Saubhagyavati - 24 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 24

२४) सौभाग्य व ती !
जीप खूप वेगाने जात असली तरी नयन मनाने अगोदरच तिथे पोहोचली होती.सारखा तिच्या डोळ्यासमोर संजीवनीचा चेहरा येत होता... क्षणात रूसणारी नि दुसऱ्याच क्षणी हसणारी संजू! लहानपणीच बालपण हरवलेली संजू आणि तासापूर्वीच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रातील मजकूर! नोकरी करून नयनला सुखी करू पाहणारी, हरवलेले नयनचे सुख परत मिळवून देवू म्हणणारी संजू...! सारी सारी रूपे नयनच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती. चौथीवर्गात आणि शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या संजीवनीची बुद्धिमत्ता पाहून, तिच्या भविष्याचा विचार करून नयनने तिला दुसऱ्या गावी ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला. एकदा नयनला वाटले, जवळच ठेवावी. नजरेसमोर शिकवावी पण नंतर पुन्हा मनात विचार येई, की नको. संजू खूप हुशार आहे, घरातले वातावरण तिच्या शैक्षणिक विकासाच्या आड यायला नको म्हणून नयनने मोठ्या कष्टाने संजीवनीला त्या नावाजलेल्या शाळेत, वसतिगृहामध्ये ठेवलं. त्या शाळेत आणि वसतिगृहात केवळ हुशार मुलानाच प्रवेश मिळत असे. पाचवीचा निकाल लागल्यानंतर नयन तिच्या शाळेत गेली होती. तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले,
'ताई, खूप हुशार आहे हो संजीवनी... गेल्या वर्षी घटक चाचण्या, सहामाही-वार्षिक परीक्षा आणि वेळोवेळी झालेल्या स्पर्धामध्ये तिचा प्रथम क्रमांक आहे. तिची अशीच प्रगती राहिली तर ती निश्चितच मॅट्रिकला सर्वांचे नाव उज्ज्वल करणार आहे. अशी हुशार विद्यार्थीनीला आमच्या शाळेत टाकल्याबद्दल आपले आभार कसे मानावे तेच समजत नाही...'
'कशी असेल संजू? खुप लागल तर नसेल ना? दवाखान्यात अॅडमिट तर नसेल ना? काय करू? किती वेळ लागतोय ? ती माझी वाट पाहत असेल? ती शुद्धीवर असेल का? कुठे मार लागला असेल तिला? कोण तिची काळजी घेत असेल? आई-बाप असूनही पोरगी कशी वनवासात होती? बाप? त्याला काय चिंता? तो तिकडे मजेत असेल. इकडे माझी लेकर बापाच्या प्रेमासाठी तळमळतात, तडफडतात आणि त्याचा बाप का...का... सदा तसा वागला? ती सटवी जर आमच्या संसारात आली नसती तर माझी लेकरं अशी परदेशी झाली नसती. शेजारच्या बापाचे आपल्या मुलावरचे प्रेम पाहून संजीवनी अनेकवेळा हिरमुसली...' नयन तशा विचाराच्या आवर्तनात असताना
माधवीची स्थिती का वेगळी होती. तिच्याही मनात विचारांनी गर्दी केली होती...
'हे काय भलतंच झालं म्हणावं? कशी असेल माझी ताई? असा कसा अपघात झाला म्हणावा? खरे तर ताई, स्वतःसह इतरांनाही सांभाळणारी आहे. ती कोणताही आततायीपणा, घाईगडबड करीत नाही. तिचे काम म्हणजे कसे शांतपणे, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध असते. असा कोणता प्रसंग होता की, ताईला बाहेर जावे लागले आणि तिचा अपघात झाला? कुठे लागले असेल? काय लागले असेल? कुणी काही बोलत नाही. आईची स्थिती बघवत नाही. परमेश्वरा, ताई, सुखरूप असू दे. तिला जास्त कुठे लागलेले नसावे? किती वेळ लागतोय पोहचायला?'
त्या दोघी तसा विचार करीत असताना जीपने शाळेच्या आवारात प्रवेश करताच जीपचा वेग मंदावला. जीप थांबण्यापूर्वीच नयनने जीवाच्या आकांताने जीपमधून उडी घेतली. पळतच शाळेजवळ आली. पायऱ्यांजवळ येताच ती थबकली. व्हरांड्यात सारे शिक्षक उतरलेल्या चेहऱ्याने उभे होते. त्यांच्या बाजूला पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलं होतं. नयनच्या मागोमाग जीपमधील सारी मंडळी पोहोचल्याचं पाहताच पुढे होत मुख्याध्यापक म्हणाले,
"ताई, माफ करा. आपली संजीवनी आपणास सोडून..."
"ना...ही..." नयन आणि माधवीच्या गगनभेदी किंकाळ्यांनी सर्वांच्या हृदयाचे जणू तुकडे तुकडे झाले.
"शांत व्हा. प्लीज शांत व्हा. बघा ती कशी शांत झोपलेय..." असे म्हणत त्यांनी चादरीकडे बोट केले. सर्वांचे लक्ष तिकडे गेले. एकदम जोराचा वारा आला आणि चेहऱ्यावरील चादर दूर होताच उपस्थितांचे हृदय हेलावले. क्षणभरही कुणी तिकडे पाहू शकले नाही.
'बाप रे! हे काय?...' प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न आला कारण तिथे चेहरा नव्हताच. होता नुसता मांसाचा गोळा...
"ना...ही. संजू नाही. तू मला सोडून कशी गेली? नाही, बाळ नाही. एकदाच बघ. मी तुला अस जाऊ देणार नाही. का... का... रुसली बाळ माझ्यावर? काय चुकल माझं? तुला दूर ठेवलं म्हणून रागावली? नाही. असं करू नको. यापुढे नाही माझ्यापासून दूर ठेवणार, ये...ये संजू, एकदाच बोल ग अग, बघ मी आलेय... मी येईपर्यंत तू बक्षीस स्वीकारणार नव्हतीस ना? बघ... बघ आता मी आलेय. मी येण्यापूर्वीच तू कशी निघून गेलीस? मला तुझा तो निबंध वाचायचा आहे ग. कुठे आहे? दाखव बरे. तू लिहल होतस, की तू मला खूप खूप सुखी करणार आहेस म्हणून मग अशी अचानक दुःखाच्या सागरात ढकलून कुठे गेलीस? सर... सर, कुठय तुमची विद्यार्थिनी? तुमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करू पाहणाऱ्या मुलीस तुम्ही कसं जाऊ दिल? सांगा, सर सांगा. ऊठ ग राणी. बघ तुझे बक्षीस घेवून तुझे सर आले आहेत. बघ तू बोलावलस म्हणून मी आले. बाळा, आता तरी बोल ना ग राजा...सर, असे कसे झाले हो?" नयनचा आक्रोश सुरू असताना बाजूला मुख्याध्यापक भाऊ, माधव व इतराना म्हणाले,
"आज सकाळी नेहमीप्रमाणे सारी मुले फिरावयास गेली होती. संजीवनीसुद्धा गेली होती. मुले परतली. संजीवनी आणि चार-पाच मुली थोड उशिरा निघाली. मोठा रस्ता ओलांडावयाचा होता. तिकडून भरधाव ट्रक येत होता. संजीवनी म्हणाली,
"अग... अग, थांबा गं. बघा तर तो ट्रक किती वेगाने येत आहे. जाऊ द्या त्या ट्रकला..."
दुसरी कुणी तरी मुलगी म्हणाली, "अग चला. ट्रक दूर आहे. आपण सहज जावू... चला. पळा."
"चला, अगोदर कोण रस्ता पार करते ते पाहू. आता समजेल कोण डेयरिंगबाज आहे ते.." ते एक प्रकारचे आव्हान ऐकताच साऱ्या मुली पळत सुटल्या आणि आणि तिथेच घोळ झाला. पळता पळता ट्रक अगदी जवळ आल्याचे पाहताच साऱ्या मुली घाबरल्या. शक्य तितक्या लवकर पलीकडे जावे म्हणून जोरात पळत असताना कुणाच्या तरी पायात पाय अडकून संजीवनी अडखळून खाली पडली. ती जीवाच्या आकांताने उठायची धडपड करीत असतानाच तो ट्रक तिच्या अंगावरून गेला. तिच्या तोंडातून किंकाळी तर सोडा पण साधा आवाजही निघाला नाही. संजीवनी पुन्हा उठलीच नाही. त्याचवेळी सारा खेळ आटोपला होता. पंचनामा, पोस्टमार्टेमनंतर थोडावेळापूर्वीच ताबा मिळालाय. ही ही सारी कागदपत्रे..." म्हणत त्यांनी काही कागदपत्रं भाऊंच्या हातात दिली आणि सुटकेचा निःश्वास घेतला. त्यांच्यापासून हाताच्या अंतरावर नयन आणि माधवीचा आक्रोश पाहवत नव्हता, दगडाला पाझर फुटेल असा! साऱ्यांचे डोळे पाणावले.
"ऊठ, संजू ऊठ. एकदा आई म्हण. तुला पुन्हा इथे ठेवणार नाही. चल अमरावतीला. माझ्या शाळेत तुझे नाव घालू. वाटले तर वेगळे घर करू पण बाळे, असे रागावू नको ग बघ... बघ... तुझी लाडकी माधोपण आलीय ग..."
"ताई, अग, अशी का करतेस ग? आम्हाला का बोलत नाहीस ग? मी आता कुणाला ताई म्हणू? कुणाशी भांडू? ताई, एकदा... प्लीज एकदा माझ्याशी बोल गं..."
"नयन, नयन शोक आवर. झालं ते झालं. आता आपणास निघायला हवे..." भाऊ म्हणाले.
"नाही. मी सोडून येणार नाही. देव का छळतोय मला? आमचा आधार हिरावून घेतला. वयच काय होतं माझ्या बाळीचं..."
"शांत हो बरे. नयन, तूच असा धीर सोडला तर माधवीला कोण सांभाळेल?"
" आता पुढे कसं? घरी तरी कस न्यावं?..." असे विचारणाऱ्या भाऊंनी मुख्याध्यापकांकडे पाहिले. तितक्यात तिथे आलेल्या मोटारसायकलवरून उतरलेल्या फौजदारांनी विचारले,
"आले का पालक?"
"हो..." मुख्याध्यापक म्हणाले.
"जीप आणली का? कुठे अमरावती नेणार का? पण नेणार कसे?..." फौजदारांनी विचारले.
"तेच मी म्हणतोय, साहेब, तिकडे नेण्यापेक्षा इथेच व्यवस्था होईल का?"भाऊंनी विचारले. तसे काही क्षण विचार करून फौजदार म्हणाले,
"ठीक आहे. करूया व्यवस्था..."
अर्ध्या तासानंतर सारे स्मशानघाटावर पोहोचले. तोपर्यंत फौजदारांच्या नियोजनातून खड्डा तयार झाला होता. माधवने धरून ठेवलेल्या नयनचा टाहो सर्वांचीच मने हेलावत होता. भाऊंनी इतरांच्या सहाय्याने संजीवनीला उचलले.
'भाऊ, तुमचे हात बाटतील. जन्मल्यापासून कधी तिला बोट लावलं नाही हो तुम्ही माझ्या लेकरांना. कधी तरी तिला प्रेमाचा, कौतुकाचा शब्द बोलला नाहीत. उचलून कडेवर घेतलं नाही. मग आजच का हे प्रेम उफाळून आलं? आज मूठमाती द्यायला कसे धावलात...' त्या परिस्थितीतही जीभेवर आलेले असे शब्द नयनने मोठ्या मुश्किलीने आतच दाबले...
काही क्षणात तो खड्डा मातीने भरला. तिथे तिची संजीवनी शांत झोपली होती. दुःखी मनाने, आक्रंदत, बळबळे नयन जीपमध्ये बसली. तो भाग नजरेआड होईपर्यंत तिचे लक्ष त्या जागेवर होते. जीपने वळण घेतले तरी चिरनिद्रा घेत असलेल्या संजीवनी अनेक रूपे नयनच्या डोळ्यासमोर येत होती...
जीप घरासमोर थांबली. घरातील सारी मंडळी लगबगीने बाहेर आली. तोवर शहरातले पाहुणे, गायतोंडे, भाईजी आणि काही शिक्षक बसून होते. उतरणारांची चाल आणि चेहरे स्पष्ट सांगत होते. तरीही अनेकाच्या प्रश्नार्थक नजरेस माधवने उत्तर दिले,
"सारे संपले. ट्रकखाली सापडून संजू..."
"नाऽही!..." क्षणातच रूंदन सुरू झाले. आई समोर येताच नयन हमसूहमसू रडत तिच्या गळ्यात पडली. माधवीने आशाला मिठी मारली...
"कुठे आहे?" कुणी तरी विचारलं,
"सारे आटोपले. बघायला काहीही शिल्लक नव्हते. चेहरासुद्धा ऊंडा झाला होता. तिथेच पुढील क्रियाकर्म आटोपून आलोत..." असे म्हणणाऱ्या माधवचे लक्ष टेबलाकडे गेले. त्यावर ठेवलेले पत्र त्याने उचलून वाचले आणि हळूच भाऊंकडे दिले... दुःखाच्या सागरात सापडलेल्या नयनला... 'केस हरलो...' असे सांगण्याचे धैर्य भाऊंना झाले नाही. नागपूरहन आलेल्या वकिलांचे पत्र त्यांनी खिशात कोंबले...
००००