His father books and stories free download online pdf in Marathi

त्याचा बाप

बाप
दार उघडलं तेव्हा जगदीश समोर उभा होता, बरोबर एक लहान सा मुलगा, त्याच नाव "कैलास" होत ,माझ्या मते ८ १० वर्षाचा असेल , मळकट कपडे, विस्कटलेले केस, फाटक्या चपला.
"साहेब, माजीवाड्या पाशी रस्त्यावरुन चालला होता रडत रडत , मी, बाईक थांबवली मला वाटलं रस्ता चुकला किंवा हरवला असावा"
"तो आपल्या ठाण्या जवळ कपाशी चा बोगदा आहे ना, त्याच्या आजूबाजूला जी वस्ती आहे तिथे रहातो, आई लहानपणी च गेली, बाप सुतारकाम करतो पण तो गेले किती एक दिवस घरी आलाच नाहीय"
"त्या झोपडपट्टीत हॉटेल वजा टपरी त्या वर हा काम करतो, काम संपल की बापाला शोधायला रोज बाहेर पडायचा सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर, ट्रान्स सगळ्या लाईन शोधल्या , सगळी स्टेशन शोधून झाली , भेटेल त्याला "माझ्या बा ला बघितल का ???" म्हणून विचारतो, पोलीस स्टेशन मध्ये पण जाऊन आला, ह्याच्या जवळ त्याचा फोटो नाही, सुनील जगताप बा च नाव आहे एवढंच सांगतो, शेवटी दया येऊन हॉटेल मालका न त्याची झोपायची सोय हॉटेल मधेच केली आहे असे दिवस चाललेत...."
"जगदीश पण मी आता चेन्नईला निघालो रे, तू एक काम कर अस म्हणत मी जगदिशच्या हातात ५०० च्या ३ ४ नोटा दिल्या, मी दोन दिवसात परत येईन मग आपण बघू..."
"पण ह्याचा बाप???"
मी हातातील सॅक खाली ठेवली, बूट काढले हातपाय धुतले आणि स्वामींच्या फोटो समोर बसलो, डोळे मिटून त्या कारुण्य मूर्ती महाराजांना विनंती केली व सर्व लक्ष स्वतः चे श्वासावर केंद्रित केले
(ह्याला शिवस्वरोदय शास्त्र म्हणतात ह्या वर बरीच पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत ती जिज्ञासूंनी जरूर वाचावी)
स्वर बदलले होते म्हणजे ह्याचा बाप जिवंत होता, आता स्वरात कुठलं तत्व चालू आहे ते बघितलं पृथ्वी म्हणजे जवळ पास होता , स्वामींना नमस्कार करून आसन सोडलं"
"काय झालं....?????"
"आहे इथेच, काळजी नको, आलो की बघू"
मी खाली बसलो कैलास च्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला,
"रडू नकोस बेटा, अजून २ ३ दिवसात तुझे बाबा परत येतील..., आता तू ह्या काकांना तुझ घर दाखव, मग २ ३ दिवसांनी ते तुला घ्यायला येतील मग आपण तुझ्या बाबांना पण परत आणू ठीक !!!!"
"खरच भेटेल नव्ह माझा बा"
"हो अगदी नक्कीच..."," पण आज पासून एकदा ही रडायचं नाही..."
कैलास न संमती दर्शक मान हलवली.
"जगदीश तू ह्याच घर बघून ठेव, जेवणाची व्यवस्था कर, ह्याला खाऊ कपडे इ0 घेऊन दे , हॉटेल मालकाशी बोलून ठेव मी तो पर्यंत येतो..."
त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मी airport करता टॅक्सी पकडली.
सॉफ्टवेअर फिल्ड मध्ये मला फिरावं लागे त्याला काही इलाज नव्हता, पण त्या निमित्ताने अनेक सिद्ध महात्मे ह्याच्या सहवासाचा मला लाभ मला स्वामी कृपेने होत असे, अनेक तीर्थक्षेत्रे घडली होती, शेवटी व्यवहारिक जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला काही न काही अधिक उण असायचाच it's part of life....
ऑफिस नंतर संध्याकाळी Chennai येथे असलेल्या कपालेश्वर मंदिरात जाऊन , कालभैरव स्वामींना धूप दीप आदी करून त्यांना मदतीची विनंती करून आलो.
Chennai २ ३ दिवसात आटोपलं, मी घरी आलो तेव्हा रात्री चे दहा साडे दहा झाले होते, घरात जोडी बसलेलीच होती
"सर, हा ऐकेना तुम्ही २ ३ दिवस म्हणालात आम्ही काल ही आलो होतो आणि आज ही"
मी फ्रेश झालो, भूक लागली होती, जगदीश ला म्हटलं "तूम्ही दोघे इथेच जेवा आज..."
कैलास माझ्या कडे उत्सुकतेने बघत होता, मी त्याला म्हटलं
"हे बघ कैलास, ते फोटो तले आजोबा आहेत ना , त्यांना आपण सांगू ते तुझ्या बाबांना नक्की घेऊन येतील"
"पण फोटो तर मेलेल्या माणसाचे असतात"
"तू हॉटेल मध्ये लोकांना पेपर वाचताना बघतोस ना?"
"त्यात खूप लोकांचे फोटो कधी कधी असतात"
"हो एकदा आमच्या गणपतीचा व मिरवणुकीचा पण फोटो आला होता",कैलास उत्साहाने सांगत होता.
"मग त्यातले काय सगळे मेलेले नव्हते ना...???"
त्याने नाही म्हणून मान डोलवली
"हा आजोबांचा फोटो पण तसाच आहे , अडचण आली की त्यांना सांगायचं मग कोणी नसलं की ते फ़ोटो त न बाहेर येतात , आपलं काम करतात आणि परत फोटोत जातात". कैलास लहान होता त्याच्या बाल मनाची समजूत पटली होती.
जेवण आवरली, स्वामी खरच दयाळू आहेत ह्याची परत एकदा खात्री पटली, मला एकदम एका गोष्टी ची आठवण झाली , पूर्वी मी कलकत्ता ऑफिस ला गेलो सगळं आवरून मग मी कामाख्या च दर्शन घाययला आसाम मध्ये गौहाटी येथे गेलो होतो, भगवती चे ते पीठ म्हणजे अतिशय श्रेष्ठ समजलं जातं, तिथे साधना करणारे भाग्यवान च
दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलो तेव्हा मला एक अघोरी साधू भेटला म्हणण्या पेक्षा आडवा आला
"सौ रुपया दो..."
त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की जणू काही मी त्याच १०० रु देणं लागत होतो.
मी खिशात हात घातले , १०० रु ची नोट काढली, स्वामींच स्मरण केलं आणि त्या च्या ओंजळीत ठेवून नमस्कार केला.
त्याचे डोळे भेदक होते , त्यानं एकदा माझ्याकडे बघितलं, एक कागद माझ्या हातात दिला, "आप जो काम करते हो ना , उसके लिए आपके महाराज ने आपको देने को कहा है । इसका गलत इस्तमाल मत करना, । बहोत ही जरूरत होने पर इसे काम मे लाना, माँ कामाख्या की याद करके ।
मी स्वामीं पुढे धूप लावला, तो कागद मी स्वामींच्या तसबिरी मागेच ठेवला होता, त्या कागदावर दूर गेलेल्या व्यक्तीस, हरवलेल्या व्यक्तीस, घर सोडून गेलेली माणस इ0 ना परत बोलवून आणण्यासाठी एक शाबर मंत्र लिहिलेला होता, त्याचा प्रयोग मी एकदाच केला होता आणि आता ही दुसरी वेळ होती.
कैलास च्या हातात एक दोन फुल देऊन मी स्वामींना वाहव्यास लावली, त्याला जगदीश जवळ बसायला सांगितलं,
स्वामींना विनंती केली, महाराज ह्या बालकास मदत करा, महायोगी गुरू गोरक्षनाथ ह्यांना मंत्र फलित व्हावा म्हणून कळकळीची विनंती केली, माँ कामाख्या च ध्यान केलं आणि त्या मंत्रोच्चारास सुरुवात केली, शाबर मंत्र फारच प्रभावी असतात, त्यातले बरेच शब्द समजत नाही किंवा त्याचा अर्थ सापडत नाही पण शब्द किंवा वर्णमाला अश्या तऱ्हेने योजलेली असते की तिचे आश्चर्यकारक परिणाम दिसतात. बाजारात हल्ली शाबर मंत्रावर असंख्य पुस्तक उपलब्ध असली तरी त्यात typo error बघायला मिळतात, पाठभेद सापडतात, काही पुस्तकात तर मंत्रातील शब्दच गाळलेले त्या मुळे त्याचे म्हणावे तसे अनुभव येत नाहीत,
धूप संपला तशी ती सगळी विभूती घेऊन मी उत्तरे कडे तोंड केलं आणि सुनील जगताप च्या नावाने फुंकून टाकली, हा त्या मंत्रातील विधीचा शेवट चा भाग होता,
कैलास माझ्या कडे बघत होता
"कैलास आजोबा आज रात्री तुझ्या बाबांना शोधायला जातील आणि तुझ्या बाबा ना घेऊन च येतील, तू आता घरी जा आणि झोप"
"जगदीश ह्याला पोहोचवून, तू ही घरी जा"
दोघे जण गेले मी घडाळ्यात बघितलं रात्रीचे अकरा वाजत आले होते, कैलास च्या निरागस चेहेऱ्याची आठवण होत होती, त्या मुळे लगेच झोप येईल असं दिसतं नव्हतं, मी स्वामीं समोर त्यांचा जप करत बसलो, नंतर केव्हातरी बेड वर येऊन झोपलो असावा.
जगदीश ला मी कैलास रहातो त्या एरिया मधेच अधून मधून चक्कर मारायला लावली होती.
ऑफिस मध्ये गेलो साधारण दीड वाजता जगदीश चा फोन आला होता
"साहेब आला तो जगताप परत...."
"तू तिथेच त्याच्या जवळ थांब मी आलोच" म्हणत मी स्टेशन गाठलं , मला बघितलं कैलास धावत धावत माझ्या जवळ आला, त्याच्या चेहेऱ्या वरचा निष्पाप आनंद...
"कैलास बघ आजोबांनी आणलं ना पकडून.."
सुनील जगताप ला घेऊन आम्ही एका हॉटेल मध्ये बसलो होतो, बरोबर मी माझा एक सब-स्पेक्टर बांदोडकर ओळखीचा होता त्याला पण घेतलं होतं, कैलास ला खेळायला पाठवून दिल, मालकाने त्याला सुट्टी देऊन टाकली होती.
आधी बांदोडकर ने सुनीलच्या २ कानात वाजवल्या होत्या, मग कैलास कस त्याला शोधत फिरत होता इत्यादी हकीगत सांगितली.
"xxx व्या, माजीवड्या जवळच हायवे आहे, कैलास ला एखाद्या गाडी ने उडवलं असत तर, xxx ल्या नो पोर सांभाळायची नाही तर जन्माला कशाला घालता..."
रडणाऱ्या सुनील ला मी म्हटलं,
"सुनील इतक्या लहान मुलाला सोडून तू जातो ...? "
"साहेब, चुकलं, गरिबी, अडचणी कटकटी ना वैतागून मी खर जीव दयायला निघालो होतो मग हिम्मत झाली नाही, शेवटी कुठे तरी लांब निघून जायचं ठरवलं मग हिथली, कैलास ची रात्री पासून इतकी आठवण यायला लागली की रात्रभर चालून कल्याण फाट्या हुन पायी आलो मी रात्रभर चालत होतो...काही सुचत नव्हतं कधी पोराला भेटतो स झालं.."
"सुनील अरे काही न काही अडचणी, त्रास प्रत्येकाला असतात, लांबून आपल्याला प्रत्येकाचं सगळं कसं छान चाललंय अस वाटत असते पण त्याला ही बिचाऱ्याला काही न काही कटकटी असतात, कोणी कोणाला दाखवत नाही इतकंच, पण त्या करता अस पळून जायचं नसत, हिमतीने सामना करायचा असतो"
"तू कुठे तर तुझा एवढासा पोरगा न कंटाळता सतत ३ साडे ३ महिने तुला शोधत फिरताना सगळ्यांनी बघितलंय त्या वरुन तू काही तरी शिकायला हवं"
"घर सोडून गेलली व परत कधी न आलेली अनेक कुटुंब मी फार जवळन बघितली आहेत, उद्धवस्त होतात अशी घर, अरे अश्या घरातील माणस जिवंत असून मेल्या सारख जीण त्यांच्या नशिबी येत, त्यात लोकांची टीका कावळ्या सारखी चोच मारत असते", त्याच्या हातात स्वामींचा फोटो दिला आणि त्याच्या कडून वचन मागून घेतलं परत अशी राख डोक्यात घालणार नाही
कैलास धावत आला
"बाबा हे आजोबा तुला भेटले का....?, मग कुठे गेले...","मला ह्या काकांनी सांगितलं होतं आजोबा तुला घेऊन येतील..."
मी कोणाच्या लक्षात येणार नाही अश्या डोळ्यांच्या ओलवलेल्या कडा पुसल्या.
दोघांचा निरोप घेतला, कैलास च्या हातात एक तांब्याची सर्पअंगुलीका स्वामी महाराजांचे नावाने मंत्रवून घातली, बांदोडकर ही निघाला त्याला कळवा पोलीस स्टेशन मध्ये काही तरी काम होत.
"जगदीश खरच स्वामी महाराजांची कमाल आहे बाबा, २ अडीच कोटी लोकांतून ह्याला परत आणलं.."
"सर, खर आहे, तुम्ही लिहीत गेलात तरी हे अनुभव संपणार नाहीत..."
खर होत ते,
स्वामींचे अनुभव पूर्वी येत होते आता ही येतातच, पुढे येत रहातील त्या करता त्यांना कोणा अविनाश ची गरज नाही,
जे सेवा करतील त्यांना नक्की अनुभव येतील हे स्वामी महाराजांचं वचन आहे
"अशक्य ते शक्य करतील स्वामी...."
ठाण्याला आनंदभरतींच्या मठात जाऊन ,आनंदभारती व स्वामींच दर्शन घेतलं, जगदीश घोडबंदर ला निघून गेला मी घरी आलो

सुनील आता कळवा स्टेशन बाहेर "श्री स्वामी समर्थ" टी स्टॉल चालवतो. कधी कल्याण ला भावाकडे गेलो तर व्हाया कळवा सुनील च्या इथे चहा पिऊन मग जातो.

"मग सुनील, परत कधी घर सोडून जाणार...???"

"मग भूतकाळ ताजा होतो, सुनील चे भरलेले डोळे आश्वस्त करतात कधीच नाही"

कैलासला स्वामीं सेवेची गोडी लागल्याने स्वामीं नी त्याचा सगळं भार उचललाय हे जाणवत रहात, २ ३ रिक्षा, कळव्यात छोटस हक्काचं घर, जीव लावणारी सहचारिणी आणि दोन गोड मुलं......

स्वामींच्या लिला स्वामीच जाणे


अविनाश
@स्वामी@