Relationship audit books and stories free download online pdf in Marathi

नात्याचं ऑडिट

नात्यांचं ऑडीट

जरूरत के हिसाब से जब,

हर कोई बिकने लगा।

वक्त के साथ रिश्तों का,

हिसाब रखना जरुरी सा लगा।


लॉकडाऊन च्या काळात एका संध्याकाळी माझी मैत्रीण, नम्रता, तिचा मला फोन आला, आम्ही बालवाडी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत सोबत असल्याने मैत्रीण कमी बहीण जास्त आहे ती माझी, आणि नशीब असं आमचं की लग्न करून एकाच शहरात राहण्याच सौभाग्य लाभलं आम्हाला....तर तिचा फोन आला मला, फोन रिसिव्ह करताच तिच्या बोलण्यातून जाणवलं की ती काहीतरी अडचणीत असावी किंवा कुठल्या तरी टेन्शन मध्ये असावी...ज्या व्यक्तींशी आपण रोज बोलतो, ज्यांना खूप जवळून ओळखतो त्यांच्या आवाजावरून कळून येत की त्यांची परिस्थिती कशी आहे...तिच्या आवाजातून काहीतरी बिघडलं आहे हे नक्की कळत होतं... नम्रताची इतकी काळजी वाटण्याचं कारण अस की काही कारणास्तव तिच्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला होता, जे सोबत आहेत म्हणून सांगत होते तेही सोबत नव्हते तिच्या पडत्या काळात...तिला विचारणा केल्यावर, "काही नाही" हे उत्तर मिळालं आणि तिने फोन बंद केला...ती अस बोलल्यावर मी पण माझ्या कामात बिझी झाली, पण तीच ते "काही नाही" मात्र डोक्यातून जात नव्हतं... जेंव्हा कोणी "काही नाही" उत्तर देतं त्यात खूप काही दडलेलं असतं, त्या 'काही नाही' ला जेंव्हा आपण 'डिकोड' करतो त्यातून खूप काही निघतं... थोड्या वेळाने तिला कॉल केला तर तिने मात्र फोन उचलला नाही किंवा मेसेजेसला ही रिप्लाय दिला नाही...आता मात्र मला ही खात्री झाली की ती काहीतरी अडचणीत नक्कीच असावी त्यामुळे मी तिचं घरच गाठलं...

तिच्या घरी पोहोचली तर ती एकदम ठणठणीत बसली होती, माझा मात्र पारा चढला, मी तिला इतके फोन, मेसेजेस केले त्याचे तिने उत्तर का नाही दिले ? याचा राग जास्त आला मला...पण तीच उत्तर मात्र मला कोड्यात टाकून गेलं...तीच उत्तर होतं,

"नैना, तुला त्रास दिल्याबद्दल खरच मला माफ कर, पण मला माझ्या मनाच्या समाधानासाठी हे करावं लागलं..."

"मनाच्या समाधानासाठी?? वेडी आहेस का तू नमी? मी किती घाबरली होती आणि त्यात बाहेर वातावरण असं, मी कशी आली माझं मलाच माहीत.. आणि तेही फक्त तुझ्यासाठी..."

"हेच ऐकायचं होतं मला की तू फक्त माझ्यासाठी आलीस मी कशी आहे हे पाहायला.. तू माझ्या नात्यांच्या ऑडीट मध्ये पास झालीस..."

"वेडी आहेस का? नात्याचं कधी ऑडीट होते का? भावनांचा हिशोब लावू शकतो का आपण कधी? आपल्या मैत्रीत हे ऑडीट वैगरे कधीपासून आलं? की तुला आता माझ्या मैत्रिवरही विश्वास नाही..."

"खर सांगू नैना...नात्यांवर विश्वास आहे पण नाते जोडणाऱ्यावर नाही, माझ्यासारख्या व्यवहारशून्य व्यक्तीला कधी कधी भावनांचा हिशोब ही घ्यावासा वाटतो...मागे काही दिवसांत माझ्या आयुष्यात खूप काही घडलं, ज्या लोकांना मी आपलं मानायची त्यांनी फक्त त्यांच्या फायद्यासाठी माझ्याशी नातं जोडलं आणि मला वाटलं की माझं खूप महत्त्व आहे त्यांच्या आयुष्यात... पण मला जेंव्हा गरज होती तेंव्हा ते लोकं कुठेच नव्हते, मग विचार केला की सगळ्यांना जीव लावून मी काय कमावलं? मग ठरवलं मी, मी ज्यांना आपलं मानते त्यांनीही जर मला तीच किंमत दिली तर तेच नातं मी मरेपर्यंत निभवेल, आणि जे मला फक्त करमणुकीसाठी उपयोग करतात त्या नात्याचं पित्र घालेन... मला माफ कर की तुला त्रास दिला..."

खरं तर आधी रागच आला होता मला तिच्या अश्या वागण्याचा पण मी जेंव्हा शांत डोक्याने विचार केला मला तीची कृती बरोबर वाटली कुठेतरी, खरंच आहे ना, व्यवहारशून्य आणि संवेदनशील लोकांना फक्त 'हातच्याला' ठेवतात या 'प्रॅक्टिकल' विश्वात...मनुष्य हा समाजशील जरी असला तरी थोडाफार स्वार्थ तर आहेच त्याच्यामध्ये... आणि याच स्वार्थापायी आपण आधार शोधतो नात्यांचा, आपल्या मानसिक समाधानासाठी...आपल्या भावनिक गरजा हा नात्यातूनच पूर्ण होतात हेच माझं मत आहे, आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक नातं अस नक्कीच असतं जे सगळ्यांपेक्षा जास्त विश्वासाच, प्रेमाच आणि भावनिक दृष्टीने अतिशय भक्कम आधाराच असतं आपल्यासाठी.. अशी नाती काहीवेळा आपल्या रक्ताची असतात, मैत्रीची असतात किंवा प्रेमाची असतात...

खूप वेळा असं होतं की आपण त्या नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देतो, त्यांची काळजी करतो, त्यांना प्रेम देतो, आपल्या कितीही महत्त्वाच्या कामातून वेळ काढून त्यांना वेळ देतो, पण त्यांच्यासाठी आपण फक्त 'टाईमपास' असतो, जेंव्हा त्यांना गरज असते तेंव्हा त्यांना आपली आठवण येते, आणि आपल्याला वाटतं की आपण खूप महत्त्वाचे आहोत त्यांच्यासाठी...खरं तर हे असत की ते फक्त त्यांच्या गरजेपुरता आपल्याला महत्त्व देतात आणि आपल्याला वाटत की आपण त्यांच्या आयुष्य 'इंटेग्रल पार्ट' आहोत, त्यांनी आपल्याला त्यांच्या 'स्वार्थासाठी' दिलेल्या 'सो कॉल्ड इम्पोर्टन्सचं' ही आपल्याला किती अप्रूप वाटतं...आणि अशी नाती एकतर्फी असतात...आणि अश्या नात्यांची तपासणी होण गरजेचं असतं...

नम्रताच्या बोलण्याचा जेंव्हा विचार केला आणि मी माझ्या नात्यांच्या खात्यात जेंव्हा डोकावून पाहिलं, मला हेच जाणवलं की माझ्या ही आयुष्यात अशी नाती आहेत ज्यांना मी प्रत्येकवेळी मदत केली, त्यांना समजून घेतलं, मानसिक अधार दिला, माझं दुःख सांगण्यापेक्षा त्यांची दुःख जास्त ऐकून घेतली, पण जेंव्हा माझी पडतीची वेळ होती तेंव्हा मात्र ही नाती कुठेच नव्हती, त्यांचे कितीतरी दुःख मी ऐकून घेतले, त्यांच्या अडचणीत उभी राहिली पण माझ्या खराब काळात त्यांनी माझी साधी खबरही घेतली नाही, आणि तरीही मोठ्या मनाने मी अजूनही त्यांचं ओझं वाहत आहे..का? तर ते मला प्रिय आहेत म्हणून...हां, किती तो लोचटपणा...! आणि त्यांच्यासाठी मी काय आहे? त्यांच्यासाठी मी फक्त त्यांच्या सवडीनुसार मन रमवायच साधन... ही परिस्थिती जी नम्रता च्या आयुष्यात आली, माझ्या आयुष्यात आली, अस सगळ्यांसोबातच घडत असते....आपण सगळेच अश्या मनस्तापातून जातोच कधीतरी...आणि मनस्ताप ही फक्त एकतर्फी च असतो, दुसऱ्या बाजूला मात्र काहीही फरक पडत नाही.., मग हा मनस्ताप रोखण्यासाठी काय करावं?? त्या नात्यातून बाहेर पडावं...

मान्य आहे नातं कधीच तोडण्यासाठी जोडू नये, पण आपला स्वाभिमान आणि आत्मसमान गहाण ठेवून जर नातं निभवायची वेळ येत असेल तर त्यातून बाहेर पडलेल कधीही चांगलं...अश्या नात्यांची खाती तपासताना जर हे आढळून आलं की या खात्यात फक्त 'डेबिट' होतं, 'क्रेडिट' मात्र काहीही नाही तेंव्हा अश्या नात्याचं 'अकाउंट क्लोज' केलेलं कधीही चांगलं...
-------------------------------------------------------
समाप्त.