Bahirji - Third Eye of Swarajya - 8 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 8

८. गुंजनमावळ

      सुरुवात तर झाली होती. श्री रायरेश्वर मुक्त करून! आपल्या हाती एखादा बळकट किल्ला असावा असे आता सर्वांना वाटू लागले. चर्चा, मसलती झडू लागल्या. शिवापूरचा वाडा मावळ्यांनी गजबजून गेला. मावळ्यांची संख्या वाढू लागली. तान्हाजी, येसाजी, नेताजी यांच्या हाताखाली कसरती होऊ लागल्या. 

        राजांचा मुक्काम गुंजवणे भागात वाढू लागले. आता लक्ष होतं, तोरणा आणि मुरुंबदेवाचा डोंगर. रायरेश्वरावरून पुण्याच्या दिशेने पाहिलं कि, सिंहगड दिसायचा.त नजर थोडी डावीकडे वळवली कि, आकाशाला गवसणी घालणारा तोरणा नजरेत भरायचा. त्याला लागूनच होता मुरुंबदेवाचा डोंगर! बहिर्जीने मारत्या, सुंदऱ्या, राणोजीला या कामाला लावले होते.

        पुणे प्रांतातील सर्वांत उंच असलेला किल्ला! गडावर तोरण जातीची फुलझाडे असल्याकारणाने गडाला तोरणा नाव पडले असावे! शिवाय गडावर तोरणेश्वर आणि मेंगाई देवीची मंदिरेही होती. गडावर जाणार सर्वच वाटा, अवघड आणि अभ्या कड्यावरून जाणाऱ्या! पुण्याच्या दिशेला , वेल्ह्याकडून गडाचा बिनी दरवाजा तर दुसरा पश्चिमेला कोकणच्या दिशेने असल्याने कोकण दरवाजा! गडाच्या आजूबाजूला गडावर आणि परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी सात आठ चौक्या होत्या. मचाणावर एखादं दुसरा पहारेकरी लक्ष ठेऊन असायचा. एवढी सगळी बलस्थानं असल्यामुळे आदिलशहाचे गडाकडे दुर्लक्ष होते. गडाच्या खर्चासाठी विजापुराहून दमडाही मिळत नसे. मुसलमानी किल्लेदार आजूबाजूच्या परिसरातून मिळणारा सारा आणि वसूल हडप करायचा. गडावर शंभरावर शिबंदी होती. पहारे, तोफा, गस्त वगैरे काहीही व्यवस्था धड नव्हती. गड तसा बेसावधच! कशाला कोण इकडे मरायला येईल! म्हणून विजापुरी किल्लेदार नेहमी नाचगाण्यात आणि शराब मध्ये दंग असायचा. पहारेकरीही निवांत झोपा काढत.

        बहिर्जीने गडाची मिळालेली माहिती राजांसमोर पेश केली. राजे वाड्यातल्या सदरवेर दादोजी, नेताजी, जिवाजी  यांच्यासोबत योजना आखण्यात दंग होते. बाकीचे आजूबाजूला उभे होते. तोच एक शेतकरी धाय मोकलून रडत भेकत मदतीची याचना करत वाड्यात येऊ लागला. राजांची भेट मागू लागला. बाहेर चाललेला गोंधळ ऐकून राजे बाहेर आले.

"काय झालं? कोण आपण?"

"राज... वाचावा.. राज...."

"काय झालं सांगाल काय?"

"म्या... गुंजवण्यातला शेतकरी हाय जी. बायका पोरी घिऊन सासरला गिलतु जी... माघारा येताना जंगलाच्या रस्त्यानं त्या मुडद्यांनी सगळं सोनं नाणं लुटून न्हेलं जी. गाडी, बैलं सारं न्हेलं राज... कसंतरी बायका पोरास्नी देवाची आण घालून सोडवून आणलंय. गरिबाला वाचवा राज..."

"दादोजी... हे काय? अजूनही असे प्रकार थांबले कसे नाहीत."

"राज... त्या भागात... इजापूरची ठाणी हायीत... त्यामुळे तिकडं फिरकता येत न्हाई... एक दोनदा त्या दरवाडोखोरांचा बंदोबस्त क्येला पर... बादशाच्या सैनिकांची मदत हाय त्यांना..."

"म्हणजे? त्यांचा बंदोबस्त होणारच नाही?"

तोच तान्हाजी म्हणाला, "राजे, म्या बगतु... उद्याच्याला तुमच्या म्होरं हुभा करतो."

मध्येच बहिर्जी म्हणाला, "राज... मारत्या आणि राणोजी त्याच भागात फिरत्यात. म्या बगतु राज... ईव्ह का?"

"बहिर्जी... काळजी घ्या...", राजे आणखी काही पुढे बोलतील, तोच बहिर्जी मागे जात मुजरा करत त्याच्या साथीदारांना घोगऱ्या आवाजात म्हणाला, "चला... रं...."

        नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे नुसता चिखल झाला होता, पाय ठेवला कि गचकन आत रुतत होता. सगळीकडे सामसूम होती, फक्त पानांची सळसळ चालू होती. मधूनच एखाद जंगली श्वापद आजूबाजूच्या झुडपातून जोरात पळत सुटायचं. बहिर्जी मारत्या अन त्यांचे दहा बारा साथीदार, हळू हळू झाडा झुडपांचा आसरा घेत पुढं पुढं सरकत होती. झाडांच्या पानांवर साचलेलं पावसाचं पाणी वाऱ्याची झुळूक आली कि खाली पडायचं. आधीच ते पावसाने भिजून गारठून गेलेले, त्यात ते गार पाणी अंगावर पडलं कि शिसारीच यायची. सर्रकन अंगावर काटा उभा राहायचा. अन तोंडातून आपसूकच, 'स्स्स्स्स....' असा आवाज यायचा. कुणाच्या हातात भाला तर कुणाकडे तलवारी होत्या. दोघं जण बहिर्जीच्या मागून तिर कामठा घेऊन दबकतच पाय टाकत होते. त्याच्या डोक्यावरच पिवळं मुंडासं भिजून डोक्यावर घट्ट बसलं होत. त्याच्या धारदार मिशीचा आकडा पाण्याने भिजल्यामुळे खाली लोम्बत होता. त्याच्या भेदक नजर जणू गरुडाचं सावजच शोधत होती. हातातलं सोन्याचं कड त्याने किंचित मागे घेऊन घट्ट फिरवलं. डाव्या हाताने त्याने पलीकडे झुडपात लपलेल्या मारत्याला आणि साथीदारांना पुढे जाण्याचा इशारा केला.

ते कुठं दोन चार पावलं पुढं जातात न जातात तोच समोरच्या झाडावरून, "कुहुऊऊउ कुहुऊऊऊउ." आवाज आला.

हा तर त्याच्या ओळखीच्या आवाज. समोरून कोणतरी येत असल्याची ती खून होती. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या पुढे होऊ घातलेल्या साथीदारांना थांबण्याचा इशारा केला. सगळे आता दबा धरून बसले होते. समोरून आता किती लोक येतायत अन त्यांच्याकडे हत्यारे आहेत कि नाही काही? कळायला काही मार्ग नव्हता.  झाडाच्या मागे लपून तो समोर एकटक बघत होता, डोळ्याची पापणीही लवत नव्हती त्याच्या. अन अचानक एक धारदार कुऱ्हाड वेगाने त्याच्या दिशेने येताना दिसली. दुसऱ्याच क्षणी तो खोडामागे गर्रकन वळला, त्याला कुणीतरी पाहिलं असावं कदाचित. वीतभर लांब असलेलं त्या कुऱ्हाडीच पात खटकन खोडात रुतलं. खोडाची एक ढपली गरगर फिरत बाजूला पडली.  क्षणाचाही विलंब न करता त्याने त्याच्या पाठीमागे असलेल्या तिर कामठा घेतलेल्या साथीदारांना इशारा केला. इशारा होतो न होतो तोच चार पाच तिर "सुं सुं" करत त्याच्या जवळून जिथून ती कुऱ्हाड आलेली होती त्या दिशेने सुटले. दुसऱ्याच क्षणी कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला.

अन समोरच्या झाडीतून "हाना मारा" म्हणत सात आठ दांडगे त्याला येताना दिसले.

बहिर्जीने आपली तलवार अन डाव्या हातातली कुऱ्हाड उंचावली. अन, "हर हर महादेव.." म्हणत त्यांच्यावर तुटून पडला.

त्याचे साथीदारही हातातल्या तलवारी आणि भाले उंचावत आरोळ्या ठोकू लागले, "हर हर महादेव".

एकच हाणामारी अन कापाकापी सुरु झाली. अगदी काही वेळातच त्या हल्लेखोरांमधील चार पाच मुडदे पडले होते. त्याचा अंगरखा रक्ताने माखला होता अन त्याच्या गळ्यातली जंगली प्राण्यांच्या पांढऱ्या शुभ्र दातांची माळ रक्ताने लालेलाल झाली होती. त्याच्या उजव्या दंडातून रक्त येत होत. उरलेले दोघेजण पळून जायच्या तयारीत असतानाच त्यांच्या पाठीत कचकन तीर घुसले अन व्हिवळतच ते खाली कोसळले. तरीसुद्धा ते सरपटत खुरडत दूर जायचा प्रयत्न करत होते.

तो, "धरा रे त्या हाराम्यांना, अन मुसक्या आवळा त्यांच्या."

त्याच्या दोन तीन साथीदारांना पण जबर जखमा झाल्या होत्या. मारत्याच्या मांडीवरही कुऱ्हाडीचा निसटता वार झाला होता. जखम खोल नव्हती पण चालताना त्रास होत होता. त्रासून तो म्हणत होता.

"च्यायचं बांडगुळ... लईच उड्या हाणत हुतं."

आपल्या जखमी साथीदारांना अन त्या दोन हल्लेखोरांना घेऊन बहिर्जी मुक्कामाच्या दिशेने दौडू लागला.

        संध्याकाळ होत आली होती. वाड्याच्या बाहेर आंब्याच्या पारावर राजे, तान्हाजी, येसाजी गप्पा गोष्टी करण्यात मग्न होते. बाहेर कसला तरी गोंधळ गडबड चालू असल्याचा आवाज येऊ लागला होता.

"थांब मुंडकच पिरगाळतु त्येच.."

"टक्कुऱ्यात दगुड घाल त्याच्या आयला त्येच्या."

"भालाच घालतू हेच्या ..**** "

मारत्या त्रासून एकेकाला बजावत मागे सरायला सांगत होता. "आरं व्हय मागं."

आज पुन्हा द्वारपालाशी हुज्जत घालावी लागणार अस वाटत असतानाच स्वतः राजेच बाहेर आले. सगळ्यांनी राजांना लवून मुजरा केला. पण ते दोघे हल्लेखोर गुर्मितच उभे होते.

राजे,"काय चाललंय हे?"

तो, "राज, हेच ते दरवडेखोर."

"वाह शाब्बास, आम्हाला खात्री होतीच कि तुला दिलेलं काम चोख पार पडणार."

बहिर्जी, "न्हाय जी. तुम्ही सांगावं अन आम्ही ऐकावं."

राजाच हात नकळतच स्वतःच्या गळ्यातील माळेकडे गेला.

राजा,"हं. यावर आपण नंतर बोलू."

त्या दोन लुटारूंकडे नजर वळताच राजाचा पार चढला. मुठी आवळल्या गेल्या. डोळ्यांतून नुसता अंगार. विस्तवाच्या ठिणग्या पडाव्या तसे ओठांतून शब्द बाहेर पडू लागले.

"आया बहिणींची अब्रू अन गोरगरिबांचं कष्टानं कमावलेलं धन लुटणाऱ्याला या राज्यात थारा नाही."

"वाईट नजरेने स्त्रियांना पाहणारे यांचे डोळे काढा अन परस्त्रीच्या अब्रूवर हात टाकणारे यांचे दोन्ही हात खांद्यापासून कलम करा. अन फेकून द्या त्यांना त्याच जंगलात कोल्ह्या कुत्र्यांना खायला."

अन झपझप पावले टाकत राजे वाड्यात चालते झाले. बाहेर त्या दोन्ही दरोडेखोरांच्या किंकाळ्या अन जिवाघेणा आक्रोश चालू होता. त्यांची विल्हेवाट लावून बहिर्जी वाड्याकडे दौडू लागला.

~ जय शिवराय ~

क्रमश:....