Bahirji - Third Eye of Swarajya - 3 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 3

३. शिकार

नदीच्या मधोमध एका लहान खडकावर शंभू महादेवाचं एक प्राचीन मंदिर होतं. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या जमिनीवर लहानसहान वृक्षराईंनी वेढलेलं ते हिरवंगार छोटंसं द्वीप जणू नदीच्या पांढुरक्या निळ्या कोंदनातील पाचूच्या खड्यासारखं भासत होतं. किनाऱ्यावर असलेल्या दगडी घाटावर तिथपर्यंत जाण्यासाठी मार्गात मोठमोठाले खडकांची एकसंघ माळ होती. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला लागली कि, मंदिरातल्या शंभू देवाचं दर्शन दुरापास्त होऊन जायचं. दैनंदिन जीवनात, देव कार्यात अडचण येऊ नये म्हणून गावातील लोकांनी घाटालगतच एक छोटंसं मंदिर उठवलं होतं. रोजच्या देवकर्मात येणारी बाधा दूर झाली होती. सकाळ संध्याकाळ देवालयातली घंटा महादेवाच्या आराधनेत तल्लीन होऊन जायची. तिचा टनत्कार चुहुदिशांना एक मंगलमय स्वरणाद सोडून जायचा.

          संध्याकाळी बहिर्जी नदीतल्या शंभू महादेवाच्या मंदीसमोर असलेल्या मोठ्या खडकावर बसला होता. मारत्या अजून आला नव्हता. समोर नदीचं नितळ विशाल पात्र बघत डोंगराकडे बघत होता. पांढरे पक्षी पाण्यावर घिरट्या घालत होते. डोक्यात विचार चालू होते.काहीतरी केलं पाहिजे! धाडस केलं पाहिजे! त्याशिवाय आपली दखल होणार नाही.किती दिवस असं नकला करत बहुरुप्याचे खेळ करायचे! तसंही राजांनी पुण्याला भेटायला बोलावलं आहे! पण काहीतरी धाडसाच काम केल्याशिवाय जायचं नाही! ठरलं! मनानं विचार पक्का केला! निर्धार करून बहिर्जी उठला. घाटाकडे जाणाऱ्या खडकांवरून मोठं मोठाल्या ढेंगा टाकत घाटावर आला. मारत्या येतच होता. मनातला विचार मारत्याला सांगितला.

मारत्या जरा विचार करतच म्हणाला, "मला एक सांग. तसंही शिवबाराजांनी भेटायला पुण्याला बलिवलं हायीच की! मंग शिकारीचा घाट कशापाई?"

"तुला कळत कसं न्हाई... आरं सोन्याच्या कड्याचा मान! लय मोठा अस्तूय...!"

"अर्रर्रर्र... मी इसरूनच गिलतु लका! सोन्याचा कडं.. ", आभाळाकडे बघत काहीतरी विचार करू लागला. अन झटकन म्हणाला,

"आरं... मंग आता कुणाची शिकार करायची. चित्ता ????"

"काय डोक्यात भुस्सा भरलाय काय तुझ्या? चित्ता इतुय का हिकडं?"

मारत्याची नकारार्थी मान हलताच बहिर्जी म्हणाला, "न्हाय ना..! मंग मला मी सांगतु तसं करू. मला एक सुचलंय..."

"काय?"

"रानडुक्कर मारण सोप्पं हाय..."

"त्ये कसं??", डोकं खाजवत मारत्या म्हणाला.

" रान डुकरं कधी मंदी  शेतात येऊन नासधूस करून जात्यात. पण आता, त्यासाठी आपल्याला येखांदी युक्ती, न्हाईतर फास लावला पायजे. तू, एक काम कर. सांच्याला वस्तीतल्या पारावर जाऊन. लोकांचं बोलणं कान दिऊन नीट आईक. कुणाच्या रानात काय हाय? कुठं रानडुक्कर येतं. येत न्हाई. सगळं लक्षात ठिव."

"झ्याक... त्येची काळजीच नगु..."

"मंग झालं तर... म्या आपल्या आंब्याखाली माणसं काय काय बोलत्यात त्ये एकदा बघुन यितू..." आणि बेत ठरला! रानडुकरांची शिकार!

        दावणीच्या गाईला चारा पाणी देऊन, बहिर्जीने बांबूच्या काठ्यांपासून बनवलेला आयताकृती फास बनवायच्या तयारीला लागला. फासाला अणुकुचीदार काठ्या ठराविक अंतर ठेऊन सुतळीने अगदी घट्ट बसवल्या. प्राण्याच्या पायांत अडकणारे चार पाच फासे त्याच्याकडे आधीपासूनच होते. प्राण्यांचे पाय त्याच्यावर पडताच ते त्याच्या पायात घट्ट रुतून बसत. आणि प्राण्याला पळता येत नसे. अशा प्राण्याला गाठून त्याला मारणं सोप्प असायचं.

        नदीच्या मधोमध असलेल्या मंदिराच्या आजूबाजूला काही बांबूची झाडं होती. संध्याकाळी मारत्याला घेऊन बहिर्जीने पाच पन्नास चांगले बाण बनवून घेतले. घरात तिर कामठा आधीपासूनच होता. रानातल्या आधीच्या शिकारी करताना बऱ्याच वेळा बहिर्जी तिर कामठा सोबत नेत असे. त्यामुळे बहीर्जीचा निशाणा अचूक होता.

        दोन चार दिवस पारावरच्या आणि गावातल्या लोकांच्या गप्पा ऐकून. त्यांनी चांगलीच माहिती गोळा केली होती. आणि त्या माहितीच्या आधारावर त्यांनी बेत पक्का केला. नदीजवळच्या पाटलाच्या मळ्यात बबन्या लव्हार रात्रीच्या राखणीला असायचा. मध्यरात्री शंभू महादेवाच्या मंदिरातील घंटा तीन वेळा वाजायची, ती शेवटचीच, नंतर पहाटेच्या आरतीलाच. घंटा वाजताच बबन्या मळातल्या शेताला एक चक्कर मारायचा आणि खोपटात जाऊन निजायचा. निघताना बबन्याच्या एका हातात कंदील तर दुसऱ्या हातात घुंगराची जाडजूड काठी असायची. मळ्याच्या मधोमध एक मचाण होतं. त्यावर चढून अर्धा एक घटका आरोळ्या ठोकत, चहूबाजूंनी गोफण गुंडे फिरवायचा. बबन्या फक्त नावालाच राखणीला होता. मुलखाचा भेदरट. घुबडाचा जरी आवाज झाला तरी त्याची घाबरगुंडी उडायची. जिथं असेल तिथून पळतच सुटायचा. खोपटात अंगावर गोधडी घेऊन मुटकुळं करायचा, ते सकाळीच उठायचा. माणसाच्या मांडीला लागतील एवढी उंच आणि दोन तीन बोटं लांब अणुकुचीदार सुळे असलेली रानडुकरं, बबन्या गेल्यावर अर्धा एका घटकेत मक्याच्या शेतात घुसायची. यथेच्छ ताव मारायची आणि पसार व्हायची. पाटलांनी त्यांच्या कामगार गड्यांना घेऊन बराच वेळा त्यांचा सामना केला होता. पण त्यांच्या कायमचा बंदोबस्त काही करता आला नाही.

        पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये त्याचं पांढर शुभ्र रुपडं दाखवत हसत होता. चांदण्या लुकलुकत होत्या. आजूबाजूने पांढुरके, धुरकट ढग हळूहळू सरकत होते. ढगांकडे एकटक पाहिलं कि वाटायचं, चंद्रच पुढे सरकतोय. कंदील न घेताही दहा एक हाताच्या अंतरावरचं माणूस सहज दिसेल एवढा प्रकाश पडला होता. देवळातली घंटा वाजून अर्धा एक घटका सरत आली होती. पाटलांच्या मळ्यात एका बाजूला बहिर्जी आणि मारत्या लपून बसले होते. बबन्या अजूनही यायचं नाव घेत नव्हता. बहिर्जी आणि मारत्या वाट बघून कंटाळून गेले होते.

"च्यायला.... ह्ये बेणं येतंय का न्हाय आज?", मारत्या वैतागून हातावर मूठ मारत म्हणाला.

"हम्म... मला पण आसंच वाटतंय... घंटा वाजून बी लय वाढूळ झालं."

"चल जाऊंदे... आता काय त्ये यायचं न्हाय..."

आता काय बबन्या येत नाही! असा विचार करून दोघेही मचाणावर चढले. चहूबाजूंनी कानोसा घेऊ लागले. दोघांनीही  दोन रात्री पाळत ठेऊन रानडुक्करं मक्याच्या शेतात कुठून येतात. कधी येतात. याची माहिती गोळा केली. त्यांना पिटाळून लावल्यानंतर कोणत्या वाटेने ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हे हि त्यांना समजलं होतं. आणि म्हणून नेमकं त्याच वाटेवर त्यांनी शेताच्या कुंपणाच्या बाहेर पाचही फासे पेरून ठेवले होते. एके ठिकाणी दोन्ही बाजूने मोठाले दगड होते त्यांच्या मधून जाण्यासाठी अगदी चिंचोळी वाट होती. बहिर्जीने त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी बारीक दोन दोऱ्या वाटेत आडव्या बांधल्या होत्या. त्या दोऱ्यांना हिसका बसताच समोरून झपकन फास उघडला जाणार होता. त्याबरोबर समोरचं सावज त्याला लावलेल्या अणुकुचीदार लाकडी काठ्यांमध्ये गपगार होणार होतं. 

        दोघेही मचाणावर चढून रानडुकरांचा अंदाज घेऊ लागले. बारीक कानोसा घेऊ लागले. थंडगार वारा आणि वाऱ्यामुळे पिकांच्या पानांची सळसळ फक्त ऐकू येत होती. तोच घुंगरांचा मंद मंद आवाज ऐकू येऊ लागला.

"भैऱ्या... हडळ तर न्हाय ना...??", घाबऱ्याघुबऱ्या आवाजत थरतथरत मारत्या बहिर्जीला धरत म्हणाला.

"ये गप्प... त्ये बघ... त्यो बबन्या हिकडचं येतंय...", दोघेही खाली बसले.

"अर्रर्रर्रर्र.... ह्याच्या आईला... ह्याच्या..."

"आता बघ... कसं गांडीला पाय लावून पळतंय..."

तोंडाला हात लावत बहिर्जीने बिबट्याच्या डरकाळीचा दोन तिने वेळा हुबेहूब आवाज काढला. तिकडे बांधावरून येणारा बबन्या शेपटी घालून खोपटाच्या दिशेने पळत सुटला. दोघेही खळखळून हसायला लागले. तोपर्यंत मागे आलेली चारपाच रानडुकरेही घाबरून इकडे तिकडे आवाज करत पळत सुटली. मचाणावर सावध उभा राहत, बहिर्जीने चार पाच बाण डुकरांच्या दिशेने सपासप सोडले. एखादा बाण जनावराला नक्कीच लागला असणार. कुंपणावरून उड्या टाकत डुकरे रानाकडे पसार झाली. पण दगडांच्या चिंचोळ्या वाटेने दोन जनावरं पळत जाताना दिसली. काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता. एखादं जनावर जखमी झालं असेल, किंवा दबा धरून बसलेलं असेल तर उगाच धोका नको म्हणून दोघेही बराच वेळ मचाणावर बसले.

"मारत्या... चल आता जाऊ घरला...", कंटाळून बहिर्जी म्हणाला.

"हा चल... मला बी लय झोप आलीय राव...", जांभळी देत आणि हातावर हात घासत मारत्या उठला.

"सकाळ... बगु काय घावलंय का न्हाय..."

"हां..."

"तू जा घरी. मी मळ्यात जरा चक्कर मारून आलू."

"अय्योवं... न्हाय बाबा... म्या एकला व्हयं? मी बी यितु तुझ्यासंग..."

"बरं... चल..."

        गार वारा सुटला होता. बहिर्जीला त्याला नेमून दिलेल्या शेतीवरही एक फेरफटका मारून यायचं होतं. मचाणावरून उतरून दोघेही पाटलांच्या दुसऱ्या मळ्याच्या दिशेने चालू लागले.

         पहाटे लवकरच उठून मारत्याला घेऊन बहिर्जीने फास लावलेलं ठिकाण गाठलं. रात्री दगडांच्या चिंचोळ्या जागेमध्ये लावलेल्या फासामध्ये अडकून एक जनावर मरून पडलं होतं. शेताच्या कुंपणाबाहेर लावलेल्या एका लहान फासामध्ये पाय अडकून पडलेलं जनावर धडपडत होतं. त्याच्या पाठीत बहिर्जीने मारलेला एक बाण रुतून बसला होता. हातातल्या भाल्याने भोसकून मारत्याने क्षणात त्याचा खेळ संपवला. फास मोकळे करून दोहोंच्या शेपट्या कापून घेतल्या. आणखी दोन चार दिवसात त्यांच्या जाळ्यात तीन जनावरं सापडली होती. पुण्याला जाण्यासाठी आता ठोस कारण सापडलं होतं.

~ जय शिवराय ~

क्रमश:....