्याकडे एकच टोपी आहे.ती तुम्हाला दिली तर मी काय घालू?."
बाईंनी शामला जवळ घेतले आणि प्रेमाने पाठीवर हात फिरवत म्हणाल्या,"बाळ शाम, तुझी टोपी कायमचीच नको.थोडया वेळाने सरळ करून देते.दे."
शामने गोल झालेली टोपी बाईंना दिली.बाईंनी शिकवत शिकवत टोपीला दोन्ही बाजूला टोकदार केले.टोपी शामजवळ देत बोलल्या,"बाळ,स्वतःला या टोपी सारखे रूबाबदार ठेवायचे."
त्या दिवसापासून शामला बाईंबद्दल खूप आपूलकी निर्माण झाली.शाम मध्ये कमालीचा बदल झाला.बाई सांगतील ती पुर्व दिशा मानून तो शिक्षणात प्रगती करू लागला.
खबाले बाईंनी पद्मावती बाईंना शामच्या आई बद्दल माहिती विचारली असता.पद्मावती बाईंनी लहानपणीच्या जुन्या आठवणी जाग्या करून सांगितल्या,"मुलगी हुशार होती पण समाज...... जाऊ द्या.ती एक मोठी कहाणी आहे नंतर कधी तरी सांगेन"
खबाले बाईंना इतकेच समजले,की शामच्या आईला जे शिक्षण मिळाले नाही ते कोणत्याही परिस्थितीत शामला दयायचं.शामची हुशारी बघून बाईंनी स्वतःच्या मुलासारखे सांभाळलं. त्याला लागणारे शिक्षणाचे सर्व साहित्य देऊ लागल्या.कधी आजारी पडुन शाम शाळेत नाही आला तर त्या शाळा सुटल्यावर घरी येऊन खुशाली विचारुन जात असत.
असेच एक दिवस शाम आजारी पडला.दोन-तीन दिवस शाळेत गेलाच नाही.आणि बाईही भेटायला आल्या नाहीत.शामला काळजी वाटू लागली आणि तो आजारी असतानाही शाळेत गेला.पण त्या दिवशी सकाळी प्रार्थनेला इयत्ता चौथीची मुलांची संख्या कमी झालेली होती.त्याला समजेना,हे खरं आहे की भास.प्रार्थना झाल्यावर एक शिक्षक पुढे आले आणि म्हणाले,"इयत्ता चौथीच्या न आलेल्या मुलांना सांगा,'खबाले बाईंची बदली झाली म्हणून शाळा बंद नाही झाली'."
वर्गात गेल्यावर शाम बेचैन झाला होता.तो फक्त बाईंनाच शोधत होता.एका मित्राला शंकरला विचारले असता समजले,की त्यांची खरंच बदली झाली होती.तो मित्र रडत रडतच पुढे सांगू लागला,"तू आला नाहीस त्या दिवसापासून बाई येत नव्हत्या पण काल आल्या होत्या.त्या देखील खूप आजारी होत्या.आपल्याला भेटायला,आपला निरोप घ्यायला.आख्खा वर्ग रडत होता.बाई सर्वांना समजावत होत्या अन् स्वतःही रडत होत्या.जाताना त्यांनी त्यांचा पत्ता फळ्यावर लिहून दिला आहे.आठवण आल्यावर पत्र पाठवा म्हणून सांगितले.आख्खी शाळा त्यांना निरोप दयायला गावाच्या वेशीपर्यंत आली होती.फक्त तू नव्हतास.बाईंना वेशीपर्यंत सोडून सर्व विद्यार्थी माघारी फिरले.मी मात्र त्यांना सोडायला बस स्टॅण्ड पर्यंत गेलो होतो.दिवस मावळला होता.बाई म्हणाल्या,"जा शंकर, अंधार होईल तुला घरी पोहचायला.आणि शामला निरोप दे, की 'तू नाही येऊ शकलास मला भेटायला पण मी नक्की येईन तुला भेटायला'."
शाम हुंदके देत रडत रडतच ऐकून घेत होता.त्याने बाई गेलेल्या रस्त्याकडे हंबरडा फोडत पळू लागला.आवाज देऊ लागला,"बाई.... बाई..... मी आलोय तुम्हाला भेटायला (रडतच)मी आलोय तुम्हाला भेटायला."
संध्याकाळ झाली होती. सुर्य मावळला होता आणि सुर्यासोबत त्याच्या बाईंना शेवटचं भेटायच्या आशाही मावळल्या होत्या....

🙏🙏🙏