MAZYA LOVEMARRIAGECHI GOAGHT - 9 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 9

सुंदर फुलाशी गप्पा

तो अर्धा तास स्वप्नात रंगल्यासारखा होता.

झाडांना पाणी घालता घालता गप्पा.. वै आणि मी. आमच्या गप्पा कशाबद्दल व्हाव्यात? आम्ही काहीबाही बोलत होतो.. पण त्यात तिला माझा वेंधळेपणाच जास्त दिसावा असे माझे बोलणे असावे असे माझे मलाच वाटत होते. पण मन ही मन में लड्डू फुटण्याचा आवाज येत असताना मी अजून करणार तरी काय होतो?

उगाच विषय काढायचा म्हणून म्हणालो मी, "काय म्हणाले काल स्वामी?"

"ओह! स्वामी! ही लुक्ड लाईक अ डिव्हाईन सोल. म्हंजे माला आवडला स्वामी अँड आश्रम. तशी माझा फेथ नाही स्वामी आणि बाबाजीवर. बट इट वाॅज नाईस टू बी विथ दिनकर."

ही युएस मधली पद्धत. कितीही मोठा असला तरी माणसाला नावाने डायरेक्ट हाक मारतात हे लोक.

"यू नो ही टोल्ड मी सो मेनी स्टोरीज .. बाबाजीस स्टोरीज. त्यांचा अन्भव कसा होता सिन्स सो मेनी इयर्स. मी आइकली सगळं. मला सगळं नाही ॲग्री. बट इट्स ओके."

आमच्या गप्पा या विरक्त आध्यात्मिक स्वामीबद्दल होणार की काय? प्रिचिंग्स अँड टिचिंग्स आॅफ द ग्रेट जगद्गुरू जगदाळे? काही असो, ती बोलत होती आणि संभाषणाला दुसरे वळण द्यावे यासाठी मला काहीच सुचत नव्हते. मी श्रोत्याचे काम करण्याचे ठरवले. खरेतर हे ही किती आणि कसे धोकादायक होते हे मला नंतर समजले. पण समोर स्वप्नवत सारे सुरू असताना मला बोलायला सुचावे हे कठीणच नव्हते का?

"तू काय नाही आला काल. इट वुड हॅव बीन नाइस."

ती बोलली हे आणि माझ्या छातीतली धडधड तिला ऐकू जाते की काय असे वाटायला लागले मला.

"तसं नाही गं. बट आय डोण्ट बिलिव्ह इन आॅल धिस.." मी उगाच बचाव केला. खरी गोष्ट मलाच ठाऊक होती. कालचे ते लगेच शब्द मागे घेता आले असते तेव्हा तर मी तिच्याबरोबर त्या स्वामींच्या आश्रमात दोन तास काय दोन दिवस ही जायला तयार होतो.

"मोडक, आय लाइक इट हियर. माला इक्डे खूप खूप आवड्ते. इक्डे म्हंजे इंड्यात. तुला?"

यावर मी काय बोलणार? मला ती जिथे तिथे आवडेल.. अगदी आफ्रिकेतल्या नामिबियात की चाड नामक देशात का असेना! पण हे काही मी बोललो नाही. म्हणालो, "आॅफकोर्स. आय लाईक इट हियर."

"पन तू माला काल अव्हाॅइड करून का पळाला ते नाही सांगलं माला."

"मी? व्हेन?"

"व्हेन? इव्हिनिंग .."

"ते..? ओह! म्हणजे दॅट वाॅज इन व्हेन..!"

मनातल्या मनात शेवटचा भाग म्हटला मी.. म्हणजे तिने त्या लुंगीत म्हणजे पाहिलेच मला. आता मीच तिला पाहिले नाही सांगावे का? तिच्यासारख्या सुंदरीस न पाहता मी निघून जाण्याइतका अरसिक तर नाही वाटणार तिला? किंवा खरे सांगून टाकू? खरे हेच की ती मला आवडली, अगदी ॲट फर्स्ट साईट. तिला मी त्या अवतारात नि चौकडीच्या लुंगीत कसा आवडणार होतो? हे तिला सांगावे तर कसे?

"नथिंग वैदेही. अगं मी जस्ट झोपेतून उठून आलेलो. सो जरा झोपेत होतो ना.."

मी संपूर्ण सत्यही नाही नि असत्यही असे काही नरो वा कुंजरोवा पद्धतीने सांगितले तिला. त्यावर ती पुढे काहीच न बोलता म्हणाली,

"सो, व्हाॅट्स फाॅर पी.जी?"

हे सोपे होते. मेडिकल नि काॅलेजच्या गप्पा तशा सोप्या मारायला!

"ओह! आय लाइक नाॅन क्लिनिकल ब्रांचेस. पॅथाॅलाॅजी. तू?"

"आय डीड रेडिओलाॅजी. जस्ट ओव्हर. माला पण क्लिनिकल ब्रांच नाय आवडत."

"पण यू नो विथ सो मच इंटरव्हेंन्शन्स, रेडिओलाॅजी नाऊ इज लाइक अ क्लिनिकल ब्रांच!" मी मध्येच इंटरव्हेन्शन करत म्हणालो.

"ट्रू. बट आय लाइक इट.."

"छान. मग पुढे काय प्लॅन्स?"

"पुढे? फ्युचर? हू नोज!" ती नोज म्हणजे नाक उडवत म्हणाली.

तिला इंडियन ग्रूमबद्दल विचारायची खरेतर योग्य वेळ होती ही.. मनातल्या मनात तिला मी विचारले ही, तुझी मैत्रीण सांगत होती तुला इंडियन नवरा हवा आहे म्हणून .. आणि तेही इथे राहणारा. एकदा मला ही चान्स देऊन बघ की! शेवटचा भाग मनातल्या मनात बोलणेही अजागळपणाचे होते हे खरे. पण त्याला काय इलाज होता?

तितक्यात तीच म्हणाली,

"इट्स सो नाइस हिअर. सगळं मोक्ळं मोक्ळं. सो मेनी पीपल अराउंड. माला हे आवडेल.."

"सो.. वेलकम.. टू इंडिया! अँड वुई इंडियन्स वुड बी हॅपी टू हॅव इट हिअर..!"

वाक्यात 'वुई इंडियन' च्या ऐवजी 'आय वुड बी हॅपी' म्हटले तर काय बिघडणार होते? आणि 'हिअर' च्या ऐवजी 'माय हाऊस'? पण नको तेव्हा माझी जीभ अडखळते. चिकटून बसावी तशी हलत नाही अजिबात, बोलायचे राहून जाते. एका स्पेसिफिक विधानाला असे जनरल विधान बनवत संधी वाया घालवणे कुणी माझ्याकडून शिकावे.

हे सारे होत असताना मी बागेतल्या फुलांकडे पाहात होतो. समोर फुललेला गुलाबांचा ताटवा, बाजूला पांढरा शुभ्र मोगरा नि सोनटक्का.. या सगळ्यांत जास्त सुंदर कोण? फुलं की वै? मी ठरवत होतो बघत बघत. आणि खरे फूल कुठले? ती की बागेतली फुले? हे मी तिला सांगू शकलो असतो का? खरेतर कधी सांगू शकेन? कितीतरी वेळ असा गेला.. पण काही क्षणच गेल्यासारखे वाटत होते. हे असेच सुरू रहावे असे वाटत होते.. त्यात वै म्हणाली,

"ओह! विल हॅव टू गो डियर.. आई वाट बगते .. विल सी यू अगेन. म्हंजे पुना भेटू. बाय" बाय म्हणून ती निघून गेली.

संध्याकाळी आम्ही असे बागेत फिरत होतो आणि आई वरून खिडकीतून पाहात होती.. याचा मला पत्ता देखील नव्हता..


Share

NEW REALESED