sahjivnatil vastav books and stories free download online pdf in English

सहजीवनातील वास्तव


“ भाईकाका, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. कधी भेटशील सांग.”
इराच्या आवाजाच्या पातळीवरून मामला काहीतरी गंभीर दिसतोय याचा अंदाज भाईकाकांना आला. तरीही आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत ते इराला म्हणाले, “ हम तो हमेशा तुम्हारे पास ही है बेटा,बोलो क्या हुकूम?”
“ हे बघ भाईकाका, मी खूप गंभीरपणे बोलतेय, माझा अजिबात चेष्टेचा मूड नाहीये. तू आज संध्याकाळी भेटशील का ते सांग म्हणजे मी येते.” इरा वैतागलेली वाटत होती.
“ हो, भेटू आपण संध्याकाळी. ये नक्की. तुझ्या बच्च्याला पण घेऊन येणार आहेस का की एकटीच येतेस?” भाईकाकांनी परत खोडी काढली.
“ चिन्मय नाव आहे त्याचे. तू नाही हं त्याला बच्च्या म्हणायचे. ते फक्त आणि फक्त आमच्यात आहे. तो नाही येणार.. म्हणजे मीच त्याला आणणार नाहीये. मी एकटीच येतेय.” इराचा पारा थोडा खाली आला होता.
“ ठीक आहे ये मग, मी वाट पाहतो.” भाईकाका.
“ आणि हो, अजून एक गोष्ट तू आई बाबांना लगेच सांगू नकोस की मी येते आहे. मला आधी तुझ्याशीच बोलायचे आहे.” ईराने बजावून सांगितले.
“ हो ग चिमणे, तू म्हणशील तसे!” असे म्हणून भाईकाकांनी फोन ठेवला.
भाई काका म्हणजे इरासाठी आई बाबांपेक्षाही खूप जवळचे होते. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींपासून अगदी लहान बाळांपर्यंत सर्व पिढ्यांशी गट्टी जमवणारे आणि वयाची साठी गाठली तरी एकटे राहून एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात आणि आनंदात जीवन जगणारे व्यक्तिमत्व! आयुष्यात खूप वाईट प्रसंग येऊन गेले. पण परिस्थितीशी हार मानणे माहितीच नाही. एकुलत्या एक मुलीचे अपघाती निधन होणे आणि त्या धक्क्याने पत्नीचे देखील हे जग सोडून जाणे असे अवघ्या सहा महिन्यांत सर्व होत्याचे नव्हते झाले. इराच्या आई वडिलांनी त्यांना आपल्या घरी राहायला बोलावले होते. पण मी माझा स्वतंत्र राहणार असा निश्चय त्यांनी केला आणि स्वतःचे सर्व विश्व उद्ध्वस्त झाले तरी इतरांचे विश्व खुलवण्यात त्यांनी आनंद शोधला.
इराचे आणि चिन्मयचे काहीतरी बिनसलेले असावे असा अंदाज भाईकाकांना आला.
संध्याकाळी इरा आली. ती खूप तणावाखाली असल्याचे जाणवत होते.
“ बोल बेटा, कशी आहेस? हा गरमागरम चहा घे आधी मग बोलू आपण.” भाईकाकांनी तिला चहा दिला.
चहा प्यायल्यावर तिने थेट विषयाला हात घातला, “काका माझे आणि चिन्मयचे खूप वाजले आहे. गेले दोन तीन दिवस आम्ही एकमेकांशी बोलत नाही आहोत. वैताग आला आहे आता.”
“ काय झाले आहे ते नीट सांग ना ” काकांनी शांतपणे विचारले.
“ तुला खरं सांगू का काका, अशी कोणतीही मोठी गोष्ट घडली नाही, पण खूप छोट्या छोट्या गोष्टींत आमचे खटके उडतात आणि वाद होतात. लग्नाआधी दोन वर्षे जे काही आमचे ट्यूनिंग होते ते आता राहिलेच नाही. अवघ्या आठ महिन्यांतच आम्ही एकमेकांना पकलो आहोत. कुठून लग्न केले असे झाले आहे.....
“ एक काम कर इरा, तू चिन्मयच्या कोणकोणत्या गोष्टींवर नाराज आहे ते आधी सांग. आपण एकेक मुद्यावर बोलू.” काकाने तिला मध्येच थांबवले.
“ काका तुला कदाचित माझ्या गोष्टी खूप किरकोळ वाटतील पण माझ्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत. हल्ली तो मला टाळतो असे वाटते. सतत आपले मोबईलमध्ये किंवा लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसणे, धड बोलणे नाही. मोबईलवर चॅटिंग करणे आणि सोशल मिडियावर इतरांच्या पोस्टला लाइक करणे जमते, पण घरात माझ्याशी बोलणेच नसते. मला तर वाटते की त्याचे माझ्यावरचे प्रेम आटले आहे. लग्नाआधी मेड फॉर ईच अदर असणारे आम्ही आता तर एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे वाटते. हाच का तो माझा चिन्मय असा मला प्रश्न पडतो. शिवाय ऑफिसमधून घरी आला की त्याचे मोठमोठ्याने गाणी लावणे, पुस्तकांचा पसारा घालणे, कपडे अस्ताव्यस्त टाकणे आणि कोणतेही नियोजन न करता वागणे असे खूप काही मला खटकत असते आणि ते आता सहन होत नाही.” इरा.
“ चिन्मय तुझ्याशी असे का वागत असेल? आठ महिन्यांत प्रेम वाढण्याऐवजी आटले असे का झाले असावे?” भाईकाकांनी इराला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
“ अरे, भाईकाका त्याचेच तर उत्तर मला हवे आहे म्हणून मी तुझ्याकडे आली आहे ना? तू मलाच कसे विचारतोस?” इराची चिडचिड सुरू झाली.
“ हे बघ बाळा, जीवनात कोणतीही समस्या आली तरी त्याचे उत्तर आपल्याकडे असते. पण आपण ते शोधायला तयार नसतो. तू मला एक गोष्ट सांग, तू चिन्मयविषयी जे काही आता बोलत आहेस ते तुला आधी माहिती होते ना? तेव्हा नाही खटकले?? मग आता अचानक असे काय झाले?” भाईकाका.
“ हो रे, हे सर्व माहिती होते आणि खटकतही होते, पण वाटले की लग्नानंतर बदलेल आपोआप सर्व किंवा मी बदलेन त्याला. पण तो बदलण्याऐवजी माझ्यापासून तुटत चालला आहे. हेच मला नकोय.” इरा.
“ म्हणजे तुला चिन्मय तर हवा आहे. पण तो तुझ्या मनाप्रमाणे वागणारा हवा असेच ना?”
“ हो, काइंड ऑफ .. कारण आमचे प्रेम आहे. प्रेमासाठी त्याने थोडे बदलायला हवे ना! माझ्या काही फार मोठ्या अपेक्षा नाही. तूच म्हणतोस ना की सहजीवन म्हटले की तडजोड आलीच. मग काय हरकत आहे त्याला माझ्यासाठी तडजोड करायला?” इरा आपल्या मुद्यावर ठाम होती.
“ इरा, एक गोष्ट विचारू? तू चिन्मयसाठी म्हणून आजवर अशी काय तडजोड केली आहेस?” काकाने थेट विचारले.
“ मी?? खूप गोष्टी केल्या आहेत. मी माझे गांव, घर, कम्फर्ट झोन आणि नोकरी सोडली त्याच्यासाठी. तुला हे माहिती आहे ना.” इरा.
“ हे सर्व तू फक्त त्याच्यासाठी केलेस की तुलाही त्याच्याबरोबर रहावेसे वाटत होते म्हणून केले?” काका.
“अं .... दोन्हीही ..” इरा गोंधळली.
“ हे बघ इरा, या सर्व गोष्टींत तू तुझ्या दृष्टिकोनातून बघतेस. तुला चिन्मय कडून काय हवे आहे याचा जसा तू विचार करतेस तसेच त्याला काय हवे आहे हे बघितलेस का? तुला छोटी वाटणारी गोष्ट त्याला महत्वाची असू शकते. संसारात जोडीदाराने माझ्यासाठी काय केले हे बघण्याआधी मी जोडीदारासाठी काय केले आणि काय करू शकते हे बघितले पाहिजे. सहजीवनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांशी सुसंवाद असणे आणि एकमेकांना समजून घेणे. संसारात Acceptance, Adjustment आणि Appreciation असे तीन A जमून आले की सहजीवन कसे A वन होते. ह्या तीन गोष्टी तू आधी अंमलात आण मग बाकी तुला हवे तसे घडेलच. म्हणजे सर्वप्रथम आपला जोडीदार आपल्याला कसा हवा आहे यापेक्षा तो कसा आहे ते आधी आपण स्वीकारले की सहजीवनाची पहिली पायरी यशस्वीपणे ओलांडली असे समजावे. त्यानंतर त्याच्यात बदल करण्यात ऊर्जा घालवण्यापेक्षा आपण त्याच्याशी कसे जुळवून घेऊ शकतो किंवा कसे स्वतःला अॅडजस्ट करू शकतो ही झाली दुसरी पायरी. तिसरी महत्वाची पायरी म्हणजे आपल्या जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींवर फोकस करून त्याची प्रसंशा करणे जमले की सहजीवन आपोआप फुलत जाते.” भाईकाकांनी इराला समजावले.
“ बाप रे, म्हणजे काका आपण आपल्या मनाप्रमाणे जगायचेच नाही का? सहजीवन एवढे विचारपूर्वक जगायला गेलो तर त्यातली गंमत निघून जाईल.” इराने नाराजी दाखवली.
“ तुला खरं सांगू का इरा, सहजीवनात गंमत येण्यासाठीच हे सर्व करायचे आहे. गंमत म्हणजे फक्त तू त्याला बच्चा म्हणणे त्याने तुला बेबो म्हणणे किंवा चित्रपटात दाखवतात तसे, ‘हम और तुम एक है, ये दो शरीर है मगर आत्मा एक है किंवा हम एक दुसरे मे समा गये’ असे काहीही वास्तविक जीवनात नसते. सहजीवन हे रेल्वेच्या दोन रुळांप्रमाणे असते. दोन स्वतंत्र जीव रेल्वेच्या रुळांप्रमाणे समांतर रेषेत असतात. ह्या दोन जीवरूपी रुळांवर संसाराची गाडी धावत असते. दोन रूळ जसे कधी एकमेकांत मिसळत नाहीत, पण कायम एकमेकांसोबत असतात तसेच सहजीवन असते. त्यामुळे जरी तुम्ही जन्मोजन्मी एकत्र रहाण्याच्या आणाभाका घेतल्या असतील तरी तुम्ही दोन स्वतंत्र व्यक्ती आहात याचा विसर न पडू देता एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. कळाले का चिमणे?” असे म्हणत भाइकाकांनी इराच्या डोक्यात टपली मारली.
“ भाईकाका तू खरंच ग्रेट आहेस. प्रत्येक गोष्टींवर तुझ्याकडे उपाय असतोच. आता हे सर्व चिन्मयला सांगावे लागेल म्हणजे त्याच्या डोक्यातही प्रकाश पडेल.” इरा.
“ हे सर्व मी तुला अंमलात आणण्यासाठी सांगितले ग.. तुझ्या त्या लाडक्या बच्च्याला माझ्याकडे पाठव, मी सांगतो त्याला काय ते आणि घरी नजरेसमोर येतील अशा ठिकाणी या ओळी लिहून ठेव,
‘सहजीवन म्हणजे एकमेकांचा आदर करणे
प्रेमाच्या खतपाण्याने संसाराचे रोपटे फुलवणे
सहजीवनात नसतो हिशोब त्याग-तडजोडीचा
असतो अट्टाहास एकमेकांसाठी काही करण्याचा’
“वा काका!!! मस्तच! मन अगदी हलकं झाले बघ. आता माझ्या बच्चालाही उद्या तुझ्याकडे पाठवते.” असे म्हणत एका वेगळ्याच उत्साहात इरा आपल्या घरी जायला निघाली.