Saubhagyavati - 28 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 28

२८) सौभाग्य व ती !
एके काळी एकत्र असलेल्या अण्णा-भाऊंच्या कुटुंबाचे भर वादळात सापडलेले जहाज किनारी लागलं होतं. किनारा मिळताच ज्याला जिथे शरण मिळेल तिथे त्याने सहारा घेवून आपापला संसार थाटला होता, चांगल्या रीतीने फुलवला होता. सारे कुटुंब पुन्हा एकत्र आले नसले तरी एकत्रच असल्यासारखे होते. छोट्या-छोट्या समारंभालाही ते एकमेकांकडे जमून आनंदाने प्रसंग साजरा करीत. त्यांच्यामध्ये मोठे मतभेद नसल्यामुळे एकमेकांना तात्काळ 'ओ' देत.
त्या वतनदारी परंपरेलाही एक डाग होता,अपयशाची एक कडा होती ती म्हणजे अण्णांच्या भरकटलेल्या नावेतून न सावरलेली, संसाराचे दान दिलेली नयन! नेहमीप्रमाणे शांत असलेली अचानक नयन म्हणाली,
"अण्णा, भाऊ मला थोड बोलायचे आहे..." ते ऐकून सारे शांत झाले. आता ही काय नवे संकट आणणार या भावनेतून अण्णा म्हणाले,
"बोल. काय म्हणतेस?.."
"माधवी आता मोठी झालीय. तिला कुठे तरी उजवून मोकळं व्हावं..."
"आई..." तिच्याजवळ माधवी ओरडली.
"तुला काही कळते का? वेडी तर झाली नाहीस? तिचे वय ते काय?" काकीने विचारले.
"कालची पोरगी ती. आत्ताच तिला संसाराच्या दावणीला बांधू नकोस. शिवाय आजकाल लग्न सोपी आहेत का? नवरदेवाचा भाव काय आहे हे माहिती आहे का तुला?..."
"अण्णा, काळजी करू नका. तुम्ही फक्त जुळवायचं बघा. सारा पैसा मी देईन. एक पैही तुम्हास मागणार नाही..."
"म्हणे मी देणार? लग्न म्हणजे काय तोंडचा खेळ वाटला? गेला तो काळ. आम्ही शंभरावर लग्ने लावली..."
"ती दिसतातच हो. मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला तरीही..."
"नैने, काहीही बोलू नकोस. तुझा संसार तुला टिकविता आला नाही. आमच्यासारखाच वतनदार शोधला होता. तालुक्यात नाव आहे त्याच..."
"आहे ना, मी कुठे नाही म्हणते? नात्याने मामी असणाऱ्या बाईशी संबंध ठेवून लग्न लावणारा म्हणून तालुक्यात काय जगभर नाव आहे की. आता एकदा त्या वतनदाराचा सत्कार करा... मला घटस्फोट दिला म्हणून..."
"नैने, तुझ्या चुकीमुळे संसार मोडलाय. तू त्याला दुसरे लग्न करण्याची संमती दिली म्हणून..."
"अण्णा, थांबा जरा. तेच तेच उगाळण्यात काय अर्थ आहे? नयन म्हणते त्याप्रमाणे माधवीचे लग्न करू या..." वाद मिटावा या उद्देशाने बाळू म्हणाला.
"चला बरे जेवायला.. ताट वाढलीत..." परिस्थितीचे गांभर्य जाणून कमा आत्या म्हणाली.
जेवण-खाण्यात, गप्पा गोष्टीत माधव-मीराच्या मुलाच्या बारशाचा दिवस उजाडला. पहाटेपासून सारे कामात दंग होते. जेवणे होत होती. आहेराचीही देवाण घेवाण होत होती. भाऊने सर्वांनाच पूर्ण आहेर घेतले होते. सायंकाळी बारशाची वेळ झाली. सजवलेल्या पाळण्यात शृंगारित बाळाला झोपवण्यात आले. नयन वाट पाहात होती. मोठी आत्या या नात्याने नाव ठेवण्याचा अधिकार नयनचा! मीरा म्हणेल याची वाट पाहत असताना अचानक आशा ऊठली. आशा का पाळण्याकडे जातेय? नयनचा अधिकार आशाला? का तसे? नयनने मनाचा मोठेपणा दाखवून आशाला नाव ठेवायचे सांगितले असते तर गोष्ट निराळी होती..."
"ऐ आशा, कुठे निघालीस ग?" कमाआत्याने विचारले.
"मला वहिनीनी सांगितले आहे की बाळाचे नाव ठेवा म्हणून..." आशा मीराकडे बघून म्हणाली.
"तू बस. अग, नयन मोठी आहे ना? तिला नाव ठेवू दे. नयन जा ग तू." कमाआत्या म्हणाली तसा प्रसंग मोठा विचित्र निर्माण झाला. कुणी काही बोलण्यापूर्वीच नयन पाळण्याजवळ पोहचली. बाळास उचलण्यापूर्वी तिने बाळाचे नाव काय ठेवायचे अशा प्रश्नार्थक नजरेने मीराकडे पाहिलं.
मीरा तणतणत म्हणाली, "स्वप्नील..."
"चल रे स्वप्नील खेळायला जाऊ..." नयनचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच तिच्या पाठीवर अनेक थापट्या बसल्या. काही क्षणात नयन बाजूला झाली. बाहेर सुरू झाला... जेवणाचा बफे ! रात्रीचे दहा वाजले तरी येणारांची रीघ सुरूच होती. घरामध्ये कमाआत्या आणि मीरामध्ये जुंपली होती. विषय अर्थातच होता, बाळाचे नाव ठेवण्याचा! नयनला बाळाचे नाव ठेवायला सांगून कमाआत्याने मोठा अपराध केल्याप्रमाणे मीरा म्हणाली,
"आत्या, तुम्ही का आशाला थांबवलत?"
"मीरा, पण नाव ठेवायचा अधिकार मोठ्या आत्याला असतो."
"असे कुठे लिहलंय का? एखादी गोष्ट तरी आमच्या मनाप्रमाणे घडत नाही."
"आता मला तरी काय माहिती? मी आपलं सहजच म्हणाले..."
"तुमच झालं हो. पण माझा पहिलाच मुलगा. त्याचे नाव कुणाच्या..."
"कुणाच्या म्हणजे काय ग? मी का कुणी ऐरीगैरी आहे? मीही आत्याच ना?" नयन भडकून म्हणाली.
"हो. आत्याच आहात हो. मी कुठे नाकारते? पण जिला स्वत:चा संसार सांभाळता आला नाही तिने दुसऱ्याच्या संसारात बिबा कालवू नये." मीरा म्हणाली आणि संतापाने नयन फुललेली पाहून
"अग... अग... थांब..." असे म्हणत कमाआत्या आणि आशाने मध्यस्थी करून तो वाद तेथेच थांबवला...
बारसे झाले. सारे पाहुणे परतले. नेहमीप्रमाणे त्यादिवशी नयन सकाळी शाळेत पोहचली. शाळेची सुसज्ज इमारत तिच्या स्वागताला सज्ज होती. ताटव्याच्या आडोशाने सुरू झालेली ती शाळा चांगली दुमजली झाली होती. अगोदर सासरी नरकात राहून नंतर माहेरच्या जाचात राहणाऱ्या नयनने शाळेत स्वर्ग निर्माण केला होता. तिच्या कष्टाला खांडरे साहेबाची मेहनत आणि जिद्द यांचे सहाय्य होते. सरकारकडून कसल्याही प्रकारची मदत मिळालेली नसताना त्यांनी ती शाळा वाढवली होती. नयन खुर्चीवर बसली न बसली तोच तिच्यासमोरचा फोन खणाणला. खांडरे साहेबांनी शाळेत फोन घेतला होता. त्यांचे राजकीय कार्यालयही त्याच इमारतीमध्ये होते. साहेब शहरात असले म्हणजे फोन त्यांच्या कार्यालयात असे. ते नसताना तो फोन नयनच्या कार्यालयात सेवा बजावत होता.
"हॅलो..." फोन उचलून नयन म्हणाली.
"ताई, मी मुंबईहून खांडरे बोलतोय..."
"नमस्कार साहेब..." नयन आदराने म्हणाली.
"नयनताई, अभिनंदन ! आपल्याला ग्रँट मिळालीय. आदेश माझ्या हातात आहेत..." अत्यंत आनंदी आवाजात खांडरे म्हणाले.
"व्वा! सर, ही तर खूप म्हणजे खुपच आनंदाची बातमी आहे. मन:पूर्वक अभिनंदन साहेब! आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. मला खूप आनंद झालाय. तुमची जिद्द फळाला आली."
"ताईसाहेब,खरी जिद्द, कौतुक तुमचे. बरे, बाकी तिथं आल्यावर बोलू."
"एक विचारू का?" नयनने विचारले.
"विचारा ना..."
"आपल्या तिकिटाचे काय झाले ?"
"तीही आनंदाची बातमी आहे. तुमच्या शुभेच्छा फलदायी ठरल्या. तिकीट मिळाले." खांडरे आनंदाने म्हणाले.
"साहेब, अभिनंदन ! दुग्धशर्करा योग जुळून आला..."नयन बोलत असताना मध्येच फोन कट झाला. तितक्यात भाईजीसह गायतोंडे आत आलेले पाहून नयन म्हणाली,
"भाऊईजी, पळ. पेढे आण, चहा सांग... लवकर."
"लेकिन क्यूं... कोई खास बात है क्या?"
"खास? महाखास बातमी आहे! अरे, ऐकशील तर उड्या मारशील. साहेबांचा फोन होता शाळेला ग्रँट आणि साहेबांना तिकीट मिळाले. " बोलताना नयनला स्वतःचा आनंद लपवता आला नाही.
"ताई, अभिनंदन तुमच्या मेहनतीमुळे आजचा दिवस..."
"मेहनत एकटीची नाही. सर्वांचीच आहे..." म्हणत नयनने समोरचे वर्तमानपत्र उचलले. चौकटीत दिलेल्या बातमीने तिचे लक्ष वेधले. त्या बातमीचा तिला धक्का बसला, आश्चर्याचा ? आनंदाचा? दुःखाचा? आणखी कशाचा?
त्या वर्तमानपत्रात भाऊंचा तिकिटांचा काळाबाजार पुराव्यासह छापला होता. शहरात आलेले अर्धपोटी, उपाशीपोटी, कफल्लक म्हणून स्थायिक झालेले भाऊ आणि अल्पावधीत शहरात बांधलेल्या आकर्षक दुमजली इमारतीचे छायाचित्र असा सारा इतिहास प्रसिध्द झाला होता. तिने ते वर्तमानपत्र गायतोंडेना दिले. बातमी वाचून ते म्हणाले,
"ताई, खरे सांगू का, ही बातमी मी सकाळी घरी वाचली होती. तुम्हाला त्रास होईल म्हणून मी काही बोललो नाही. ताई, आता पुन्हा तुमची परीक्षा आहे. अनुदान मिळाल्याचा आनंद व्यक्त करणार की या बातमीचे दुःख?"
"भाऊ, आनंद, दुःख, सुख या सर्व संवेदना माझ्यासाठी बोथट झाल्या आहेत, या सर्वांपासून मी खूप दूर गेले आहे. माझ्यासाठी सर्व स्पर्श, भावना मृत झाल्या आहेत, त्या सर्वांपलिकडे मी पोहचलेय..." नयन म्हणाली. तिकडे पेढे, चहा आणायला जाणाऱ्या भाईने सर्व शिक्षकांना शाळेला अनुदान मिळाल्याची बातमी मोठ्या आनंदाने सांगितली. तसे सारे आत्यंतिक आनंद झाल्याच्या अवस्थेत कार्यालयात जमून नयनचे अभिनंदन करू लागले...
००००