Yedi_Suni books and stories free download online pdf in Marathi

येडी_सुनी

#लघुकथा


खिडकीच्या बाहेरून ओढा वहात होता,अशक्त पिवळसर उजेड असलेल्या त्या महिलाश्रामाच्या खोलीत बसणं मला नकोसं झालं होतं पण मला ‘तिला’ एकदा पहायचं होतं.

गावी पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा माझ्याच वयाची, दहा /अकरा वर्षांची असेल.काळवंडलेला चेहरा,बारीक डोळे,धारदार नाक न तेलाचा बोट नसलेल्या कोरड्या दोन वेण्या.बटनं निघाल्याने घसरत असलेल्या फ्रॉकला पुन्हा खांद्यावर घेत ती उकीरडा चाळत होती. तिला “काय शोधतेय?” विचारल्यावर फाटक्या कोरड्या ओठांमधून वेडगळ पण मनापासून हसत, वसकन तोंडासमोर येत “केसं” एवढंच बोलली.

मी घाबरून मैत्रीणमागे लपले. ती म्हणाली-
“ अग येडी सुनी य ती”

मंदसर,भोळी सुनी उकिरड्यावर,रस्त्यावर केसांची गुंतवळ शोधायची आणि सुयापोतवालीकडून फुगे घ्यायची.मुली तिला चिडवायच्या,कधी खडा मारून फिदीफिदी हसायच्या, लागल्याजागी चोळत ती पण “हि हि” करून हसायची.
कधी तिच्यासारखीच धुरकटलेली वाटणारी तिची आई तिला शोधत यायची आणि पाठीत गुध्धा मारून, कधी गोंजारून घेऊन जायची.एकट्या राहणाऱ्या पारबताच्या काळजाचा तुकडा होती ती.
कधी पारावर दुरूनच आमचा खेळ बघत उभी असायची. आम्हाला कैऱ्या,चिंच खाण्याची हुक्की आली की एखादी बेरकी मैत्रीण तिला हुकूम सोडायची-“येडी सुनी चढ वं झाडावर” ती लगेच तयार व्हायची.
एकदा ती वर चढणार हे पाहून मला तिच्या फाटक्या फ्रॉकची चिंता वाटू लागली. मी म्हटलं-“ तुझा फ्रॉक फाटेल” तेव्हा हसत ती म्हणाली–“मी जांघ्यात खोचते ना.”
तिने तो तसा खोचला,तिच्या कोरड्या,भेगाळलेल्या,धुळमातीने हिरवट झालेल्या पोटऱ्या,मांड्या उघड्या पडल्या.
तोंड दाबून “अव्वाबाई” म्हणत पोरी फिदीफिदी हसल्या,मला वाईट वाटलं,उगाच सहानभूती,दया वाटायला लागली.
खेळून झाल्यावर मी तिला म्हटलं-“सुनी असा फ्रॉक वर नाही करायचा,लोकं हसतात आणि रोज साबण लावून अंघोळ करायची.” कैरीवर दात रुतवून ती फक्त हसली.

गावाबाहेरच्या मंदिराच्या रस्त्याला तिचं घर होतं.मी मंदिराकडे जात असतांना तिने मला हाक दिली,सोबतच्या मुली पुढे निघून गेल्या. कुणी बघणार नाही याचा अंदाज घेत मी तिच्या घरात गेले. अंधूरक्या एक खोपी घरात एका बाजूला मोरी आणि एका बाजूला चूल होती.पाटीवर काही हंडेलीमचे डबे,किडूक मिडूक भांडी . खाटेवर जुन्या कुबट गोधड्या पडल्या होत्या,मला पाहून तिच्या आईने “व माय तालुक्यानी पाहुनी बाई का?”म्हणत कौतुकाने आत बोलावलं.
फळीवरून स्टीलचा,नक्षीदार ओशट ग्लास काढून त्याचं बुड अंगावरच्या मळक्या साडीला पुसून स्वच्छ केलं न बाहेरून शेवाळलेल्या माठात घालून माझ्यासमोर धरला.मला डचमळून आलं,मी नाही म्हटलं तशी ती वरमली आणि पीळल्यागत हसली.
“एक गम्मत दाखाडू?” ओठांच्या कोपऱ्यावर जमलेली थुंकी पालथ्या मुठीने पुसत सुनी म्हणाली आणि ओढतच मोरीत घेऊन गेली. तिने माझ्या हातावर ओलसर गुलाबी असा साबण ठेवला. काळोख्या,थंड मोरीत लघवीच्या आणि साबणाच्या वासाचं विचित्र थंडगार मिश्रण भरून राहिलं होतं,मला उचमळलं,मी बाहेर आले. कौतुकाने बघत तिची आई म्हणाली-“बाई तू सांगेल व्हतं ना साबण लाई अंघोय कर म्हणून आणा हा साबू बरं”
साबणाचं त्यांना कोण अप्रूप वाटलं.माझे डोळे उगाच भरून आले.
नंतर गावी गेले ते थेट दहावीच्या सुट्टीत,कोरड्या बांधावर वेडी बाभळ तरारून वाढावी तशी सुनी अंगापिंडान भरली होती,क्षणभर तिचं सौष्ठव पाहून बारीक असूया देखील वाटली. पुन्हा वर्षाने गावी आल्यावर पोरींनी फिदीफिदी हसत तिला दिवस गेल्याचं आणि जिल्ह्याच्या महिलाश्रमात ठेवल्याचं सांगितलं,काळीज पिळवटून निघालं.
तिच्या आईला भेटावं म्हणून मी उगाच मंदिराच्या दिशेने गेले,घर तसचं काजळी धरल्यासारखं होतं. “कुण्या भाड्खाऊने माझी पोर नासवली ग” म्हणून पारबताने गळा काढला.

त्यानंतर आज दहा वर्षाने ह्या आश्रमात येण्याचा योग आला,सुदैवाने ती इथेच होती आणि त्या कोवळ्या वयात राहिलेलं पोर जन्मताच मेलं होतं म्हणे.

एकदम आलेल्या साबणाच्या भपक्याने मी मागे वळून पाहिलं, अनोळखी नजरेने तसच विचित्र “हि हि” हसत येडी सुनी उभी होती, सात/आठ महिन्याचं पोट दिसत होतं.
मला गलबलून आलं.

खिडकीच्या बाहेरून ओढा वहात होता,लोकं त्यात घाण टाकत होती...ओढा तसाच वहात होता...!

©हर्षदा

#उन्हाच्या_गोष्टी