Mile sur mera tumhara - 2 books and stories free download online pdf in Marathi

मिले सूर मेरा तुम्हारा - 2


थोड्याच दिवसात एका चांगल्या शुभ मुहूर्तावर मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने निनाद आणि वृंदाचा शुभविवाह पार पडला. वृंदा नवरी म्हणून सजलेली खुपंच छान दिसत होती. कोपरा पर्यंत भरलेले मेहेंदीचे हात, हातातला हिरवा चुडा, त्यात मोत्यांच्या कडा, कपाळावर अर्ध चंद्राची टिकली, डोळ्यात काजळ, नाकात मोत्याची ओठांपर्यंत येणारी नथ, कानातले झुमके आणि केसांच्या आंबाडयातले सोनेरी फुल, गळ्यात सुंदर मोत्याची ठुशी आणि एक लक्ष्मीहार, त्यात हळदी च्या वेळेस घातलेला पिवळा धागा, हातातले हळकुंड, पायातले पैंजण, या सगळ्यात ऊठून दिसणारी निळ्या काठांची गुलाबी नऊवारी साडी आणि भर म्हणून नुकतंच निनाद ने तिच्या भांगेत भरलेले कुंकू, गळ्यातले दोन वाट्यांचे मंगळसूत्र, पायातले जोड्वे आणि मुंडावळ्या.. तिचं सौंदर्य अजून वाढवत होते.
निनादही काही कमी नव्हता. निळ्या रंगाचं धोतर आणि त्यावर फिक्कट क्रीमी रंगाचा कुर्ता, त्यावर डाव्या खांद्यावरुन उजवीकडे येणारा पट्ट्यात असणारा खंजीर आणि डोक्यावर सोनेरी जरिच्या काठांचा निळा फेटा, मुंडावळ्या यामुळे त्याचाही रुबाबदारपणा ऊठून दिसत होता.
लग्न पार पडले. पंगती उठल्या. आलेल्या पाहुण्यांनी नवदाम्पत्यांना आशिर्वाद दिला आणि पाठवणीची वेळ जवळ आली. भरल्या डोळ्यांनी वृंदाच्या आई वडलांनी तिला निरोप दिला. निशा करवली म्हणून ताईसोबत येणार होती. सगळे गाडीत बसले. निनाद आणि वृंदा साठी फुलांनी सजवलेली गाडी तयार होती. घरी पोचत पोचत बरीच संध्याकाळ उलटून गेली होती. निताबाईंनी आत जाऊन ओवाळणीचं ताट, सप्तधान्याने भरलेलं माप आणि भाकरतुकडा आणला. सुलेखाला ताट आणि माप पकडायला सांगून आधी भाकरतुकडा आणि पाणी नवदाम्पत्यावर ओवळून टाकलं. मग मनापासून नविन सुनेला हळदकुंकू लावून तिला ओवाळलं. त्यानंतर वृंदाने माप ओलांडलं आणि कुंकवाच्या ताटात पाय ठेऊन देव्हा-यापर्यंत चालत आली. सगळ्यांनी मग मनोभावे देवाला नमस्कार केला.
उशीर झाला होता त्यामुळे जाणत्या बायका स्वयंपाकाला लागल्या. सुलेखा आणि इतर बहिणी वृंदाच्या अवतीभवती बसल्या. त्यांनी वृंदाला नाव घ्यायला सांगितलं. वृंदानेही जास्त आढेवेढे न घेता छान नाव घेतलं.
“माहेराला ठेवून मनात, साद घालते सासरला,
निनादरावांसोबत गृहप्रवेश केला, लागते आता संसाराला”
सगळयांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. मग सगळयांनी निनादला नाव घ्यायला सांगितले. पण निनादने काहिच प्रतिक्रीया दिली नाही. सगळयांनी force केला तर तो म्हणाला,” थकलोय मी. जेवून झोपा तुम्ही सगळे आणि मलापण आराम करू द्या.” असे म्हणून तो बाहेर निघून गेला आणि मोकळ्या हवेत बाकावर जाऊन बसला. वृंदाला वाईट वाटले. पण तिने तसे दाखवले नाही. त्यानंतर जेवणं झाली आणि सगळे झोपी गेले.
दुस-या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. वृंदाचे आई वडील देखील आले होते. त्यांना बघून तिचे डोळे भरुन आले. मग स्वत:ला सावरून ती पुजेला बसली. प्रसाद बनवणे, जेवण बनवणे, आलेल्या पाहुण्यांची सरबराई ह्यातंच तो दिवस गेला. त्यामुळे निनाद आणि वृंदाला बोलायला असं मिळालंच नाही. तिचे आई वडील जाताना निशाला सोबत घेऊन गेले. बरेच पाहुणे परतीच्या प्रवासाला गेले. आता वृंदा तिच्या सासरी एकटीच होती. नाही म्हटलं तरी नणंद सुलेखा आणि सासू सासरे होते. पण जो जवळचा होता तो निनाद तिच्या आसपास देखील फिरकत नव्हता.
त्यानंतर सगळे मिळून कुलदेवतेच्या दर्शनाला जेजुरीला गेले. तिकडे नव-याने नववधूला उचलून घ्यायची प्रथा होती. निनादने या गोष्टीला साफ नकार दिला. देवाच्या दारी तमाशा नको म्हणून कोणी काही बोलले नाही. देवदर्शन करुन सगळे घरी आले.
आता घरात ब-यापैकी शांतता होती. वृंदा सासूला घरकामात मदत करत होती. तिच्या मनात नाना प्रश्न होते. ती थोडी नाराज होती. पण काही बोलत नव्हती. सासूबाईंनी हे ताडले. त्या तिला म्हणाल्या, “ अगं नेहमी असा नाही वागत निनाद. नको काळजी करुस. होईल सगळं नीट.” तिने वरचेवर हो म्हटलं आणि खोटं हसू आणत कामाला लागली.
रात्री सगळं आवरून झाल्यावर सुलेखाने तिला निनादच्या म्हणजे त्या दोघांच्या खोलीत नेले. सुलेखा तिला खोलीत एकटी सोडून निघून गेली. खोली छान नीटनेटकी सजवलेली होती. आज त्यांची पहिली रात्र. म्हणून जास्त नाही पण बेडवर फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. ते सगळं बघून वृंदा थोडा वेळ स्तब्ध झाली. तिला काही सुचेना. ती बेडवर एका कोप-यात जाऊन बसली. थोड्या वेळाने निनाद खोलीत आला. त्याने खोलीचं दार आतून बंद केलं आणि सोफ्यावर जाऊन मोबाइल बघू लागला. वृंदाला आधी कसं react व्हावं तेच कळत नव्हतं. मग उगीचंच बोलायचं म्हणून ती म्हणाली,”झोपायचं नाही का?”
“तू झोप.”,त्याने वर न बघताच उत्तर दिले.
वृंदा तशीच बसुन राहिली. मग म्हणाली,”मला जाणवतंय की तू माझ्याशी तुटक तुटक वागत आहेस. माझं काही चुकलंय का?”
तिच्या या प्रश्नाला मात्र निनाद चिडला. आणि रागातंच म्हणाला, “ हो चुकलंच आहे तुझं. खुप स्वप्न बघितली असतील ना तू लग्नानंतरच्या संसाराची. पण तुला काहीही मिळणार नाही.”
निनादच्या अशा उत्तरावर ती थोडी गोंधळली. मग तिने थोड्या धाडसाने विचारले,“पण का? जर माझ्यासोबत रहायचेच नव्हते तर का लग्न केलं माझ्यासोबत?”
निनादला या प्रश्नाची कल्पना होती. तो उत्तरला, “नीट बघ माझ्याकडे. पटतेय ओळख?”
वृंदाने नकारार्थी मान हलवली.
“मी तोच आहे ज्याला तुझ्यामुळे कॉलेज मधून रेस्टीकेट व्हावं लागलं. तुझ्या फ़र्स्ट इयर च्या वेळी तू माझी आणि माझ्या मित्रांची प्रिंसिपल कडे complaint केली होती. आठवतंय का काही? तेव्हाच ठरवलं होतं मी की तुला अद्द्ल घडवणार. आता संधी मिळालेय.”
हे सगळं ऐकुन वृंदाला काय बोलावं तेच कळलं नाही. मग तिलाही राग आला. ती म्हणाली, “ चूक तुमचीच होती. जर इतकंच वाटतं तर तसं वागायचं नव्हतं.”
“हे बघ मला आता त्याने काही फरक पडत नाही. मला तुझ्याशी बोलण्यात काही interest नाही.”
असं बोलून निनाद सोफ्यावरंच कूस बदलून झोपी गेला.
हे तर obvious होतं की निनाद ने वृंदाशी मनापासून लग्न केलं नव्हतं. वृंदा मात्र या सगळयाने दुखावली गेली. आज राहून राहून नको असतानाही तिला मनन ची आठवण येत होती. तोही शेवटी तसाच निघाला म्हणून तिने त्या आठवणी आवरत्या घेतल्या. डोळ्यातल्या पाण्याला वाट करुन देत ती तशीच झोपी गेली.
दिवस असेच जात होते. नातेवाईकांकडे जेवायला बोलवणं आणि दुस-या काही रिती परंपरा यांमध्ये दोघांचा बराचसा वेळ जायचा. निनाद तिच्याशी काम असलं तर तेवढ़ंच बोलायचा. वृंदादेखील त्याच्याजवळ जास्त जात नव्हती. या दोघांचं कसं होणार याची मात्र निताबाईंना काळजी वाटत होती. दोघांत असलेला अबोला त्यांना जाणवायचा. पण नेमकं कारण कळत नव्हतं. एकदा दोनदा त्यांनी वृंदा आणि निनादला विचारुन पाहिले. पण काही खास उत्तर मिळाले नाही.
लग्नासाठी घेतलेली एक महिन्याची सुट्टी संपत आली आणि निनाद ऑफिस ला जायला लागला. वृंदानेही मग ऑफिसला जाणं सुरु केलं. हनिमून ला जायचा विषय निनादने टाळला होता. निनादचं CA पूर्ण झालं आणि त्याने जॉब change केला. आणि नेमकं जॉईन झाल्यावर काहिच दिवसांत त्याची बदली पुण्याहून मुंबईला झाली असल्याचं त्याला सांगण्यात आलं. लवकरंच त्याला तिकडे जॉईन व्हायचं होतं. त्यामुळे तो तिकडे जाण्याची तयारी करु लागला. आता वृंदाला इतक्यात नेता येणार नाही असं कारण सांगून त्याने तिला नेण्याचे टाळले. पण त्याची आई ऐकायलाच तयार नव्हती. म्हणून एक महिन्याने तिला घेऊन जाईन असं त्याने आईला वचन दिलं. तो मुंबईला गेला.
वृंदाचा जॉब चांगला चालू होता. मुंबईला जावं लागेल म्हणून तिने एका महिन्याच्या नोटीस पीरियड वर राजीनामा दिला. त्यानंतर एक महिना ती इकडे पुण्यात तर निनाद मुंबईला राहत होता.
निनादचा रोज फोन यायचा. सगळ्यांशी तो भरभरुन बोलायचा. वृंदाशी बोलायची वेळ आली तर काहितरी कारण सांगून टाळायचा. अगदीच टाळता नाही आलं तर फोनवर काही न बोलता नुसताच ऐकत बसायचा. वृंदाला हे कळत होते. तीपण फोन घेऊन सरळ बेडरूम मध्ये यायची. आणि लगेच फोन ठेवून द्यायची. उगीच बाहेर कोणाला कळू नये म्हणून तिचा केविलवाणा प्रयत्न असायचा. माहेरचा फोन आला की तेव्हाही ती हसुन उत्तरं द्यायची.
असाच एक महिना संपला आणि वृंदा निनादसोबत एकदाची मुंबईला आली. नविन असल्याने सासूबाई एक आठवडयासाठी येणार होत्या. दोघांची चांगली सोय लावली की झालं असं त्यांचं मत होतं. वृंदालाही बरं वाटलं. निदान दुसरा जॉब मिळेस्तोवर तिला घरंच सांभाळायचं होतं. त्यामुळे आईंची मदतंच होईल असे तिला वाटले.
1BHK चा छोटासा पण सुंदर भाड्याचा flat होता. त्याची balcony मात्र ब-यापैकी मोठी होती. नाही म्हटलं तरी ३ दिवस लागले होते सगळं घर सजवायला. सासरे पहिल्याच दिवशी पुन्हा पुण्याला गेले होते. सुलेखा आई सोबत इकडेच थांबली होती. त्या दोघींसोबत वृंदाचा छान वेळ जायचा. गप्पा गोष्टी, घर आवरणं ह्या सगळ्यात ती रमली होती. शेवटी एक छोटासा देव्हारा hall च्या एका कोप-यात तिने सजवला आणि घराला घरपण आलं. बघता बघता आठवडा संपला आणि निताबाई अन् सुलेखा परत जायला निघाले. वृंदाला अतिशय भरुन आले त्यांना निरोप देताना. सकाळी ९ ची गाडी होती. निनाद त्यांना गाडीत बसवणार होता. सगळे गेल्यावर वृंदाला तो छोटा flat मोठा वाटायला लागला. डोळे पुसत ती घरकामाला लागली. निनाद परस्पर office ला जाणार होता.
आता ख-या अर्थाने दोघांचा संसार सुरु होणार होता. पण खरंच तो चालू झाला की नाही दोघांनाही माहीत नव्हते.
रात्री ब-याच उशिरा निनाद घरी आला. वृंदाने उठून गरम केलेले जेवण वाढायला घेतले.
“काही गरज नाहीये इतकं सगळं करायची. मला जेवायचं नाहिये.”, washroom मधून फ्रेश होऊन बाहेर येत तो म्हणाला.
“का? जेवून आलास का?”,वृंदाने सहजंच पण जरा काळजीने विचारले.
“तुला काय करायचंय?”, निनाद नीट बोलायला तयारंच नव्हता.
“माझ्यावरचा राग जेवणावर कशाला काढत आहेस?”, वृंदाने जेवणाचं ताट त्याच्या समोर करत म्हटलं.
पोटात भूक होतीच. त्यामुळे जास्त आढेवेढे न घेता निनाद जेवायला बसला. भूक होती म्हणून की काय पण तिने बनवलेल्या स्वयंपाकाला इतकी चव असेल असे त्याला वाटले नव्हते. दोन घास जास्तंच जेवला तो. आणि hall मधल्या single cot वर जाऊन झोपी गेला.
वृंदाने सगळं आवरलं. आणि बेडरूम मध्ये येऊन पलंगावर अंग टाकलं. जे होतंय ते तिने स्विकारलं असलं तरी तिला पटलं नव्हतं. तिचा भूतकाळ तिने मागे टाकला होता. नाही म्हटलं तरी तिच्या काही अपेक्षा होत्याच. असं नव्हतं की तिचं निनाद वर प्रेम होतं. कारण तसे क्षण त्यांच्यात तयारंच झाले नव्हते. ना शारिरीक ना मानसिक. ती विचार करत होती. गेली कित्येक रात्री तिने विचारात घालवल्या होत्या. तिने ठरवलं की ह्या नात्याला संधी द्यायची. आपल्या बाजुने पूर्ण प्रयत्न करायचे. कसलीही अपेक्षा न ठेवता. प्रेम काय आता आपल्या आयुष्यात नाही असेच वाटते आहे. विचारांच्या तंद्रीतंच तिला झोप लागली.
आता रोजचं रूटीन सुरु झालं. सकाळची आवराआवर, निनादचा डब्बा, त्याचं ऑफिसला जाणं, मग त्यानंतर घरातली इतर कामं आणि जॉब शोधणं. हे सगळं चालू झालं. निनादला बाहेरच्या जेवणाचा त्रास व्हायचा. म्हणून तो बाहेर काही खायचा नाही. रात्री जेवणं झाली की निनाद hall मध्येच झोपायचा. ती काही त्याला बोलायची नाही.