gavachi athavn books and stories free download online pdf in Marathi

गावाची आठवण


वीस-पंचवीस वर्षानंतर आज शेखरला गावाकडे जाण्याचा योग आला. कारण ही तसेच होते. त्याचा जीवाचा जिवलग मित्र राजेशच्या मुलीचं लग्न होतं. राजेश आणि शेखर लहानपणापासून एकाच वर्गात शिकलेले. घराच्या बाजूला त्याचे घर. एकत्र खेळायचे, जेवायचे आणि एकत्रच राहायचे. त्यांच्या दोघांची मैत्री संपूर्ण गावाला माहीत होतं. वीस दिवसांपूर्वी राजेश स्वतः पत्रिका घेऊन शेखरच्या घरी गेला होता. लग्नाला सहकुटुंब सहपरिवार येण्याचं आमंत्रण देऊन गेला. म्हणून तो आपल्या परिवारासह गावाकडे जाण्यास भल्या पहाटे आपली गाडी घेऊन निघाला. गाडी ज्या वेगात जात होती त्याच वेगात त्याचं मन देखील गावात जाऊन पोहोचलं होतं. लहानपणी असलेलं गाव आज तसंच असेल काय ? काय काय बदल झाला असेल या विचारांच्या तंद्रीत तो गाडी चालवू लागला. शेखरची मुलं देखील गावी जायला मिळतंय म्हणून आनंदी होती. आजूबाजूला पळणारी झाडे आणि गावं पाहून शेखरचा लहान मुलगा आनंदाने टाळ्या वाजवत होता. गावात आता शेखरचं काही शिल्लक राहिलं नव्हतं. आई-बाबा देवाघरी गेल्यानंतर तो घर आणि शेत विकून दूर शहरात राहायला गेला होता. त्यामुळे त्याचं आणि गावाचं नाळ पूर्णपणे तुटला होता. मात्र राजेशच्या आमंत्रणामुळे आज गावी जाण्याचा योग आला. चार तासाच्या प्रवासानंतर तो गावी पोहोचला. त्याची गाडी येतांना पाहून राजेशला देखील खूप आनंद झाला. हातपाय धुवून फ्रेश झाल्यावर चहापाणी घेतलं आणि शेखर गावात फेरफटका मारावं म्हणून बाहेर पडला.
लहानपणी ज्या गावात ज्या ठिकाणी खूप दंगा मस्ती, लंपडाव, क्रिकेट असे खेळ खेळायचा त्या जागा आज लुप्त झाल्या होत्या. शाळेचे मैदान बंदिस्त झाले होते. गावातील खुले मैदान म्हणजे शाळेचे मैदान पण आज शाळा सुरू असेल तरच शाळेत प्रवेश करता येतो कारण चहूबाजूनी शाळेला बंदीस्त केले होते. शाळा पहिल्यासारखी राहिली नव्हती. दोनच खोल्याची शाळा आज सात-आठ खोल्यांची झाली होती. विविध प्रकारच्या चित्रांनी बोलकी झाली होती. सुट्टीच्या दिवशी शांत वाटणारी शाळा इतर दिवशी मुलांच्या आवाजाने गलबलून जायची. हा बदल झाला असला तरी शेखरला ती शाळा पाहून खूप आनंद झाला. शाळेच्या काही अंतरावर एक मोठे चिंचेचे झाड होते. त्याठिकाणी एकट्याला जाणे तेंव्हा खूप भीतीदायक वाटायचे. मुलं एकटे तिकडे कधीच जायचे नाहीत. चिंचा पाडायला दोघे तिघे मिळून जायचे. तसा शेखरचा नेम मात्र लय भारी. ज्याच्यावर नेम धरला ते बरोबर खाली पाडायचा. थोडेफार चिंचा घेऊन गुपचूप शाळेत येऊन बसायचे. गुपचूप अधून मधून चिंचा खात बसायचे. आज मात्र त्या चिंचेच्या झाडाचे भय वाटत नाही. कारण ते चिंचेचे झाड गावाचे बसस्थानक बनले होते. पूर्वी त्या झाडाजवळ चिटपाखरू दिसत नव्हते. पण आज त्या झाडाखाली अनेक रिकामटेकडे माणसं दिवसभर गप्पा मारत बसलेले दिसत होते. त्याच्या आजूबाजूला काही दुकानं आणि हॉटेल चालू झाली होती. पूर्वी गावात चहा फक्त घरी प्यायला मिळत असे. इतर कोणतेच वस्तू मिळत नव्हते. पण आज तिथे वेगवेगळी दुकानं आणि हॉटेल चालू झाली होती. बरेच लोकं त्याचा आस्वाद पण घेत होती. पूर्वी गावात सकाळ दुपार आणि सायंकाळ लाल रंगाची बस धुरळा उडवत यायची. पण सध्या गावात बसच येत नाही मात्र शहरात जाण्यास भरपूर ऑटो थांबलेले असतात. लोकं आता त्याच्यानेच दाटीवाटीने प्रवास करत असतात असे तेथील लोकांनी शेखरला सांगितले. गावाच्या पश्चिमेला एक मोठा तलाव होता. त्यात नेहमी पाणी भरून असायचे, गावातील सर्वांचे कपडे धोबी लोकं त्या ठिकाणी आणून धुवायचे. संपूर्ण तलाव विविध रंगाच्या कपड्याने रंगून जायचे. पण आज या तलावात भरपूर पाणी आहे मात्र कोणीही त्याठिकाणी कपडे धुवायला येत नव्हते, त्यामुळे तलाव विविध रंगी दिसत नव्हते. लोकं आपापल्या घरी कपडे धुवून घेत आहेत म्हणून धोब्याची काम देखील कमी झाले आहे. तलावाच्या आजूबाजूला पाच सहा बोरीचे झाडं होते. त्यातील एका झाडाचे बोर खूपच गोड होते. त्याला खारका बोर असे नाव होतं. ते एका मुस्लीम व्यक्तीच्या मालकीचे होते. ती म्हातारी बाई सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या झाडाखाली बसून राहायची. पाच पैश्याला एक डबा बोर द्यायची. कधी तरी ती झाडाखाली नसताना शेखर आणि त्याचे मित्र चोरून त्या झाडाची बोर आणायचे. पण हे जर त्या म्हातारीला कळाले की, ती घरी येऊन शेखरच्या आईला सांगायची, खूप भांडायची मग काय शेखरची आणि रमेशची त्यादिवशी खिचडीच व्हायची. त्याच झाडाच्या बाजूला जांभाचे झाड होते. ते ही अगदी गोड होते. त्याचे मुलांना अप्रूप वाटायचे. शाळेत असतांना पैसे जवळ नसल्यामुळे मनात असून देखील शेखरला खायला मिळायचे नाही. हे सर्व त्याला जसेच्या तसे दिसू लागले होते. मात्र आज त्या जागेवर कोणतेच झाड शिल्लक नव्हते. सर्व झाडे तोडण्यात आली होती आणि त्याठिकाणी काही लोकांची झोपडी झाल्याचे दिसू लागले होते. खरोखरच फळांची झाडे तोडणे योग्य आहे काय ? याचा विचार करून शेखरचे मन भरून आले होते. शाळेला लागूनच एक आंब्याचे ही झाड होते. त्या झाडाचे आंबे देखील चोरून खाण्यात शेखरला खूप मजा यायची. रविवारच्या दिवशी शेखर, रमेश, गणेश हे सारे मित्र तळ्यात क्रिकेट खेळायला जायचे. दुपारी ऊन होईपर्यंत तहानभूक विसरून खेळायचे, खेळून खेळून परत घरी आल्यावर कधी कधी शिव्या भेटायचं पण क्रिकेट खेळणे त्यांनी सोडले नाही. आज त्या तलावात सर्वत्र मोठं मोठे खड्डे दिसत होते, ते मैदान कुठेच दृष्टीस पडत नव्हते. आजच्या मुलाना खेळायला जागाच नाही, आज मुलं पूर्वीचे कोणतेच खेळ खेळत नाहीत, हे पाहून शेखरला खूप दुःख वाटले. आज मुलं घरातच बसून एकतर टीव्ही पाहतात किंवा मोबाईलवर गेम खेळतात असे एका युवकाने शेखरला सांगितल्यावर तो खूप चिंतीत झाला. शाळेच्या परिसरात असे अनेक फळांचे झाडं होते तर शेखरच्या घराच्या पाठीमागे सीताफळाचे झाड होते. सीताफळाची पिवळी फुले लागल्यापासून शेखर त्याची काळजी घेत असे. दुपारच्या सुट्टीत एकदा घरी जाऊन झाडाखाली उभे राहून सर्व सीताफळ एकदा निरखून पाहत असे. डोळे उघडलेले सीताफळ तोडून घरात एखाद्या मडक्यात ठेवले जायचे. रात्रीच्या जेवणानंतर त्या सीताफळाचे सर्वामध्ये वाटणी करून खायले जायचे. शेखर रडून रडून एखादे सीताफळ मिळवित असे. मात्र ज्याने ते घर विकत घेतले त्याने ते सीताफळाचे झाड तोडले होते. त्याच्याच बाजूला एक चाफ्याचे झाड. ती पिवळी फुले पाहिली की मन मोहून जायचे. देवाला फुले पाहिजे म्हटले की शेखर झाडावर चढायचं थोडंसं झाड हलविले की खूप फुलं खाली पडायचे. देवासाठी काही फुलांचे हार केल्या जायचं तर काही फुलं तसेच खुले ठेवले जायचे. पण आज सीताफळाचे झाड नाही ना चाफ्याचे झाड. शेखरच्या घराच्या बाजूला एक विहीर होती. त्या विहिरीचे पाणी गावातील सर्व लोकं पिण्यासाठी घेऊन जात. भल्या पहाटे उठून लोकं त्या विहिरीवर गर्दी करायचे. सकाळी सकाळी बादलीचा आणि बायकांच्या बोलण्याचा आवाज कानावर पडायचं. पावसाळ्याच्या दिवसांत तर हौदातून पाणी घ्यावे तसं त्या विहिरीतून पाणी घेतल्या जायचं. ती विहीर देखील आज नामशेष झाली आहे. सकाळी सकाळी येणारा तो पोहऱ्याचा आवाज देखील लुप्त झालाय. आज सर्वांच्या घरी सार्वजनिक नळाद्वारे पाणी येत आहे. त्यामुळे पाणी भरण्याचे ही कोणाला अनुभव मिळत नाही. कष्टच कमी झाले म्हणून आज लोकांना विविध प्रकारच्या रोगांना बळी पडावे लागत आहे, असे चित्र शेखरला दिसू लागले होते. पर्यावरणाशी या लोकांनी कट्टी केली म्हणून तर गाव पूर्ण वेगळ्याच समस्यांनी त्रस्त दिसत होतं. बदल झाला नाही तर गावाकडे जाणारा रस्ता, त्यात मात्र काही बदल झाक नाही पूर्वी जसा खाचखळग्याचा होता तसाच आहे. गावात येताना शेखरला गाडी चालविताना त्याचा अनुभव आला होता. गावातले रस्ते सिंमेंटचे आणि नाल्याही सिमेंटचे बांधले गेले होते. त्यामुळे गावातून दुचाकी कोठे ही फिरविता येऊ शकत होती. अगोदर ज्या गल्ली बोळात सायकल चालविणे जिकरीचे होते. तेथे गाडी देखील चालविता येऊ शकत होती. गावातल्या अनेक जागा नामशेष झाल्या होत्या मात्र शेखरच्या मनात त्या आठवणी आज ही कायम होत्या. लग्न संपल्यावर जेवण करून राजेशचा निरोप घेतला आणि येतांना जो उत्साह होता तो उत्साह परत जातांना त्याच्या चेहऱ्यावर मुळीच नव्हता. गावाकडच्या आठवणी मनात साठवून खिन्न मनाने शहराच्या दिशेने गाडी पळवू लागला.