mayajaal - 30 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल -- ३०

मायाजाल --- ३०
त्या रात्री हर्षदशी फोनवर बोलणं झालं; आणि दिवसभराच्या ताणामुळे थकवा आलेला असूनही प्रज्ञाला काही केल्या झोप येईना. तिच्या बंद डोळ्यांसमोर काॅलेजचे दिवस साकार होऊ लागले. इंद्रजीतशी पहिली भेट झाली, तो दिवस ---- त्या दिवशी आस्मानी संकटात तो तिला सुखरुप घरी घेऊन आला होता. किती सहजपणे त्याने तिच्या मनावरचं अनोळखीपणाचं ओझं दूर केलं होतं. आणि नंतर काही दिवसांतच तो तिचा मित्र झाला होता. त्यांच्यातील आर्थिक दृष्ट्या असलेलं अंतरही त्यानं कधीच जाणवू दिलं नव्हतं. दोन वेळा प्राणघातक हल्ला होऊनही तिच्यापासून दूर होण्याच्या विचारही त्याच्या मनात आला नव्हता. त्याचं किती प्रेम होतं तिच्यावर! त्याने केलेल्या चुकीची फार मोठी शिक्षा ती त्याला देत होती का? तो म्हणतो त्याप्रमाणे जर त्याने हर्षदच्या कुटुंबाची वाताहात होऊ नये म्हणून एवढा मोठा त्याग केला असेल; तर माणूस म्हणून तो किती मोठा आहे!
पण त्याच्यविषयी पूर्वीच्या प्रेमभावनेचा लवलेशही तिच्या हृदयात का नव्हता? त्याच्याकडे पाहिल्यावर आपलेपणा का वाटत नव्हता? त्याला बघून तिला आनंद का झाला नव्हता? तिचंच काही चुकत तर नव्हतं? आई म्हणते त्याप्रमाणे ती अहंकाराच्या आहारी जात होती की काय? आता प्रज्ञाच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती. तिचं मन आणि बुद्धी तिला वेगवेगळे निर्देश देत होते!
**********
सकाळी ती हाॅस्पिटलला जायला निघाली; आणि त्याचवेळी इंद्रजीतचा फोन आला. "तू काय ठरवलंयस? आई - बाबांना मुद्दाम तुझ्या घरी पाठवलं होतं; पण --- तू विषय टाळलास असं ते म्हणाले--- तुझा माझ्यावरचा राग अजून गेला नाही का?"
तो तिला बोलायची संधी न देता बोलत होता. अविनाश सरांच्या--- एका हुषार उद्योगपतीच्या दृष्टीतून तिच्या वागण्यातील तुटकपणा सुटला नव्हता.
" मी अजून काही ठरवलं नाही. आणि आता मी निघण्याच्या घाईत आहे." प्रज्ञा त्याच्याशी बोलणं टाळण्याचा प्रयत्न करत होती.
"मी पुढच्या आठवड्यात लंडनला जाणार आहे! परत कधी येईन; सांगता येत नाही! तुझा निर्णय काहीही असू दे! जाण्यापूर्वी मला एकदा तुझ्याशी बोलायचं आहे तुझा गैरसमज दूर करायचा आहे. संध्याकाळी भेटशील मला?" इंद्रजीतने आर्जवाने विचारलं.
" संध्याकाळी माझा निघायची वेळ नक्की नसते. पण दोन दिवसांनी--शनिवारी माझा 'विकली आॅफ ' आहे; त्या दिवशी घरी ये!" प्रज्ञा म्हणाली. जीतची बाजू एकदा शांतपणे ऐकून घ्यायला काहीच हरकत नव्हती.
"घरी नको! आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया आपण! चालेल?" इंद्रजीतने विचारलं.
" हरकत नाही! संध्याकाळी ६ वाजता!" प्रज्ञाने फोन ठेवला. तिच्या परत लक्षात येत होतं, की तिचं मन त्याला भेटायला फारसं उत्सुक नव्हतं. फक्त आईने दिलेला सल्ला ती पडताळून पहाणार होती.. निर्णय घेणं तिच्या हातात होतं; मनातला राग बाजूला ठेवून एकदा त्याची बाजू ऐकून घेणं--- त्याला एक संधी देणं गरजेचं होतं. मन मोकळं करायची संधी दोघांनाही परत मिळण्याची शक्यता फार कमी होती.
*********
इंद्रजीतला भेटण्याचा दिवस उजाडला. सकाळपासूनच प्रज्ञाच्या मनात उलटसुलट विचारांचं काहूर माजलं होतं. ती जीतला भेटणार आहे, हे कळल्यावर बाबांचा चेहेरा चिंताक्रांत झाला होता. सकाळी प्रज्ञा चहा प्यायला हाॅलमध्ये बसली होती. पण समोरचा चहा थंड झाला, तरी तिचं लक्ष नव्हतं ; एवढी ती स्वतःच्या विचारांनध्ये हरवून गेली होती. न राहवून त्यांनी विचारलं,
"कसला विचार करतेयस? तू इंद्रजीतविषयी अगदी योग्य निर्णय घेतलायस! आता वेगळा विचार करायची गरज नाही! खरं म्हणजे तू आज त्याला भेटायला जाणार आहेस; हेच मला पटत नाही!" प्रज्ञाने इंद्रजीतशी कोणताही संबंध ठेवावा; हे त्यांना मान्य नव्हतं.
"त्याने फक्त एकदा भेटायला बोलवलंय! मी त्याची बाजू ऐकून घ्यायचं ठरवलंय!" प्रज्ञा तंद्रीतून बाहेर येत म्हणाली. ती जीतला भेटायला जातेय, हे बाबांना आवडणार नाही; याची कल्पना तिला होती.
"पण तो गोड बोलून समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं पटवून देण्यात हुशार आहे; तुला माहीत आहे नं? " बाबांनी त्याच्या मनातली चिंता व्यक्त केली.... जरा थांबून ते पुढे बोलू लागले,
"बाळा! भूतकाळाने शिकवलेले वाईट अनुभव विसरून जायचे नसतात. विचार करून पाऊल पुढे टाक. इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको! इंद्रजीतमुळे तुझी जी अवस्था झाली होती; ती मी कधी विसरू शकत नाही. तू सुद्धा विसरू नकोस! तो विश्वासपात्र नाही! माणसाचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही. तू हुशार आहेस.तुला जास्त काही सांगायची गरज आहे; असं मला वाटत नाही; पण त्याच्यापासून सांभाळून रहा!"
मोठ्या हिकमतीने प्रज्ञा इथपर्यंत आली होती तिला दुःख देणा-या इंद्रजीतला परत संधी देणं, म्हणजे आगीशी खेळणं आहे; असं त्यांना मनोमन वाटत होतं. प्रज्ञाची काळजीही वाटू लागली होती.
"मी फक्त त्याला भेटणार आहे. त्याने अनेक वेळा विनंती केली. एकदा त्याची बाजू ऐकलीच पाहिजे. तो काही दिवसांतच परत लंडनला जाणार आहे! काळजी करू नका! ही आमची शेवटची भेट असेल!"
प्रज्ञाने एवढं ठासून सांगितलं; तरीही अनिरुद्ध निश्चिंत नव्हते. इंद्रजीत समोरच्या माणसाला घोळात घेण्यात किती तरबेज होता, हे त्यांना चागलंच माहीत होतं.
"पण तो माणसांना आपलंसं करण्यात किती हुशार आहे; तुला माहीत आहे नं? तो गोड बोलून तुला कधी हिप्नोटाइझ करेल; तुलाही कळणार नाही! सांभाळून रहा!" त्यांनी तिला सावध करून ठेवलं.
*********
दिवसभर प्रज्ञाचं मन सैरभैर झालं होतं. कधी जीतच्या सहवासातले आनंदाचे क्षण आठवत होते तर दुस-याच क्षणी "लग्न मोडलं असं समज!" असं म्हणतानाचा त्याचा कठोर चेहरा आठवत होता.
खरं म्हणजे तिच्या एकेकाळच्या प्रियकराने तिला परत प्रपोज केलं होतं. पण त्याला भेटायला जाताना मन निरूत्साही होतं. एक उपचार म्हणूनच ही भेट होणार होती!
संध्याकाळी निघताना तिने अगदी साधा ड्रेस घातला. नीनाताईंनी तिच्याकडे पाहिलं, आणि म्हणाल्या,
"प्रज्ञा ! तू लंडनला प्रॅक्टिस करणा-या मोठ्या डाॅक्टरला भेटायला जातेयस. आणि तुझंही स्टेटस त्याच्यापेक्षा कमी नाही! नीट तयार होऊन जा! तुझ्या पप्पांनी तुझ्या वाढदिवसाला नवीन काश्मिरी भरतकामाचा ड्रेस घेतला होता; तो का नाही घालत?" आईच्या सूचनांनी प्रज्ञा भानावर आली. आईच्या आग्रहाखातर व्यवस्थित तयार होऊन ती निघाली.
"किती सुंदर दिसतेयस! हा ड्रेस तुला खूप खुलून दिसतोय! " आईच्या नजरेत कौतुक होतं.
" मी तुला त्या दिवशी सांगितलं ते लक्षात आहे नं? ही सोन्यासारखी संधी दवडू नकोस! " त्या अनिरुद्धना ऐकू जाऊ नये; म्हणून तिची ओढणी नीट करत हळू आवाजात म्हणाल्या. प्रज्ञाचं मन आता द्विधावस्थेत आहे ; हे आईने ओळखलं होतं. तिने परत एकदा आपण दिलेल्या सल्ल्याची आठवण करून दिली. मुलीचं आयुष्य मार्गी लागावं; ही आईची इच्छा प्रज्ञालाही नकळत दुर्बल बनवत होती.
*********
ते रेस्टाॅरंट प्रज्ञाच्या आवडत्या हाॅटेल्सपैकी एक होतं; हाॅटेलच्या बाहेर डेरेदार वृक्षांनी वेढलेल्या विस्तीर्ण जागेत लाॅनवर टेबलं मांडलेली होती. आजूबाजूला सुंदर फुलझाडं लावलेली होती. झाडांना रंगीबेरंगी बल्बची रोषणाई केलेली होती! संध्याकाळी दिवे झगमगू लागले; की खूप सुंदर वातावरण निर्माण होत असे. पूर्वी अनेक पवेळा ती जीतबरोबर तिथे गेली होती. हाॅटेलच्या आत बंदिस्त जागेत बसण्यापेक्षा बाहेर बसणं तिला आवडत असे.
तिनं पाहिलं जीत तिची वाट पहात हाॅटेलबाहेर उभा होता. त्यानं हात उंचावून तिला बोलवलं. "साॅरी! मला यायला उशीर झाला का?" प्रज्ञा त्याची नजर चुकवण्यासाठी घड्याळाकडे बघत म्हणाली. पण ती काय बोलतेय ; इकडे त्याचं लक्ष नव्हतं.
पांढ-याशुभ्र सिल्कवर नाजुक भरतकाम केलेल्या ड्रेसमध्ये जणू त्याच्यासमोर परी प्रकट झाली होती. तो एकटक तिच्याकडे पहात होता.
" मी तुला विचारलं; फार वेळ वाट पहावी लागली का?" त्याला भांबावलेला बघून नककळत प्रज्ञाच्या ओठांवर हसू उमटलं होतं. जीत भानावर आला,
"तुला उशीर नाही झाला! मीच लवकर आलो होतो. तुला कधी भेटतो; असं झालं होतं मला! सकाळपासून तास---- मिनिटं--- सेकंद मोजत होतो." तो लाघवी नजरेनं तिच्यकडे पहात म्हणाला.
" मला कशासाठी बोलावलंस? काय बोलायचं होतं?" प्रज्ञा मुद्दाम आवाजात कोरडेपणा आणत म्हणाली. तिला जीतच्या गोड बोलण्यात गुंतायचं नव्हतं.
दुसरीकडे इंद्रजीत मात्र तिचं मन जिंकून घेण्याचा निश्चय करून आला होता!
********* contd.---- Part 31.

Share

NEW REALESED