Santshrestha Mahila Part 19 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | संतश्रेष्ठ महिला भाग १९

संतश्रेष्ठ महिला भाग १९

संतश्रेष्ठ महिला भाग १९

यानंतरना नाव येते महदंबा यांचे.
ह्या सु. १२२८−सु. १३०३ या काळातील आद्य मराठी कवयित्री.
अकराव्या ते अठराव्या शतकातील यादव व महानुभाव-संत काळ या दरम्यान स्त्री साहित्य बोटावर मोजण्याइतकेच होते.
बाराव्या शतकापासून संतांचे लिखाण सुरू झाले.
चातुर्वर्ण व्यवस्थेचा समाज जीवनावर प्रभाव असतानाही संत कान्होपात्रा, महदंबा, पुढे जनाई, मुक्ताई यांनी साहित्यकृती रचल्या.
महदंबा मराठीतील आद्यकवी ठरल्या.
चक्रधर स्वामींच्या लग्नात महदंबेचे धवळे गायिले.
त्यानंतर त्यांच्या काव्य प्रवासास सुरूवात झाली.
महादाईसा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा (जन्म : इ.स.१२३८; मृत्यू : इ.स.१३०८)
ऊर्फ रूपाईसा ह्या मराठी भाषेतील पहिल्या स्त्री कवयित्री आहेत .
महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगाव या गावच्या आहेत.
तसं त्यांचं कुटुंब हे आजची पुरी पांढरी जि. बीड येथील होते .
पंरतु नंतर सर्व कुटुंब हे रामसगाव येथे आले होते आणि हेच त्यांचे गाव झाले होते.

१३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी
महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होत्या .
त्या पंथाची मोठी आईच होत्या .
सर्वजण त्यांना आऊसा म्हणजे आई म्हणत.

महदंबा यांचे जीवन विलक्षण होते.
लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभुचरित्र, स्मृतिस्थळ आणि इतिहास ह्या महानुभावीय ग्रंथावरून तिचे काही चरित्रात्मक तपशील हाती येतात ते असे.

देवगिरीचा राजा महादेवराय यादव ह्याचे पुरोहित वामनचार्य ह्यांच्या कुळात महदंबेचा जन्म झाला. वामनाचार्याचा पुत्र महेश्वरपंडित ह्याला माधवभट आणि बायेनायेक असे दोन पुत्र होते.
महदंबा ही बायेनायेक ह्याची कन्या.
महानुभाव पंथीयांचे आद्य आचार्य नागदेवाचार्य माधवभटाचे पुत्र होत.
म्हणजे नागदेवाचार्य व महदंबा ही चुलत भावंडे.
त्या अत्यंत विरक्त आणि बुद्धिमान होत्या .

बालविधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा त्यांचा जीवनप्रवास झाला .
महादाईसाचे घराणे तसे विद्वानांचेच होते.
त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयातच झाले.
परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले.
त्या वडिलांकडे परत आल्या .
त्यांना भक्तिमार्गाची व परमार्थाची ओढ होती.
परमार्थाच्या ओढीने प्रथम त्या दादोसाच्या शिष्या झाल्या .
त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली.
श्री चक्रधर स्वामींनी सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले.
महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता.
संन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला.
संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत रममाण होताना
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली.
त्यांची भक्ती डोळस होती.
बुद्धीची, चौकसपणाची त्याला जोड होती.
त्यांना श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती.

त्यांनी संपूर्ण आयुष्य महानुभाव पंथाच्या प्रसारार्थ वेचले.
महानुभाव पंथीयांना महदंबेबद्दल फार आदर होता.
ज्ञानेश्वर-मंडळात मुक्ताईचे जे स्थान तेच चक्रधर-मंडळात महदंबेचे होते, असे म्हणण्यास हरकत नाही.

त्या चतुर, सडेतोड वृत्तीच्या होत्या .
चक्रधरांचा विश्वास त्यांच्यावर होता.
चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरत असत.
त्या तुलनेत गोविंदप्रभू हे एकाच ठिकाणी असत.
त्यामुळे ती चक्रधरांच्या अनुज्ञेनेच गोविंदप्रभू यांच्याजवळ राहिली.
त्यांचे “धवळे” नावाचे लेखन महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे.
तो वाड्मयीन रचनाप्रकार आहे .
धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची वरगाणी अर्थात विवाहविषयक गीत होय.
त्याची निर्मिती 'श्रीगोविंदप्रभूचरित्रा'तील 'विव्हावो स्विकारू' या लीळेवरून कळते.
गोविंदप्रभू यांना एकदा बाशिंग घेऊन जाणाऱ्या तेलिणीस पाहून विवाह प्रवृत्ती झाली.
तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली.
त्या गीतांत विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन आले आहे.
ढवळ्यातील मुख्य विषय रूक्मिणी स्वयंवराचा आहे.
ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग आला आहे.
तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे.
उत्तरार्धात पासष्ट कडवी आहेत.
ते वाचताना महदंबेचे शीघ्रकवित्व दिसते.

धवल या संस्कृत शब्दावरून ‘धवळा’ व ‘ढवळा’ हा शब्द आलेला आहे.
ते विवाहप्रसंगी भक्तांकडून गायले जात असत.
प्राचीन काळातील लोकगीतातील ढवळे उपलब्ध नसले तरी महदंबा, एकनाथ, दासोपंत, रामदास इत्यादी कवींनी रचलेले ढवळे उपलब्ध आहेत.
महदंबेच्या ढवळ्यांची भाषा साधी, सुबोध व तात्कालिक बोलीभाषेच्या रूपाची आहे.

महदंबेने ढवळ्यांप्रमाणेच ‘मातृकी रुक्मिणीस्वयंवर’ या काव्याची निर्मिती केली आहे.
त्याची ओवीसंख्या एकशेनऊ आहे.
त्या काव्याचे विशेष असे, की त्यातील कडव्यांत अ, आ, इ, ई पासूनची अक्षरे आणली आहेत.
प्रत्येक ओळीतील आद्याक्षरांचा क्रम साधण्याचा प्रयत्न आहे.
तोच प्रकार पंडिती काव्यात नंतरच्या काळात दिसतो.
कृष्णवर्णन, पाठवणी, कृष्णदर्शनामुळे रुक्मिणीने सज्जावरून उडी घेणे इत्यादी प्रसंग आले आहेत.
‘गर्भकांड ओव्या’ हे महदंबेने लिहिलेले छोटेसे प्रकरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे.
महदंबेचे महानुभाव संप्रदायात स्थान महत्त्वाचे होते.
ती ‘तरी मज वेष द्यावा’ असे म्हणते.
त्यांना पंथाचा वेष दिला जातो.
त्या मठव्यवस्था बघत, सर्व भक्तांची उठबस करत, चक्रधरांचा पूजावसर संभाळत,
संन्यासिनींवर करडी नजर ठेवत- त्यांना फटकारत .
त्यांनी महानुभाव संप्रदायाची शिस्त स्वीकारली होती हे दिसून येते.
त्यांच्या मानसिक आणि शारीरिक कोंडमाऱ्याचे चित्र त्यांच्या कृती-उक्तीतून ‘लीळाचरित्रा’त दिसून येते. संन्यासीपण, निवृत्ती, जीवनभोगापासून दूर राहणे आणि आध्यात्मिक पातळीवर विचारदर्शन घडवणे अशी महदंबेच्या आयुष्याची वाटचाल ठरली.
महदंबा ह्या संवेदनशील सौंदर्यदृष्टी असलेली, नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा असलेली सुगरण, गाणे गाणारी, रांगोळी सुंदर काढणारी दक्ष कार्यकर्ती होत्या .
श्रीकृष्णरुक्मिणीविवाहविषयक ही मराठीतील पहिली रचना होय.
महानुभाव वाङ्मय: आठवणी, दिनचऱ्या, स्थलवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक, भावगीतसदृश, तात्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना महानुभवांनी केली आहे.
गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारांतील हे लेखन आहे.
गद्यातील विविधता विषयांची नाही, तर वाङ्मयप्रकारांची आहे.
त्या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे.

श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी आणि वर्तमान असे गद्यग्रंथांचे एक वर्गीकरण महानुभाव पंथात केले जाते.
श्रुती’ म्हणजे चक्रधरांच्या सूत्रांची संकलने.
‘स्मृती’ म्हणजे नागदेवाचार्य यांची वचने.
त्यानंतरचा आचार्यवचनांना वृद्धाचार म्हणतात.
त्यानंतरचा विचार म्हणजे मार्गरूढी होय.
नंतरचे साहित्य म्हणजे ‘वर्तमान’.

महदंबेची ख्याती तिने रचिलेल्या ‘धवळ्यां’वर (कृष्णरुक्मिणी-विवाहावर तिने रचिलेली गीते) मुख्यतः अधिष्ठित आहे.
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे ह्या धवळ्यांचे दोन भाग आहेत.
साधी, सुंदर रचना हे ह्या धवळ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य.
धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णतः महदंबेचा असून उत्तरार्धाच्या रचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या दोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते.
.महदंबेच्या नावावर मातृकीरुक्मिणीस्वयंवर आणि गर्भकांड ओव्या अशा दोन रचनाही आहेत.
कृष्णरुक्मिणीविवाह हाच मातृकीरुक्मिणीस्वयंवराचाही विषय.
प्रत्येक ओवीच्या प्रारंभी एक अशा प्रकारे बावन्न मातृका ह्या काव्यात योजिलेल्या असल्यामुळे त्यास मातृकीरुक्मिणीस्वयंवर असे नाव देण्यात आलेले आहे.
ह्या काव्यातूनही धवळ्यांचे प्रतिसाद अपिरहार्यपणे उमटलेले आहेत.
गर्भकांड ओव्या हे एक आध्यात्मिक प्रकरण आहे.
श्री चक्रधरांनी जाण्यापूर्वी त्यांना ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता.
’असंन्निधानी तळमळ.....
पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये.
अखंड जळतचि असे’
अशी विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली
महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला.
स्त्रियांना, शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता.
त्यामुळेच चक्रधरस्वामी हे आद्य कृतिशील सुधारक ठरतात.
अशा स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने विचारपूर्वक पारख करूनच स्वीकारले होते.
महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग तिने स्वीकारला होता.
त्यांचे वडील याला विरोध करत होते परंतु त्या आपल्या ठाम निश्चयापासून दूर गेल्या नाहीत .
.. महानुभावातील अत्यंत खडतर असलेले “भिक्षाव्रत” त्यांनी स्वीकारले होते.
या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्वीकारायचे
व ते अन्न नदीच्या काठी जाउन, नदीकडे तोंड करुन प्राशन करायचे व पाणी प्यायचे.
“वैराग्यवृत्ती” “मनोनिग्रह” या गुणांमुळेच त्या हा खडतर प्रवास पार करू शकल्या .
चक्रधर स्वामींवर त्यांची नितांत श्रद्धा होती..
त्यांच्या प्रत्येक विचाराला व तत्त्वज्ञानाला अनुसरणारी त्या आदर्श शिष्या होत्या .
चक्रधर स्वामींना आपले जीवन त्यांनी समर्पित केले .
हे समर्पण परमार्थाच्या भक्तीतून आले असल्याने त्याला अध्यात्माचा रंग चढला आहे.
स्त्री जीवनाचा खरा अर्थ दाखवून देणार्‍या काही स्त्रियांपैकी एक म्हणजेच महदाइसा अथवा महदंबा होत्या.
त्यांचे जीवन एक मानबिंदू ठरतो.
या पंथाने स्त्रियांना व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग मोकळा करून दिला.
त्याचा महदाइसाने फायदा घेऊन परमोच्च स्थान प्राप्त केले.

श्रीचक्रधरस्वामी ह्यांचे प्रयाण झाल्यानंतर
त्या ऋद्धिपुरास येऊन श्रीगोविंदप्रभूंची (श्रीचक्रधरांचे गुरु) सेवा करू लागल्या .
त्यांच्या मृत्यूनंतर तिचे उर्वरित आयुष्य सामान्यतः निंवा येथे नागदेवाचार्यांच्या सानिध्यात गेले.

महदंबेच्या मृत्यूच्या समयी नागदेवाचार्य तिच्या समीप होते.

क्रमशः