Aani Tichyatlya Aaicha Janm Zala books and stories free download online pdf in Marathi

आणि तिच्यातल्या आईचा जन्म झाला ?

विदुला आज सकाळी लवकरच उठली. चटकन आवरून तिने आॅफिस गाठले. तिच्या अत्यंत महत्वाच्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनचं आज सादरीकरण होतं तेही कंपनीच्या सीईओंच्या उपस्थितीत. तिने खूप मेहनत घेतली होती या प्रोजेक्टसाठी. विदुलाने सर्व तयारी केली. थोड्याच वेळात संपूर्ण टीम सीईओंसह मिटींग रूममध्ये दाखल झाली.

विदुला थोडी नर्व्हस होती पण कालच आरूषने तीला धीर दिला होता आणि तो तीला हे ही म्हणाला होता की, "मला खात्री आहे तुझं प्रेझेंटेशन एकदम बढिया होणार. आणि तू बाॅसकडून कौतुकाची थापही मिळवणार."

हे आठवताच एक आगळाच आत्मविश्वास तिच्या डोळ्यांमध्ये तरळू लागला आणि विदुलाने प्रेझेंटेशनला सुरूवात केली. एक तास अव्याहत ती बोलत होती आणि मिटींग रूममधील सर्व मंडळी लक्षपूर्वक तीला ऐकत होती. प्रेझेंटेशन संपल्यानंतर तीने सर्व प्रश्नांची आत्मविश्वासपूर्वक उत्तरेही दिली. बाॅस अर्थातच खूप खूश झाले कारण विदुलाने सादरीकरणंच तसं केलं होतं. तिचं खूप कौतुक केलं संपूर्ण टीमने. त्या आवेशातच तिने दिवसभर मन लावून आॅफिसचं काम केलं.

आता वेळ होती घरी जाण्याची जी विदुलाला कधीच आवडत नव्हती. कारण होतं तिच्या सासूबाई - जानकीबीई. विदुला लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. वर्गात सतत पहिल्या-दुसर्या क्रमांकावर असायची परिक्षेत. तिचे आई-बाबा सतत तिला प्रोत्साहन देत त्यामुळे तीचा स्वभाव महत्वाकांक्षी होत गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला चांगल्या कंपनीमध्ये उत्तम पगाराची नोकरीही मिळाली आणि मग आरूष तिच्या आयुष्यात आला. दोघही एकमेकांच्या प्रेमात पडली आणि काही महिन्यांतच दोघांच्या घरच्यांच्या संमतीने विवाह पण पार पडला.

त्यांचा संसार सुखाचा होईल असंच सर्व काही होतं कारण आरूष खूप समजदार, कर्तबगार आणि प्रेमळ होता. विदुलावर खूप जीव त्याचा. पण विदुलाला आपल्या संसारा मध्ये *'सासूबाई*' नावाचा *पण* नको होता. का कोण जाने पण तिच्या मनात सासूबाई म्हणजे व्हिलन ही प्रतिमा अगदी अधोरेखित झाली होती.

तशा जानकीबीई खूप प्रेमळ होत्या स्वभावाने. त्यांना मुलगी नव्हती पण मुलीची भारी हौस म्हणूनच की काय सुनेची लग्नात आणि नंतरही खूप हौस पूरवली त्यांनी. आरूषचं आणि त्यांचं एकमेकांवर अगदी कृष्ण-यशोदेसारखं प्रेम. पण विदुलाला त्या अजिबातच आवडत नव्हत्या. आरूष आपल्या आईवर खूप प्रेम करतो हे तीला माहित होतं पण तरीही ती सतत त्याचा आपण वेगळं राहू म्हणून पिच्छा करायची पण आरूष फक्त नाहीच म्हणायचा आणि विषय संपवायचा.

खरं तर विदुलाकडे काही विशेष कारणही नव्हतं वेगळं राहण्याचं कारण जानकीबीई तीला अगदी लेकी सारख्या जीव लावायच्या, तीचा आॅफिसचा डब्बा करून देण्यापासून तिच्या आवडीचे पदार्थ बनवण्यापर्यंत सर्वच त्या करायच्या. पण विदुलाच्या मनात त्या जागा निर्माण करू शकल्या नाहीत.

विदुला त्यांना सतत हिणवायची याचं वाईट वाटायचं पण त्या कधी व्यक्त झाल्या नाही यावर. हे सर्व आरुषला कळत होतं.

विदुला आॅफिसमधून घरी येताना डाॅ. राणेंच्या क्लिनीकमध्ये रिपोर्ट घेण्यासाठी गेली होती. तिला दोन दिवसांपूर्वी गरगरत होतं आणि उलटी आल्यासारखे वाटत होतं म्हणून तिने काही तपासण्या करवून घेतल्या. डाॅ. राणेंनी रिपोर्ट पाहून तीचं अभिनंदन केलं कारण विदुला मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी होती. विदुलाचा आनंद गगनात मावेना तिने लगेच आरुषला आणि तिच्या आईला ही गोड बातमी कळवली.

आरूष खूप आनंदात होता. पण रात्री पून्हा विदुलाने वेगळं राहण्याचा विषय काढलाच. तिला आपल्या बाळावर जानकीबाईंची सावलीही नव्हती पडू द्यायची कारण तिला वाटू लागलं होतं जसा आरूष आई आई करता थकत नाही तसंच आपलं बाळही आजीच्या आहारी गेलं तर.... यावेळी आरूषने चक्क वेगळं राहण्यासाठी विदुलाला होकार देऊन टाकला. तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला अगदी.

आरूषने दोन दिवसात फ्लॅट पाहून नक्की केला आणि आठवड्याभरात हे जोडपं तिकडे राहायलाही गेलं. इकडे जानकीबीई अस्वस्थ होत्या की आरूषने असा निर्णय कसा घेतला?.. का माया पातळ झाली त्याची?... पण तरीही त्या शांत होत्या कारण मनोमन त्यांना त्यांच्या प्रेमावर विश्वास होता. त्यातही त्यांना विदुलाची काळजी लागून राहिली कारण ती प्रथमच आई होणार होती.

दिवसागणिक विदुला आई होण्याच्या सुखद अनुभूतीचा अनुभव घेत होती. आॅफिस घर आणि जवळ येत असलेली प्रेगनेंसी या सर्व आघाड्या पेलताना तीची दमछाक होत होती पण ती तरीही आनंदी होती.

एक घट्ट अतूट नातं तिच्या आणि तिच्या बाळामध्ये त्याच्या जन्माच्या आधीच तयार झालं होतं. तिच्या आईने तिचं डोहाळे जेवणही अगदी थाटामाटात केलं. जानकीबाईही आल्या होत्या तिकडे. तेवढच काय ते त्यानी आपल्या सूनेला डोळे भरून पाहिलं आणि आपल्या नातवाची चाहूल अनुभवली.

अखेर तो हर्षाेल्हासित करणारा क्षण आला आणि विदुला एका गोंडस बाळाची आई झाली. सोसलेल्या सर्व यातना ती अगदी विसरली आणि ती आणि आरूष त्या बाळाकडे एकटक पाहू लागले. बाळाला उराशी कवटाळून विदुला वदली, "माझं बाळ मी याला सोडून कधीच राहू शकणार नाही". तिचे ते शब्द ऐकताच आरूष म्हणाला, "अगं जरी हा मुलगा असला तरीही तो आपल्याला सोडून जाणारच". मी नाही का माझ्या आईला सोडून आलो. तसाच हा सुद्धा तूला सोडून जाईल बघ एक दिवस... "

आरूष चे ते शब्द ऐकले आणि विदुला कळवळून रडू लागली... तिला तीची चूक नव्हे अपराधच उमगला होता. ती आरूषकडे बघूही शकत नव्हती इतकी तीला स्वत:चीच लाज वाटत होती.

ती आरूष ला म्हणाली मला आईंची माफी मागायची आहे. मायलेकराची ताटातूट करण्याचा जो जगन्न अपराध मी केला आहे त्याचं प्रायश्चित्त ही मला करायचं आहे. हे ऐकताच दारात उभ्या असलेल्या जानकीबाई रडता रडता हसू लागल्या आणि त्यांनी आपल्या सुनेच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. *विदुलातल्या आईचा खर्या अर्थाने आज जन्म झाला होता कारण तीला आईपण म्हणजे काय हे कळून चुकलं होतं.*

आरूष गालात हसत होता कारण त्याने काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या कठोर निर्णयाचं जे फलित त्याला हवं होतं ते त्याला आता मिळालं होतं....

विद्या कुलकर्णी- उन्हाळे