Shwas Tu books and stories free download online pdf in Marathi

श्वास तू

सकाळी सहाच्या ठोक्याला उशाशी ठेवलेल्या घड्याळात अलार्म वाजला व तिने लगेचच आपले डोळे उघडले. जणू काही ती केव्हांची जागीच होती व डोळे बंद करून अलार्म वाजण्याची च वाट पाहत होती. तिने लगेचच आपल्या अंगावरील चादर बाजूला केली व अंथरुणात उठून बसली. उठून बसल्यावर तिने आपल्या शेजारच्या रिकाम्या जागेत व कुशीवर हळुवार हात फिरवला व स्वतःशीच हसली पण लगेचच उठून तिने आवरायला घेतलं.

उठून तिने तिच्या चादरीची घडी घातली व व्यवस्थित जागेवर ठेवून दिली. आंघोळ करून झाल्यावर तिने गॅलरीतील तिच्या आवडत्या मोगऱ्याच्या झाडाला पाणी घातले. किचन मध्ये जाऊन तिने स्वतःसाठी मस्तपैकी चहा ठेवला व सवयीप्रमाणे दोन कप घेतले व त्यात चहा गाळला. नंतर तिची चूक तिला लक्षात आल्यावर तिने दुसरा कप रिकामा करून बेसिन मध्ये ठेवला व तिच्या साठीचा चहाचा कप घेऊन ती हॉलमध्ये येऊन बसली. चहा घेता घेता तिची नजर टेबलावर ठेवलेल्या त्याच्या फोटोकडे गेली. तिने चहाचा कप खाली ठेवला व त्याचा फोटो घेतला त्याच्या फोटोवरुन आपला हात फिरवत ती बोलली,

"किती दिवस झाले मी एकटीच सकाळचा चहा घेते आहे.... कधी येणार आहेस तू?.... सकाळी माझी आंघोळ झाल्यावर मोगर्‍याला पाणी घालून येत नाही तर तू आपल्या दोघांसाठी मस्त गरमागरम चहा घेऊन टेबलावर माझी वाट पाहत बसायचा आणि नेहमी चहा पावडर जास्त असलेला कडू चहा ही तुझ्यासोबत घेताना गोड लागायचा... सकाळच्या एवढ्या घाईत तुझ्यासोबत चहा घेताना घालवलेले पाच दहा मिनिटे ही खूप वाटायचे..."

एवढं बोलून ती फोटो कडे बघून आपलं नाक मुरडते व पुढे बोलते,

"तू ना आता खूप हट्टी झाला आहेस...जा मी ही एकटीच चहा घेणार. तुझा तू करून घे आता..... मला खूप काम आहेत अजून. आज जरा लवकरच जायचं आहे ऑफिसला." असं बोलून ती हातातला त्याचा फोटो परत टेबलावर व्यवस्थित ठेवते व एवढ्या वेळात गार झालेला चहा संपवते.

किचन मध्ये जाऊन ती टिफिन साठी भाजी पोळी बनवते. भाजी पोळी बनवताना तिच्याकडून दोन पोळ्या जास्ती च केल्या जातात. किचनमध्ये बाकीचं काम आवरत असताना ती एकदा घड्याळ बघते,

"अरे देवा आज उशीर होणार बहुतेक. आता नाश्त्याला पटकन थोडेसे पोहोच बनवते."

असं म्हणून लगेच कांदा टमाटा चिरायला घेते व पटकन पोहे बनवते. पटकन टिफीन भरते व प्लेट मध्ये पोहे घेऊन ती बाहेर येते. टिफीन व पोह्यांची प्लेट टेबलावर ठेऊन ती रूममध्ये तयार व्हायला जाते. आरश्यात पाहून ती तयार होत असते. केस विचरताना ती परत एकदा त्याच्या विचारात हरवून जाते.

केस विचरून आपण वेणी घातली की तो हटकून आपल्या जवळ येणार व आपण किती ही नको म्हणत असताना वेणी सोडणार व केस मोकळे ठेवण्याचा हट्ट करणार. आपण नाही म्हटल्यावर मग रूसून बसणार. त्याचा असा उतरलेला चेहरा बघितल्यावर मग हळूच ती त्याच्यासाठी केसांना फक्त एक क्लचर लावून केस मोकळे ठेवत. ही आठवण येताच ती गालात हसते व घातलेली वेणी सोडून केस मोकळे ठेवते. व पटकन बाहेर येते. मग घाईतच पटपट पोहे संपवते व ऑफिसला पळते.

ऑफिसला गेल्यावर ती आपल्या कामात गढून जाते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ती नकळतच मोबाईल वर त्याला जेवण करून घे म्हणून मेसेज करते व जेवायला बसते. घड्याळाचे काटे पुढे सरकतात. संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर ती घाईत च लागणार थोड सामान घेते व घरी येते. तो आता थोड्यावेळात येईल तर तो आल्यावर त्याला गरमागरम जेवण भेटावं या हिशोबाने ती स्वयंपाक करते. स्वयंपाक झाल्यावर ती फ्रेश होऊन त्याची वाट बघत बसते. मध्येच तिच्या आईचा तिला फोन येतो. आई सोबत फोनवर बोलून ती परत त्याची वाट बघत बसते. रात्रीचे नऊ वाजतात पण तरी त्याचा काही पत्ता नसतो. नऊ चे दहा होतात तरी तो येत नाही. तिच्याही पोटात भुकेने कावळे ओरडायला लागतात. तिला त्याचा खूप राग येतो. शेवटी ती कसेबसे दोन चार घास जेवण करते व सर्व आवरते व झोपण्यासाठी रूममध्ये जाते. रूममध्ये त्यांच्या लग्नाचा फोटो बेडच्या बाजूला ठेवलेला असतो. तो फोटो ती हातात घेते.

"असा कसा रे तू.... अजून किती वाट बघायची?... ते सर्व जण सुद्धा बोलत होते की तू परत येणार नाहीये म्हणून पण तू माझ्या पासून लांब जाऊन राहू शकशील का?.... नाही ना... मग मी तरी का राहू तुझ्याशिवाय?..... ऑफिसला जातोय असं सांगून जो गेलास तो परत आलाच नाहीस. तूला असही वाटलं नाही की मी तूझी वाट पाहत असेल. मला सोबत घेतल्याशिवाय कुठेही न जाणारा तू एवढ्या लांबच्या प्रवासाला एकटाच निघून गेलास. ... पण मी तूला जाऊ देणार नाही.. कधीच नाही.... तूला मी माझ्या श्वासात जीवंत ठेवेल... जोपर्यंत माझे श्वास मला साथ देताय तोपर्यंत....." आणि नकळत तिच्या डोळ्यांतून एक अश्रूचा थेंब ओघळून गालावर येतो. रात्री बऱ्याच उशीरा तिला झोप लागते.

सकाळी परत सहाच्या ठोक्याला अलार्म वाजतो. परत एक नवा दिवस त्याच आठवणी घेऊन येतो.

समाप्त