Mala Kahi Sangachany - 30 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय..... - ३०

३०. नशीब

नाईट लॅम्पचा मंद प्रकाश डायरीच्या पानांवर पडत होता , जरा नजर रूममध्ये इकडे तिकडे गेली की उजेड जणू नसल्याचं तिला भासत होतं ... पंख्याचा गार वारा , नीरव शांतता असल्याने फिरणाऱ्या पात्यांचा गरगर असा आवाज तिच्या सोबतीला होते आणि कुमारची डायरी ... मनात मध्येच येणारे काही विचार , आठवणी ...

बिछान्यावर पूर्ण अंग टेकवून तिला बरं वाटलं ... मनात येणारे विचारांचे वावटळ दूर करून तिने वाचायला सुरुवात केली ...

कुमारने समोर लिहिलं होतं ---

तिची MS-CIT ची परीक्षा झाली , मला ठाऊक होतंच कि ती पास होणार अन ती चांगले टक्के घेऊन पास झाली , मी तिला शुभेच्छा दिल्या होत्या तर तिने हसतच पेढा माझ्या हातावर ठेवला होता ... काही क्षण हे कधीच विसरता येणार नाहीत याची मला आज जाणीव होते आहे .... त्यावेळेला तिचा पाहिलेला चेहरा नकळत आजही डोळ्यांसमोर येतो ... सोबत घेऊन येतो आठवणींचा पूर ... मी त्या पुरात वाहत वाहत चिंब होतो , कधी मिटलेल्या डोळ्याने तर कधी आसवांनी भिजलेल्या डोळ्याने ...

मी ज्या दिवसाची वाट पाहत होतो , तो दिवस जवळ येत होता ... तिचा वाढदिवस ... अचानक भेटून तिला आनंदाचा धक्का द्यायचा म्हणून त्या आठवडा भर तिला भेटायचं नाही असं ठरवलं होतं ... जेणेकरून जर बोलता बोलता तिने मला सांगितलं की इतक्यात तिचा वाढदिवस आहे तर ' सरप्राईस ' तसंच राहिल असतं . तिला एकदम भेटायचं तर 18 एप्रिल ला ... बरोबर ना कबीर ..! मी जवळजवळ त्याला मिठी मारली होती ...

आजवर अनेक ग्रिटींग कार्ड बनवले होते पण हे जरा जास्तच विशेष होतं ... म्हणून दोन दिवस बरच डोकं , कितीतरी साहित्य गोळा करून , वेळ खर्च करून सरतेशेवटी 13 तारखेला कार्ड तयार झालं , एक काम तेवढं बाकी होतं To आणि From नंतर नावं लिहायची होती अन पहिल्या पानावर " वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा " बस् !

त्यासाठी कितीतरी पान सराव करून काळे निळे केले . बराच वेळ काय ? तो पूर्ण दिवस निघून गेला पण ते तीन शब्द नेमके कश्या प्रकारे लिहावेत ठरवता आलं नाही ... दुसरा दिवस कामाने सुरु झाला अन कामातच संपला ... तारीख 15 एप्रिल , सकाळी सकाळी सारे कागद अन ते ग्रिटींग कार्ड घेऊन बसलो होतो , सर्वात जास्त आकर्षक असे ते तीन शब्दाचे लेखन शेवटी बनले ... वेगवेगळे प्रकार एकत्र करून ! सोबतच To नंतर किर्तीप्रिया तर From नंतर कुमार लिहून मोहीम यशस्वी झाली ...

तिच्या वाढदिवसाला तिला हे ग्रिटींग कार्ड देतांना काय होईल ? तिला आवडेल कि नाही ? ती खुप खुश होईल मी विचारात हरवलो होतो , इतक्यात आवाज ऐकू आला ... मला अजून आठवण आहे आणि नेहमीच राहील , आयुष्यभर ..!

" कुमार , झालं कि नाही , आवर पटकन आपल्याला आज गावाला जायचं आहे ना ... " आईने मला हाक दिली होती , मला आठवण झाली की आम्ही सर्व बाहेरगावी लग्नाला जाणार होतो , दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला लग्न होतं आणि 17 ला परत येणार होतो पण माझं मन काही केल्या सोबत जायला तयार नव्हतं पण " एकटा घरी काय करशील ? चल सोबत " म्हणत आईने तयारी करायला लावली होती ... मग काय माझा नाईलाज झाला आणि आम्ही सर्वजण लग्नाला गेलो ...

प्रवासात सतत मनात एकच विचार घोळत होता , 18 एप्रिल ... वाढदिवस ... ग्रिटींग कार्ड ...

तिथं पोहोचल्यावर काही वेळाने नवीन मित्र झाले , मला बाकी गोष्टींचा विसर पडला होता ... दुसरा दिवस लगबगीत निघून गेला , 17 ला स्वागत समारोह ते तरी बरं झालं की कार्यक्रम दुपारी होता , मला वाटलं होतं की सायंकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार पण नातेवाईकांनी हट्टाने थांबवलं होतं ... मग काय मानासाठी राहावं लागलं ...

18 एप्रिल , ती अनपेक्षित पणे समोर होतीच ... मी सायकल हळू चालवत जवळ जाऊन थांबलो होतो , तिला बिलकुल काहीएक माहिती नव्हतं ...

" कुमार ,इतक्यात दिसला नाही .."

" आम्ही सर्व लग्नाला गेलो होतो . "

" अस्स होय ... कसा आहेस ? "

" मजेत , तू सांग ... "

" एकदम मस्त .."

" तेथून एक गोष्ट आणली , मी तुझ्यासाठी .."

" काय ? बघू .."

" आधी डोळे मिट मग देतो "

तिने काहीएक न बोलता डोळे मिटले मी क्षणभर तिला पाहतच होतो ..

" दे , इतका वेळ , मस्करी तर करत नाहीस "

" एक मिनिट थांब " म्हणत मी पांढरं गुलाब आणि ग्रिटींग तिच्या हातावर ठेवलं ...

तिने डोळे उघडले , तिचा चेहरा खुलून आला ती काहीतरी बोलणार इतक्यात मला थंड पाणी ओतून चिंब भिजल्याचं जाणवलं अन सोबत हसण्याचा आवाज ऐकू आला पण कुणी दिसलं नाही ... आजूबाजूला पाहतो तर चार भिंती , बाजूला गादीवर कुणीतरी झोपलेलं ... मी स्वप्नातून परत आलो आणि मला जाणीव झाली की मी बाहेरगावी आहे आज काहीही करून गावी परत जायचं आहे पण माझं नशीब खोटं त्याला मी तरी काय करणार ....

मी घरच्यांना हट्ट करून थकलो पण नातेवाईकांनी एका वाक्यात सारं संपवलं ... " बाळा , तसं काही आईचं इकडे येणं होत नाही मग आता लग्नाच्या निमित्याने आले आहात तर दोन तीन दिवस राहा .."

मी मात्र पश्चाताप केल्याशिवाय काहीही करू शकलो नव्हतो ... राहून राहून मला वाटतं होतं का मी सोबत लग्नाला आलो ? का ? का मी घरीच थांबलो नाही ? घरी एकटा राहिलो असतो तर बरं झालं असतं ... किती उठाठेव केली होती सारं काही मातीत गेलं होतं . याचं मला दिवस बुडाला , रात्र होऊन सकाळ उगवली तरी वाईट वाटत होतं ... आजही वाटतं ...!

नातेवाईकांची मर्जी ठेवून आम्ही दोन तीन दिवसांनी गावी परतलो ... घरी येताच मी ग्रिटींग कार्ड घेऊन सरळ कबीरजवळ गेलो होतो ... त्याला पाठ टेकवून बसलो होतो , कार्ड हाती घेऊन एकटक पाहत होतो अन डोळ्यात आसवं आले , पापण्या ओल्या झाल्या , पापण्यांचे बांध मोडून आसू गालावरून खाली उतरले , काहि त्या कार्डवर पडले होते ... ज्या दिवसाची मी किती वाट पाहिली होती तो दिवस , तो क्षण मी गमावून बसलो होतो ... नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आधी जसं कार्ड बनवलं होतं पण एक आठवण म्हणून तसेच ठेवून द्यावं लागलं होतं , या कार्डच्या नशिबात तेच होत , माझ्याबाबतीत हि असंच काहीसं !

तिने डायरी तशीच धरून नजर बाजूला सारली ... पुन्हा नव्याने विचारचक्र सुरु झालं ... विचार जणू लाटा पायांवर पाठोपाठ याव्यात तसे मनात येत होते ... खरंच कुमार तुला समजणं सोप्प नव्हतं , नाही ... तू मनात काय काय लपवून ठेवलं ते आज कळत आहे . ते हि एका दुर्दैवी कारणाने , दुःखद घटनेने , तुझ्या अचानक झालेल्या अपघातामुळे , सुजीतच्या हातून नकळत चूक झाल्याने ... हेच आहे का मग नशीब ? नशीब ... जे काय लोक म्हणतात , नशिबात जे आहे ते वेळ आली की घडतं .... कि नियतीचा हा नवीन खेळ आहे ? ज्याची कुणाला काहीएक कल्पना नाही ... यामागे काय संकेत असावा ? काय हेतू असावा ? कुणास ठाऊक ..?

शेवटी नशीब कुणास ठाऊक होतं ? कुणास ठाऊक आहे ? कुणास ठाऊक असेल ...? ? ?

तेच ते प्रश्न मनात पुन्हा पुन्हा येऊ लागले , ती नकळत मनात येणाऱ्या प्रश्नांना आहारी जाऊन तिला जरावेळ वास्तवाचं भान राहील नाही ... कुमार अन त्याची डायरी तिला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले अस तिला वाटलं ... विचार करत असता तिने कधी डायरी बंद केली तिला कळलं नाही , एका हातात ती डायरी ... दुसरा हात आडवा करून मस्तकावर ठेवलेला ... नजर गरगर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांवर रोखलेली ती , विचारांत बुडून गेली ...

कधी कधी असंच होतं ... नाही ? मन शांत असले की अचानक एखाद्या गोष्टीचा विचार करत , कुण्या प्रश्नाचा पाठलाग करत आपण वेळेचं भान हरपून जातो ... आपल्याला आजूबाजूच्या वास्तविकतेचा विसर पडतो आणि मन जुन्या आठवणीत रमत तर कधी विचलित होतं ....

इतक्यात दार उघडलं अन तिची समाधी भंग पावली ... ती आठवणींच्या देशातून परतली , समोर तो जांभई देत आत येताना तिला दिसला .. पटकन कूस बदलायचं दाखवून तिने डायरी उशीखाली ठेवली , डोळे मिटले ... तो बिछान्यावर पहुडला ... रात्रीचे अकरा वाजलेले , दिवसभर कामात व्यस्त अन बराच वेळ जागा राहिल्याने त्याला लगेच झोप लागली ...

तसं पाहिलं तर झोपेची काही ठराविक वेळ नाही ... हा रोजच्या सवयीचा भाग आहे ... नाहीतर मनात विचारांची गर्दी झाली , न उलगडणारे प्रश्न पाठोपाठ डोक्यात आले तर रात्र संपते पण झोप उडाली असते ... रात्रभर मनात सुरु झालेले विचारयुद्ध सकाळ झाली तरी सुरूच असते तर कधी कधी आयुष्यभर सुध्दा ...!