Bahirji - Third Eye of Swarajya - 10 - The last part books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 10 - अंतिम भाग

१०. निशाणाचा हत्ती

            तोरण्यापाठोपाठ त्याच्या जवळचा मुरुंबदेवाचा डोंगरही थोडासा प्रतिकार करताच हाती लागला. तोरण्यावर राजांना हिरा, मोहरांनी भरलेले हंडे सापडले. गडांच्या डागडुजीसाठी तोरणेश्वराचा आशीर्वाद मिळाला. राजांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावर लढाई न करताही चाकण, पुरंदर, तिकोना आणि आजुबाजुचा परिसरही आपल्या अधिपत्याखाली आणला. रायरेश्वराजवळचा रोहिडा किल्लाही जास्तीचा विरोध न करता आपला केला. रोहीड्यावर राजांनी बाजी - फुलाजी हि प्रभू देशपांड्यांची जोडी तर जावळी खोऱ्यामध्ये मुरारबाजी असे एकना अनेक हिरे आपले केले. बाजी पासलकरांच्या आन कान्होजी जेधेंच्या सेनाधिपत्याखाली फतेहखानाची स्वारीही यशस्वीपणे परतवून लावली. पण या वेळी स्वराज्यासाठी पहिले बलिदान बाजी पासलकर आपल्या नावावर करून गेले.

        राजधानी म्हणून राजगड हा मुरुंबदेवाचा डोंगर नावारूपाला आला. स्वराज्याची खलबतं, चर्चा मसलती राजगडावरच्या सदरेवरून होऊ लागल्या.

        आता बहिर्जीच्या मागेही कामाचा व्याप वाढू लागला. फतेहखानाच्या स्वारीत बहिर्जीच्या हेरांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय होती. त्याच जोरावर फतेहखानचा सपशेल पराभव करता आला. शिवाय, शिरवळच्या ठाणेदाराला कायमचा विजापूरचा रस्ता दाखवला. राजगडावर बहिर्जीचा प्रधान मंडळामध्ये हेरखाते प्रमुख म्हणून मनाची पगडी, पोशाख, तलवार, शिक्केकट्यार आणि हेरांचा नायक "नाईक" हा किताब बहाल करण्यात आला. आऊसाहेबांनी स्वहस्ते त्याच्या पगडीमध्ये मोत्यांनी लगडलेला मखमली तुरा खोवला. बहिर्जी कृतकृत्य झाला. रामोश्याचा बहिर्जी, बहिर्जी नाईक जाधव झाला. स्वराज्याच्या हेर खात्याचा प्रमुख 'बहिर्जी नाईक' झाला.

        विजापुरातून आता नक्कीच काहीतरी मोठे पाऊल उचलण्याची शक्यता होती. बहिर्जी महिनाभर विजापुरातच होते. खबर मिळाली! अफजलखानाला दरबारामध्ये बोलावण्यात आल्याची! बहिर्जीने हिकमतीने दरबारामध्ये प्रवेश मिळवला. बहिर्जीची शंका खरी ठरली. 'राजांना जिवंत वा मृत पकडून आणून दरबारात हजर करण्याची शपथ खानाने दरबारासमक्ष घेतली.' आदिलशहाने त्याला मोहिमेसाठी स्वतःचा ढालगज हत्ती भेट दिला.सोबत दहा हजार पायदळ, तेवढंच घोडदळ, उंट, हत्ती, तोफा, दारुगोळा आणि मोहिमेसाठी खजाना!

              विजापुरात खान त्याच्या गाडीवजा वाड्यात थांबला होता. दोन दिवसांनी दख्खन कडे कूच करायचे होते. तो नेहमी मोहिमेला निघायच्या आधी त्याच्या एका फकीर बाबाकडे जात असे अन त्या त्या मोहिमेचे भविष्य काय असेल ते विचारत असे. या वेळीही त्याने त्या फकीर बाबाला या मोहिमेच्या भविष्याबद्दल विचारले होते अन त्या दिवसापासून तो खूप तणावात अन रागात असे. आता कुणीही नोकर चाकर त्याच्या जवळ फिरकतही नसे. कारण चार पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या वेळी त्याच्या आसपासच्या नोकर चाकरांनी त्याच्या जनानखान्यातून स्त्रियांच्या मरणांतिक आर्त किंकाळ्या ऐकल्या होत्या. त्याच्या नोकर चाकरांमध्ये अन राज्यामध्येही काही अफवा पसरल्या होत्या. काय खरे अन काय खोटे त्यालाच माहित. त्याच्या जनानखान्यात एकूण साठ सत्तर स्त्रिया होत्या. पण त्या फकीर बाबाला भेटल्यापासून त्याने त्याच्या सगळ्या स्त्रियांना एका मोठ्या विहिरीमध्ये ढकलून दिले, विष पाजून मारले किंवा त्यांची कत्तल केली होती म्हणे. सगळ्या नगरामध्ये याचीच कुजबुज अन चर्चा मात्र चालू होती.

            बहिर्जीने चारपाच हेर अगोदरच खानाच्या नोकरांमध्ये लावून दिलेले होते. आणि वीस पंचवीस तगडे लढाऊ मावळे खानाच्या हवेलीच्या आसपास पेरून ठेवलेले होते. काहीही करून हि कामगिरी फत्तेच करायची अन मगच राजधानीकडे कूच करायची त्यांची योजना होती. त्यांनी खानाच्या मोहिमेच्या ढालगज हत्तीला चारा कुठून कुठे, अन कोण घेऊन जात याची माहिती मिळवली होती. कारण, त्या शिवाय त्यांना खानाच्या हवेलीबद्दल काहीच माहिती मिळणार नव्हती. बहिर्जीने चारा कामगारांमध्ये एक जागाही मिळवली होती. अन आज तो स्वतः चारा घेऊन जाणाऱ्या कामगारांत सामील होऊन हत्तीखान्यामध्ये ये-जा करत होता. तिथून जवळच काही अंतरावरून खानाची हवेली नजरेस पडत होती. सगळीकडे त्याची चाणाक्ष नजर भरभर फिरत होती. बारीक सारीक प्रत्येक गोष्टींचा त्याच्या मेंदू मध्ये भरणा होत होता. रात्री बहिर्जी आणि त्याचे पाच सात वीर, चारा ठेवण्याच्या कोठारात जमले होते.

"हे बघा गड्यांनो, उद्या सूर्य उगवायचा आधीच आपल्याला हे काम फत्ते करायचं हाय."

"अन टाकोटाक वेषांतर करून निघायचं. म्होरं कोण आलाच तर हयगय करून नगा."

ती रात्री सगळ्यांनी जवळ जवळ जागूनच काढली. 

              सकाळ झाली तशी नोकरांची पळापळ अन आरडा ओरडा चालू झाला. सगळीकडे बोंबाबोंब झाली होती. लवकरच खानाला हि बातमी कळाली. अन धावत पळतच तो त्या ठिकाणी पोहोचला.

"या अल्लाह, कैसे हुआ ये सब?"

त्याने जवळच उभ्या असलेल्या त्याच्या नोकराच्या नरड्याला धरून उचलले अन दूर फेकून दिले. 

"कमिनों, क्या कर रहे थे तुम? सारे के सारे निकम्मे हो तुम।"
"और ये माहूत कैसे मरा. किसनेsssss किसने sssssss किया येsssssss?"

एक नौकर घबरातच दबक्या आवाजात बोलला, "पता नही हुजूर, सुबह से दलगज जगा हि नही और ये माहूत भी अपनी जगह पर मरा पडा था."

खानाचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, डोळ्यांतून अंगार बरसत होता.

"जो कोई है, उसे पकड़ो और मेरे सामने पेश करो। वरना यंहा जो कोई है, किसी की खैर नहीं।"

                  नगरामधे एकच अफरातफरी माजली होती, एखाद्याचा जरा जरी संशय आला तरी त्याला पकडत होते. नाईकांचे पाच सहा साथीदार अजून खानाच्या हवेलीलगतच घिरट्या घालत होते. संध्याकाळ व्हायच्या आत दहा पंधरा जण पकडले गेले. त्यात नगरातले भिकारी आणि भिक्षा मागणारे बैरागी पण होते. मोहिमेला जायच्या आधी खानाचा हत्ती अन माहुताला विष देऊन मारण्यात आले होते. या आरोपाखाली सगळ्यांना पकडून आणले होते. हा खूपच मोठा अशुभ शकुन मानला जायचा. कारण त्यामुळे मोहिमेमध्ये अडथळे निर्माण होऊन मोहीम नाकाम होते. असा समज त्या काळी प्रचलित होता. त्यामुळे खान खूपच संतापला होता. अंधार पडत चालला होता. सगळे पकडलेले लोक गुडघ्यावर मागे हात बांधून एका रेषेत बसलेले होते. खानाला हि बातमी कळताच तो ताडताड आपली दमदार पावले टाकत तिथे आला. आता खानाचा संताप वाढला होता, डोळे लालेलाल अन मोठे झालेले. तो एका संशयितासमोर जाऊन उभा राहिला अन रोखून त्याच्याकडे पाहू लागला. तो गरीब त्याला पाहून थरथर कापू लागला. खानाने त्याच्या नरड्याला हात घातला अन तसाच त्याला वर उचलला.

"बोल दगाबाज, कुत्ते कि अवलाद, क्यूँ किया तुने ये?"

तो गरीब हातपाय झाडत काही सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्याचे नरडे खानाने त्याच्या मजबूत पंजामध्ये दाबले असल्याने त्याला काहीच बोलता अन करता येत नव्हते. तडफडतच त्याने वरच्यावर प्राण सोडला. असच त्याने एक एक करत चार पाच जणांचा मुडदा पाडला. आता नाईकांच्या एका साथीदाराची वेळ आली होती. खानाने त्याला हि तसेच नरड्याला धरून वर उचलले, हात पाठीला बांधले असल्याने त्याला काहीच करता येत नव्हते. तरीही त्याने काहीच हालचाल केली नाही की, पायही झाडले नाहीत. खानाकडे बघत त्याने आपला श्वास रोखून धरला होता.

"बता, तू बतायेगा अब। बोल तुने किया ना ये सब। दगाबाज, कमिनो। लगता है सबको मौत बडी प्यारी लगती है।"

पण त्याने हूं कि चुं केले नाही. त्यामुळे खान आणखीनच चवताळला. त्याने त्याच्या पंजाची पकड अजून घट्ट केली अन त्याचे नरडे आवळायला सुरुवात केली. आता त्याचे पाय लटपट कापायला लागले. तसा खान मोठाने हसला. पण दुसऱ्याच क्षणी एक बाण सुं सुं करत त्याच्या दिशेने आला. त्याच्या हातात कचकन घुसला.

"या अल्ला... सुवर कि औलाद....", करत खानाने हात मागे घेतला.

"पकडो, इस हरामजादे को। मुझे जिंदा चाहिये ये।"

काही कळायच्या आत एकाने त्याचे दोर कापले अन त्याला मोकळा केला. क्षणाचा विलंब न करता बहिर्जीने खानवर एक दोन वार केले. पण सावध खानाने ते हुशारीने चुकवले. एवढा वेळही नव्हता अन जीवही वाचवायचा होता. खाली त्यांचे साथीदार घोडे घेऊन वाट पाहत होते. त्या चार पाच जणांनी पटापट भिंतीवरून खाली उड्या मारल्या. हे सगळे एवढ्या चपळाईने घडले कि, खानाच्या शिपायांना ते उड्या मारत असताना त्या भिंतीपर्यंत सुद्धा पोहोचता आले नाही. अंधारही वाढला होता. शिवाय, खाली झाडी असल्याने काहीच दिसत नव्हते. खाली नाईकांच्या साथीदारांनी भली मोठी झोळी धरली होती. त्यात एक एक जण अलगद पडत होता. त्यांनी पटापट बरोबर आणलेल्या शिपायांचा पोशाख घालून घोड्यावर मांड ठोकली. सगळ्यांची एकदा खात्री झाली आणि त्यांचा घोडा राजाच्या राजधानीकडे भरधाव दौडू लागला.

----

        ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. एकाएकी आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. धुळीचे लोट वाऱ्यामुळे उंचच उंच उडत होते. वाऱ्याच्या माऱ्यामुळे मोठं मोठाल्या झाडांनी तर कधीच आपलं अंग जमिनीवर टाकून दिलेलं होतं. उरली सुरली कशीबशी तग धरून उभी होती. बायबापड्यांची पळापळ चालू होती. आपापली गुरे ढोरे गोठयामध्ये बांधून ठेवण्याची लगबग चालू होती. पावसापासून काही भिजू नये म्हणून घाई गडबड चालू होती. भर दिवसा काळरात्रच अवतरली होती जणू. अन त्याच वेळी दूर काही मैलांवर एक घोडेस्वार राजगडाच्या दिशेने भरधाव दौडत होता. पायात कोल्हापुरी बाज असलेली अन अस्सल चामड्या पासून बनवलेली वहाण, डोक्यावर काळ्या कापडाचे मुंडासे, पल्लेदार मिशा, गळ्यात स्वतः मारलेल्या जंगली प्राण्यांच्या दातांची माळ. खोगिराच्या रिकिबीत त्याचे पायही आता बधिर व्हायला आले होते. डोळ्यांत एक अनामिक भीती! डोक्यात फक्त एकाच विचार! गड गाठणे! चेहरा घामाने डबडबला होता. सगळे अंग भिजून गेले होते. कित्येक कोसांची दौड करून त्याचा घोडा हि आता थकला होता. तोंडाला फेस आला होता. अंग घामानं निथळत होतं. त्याला लवकरात लवकर राजांना भेटायचं होत. त्यासाठी गडाचे दरवाजे बंद व्हायच्या आधी पोहोचणं जरुरी होत. कारण एकदा का दरवाजे बंद झाले कि, उद्या सकाळीच उघडणार मग कसलीही निकड असू द्या. शेवटच्या तोफेचा बार उडाला की, मुख्य द्वाराच्या वरच्या सज्जात बसवलेली मोठी घंटा दहा वेळा वाजायची. अन ज्यांना कुणाला शेवटच आत बाहेर करायचंय त्यांची पळापळ व्हायची. बार उडायला अजून अर्ध्या घटकेचा वेळ होता. अन अंतरही बरच पार करायचं होत. काळोखही दाटून आला होता. घोडाही दमला होता. वेगही मंदावत चालला होता. धावून धावून त्याच्या घोड्याच्या तोंडाचा फेस खाली टपकत होता. तरीहि, तो त्याला तसंच दामटत होता. अन अचानक कसल्या तरी पक्षाच्या विचित्र आवाजाने तो थबकला. समोरून दोन घोडेस्वार त्याच्या दिशेने येत होते. त्याने आपला घोडा थांबवला अन आपल्या तलवारीच्या मुठीवर पकड घट्ट केली. दोघेही आता सामोरा समोर येऊन ठाकले होते. तो त्याची तलवार म्यानातून उपसणार पण तेवढ्यात एक धोडेस्वार त्याच्या जवळ येऊन काहीतरी कुजबुजला. क्षणभराचाच अवलंब घोड्यांची आदलाबदल करून त्याने त्याच्या नव्या ताज्या दमाच्या घोड्याला टाच दिली. अन भरधाव तो गडाच्या दिशेने दौडू लागला.

          नुकतंच राजांनी थोरल्या महाराजांना आदिशाहीच्या एका मोठ्या संकटातून वाचवलं होत. त्यानंतर मात्र राजांनी काही काळ शांततेचे धोरण अवलंबले होते. शिवाय, आपल्या स्वराज्यातील बलाढ्य कोंढणाही राजांना विजपुरकरांना द्यावा लागला. प्रकरण अजून चिघळू नये म्हणून, राजांनी आदिलशाही प्रांतामध्ये इतक्यात काही मोहिमा आखल्या नव्हत्या. पण स्वराज्यात होणाऱ्या आदिलशाही सैन्याचा बंदोबस्त हि केला होता. राजांनी आता काही काळ स्वराज्यातील सुधारणांवर लक्ष द्यायचे ठरवले होते. स्वराज्यामध्ये सगळीकडे सुबत्तात, शांतता नांदत होती. आज पर्यंत स्वतःला जनतेच्या भल्यासाठी, रक्षणासाठी वाहून घेतलेलं होत अन सारी प्रजाही राजांवर आपल्या पोटच्या लेकरा प्रमाणे प्रेम करत होती. परकीय आक्रमणेही आता थांबली होती. पण आदिलशाही दरबारामध्ये राजांविरुद्ध मोठी कारवाई कारणहासाठीची जोरदार खलबत चालू होती. राजांना याची पुसटशीही कल्पना त्याला नव्हती. कारण बऱ्याच दिवसांपासून हेरांकडूनही काही नव्या बातम्या येत नव्हत्या.

राजे आपल्या दालनामध्ये विचार मग्न होते. चेहऱ्यावर धीरगंभीर भाव होते. कसल्यातरी अनामिक हुरहुरीने राजांचे मन विषण्ण, चिंताक्रांत झाले होते. आपल्या दालनामध्ये राजे शतपावली करत होते. 

        राजांची वाट पाहत तो धोडेस्वार राजवाड्याबाहेर ताटकळत उभा होता. त्याने द्वारपालाच्या दोन तीन वेळा राजांना भेटण्यासाठी विनंतीही केली होती. पण द्वारपाल त्याला दाद देत नव्हता. आता तो चांगलाच अस्वस्थ झाला होता. त्याची अन त्या द्वारपालाची बाचाबाची चालू झाली अन आवाजही वाढू लागला.

राजे थोड्या गुश्यातच म्हणाले, " कोण आहे रे तिकडे? काय चालू आहे?"

द्वारपाल काही बोलणार तोच तो इसम म्हणाला,

"म्हाराज, म्या हाय जी."

राजांच्या चाणाक्ष कर्णइंद्रियांनी क्षणात तो आवाज ओळखला. तो ओळखीचा आवाज राजे ऐकून गंभीर झाले.

"नाईक... तुम्ही या वक्ताला...?", राजे धीरगंभीर आवाजात बोलले.

       अर्धा घटका बहिर्जी राजांशी बोलत होता. राजे गहिवरून गेले होते. डोळे अश्रूंनी डबडबले होते. राजांच्या नकळत बहिर्जी मुजरा करून निघून गेला. बऱ्याच वेळ राजे भरलेल्या डोळ्यांनी ती संदुक हातात घेऊन आसनावर बसले होते. नवीन बाळ येण्याची आनंदी वार्ता, आणि दादा महाराजांची आठवण या विचारताच राजांनी ती संदुक उघडली अन खळकन अश्रुंचे दोन थेंब त्या चमकणाऱ्या वस्तूवर पडले.

        बाहेर वरूण राजा त्याच्या जलधारांनी गडरूपी शंभुदेवाला अभिषेक घालत होता अन आतमध्ये राजा त्याच्या अश्रूंनी त्या संदूकीमध्ये असलेल्या पंचधातूंच्या 'वाघनखांना'.

        दालनाबाहेर बहिर्जीची पावलं जड झाली होती. डोळेही भरून आले होते. येणारं संकट मोठं होतं. पण त्याही पेक्षा मोठी होती उरातली जिद्द... राजांप्रती असलेली निष्ठा... आणि डोळ्यांत सदा तेवत असलेलं स्वराज्याचं स्वप्न...

भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाची हि तर फक्त सुरुवात होती!

कारण दिल्ली अजून खूप दूर होती!

आणि बहिर्जीच्या खऱ्या करामतीची जादू विजापूरकर आणि दिल्लीकरांना अजून झालीच कुठं होती.

~ जय शिवराय ~

पूर्वार्ध समाप्त 

उत्तरार्ध लवकरच...