Saubhagyavati - 16 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 16

१६) सौभाग्य व ती !
सकाळी पुरते फटफटलेही नव्हते तरीही विठाबाईने लगबगीने वाड्यात प्रवेश केला. रात्री सदाचे आणि नयनचे भांडण सुरू असताना सदाने तिला वाड्याबाहेर काढल्यापासून तिचे चित्त
थाऱ्यावर नव्हते. रात्रभर झोपही लागली नव्हती. एखादेवेळी थोडी डुलकी लागली न लागली की तिला खडबडून जाग येत होती.
'काय झाल असेल? मालकाने लई मारल असल का? काही इपरित तर बघायला मिळणार नाही ना?' अशा विचारा विचारात तिने वाड्यात प्रवेश केला आणि चुलीपुढे बसलेली नयन पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने विचारले,
"तायसाब, समद ठीक हाय ना?"
"तुला काय वाटल, माझा पत्ता कट झाला?"
"पत्ता कट होवो दुश्मनाचा! रातभर उगाच रूखरूख लागली व्हती. रातभर झोप बी लागली न्हाय."
"विठा, हे रोजचे मरण नको वाटते. मीच येथून तोंड काळे करते..."
"न्हाय. आस्सा ईच्चार बी मनात आणू नका."
"विठा, बुडत्याला काडीचा आधार असल्याप्रमाणे मला माणसांचा नसला तरी शिक्षणाचा टेकू आहे. देवाने तेव्हा भाऊंना कशी बुद्धी दिली हे त्यालाच ठाऊक परंतु त्या काळातही मला शिकायला मिळाले. त्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहू शकते."
"तायसाब, तुमी मोप उभं राहसाल पर ह्यो समाज तुमचे तेच पाय उचलाया मांघ फुडं फाणार नाही." "मग मी तरी काय करू? रोज माझ्यी छातीवर होणारा धुडगूस पाहू? किती स्वप्ने होती लग्नाआधी. अग, चुकून कधी दारात उभी राहिले तर ... रस्त्याने एकमेकाच्या हातात हात घालून पोपटाप्रमाणे गुलूगुलू बोलत जाणारी जोडपी पाहिली, की वाटते आपण कशामध्ये कमी आहोत ? माझ्याच नशिबात असे क्षण का नसावेत? माझे नशीब लिहिताना देव हा क्षण विसरला की काय ?"
"उग..उग..गप व्हा बर..."
"तू दिसली की कसं भडभडून येते. मोठी बहीण भेटल्याप्रमाणे दाटून येते. बाळू आणि मी बरोबरीचे. फरक काय तर तो पुरुष आणि मी स्त्री. दोघेही सोबत खेळलो, वाढलो. दोघांनी एकदाच तारूण्यात प्रवेश केला. त्यामुळे काही बंधने आली तरीसुद्धा आम्ही एकत्र राहिलो. माझे लग्न झाले. योगायोगाने बाळूही याच गावात आला आणि शेजारीच राहतोय. दोन घरामध्ये हाकेचे अंतर आहे पण त्याचा संसार बघ कसा छान फुलतोय, बहरतोय. बस आता, एखादं गोड फळ त्या संसाराला लागलं की झालं. इकडे माझ्याकडे बघ. कुणीतरी माझ्या संसारात काटे पसरवलेत. कुणीतरी कशाला? ज्याला माझं शरीर, माझं सर्वस्व दिलं त्यानेच पसरवलेल्या काट्याने झालेल्या रक्तबंबाळ अवस्थेत प्रवास सुरू आहे. समोर वाळवंटच दिसते आहे. त्यात ही छकुली..."
"व्हय वो, कसं फुलावाणी लेकरू हाय बगा. फायल की घ्यावचं वाटते..." असे म्हणत विठाने संजूस उचलले आणि ती तिचा पापा घेत असताना नयन एकाएकी पळतच मोरीकडे गेली. तिने ओकण्याचा प्रयत्न केला पण छे! नुसतीच कोरडी ओकारी. चमत्कारिक नजरेने पाहत संजीवनीस पाळण्यात टाकून विठा म्हणाली, '
"काय झालं?"
"ठाऊक नाही गं. पण एकदम..."
"ताईसाब, तुमास्नी बाहीर बसून..."
"मायगॉड! म्हणजे? नाही. नको विठा, नको. आता ती इच्छाच नाही. अग, ही एकच आहे तर तिचेच ओझे वाटतंय."
"न्हाई, तस न्हाई. आता त्ये काय आपल्या हाती हाय व्हो. तायसाब, देवाचीच किरपा बगा. अव्हो, नवससायास करून मी जिंदगीभर वांझ हाईता हो कैक बाया! अव्हो, तुमच भाग म्हणा..."
"दुसरी कुठली कृपा, भाग्य नाही पण या बाबतीत..."
"तायसाब, अव्हो, या येवढ्या मोठवया ईस्टेटीची काळजी देवाला असणारच की राज्यावाणी आसलेल्या इस्टेटीला वारस..."
"वारस? ईस्टेट...हूं..."
"मालकाचे तर ध्यान न्हाई पर तुम्ही तर ध्यान..."
"मी काय लक्ष ठेवू? आहेत ते... तुझे धनी समर्थ..."
"न्हाई वो. आता तुमास्नी सांगू का न्हाई पर सांगत्ये. अहो, धन्याचे वावराकडे ध्यान न्हाई व्हो. समदा दियाखाली अंधार हाय. घरातून वावरात नेयाया धा पोत्ये काढले तर शेतात पाच पोत्ये जात्यात हो..."
"बाकीचे पोते कुठे जातात?" नयनने विचारले.
"बाकी ईकल्या जातात. कालच आमचे घरचे म्हणत व्हते. खळ्यावरचा माल अगुदर गड्याच्या घरात जातो आन् मंग वाड्यात येतो..."
"मग त्याने हे मालकाला..."
"तायसाब, वकुत बुरा आला काय? धन्याल सांगावं तर कांगाळी केली म्हून समदी गडी येक होऊन ह्यास्नी मारतील. म्हणून म्हणते तायजी, आता तुम्ही तरी ध्यान द्या..."
"काय झाल?" वाड्यात आलेल्या बाळूने विचारलं.
"बाळासाब, जा पळा. पेढे आणा.आनंदाची बातमी..."
"आनंदाची बातमी? तुला पोरगं-बिरगं..." बाळूच्या पाठोपाठ आलेल्या सदाने विचारले.
"कामून गरीबाची मस्करी कर्ता धनी? अव्हो, पोरगं व्हतंय तुमास्नी." विठा म्हणाली.
"काय? मला? म्हणजे तुला..." असे म्हणता म्हणता सदाने संशयाने बाळू आणि नयनकडे पाहिले. त्या विषारी नजरेतील दंश पचवायची शक्ती त्यावेळी नयन जवळ नव्हती.
"अभिनंदन सदाशिवराव, अभिनंदन!" बाळू म्हणाला.
"माझं कसचं अभिनंदन करतो? अभिनंदन तुझे आणि नयनचे! तुमची मेहनत फळाला आली. सदाशिव वेगळयाच स्वरात म्हणाला.
"चूप बसा. भलतेच काही बोलू नका..." थोडसं किंचाळत नयन म्हणाली.
"का म्हणून? तुम्हाला थेरं करायला लाज नाही..."
"सदाशिव..." त्याच्या बोलण्याचा रोख ओळखून बाळूही ओरडला.
"का? खरे बोलण्याचा राग आला? तुम्हाला काय वाटलं, मला काहीच माहिती नाही?"
"धनी, आस्स काय बी बोलू नगसा. देव माणसं..."
"तू चूप! तोंडचोबंडेपणा करू नको. ही आणि देव माणसं? विठा, तू फार भोळी आहेस ग. अग, प्रेम करायलाही माझ्यासारखं धाडस लागतं ते साऱ्यांजवळ नसतं. साऱ्या जगाला साक्षी ठेवून प्रभाकडे ... नात्यातल्या.. जून नातं नवं करून मी तिच्याकडे जाण्याचं.. तिच्याशी लग्न करण्याचं धाडस केलंय या..या सदाशिवने! तुमच्या, जगाच्या दृष्टीने ते पाप असेल परंतु भुकेल्यास अन्न व तहानलेल्यास पाणी देणे ही आपली परंपरा आहे, धर्म आहे. माझी मामी असली तरी ती एक स्त्री होती. तिची ती भूक मी शमविली. काय वाईट केलं? परंतु तसलं पुण्य करायलाही धाडस लागते. मी तिकडे जातो या गोष्टीचा फायदा घेवून रात्रीच्या काळोखात हा. हा... बाळू माझ्याच बायकोला... स्वतःच्या आतेबहिणी सोबत..."
"सऽऽदाऽऽ" जोराने ओरडत बाळू सदाशिवकडे धावला. परंतु त्याला मध्येच अडवत विठा म्हणाली, "न्हाई, बाळासाब न्हाई. तुमास्नी मही आन हाय. चला. तुमी चला..." म्हणत तिने बळेबळेच बाळूला वाड्याबाहेर नेले. जुगारामध्ये सर्वस्व हरवलेल्या व्यक्तिप्रमाणे थकलेल्या पावलांनी बाळू घराकडे निघाला....
"तुम्हाला असा भलताच आरोप करताना काहीच कसे वाटले नाही?" भडकलेली नयन म्हणाली.
"आरोप नाही. माझा विश्वास, खात्री आहे. पोटात वाढणारं पापच नाही तर ... ही पोट्टीही माझी नाही."
"सदाशिव, वाट्टेल ते आरोप करू नका. जिभेला काही हाड? भलतेच कुभांड रचू नका. मला माहिती आहे, तू तुझे पाप लपविण्यासाठी, समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी..."
"मला तसे करण्याची गरजच नाही. समाजाची मी कधीच काळजी केली नाही. लहानपणापासून मनाला वाट्टेल तसं जीवन मी जगलो, भ्याडासारखं नाही. जे पाहिजे..."
"पर मालक, तुमचं काय बी असेल पर तायसाब धुतल्या तांदळावानी हाईत. रोज त्यांच्या पायाचं पाणी पेल तर..."
"विठे, तुला सांगतो..."
"का ओरडता तिच्यावर?" नयनने संतापाने विचारले.
"आता चूप बसते का? थांब..." असे म्हणत सदाने नयनला बडवायला सुरुवात केली. विठा पुन्हा मध्ये पडली. रडणाऱ्या नयनला ओढत तिला खोलीमध्ये ढकलली. तसा रागारागाने तणतणत सदाशिव प्रभाच्या वाड्यात शिरला...
"अरे! काय झाले? चेहऱ्यावर बारा का वाजताहेत?"
"मी..मी बाप बनतोय..." सदाशिव म्हणाला.
"इश्श! माझ्याआधी तुला कसे समजले? मी तर परवाच बाजूला बसले होते नि तरीही..."
"चूप! तू नाही. ती-ती नैनी..."
"काय? नयन? आई होतेय? म्हणजे तुझ्याशी तिचे संबंध चालूच आहेत तर...मी रखेल..."
"गप्प बस भलतेच बोलू नकोस..."
"का नको बोलू? अरे, सदा, मी तुला काय कमी केले? तुझ्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे दिवस-रात्र केव्हाही तुला 'हो' म्हणाले. तरीही तू तिच्याशी..."
"होय! सालीचे रूपच आहे तसे. शिवाय रोज नाही जात तिच्याकडे. तुझ्या त्या चार रात्री....तिला दाबात ठेवण्यासाठी नवरेपणाचा हक्क गाजवावाच लागतो. अग, पण तुझा सवतीमत्सर का जागा झाला?"
"खरीखरी सवत आहे मी! मत्सर जागा होणारच ना..." असे म्हणत प्रभा सदाच्या मिठीत शिरली. त्याच्या छातीवर हळूवार ओठ टेकवून ती पुढे म्हणाली,
"सदा, यावेळी तिला मुलगा झाला तर?"
"झाला तर झाला? आपल्याला काय त्याचे?"
"अरे, सदोबा, सारी इस्टेट तिलाच द्यावी लागणार ना?"
"प्रभादेवी, किती विचार करतेस? अग, माझी सारी इस्टेट तुझ्याच मुलाला मिळेल अशी व्यवस्था मी केलेय ग..."
"व्वा! ग्रेट..."असे म्हणत प्रभाने सदाला करकचून आवळले...
तिकडे पलंगावर नयन खदखदू लागली. तितक्यात खोलीत आलेली विठा म्हणाली, "तायसाब..."
"विठा, ह्यांचे हेच शब्द..आरोप ऐकायला का मी रोज मरूनही जिवंत होते? तो घाणेरडा...शी: शीः ते ऐकताना माझे कान का गळाले नाहीत? का...का... ही धरती दुभंगली नाही? तसा आरोपाचा भूकंप झाल्यावरही मी का कोसळले नाही? ठरलं... आता ठरलं... हे... हे घर सोडायचे... "
"जरासा विचार करा जी. असा आततायीपणा करू नगा. तुमी पडल्या बाईमाणूस. कडेवर एक पोरगी आणि वर पुना पोटुश्या..."
"जे होईल ते पाहता येईल..."
"तायसाब, मला मोठी भन म्हन्ता, मग ऐका माझं, अव्हो, सौंसार म्हन्ला, की त्याला दोन चाकाचा भक्कम आधार लागतो. अव्हो, बिगर गड्याचा सौंसार म्हणजे..."
"विठा, तुला माहिती नाही? माझ्या संसाराचं एक चाक मोडलं..."
"असू द्या. मोडक आसू द्या. ते सम्द जनतेला ठाव हाय म्हून तर लांडगे च्यार हात दूर हायेत. येकदा का त्येंना समजल ना, की तुमच्या सौंसाराचं एक चाक निखळून गाडी येकाच चाकाची हाय तव्हा टपलेले लांडगे धावा बोलून तुमचं जीनं हराम करतील बघा."
"विठा, आता काहीही झाल तरी मी थांबणार नाही. मी शिकलेली आहे. कुठेही नोकरी करून चटणी भाकरी मिळवेन.... ती सुखाची असेल..."
"तायसाब, म्या नौकर माणूस, जास्ती काय बोलू? पर तुमी जे बोल्ला ते काय घावलं न्हाई. अव्हो, ज्या घरात बाई डोलीतून जात्ये तिने त्या घरातून तिरडीवरूनच बाहीर..."
"तिरडी? अग, या वाड्यात आल्यापासून मी कायमच तिरडीवर आहे ग. अग, नवरा जिवंत असूनही मी विधेवेप्रमाणे जगते ग. रोज रात्री सती..."
"तायवान, या वक्ती तुमचा दिमाग गरम हाय. रातभर ईच्चार करा. म्या फाटे येत्ये. बाळूकाका, काकीलाबी बोलू आन् मंग फावू काय करायच त्ये. पर फाटेपस्तोर..." बोलताना का कोण जाणे त्या दिवशी प्रथमच विठाचे डोळे भरून आले. तिला काय वाटले कोण जाणे परंतु भरल्या डोळ्यांनी तिने संजीवनीचे पापे घेतले आणि नयनकडे पाहत, डोळ्याला पदर लावून ती खोलीबाहेर पडली. ओसरीवरील रिकामा पिंजरा तिचे स्वागत करीत होता. पोपट गेल्यापासून पिंजऱ्याचे दारही कुणी लावलं नव्हतं. विठाबाईस तो पिंजरा भकास, उदास वाटला... त्या वाड्या प्रमाणे!
००००