ह्या कोविड मारामारीच्या दरम्यान मी काय शिकले? books and stories free download online pdf in Marathi

ह्या कोविड मारामारीच्या दरम्यान मी काय शिकले?


पेराल तसे उगवेल', 'जशास तसे', 'स्वतः कुर्‍हाडीवर पाय देणे' अशा अनेक मराठीतील प्रचलित म्हणी आपण ऐकतो किंवा उच्चारतो.मात्र यातील शोकांतिका अशी की, मानवानेच या म्हणी बनवल्या आहेत आणि त्याला त्याचा अर्थ माहित असुन देखील तो त्या पाळत नाही. सांगायचचं झालं तर, आचरणात किंवा त्याच्या वागण्यात आणत नाही. परंतु आज आपल्याला ह्या म्हणी चांगल्याच अनुभवायला मिळालेल्या आहेत. आज एका लहान मुलांपासून तर वयोवृद्धांच्या तोंडातून एक शब्द नऊ ते दहा वेळा नक्की ऐकायला येतो तो म्हणजे "कोरोना".

जिकडे बघाल, जिथे बघाल, जसे बघाल तिथे कोरोना, कोरोना आणि फक्त कोरोना. एखाद्या मतदानाच्या निकालाच्या वेळेस ज्याप्रमाणे टीव्ही वर आकडे यायचे त्याप्रमाणे कोरोना संक्रमितांचे आणि मृत्यूचे आकडे दर टीव्हीवर आज-काल आपल्याला पाहायला मिळतात. माणसाने किती प्रदूषण, वृक्षतोड,अनिर्बंध शिकार, अमर्याद लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगीकीकरणाचा दर वाढवला तरी निसर्गाच बघा ना, त्याचा स्वतःचा समतोल राखण्याबरोबर तो माणसाला किती काय शिकवतोय!

कोरोना नावाचा व्हायरस (सूक्ष्मजीव) मानव राज्यात अन्यायाचा श्रेय तर मानवाचेच आहे यात काही वेगळे सांगायला नको. परंतु "मानवा तुझ्या चुकांचा घडा भरत आलाय" असा संदेश देण्याबरोबरच आपल्या धगधगत्या जीवनाला विरामचिन्ह देण्याचं काम निसर्गाने केलंय.भले कोरोना नामक जीवाने अनेकांचे प्राण घेऊन त्याच्या कामाची सुरुवात केली असेल, मात्र या कोविड महामारीच्या दरम्यान मी च नाही तर संपूर्ण मानवजात खूप काही शिकलीये.

या महामारीच्या काळात अनेकांनी त्यांच्या दुरावलेल्या मित्राला जवळ बोलावले. तो मित्र म्हणजे पुस्तक. या काळात मी छोट्या-छोट्या गोष्टींमधला आनंद घेण्याबरोबरच पुस्तकांच जग वाचायला शिकली. कुटुंबासोबत वेळ घालवून,चर्चा करून मी त्यांचे अनुभव जगायला शिकले. आठवड्याला चित्रपट बघण्याबरोबर मी चित्रपटांचे जग वाचायला शिकली. माझ्यात असलेल्या क्षमता, गुण ओळखायला शिकले. नवीन पदार्थ बनवण्यासाठी त्यात टाकाव्या लागणाऱ्या साहित्यांच्या योग्य प्रमाणाबरोबर, मी जीवनात नात्यांचं महत्व समजायला शिकली. कोणत्याही गोष्टीला मर्यादा घातल्या तर, त्या तिथेच थांबवता येऊ शकतो यामागचे मर्म मी शिकले. आपल्याला सुखदुःखात दुसऱ्याला सामील करून घेण्याची रीत मी शिकले. जुन्या आठवणीतील चव चघळून मी त्या जगायला शिकले. ऐवढे दिवस स्वातंत्र्यात राहिल्याने अचानक पाच महिने घरात राहण्याची सत्यता, मी अनुभवायला शिकले. एकच प्रजात असून देखील माणूस-माणूस लांब राहायला लावण्याची शिक्षा मी भोगायला शिकले. हळूहळू घरातील कामे करण्याबरोबरच मी माणसातला माणूस माणूसपण ओळखायला शिकले. पैशांची किंमत करणे बरोबर मी माणसाच्या जीवाची किंमत करायला शिकले. आपल्यांपासून लांब जाण्याचे दुःख काय असते याची मी कदर करायला शिकले. माणूस हा माणूस आहे कोणी देव नाही याची सत्यता मी जाणायला शिकले. श्रीमंतांनी किती काही केले अखेर त्याचा झटका गरिबांना सर्वप्रथम बसतो याची जाणीव आणि सामंजस्यता बाणायला मी शिकले. आणि अखेर माणूस चुका करेल तर त्या चुका सुधारण्याची संधी देण्याबरोबरच त्याची शिक्षा निसर्ग कशाप्रकारे देतो, अशा उदार मनाच्या निसर्गाची मी काया ओळखायला शिकले!!!!!

लेखक:-ज्ञानेश्वरी ह्याळीज

नमस्कार वाचकांनो🙏....

हा एक लेख आहे.... ह्या लाॅकडाऊन च्या काळात अनेक लोक खूप काही शिकली खूप काही केलंय आणि मी पण त्यातलीच एक आहे .पण एकंदरीत लेख लिहायचा म्हटल्यावर काही मोजक्या शब्दात तो मी लिहिलेला आहे. कोरोना आल्याने जेवढे तोटे झाले आहेत तेवढेच फायदे पण झाले आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती च आहे .. तब्बल पाच ते सहा महिने आपण घरात राहून सगळ्यांनी लॉकडाउन चांगलाच अनुभव घेतलेला आहे तुम्ही पण लॉकडाउनच्या काळात काय-काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या किंवा शिकले आहात ते मला तुम्ही प्रतिक्रियांमध्ये सांगायला आजिबात विसरू नका.....आणि कसा वाटला तेही सांगा...

आणि हो माझ्या कथेला भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद ....🙏