Guntata Hruday He - 13 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | गुंतता हृदय हे!! (भाग १३)

गुंतता हृदय हे!! (भाग १३)

आर्या आणि अनिशचे लग्न २ महिन्यांनी ठरलं..दोघांच्याही घरातले खूप खुश होते..जोशी काकू आणि गोडबोले काकू दोघीही लग्नाच्या तयारीला लागल्या..

जोंशी काकूंना सर्व तयारी आर्याच्या पसंतीनेच करायची होती..खरेदी, दागिने, भेटवस्तू, मानपान!!!..बापरे!! किती गोष्टींची तयारी करायची होती..

त्यांना लग्नात कसलीच कसर सोडायची नव्हती..त्यांच्या लाडक्या आर्याचे जे लग्न होते..

गोडबोले काकूंचे ही तसेच होते..पण त्यांना दगदग होऊ नये म्हणून अनिश आणि त्याच्या बाबांनी सगळ्या लग्नाच्या तयारीची जवाबदारी स्वतःवर घेतली होती..

सर्व धावपळ जरी ते दोघे करीत असले तरी काकूंच्या सल्ल्यानुसार सगळे चालले होते..

काकूंना अनिशचे लग्न खूपच धामधुमीत करायचे होते..पण त्याच्या ह्या अचानक च्या आजारामुळे अनिशला हे लग्न अगदी साधेपणाने आटपायचे होते..

पण जेव्हा आर्याच्या घरच्यांनी याला दुजोरा दिला..तेव्हा काकूही यासाठी तयार झाल्या..

आर्या आणि अनिशची सर्व खरेदी ते दोघे मिळून करतील असे ठरले..सगळे काही ठरल्याप्रमाणे होत होतं..

अनिशने एका दुकानातून घरीच साडी खरेदी करण्याचा प्रोग्रॅम ठेवला होता म्हणून गोडबोले आणि जोशी काकू दोघांनाही घरी आरामात बसून त्यांच्या आवडीच्या साड्या खरेदी करता आल्या..दोघींनीही अनिशच्या ह्या कल्पनेची प्रशंसा केली..

हॉल, जेवण, आमंत्रणे!!..बघता बघता काही दिवसांवर लग्न येऊन ठेपलं..

परगावाहून येणाऱ्या मोजक्या पाहुण्यांची सोय ही अनिशने उत्तम रित्या आधीच करून ठेवली होती..जेणेकरून त्याच्या आईला काहीही दगदग न करता सर्वांसोबत वेळ घालवून लग्न उत्तमरीत्या एन्जॉय करता येईल..

इथे, आर्याच्या घरीही जवळ जवळ सगळी तयारी होत आली होती..

आर्याची आत्या काही कारणांमुळे तिच्या साखरपुड्याला उपस्थित राहू शकली नव्हती..पण लग्नासाठी ती आणि तिचे यजमान आणि त्यांचा मुलगा चार दिवस आधीच येणार होते..

जोशी काकूंनी तशी ताकीदच त्यांना दिली होती..आणि तसं पण आपल्या एकुलत्या एका भाचीचं लग्न आत्या कशी मिस् करेल..

आर्याची आत्या??? अहो!! अजून नाही समजलं का तुम्हाला..आपल्या सुमती काकू!! आपल्या गौरीच्या आई!! शास्त्री काकांच्या मिसेस..

आश्चर्य वाटलं ना!!

म्हणजे समीर कितीही दूर गेला तरी तो आर्याच्या जवळच होता..अगदी एका हाकेच्या अंतरावर!!

असो, आर्याची आत्येबहीण गौरी काही कारणामुळे लग्नाला येऊ शकत नव्हती..

आर्या ह्यासाठी गौरीवर थोडी नाराजही झाली पण तिलाही माहीत होतं की, महत्वाचं काम असल्याशिवाय गौरी असं करणार नाही..

पण गौरीने आर्याला लग्नानंतर अनिशला घेऊन एकदातरी बेंगलोरला फिरायला यायला आमंत्रण दिलं..आर्यानेही हो म्हणत संमती दर्शविली..

हा हा म्हणता, लग्न अगदी ४ दिवसांवर येऊन ठेपलं..शास्त्री कुटूंब ही मुंबईत दाखल झालं..

ऋग्वेद आणि वेदांतची तर लगेच गट्टी जमली..जोशी काकू आणि काकांनी शास्त्री कुटूंबाचं स्वागत केलं..

शास्त्री काकू आणि जोशी काकू पुढच्या समारंभाच्या कामाला लागल्या..

दोन्ही घरात पाहुण्यांची रेलचेल वाढली..हळदीचा दिवस ही उजाडला..अनिशला हळद लावून त्याची उष्टी हळद आर्याच्या घरी पोहचवण्यात आली..

दोन्ही घरातल्या मंडळींनी भरपूर नाचतगात..आपापल्या घरी म्हणजे अनिशच्या घरी त्याच्या घरातल्यानी आणि आर्याच्या घरी त्याच्या घरातल्यानी भरपूर धमाल केली..

हळदही खेळली गेली..हळदीचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला..अनिश आणि आर्याची नजरही काढण्यात आली..

हळदीच्या आणि लग्नाच्या मध्ये एक दिवसाचा गॅप मुद्दामूनच ठेवण्यात आला होता..

कारण हळदीला नाचून आणि हळद खेळून जवळ जवळ सगळेच दमले होते..

तसेच लग्नाचा दिवस म्हटला की, एक मिनिट ही कोणाला उसंत नसते..म्हणून लग्नाची तारीख तशीच ठरविण्यात आली होती..शिवाय गोडबोले काकूंना ही जास्त दगदग ठीक नव्हती..

अनिश आणि आर्या दोघेही खूपच खुश होते..इतक्या महिन्यात इतके काही घडून गेले होते की, आर्या समीरला हळूहळू विसरू लागली होती..

तिच्या जीवनात आता ती.. अनिश आणि त्याच्या कुटूंबाला प्रथम प्राधान्य देत होती आणि हेच तिचे कर्तव्य होते..कारण ती आता गोडबोले घराण्याची सून आणि अनिशची अर्धांगिनी जी होणार होती..

लग्नाचा दिवस उजाडला..बँड-बाजासहीत अनिशची वरात लग्नाच्या हॉलवर पोहोचली..

अनिश एखाद्या राजकुमारसारखा दिसत होता..त्याचे स्वागत करण्यासाठी जोशी कुटूंब आणि शास्त्री कुटूंब तयार होते..

पण नशिबात पुढे काय वाढून ठेवले आहे हे कोणीच सांगू शकत नाही..पुढच्या क्षणी काय होईल ह्याची खात्री कोणी देऊ शकत नाही..

अनिश एखाद्या राजकुमारासारखा घोड्यावर बसला होता..गोडबोले कुटूंब व त्यांचे सगळे पाहुणे वरातीत नाचत होते..सगळे खूपच आनंदित होते..

अनिशच्या मित्रांनी फटाक्यांची आतिषबाजी करत..पाच हजारांची फटाक्यांची माळ लावली..आणि जे घडायचे नव्हते तेच घडले..

एक फटाका चुकून घोड्याच्या पायाखाली आला..त्यामुळे तो घोडा पुरता जखमी झाला आणि हा हा म्हणता तो चांगलाच उधळला..त्याने अनिशला पाठीवरुन खाली फेकले..आणि तो गर्दीत मिळेल त्याला तुडवू लागला..

त्याला गर्दीतुन बाहेर जायला वाट न मिळाल्यामुळे त्याने एकाच जागेवर थैमान घालायला सुरुवात केली..तो स्वतःच्या मालकाला ही आवरत नव्हता..सगळे घाबरून गेले..

अनिश चांगलाच त्याच्या तावडीत सापडला..सगळेजण स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सैरभैर पळू लागले..कोणीही पुढे जाऊन अनिशला बाजूला करायची हिम्मत केली नाही..

गोडबोले काकू जिवाच्या आकांताने ओरडत होत्या पण त्या घोड्याने असा काही थैमान घातला होता की, त्याला काबू करणे खरच अशक्य होते..

अनिश भरपूर जखमी झाला होता..त्याच्या डोक्याला मार लागला होता आणि खूप रक्त सुद्धा वाहिले होते..

तो घोडा वाट मिळताच तिथून पळून गेला व त्याचा मालक त्याच्या पाठी पळाला..घोडा निघून जाताच सगळे अनिशकडे धावले..अनिश बेशुद्ध झाला होता..

अनिश घोड्यावरून पडल्यावर तो उठायच्या आधीच त्या घोड्याने अनिशला त्याच्या पायाने मारायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे अनिशला जागेवरून हलने ही मुश्किल झाले होते..

त्याच्या सततच्या मारण्यामुळे अनिश रक्तबंबाळ झाला होता..अनिशला तातडीने गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले..

डॉक्टरांनी त्याची योग्य तपासणी केली पण त्या घोड्याची एक लाथ अनिशच्या छातीवर जोरदार बसल्यामुळे अनिशला जबर आतून मार बसल्याची शक्यता होती..

अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे जरुरी होते..

इथे आर्या खूप छान सजली होती..

तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी घातली होती..गळ्यात आणि कानात साजेसे दागिने घातले होते..हातातल्या हिरव्या बांगड्या हातावर काढलेल्या मेहेंदीला शोभून दिसत होत्या..

कधी एकदा अनिश येतो असे आर्याला झाले होते..

अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती आज आपली आर्या..

इतक्यात वरात आली असा स्निग्धचा आवाज आर्याच्या कानावर पडला..

स्निग्धा आर्याला चिडवायला लागली..आर्या लाजेने अगदी लाल झाली होती..

काही वेळात जोरात फटाक्यांचा आवाज झाला आणि नंतर अचानक कसलीतरी गडबड झाल्याचे आढळून आले..

कसला आवाज हे बघण्यासाठी स्निग्धा बाहेर गेली..पहाते तर काय!!

घोडा उधळला होता आणि त्याने अनिशला खाली पाडले होते..ती आर्याजवळ जाणार इतक्यात आर्याचं बाहेर आली..

घोडा इतका सैरभैर झाला होता की, अनिशला बाजूला काढणे खूपच कठीण होते..

आर्याने स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण तिला दुखापत होऊ नये म्हणून तिला कोणी पुढे जाऊ दिले नाही..इतक्यात अनिश बेशुद्ध पडला..आर्या जागच्या जागी कोसळली..

घोडा त्या गर्दीतून निसटताच सगळ्यांनी अनिशकडे धाव घेतली..कोणीतरी अनिशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी गाडी बाहेर काढली..आर्याही त्या गाडीत बसली..

अनिशची आई आणि आर्याची आई दोघीही रडत होत्या..आर्याची आत्या म्हणजेच आपल्या गौरीची आई त्या दोघींना धीर देत होत्या..

(बँगलोरची सकाळ)

आज गौरीची सकाळ खूपच छान आणि रोमॅंटिक होती..

आजचा पूर्ण दिवस तिने समीर बरोबर घालवायचा ठरवला होता..त्याप्रमाणे तिने सकाळीच उठल्याउठल्या समीरला फोन केला होता..त्यानेही तिला चालेल असे म्हटले होते..

आर्या उठून फ्रेश झाली आणि मग तिने नाश्ता बनवला व ती समीरची वाट पाहू लागली..

त्याआधी समीरला १० फोन करून झाले होते..ती परत फोन करणार इतक्यात तिच्या बाबांचा म्हणजेच शास्त्री काकांचा फोन तिच्या मोबाईलवर आला..

तिने फोन उचलला आणि तिच्या बाबांनी जे तिला सांगितले ते ऐकून तिच्या हातातला फोन खाली पडला..

समीर तेवढ्यातच घरात आला..त्याने गौरीकडे पाहिले आणि तिच्या हातातून खाली पडलेला तिचा फोन उचलला तर तो शास्त्री काकांचा होता..

काकांनी समीरला इथे काय घडले ते सगळे सांगितले आणि तातडीने जी मिळेल ती फ्लाइट पकडून मुबंईला यायला सांगितले..

गौरी अजूनही शॉक मध्ये होती..समीरने तिला पाणी दिले..गौरी हमसून हमसून रडू लागली..

समीरने तातडीने बँगलोर - मुबंई ची २ तिकिटे बुक केली आणि काही वेळातच ते एअरपोर्टला जायला निघाले..

गौरीला आर्याची खूप काळजी वाटत होती..ती पूर्ण प्रवासात नुसती रडत होती..तिने एक चकार शब्द ही उच्चारला नाही..

मुबंई एअरपोर्टवर त्यांना नेण्यासाठी गाडी पाठवली गेली होती..ते आधी हॉस्पिटल मध्ये जाणार होते..

समीरला शास्त्री काकांकडून हेच कळले होते की, गौरीच्या मामेबहिणीचा नवरा हॉस्पिटलमध्ये सिरीयस आहे..आणि त्यासाठी तातडीने गौरीला मुबंईला घेऊन यायचे आहे..

पूर्ण प्रवासात समीर हाच विचार करत होता..

पुन्हा मुबंई!!

क्रमश:

(ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्कीच शेअर करा..धन्यवाद)
©preetisawantdalvi