Dildar Kajari - 1 books and stories free download online pdf in Marathi

दिलदार कजरी - 1

Dr Nitin More

दिलदार

त्याचे नाव दिलदारसिंग! नावाप्रमाणेच दिलदार. खरेतर एखाद्या डाकूला न शोभेल असे नाव त्याचे. दिलदार! त्याच्या जन्माच्यावेळी त्याच्या बापास, संतोकसिंगास, त्याचे पाय पाळण्यात दिसले की काय कोणास ठाऊक, भर जंगलात दिलदारने पहिला ट्यांहा केला. संतोकसिंग खूश झाला. आपल्या डाकू घराण्याचे नाव उज्वल करायला वारस मिळाला म्हणून. संतोकसिंग ठाकूर म्हणजे चंबळमधील सिनियर डाकू. रेप्युटेड म्हणावी अशी दरोडेखोरांची टोळी चालवणारा. त्याच्या क्रूरकर्मांमुळे गावागावातून प्रसिद्धीस पावलेला. नुसत्या नावानेही गावातले लोक चळचळा कापत. संतोकसिंग तसा कर्तृत्ववान. कमी वयात अंगावर टोळीची जबाबदारी येऊन पडली. संतोकसिंगाचा बाप नटवरलालसिंग एका डाक्याच्या वेळी बंदुकीची गोळी लागून गेला. त्याने देह ठेवला तेव्हा संतोक उणापुरा सोळा वर्षांचा असेल. पण आपल्या मिडिआॅकर म्हणाव्या अश्या टोळीचे दिवस संतोकसिंगाने आपल्या मेहनतीचे पालटवले. जंगलात दुसरे डाकू नटवरलालसिंगच्या उदार धोरणाने सह अस्तित्व करून होते. 'खुद खाओ.. औरोंको खाने दो' असल्या समाजवादी डाकूगिरीने उत्कर्ष होऊन होऊन किती होणार? देश परदेशातून बदलाचे वारे अर्थव्यवस्थांवरून वाहू लागले तेव्हा कदाचित त्यातील एखादी झुळूक चंबळच्या जंगलावरून वाहत गेली असावी. भांडवलशाही व्यवस्थेत खुद ज्यादा खाओ आणि इतरांना मिंधे बनवून त्यांच्याच वाटच्या चतकोर तुकड्यातील काही त्यांना उदार बनून खिलाओ अशा मताचा संतोकसिंग त्या दृष्टीने कामाला लागला. बदलती अर्थव्यवस्था.. आणि काय!

तर संतोकसिंगाने आपली दरोडेखोरी एका उंचीवर नेऊन ठेवली. काही वर्षातच त्याचे नाव सगळीकडे झाले. मेहनत आणि नियोजन यांच्या बळावर संतोकसिंगाच्या टोळीला वैभवाचे दिवस आले. डोंगरदऱ्यातून घोडेस्वारी, अचूक अशी नेमबाजी, एकदा डाका घालण्याची योजना आखली की तहान भूक हरपून ती तडीस नेण्याची जिद्द .. आणि आजोबा पणजोबांकडून वारशात संक्रमित होऊन आलेले क्रौर्य.. संतोकसिंगकडे हे सारे गुण होते. दिलदारसिंगाच्या जन्मानंतर संतोक काही दिवस थोडा स्थिरावला. मंदावला. आपल्या कुलदीपकाचे लाड करत एकाच गुहेत एखादे वर्ष त्याने काढले असेल. मग परत कामास लागला. दिलदारसिंगास डाकूगिरीचे बाळकडू पाजले गेले. लहानपणापासून खरेखुरे घोडे नि थोडा मोठा झाल्यावर खरीखुरी बंदूक त्याच्या हाती आली.. इतर शहरी नि ग्रामीण मुलांमागे असते तसे शाळेचे लचांड त्याच्या मागे नव्हतेच. त्यामुळे स्वच्छंदी वृत्तीने काही वर्षे गेली. नद्यानाल्यांतून आणि डोंगरदऱ्यांतून बागडणे.. कधी बापाच्या मागे लागून डबलसीट घोड्यावर रपेटी मारणे.. थोडा मोठा झाल्यावर मात्र संतोकसिंगाने दिलदारसिंगाला आपल्या खऱ्या जीवन शिक्षण शाळेत घेतले. खुद्द टोळीच्या सरदाराचा मुलगा म्हणून त्याची लहानपणीही अशी वट होती. म्हणजे तसा संतोकसिंगचा राजकारण्यांशी संबंध तोवर फार जवळून आलेला असे नाही, पण घराण्यातील पुढच्या पिढ्या आपोआपच आपला वारसा चालवतात एवढे त्याच्या ध्यानी आले होतेच. तसा वारस घडवण्याची तयारी संतोकसिंगाने केली तर आपल्या देशात त्याचे आश्चर्य वाटायला नको. पण दिलदारसिंग तसा हूड होता. संतोकसिंगच्या शिक्षणात लक्ष नसलेला. बंदुकीच्या नेमबाजीपेक्षा उडती पाखरे टिपून ती भाजून खाणे यात जास्त रस असणारा. कधी कधी संतोकसिंगास आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता वाटू लागे. टोळी चालवणे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी हिंमत मेहनत आणि नेतृत्वगुण लागतात. एखाद्या नेत्याप्रमाणे दूरदृष्टी लागते. दिलदार तरूण होत होता. पण त्याच्या नजरेत ती चमक दिसेना. लहानपणी उडती पाखरे टिपणारा आता पक्ष्यांची ही शिकार करताना मनातून साशंक होऊ लागला तर माणसाची हत्या नि लुटालूट कशी करणार? दरोडेखोराचे काळीज कसे घट्ट आणि पाषाणाचे हवे. त्यात असे सशासारखे काळीज घेऊन दिलदार आपल्या टोळीचे लाखाचे बारा हजार करण्यास वेळ लावणार नाही .. हे हृदय असे बापाचे दिनरात्र अशा विचारात गढून जाई.

दिलदार विशीत आला नि संतोकसिंगने एक निर्णय घेऊन टाकला. डाकूगिरीचा त्याग करण्याचा.

आपल्या तंबूत तो दिलदारच्या हाती सूत्रे देण्याचे सूतोवाच करत म्हणाला,

"बेटा दिलदार, आम्ही आता थकलो आहोत. दमलो आहोत.. आमच्या हातून ही टोळी आता चालवत नाही. डोळ्यात प्राण असेतोवर तुम्ही ती हाती घ्या.."

"असे काय म्हणता तात? सरदार तुम्ही. आणि आम्ही तसे मनाने तयार नाही झालोत अजून."

"दिलदार, पाण्यात पडले की पोहता येतं.. आणि पाण्यात पडल्यावाचून पोहता येत नाही. आम्ही या चंबळच्या खोऱ्यात कित्येक पावसाळे पाहिले. ते ही छत्री न घेता. नद्यांना आलेले पूर पाहिले. त्यात तुम्ही कालपर्यंत कागदी बोटी चालवायच्यात. आता बास. तुम्ही मोठे झालात. कागदी घोडे नाचवू नका. खरे घोडे दौडवा. आम्ही निवृत्त होत आहोत.."

"असे काय म्हणता तात.."

"दिलदार, सगळ्यांचे भले त्यातच आहे. तुम्ही टोळीचे मुखिया बना. आम्ही आता ही डाकूगिरी सोडून वेगळ्या पद्धतीने काम करू इच्छितो. हे लपूनछपून दरोडे घालणे आता आम्ही बंद करू.. शेवटी काय पैसाच कमवायचा.. राजरोस कमवू. आम्ही राजकारणात जात आहोत. लवकरच या प्रातांत निवडणुका होतील. आम्ही निवडून येऊ.. आणि मग असे दरोडे घालण्याची गरज नाही .."

"म्हणजे तात आम्ही पण .."

"नाही. आम्ही फक्त जात आहोत ते तुमच्या काळजीपोटी. आणि आपले वंशपरंपरागत काम सुरू राहिलेच पाहिजे. वारसा जपून ठेवलाच पाहिजे. आपल्या सात पिढ्यांची उज्ज्वल परंपरा आहे ती. तुमच्या आजोबा, पणजोबांनी आणि खापरपणजोबांनी आपल्या टोळीची बसवलेली दहशत अजून आहे. ती परंपरा चालवण्याची जबाबदारी आहे आता तुमच्यावर. पण दिवस बदलत आहेत. पूर्वी सरकारे आपल्याला वचकून असत. पण आता काही कमीजास्त झाले तर सरकार दरबारात वजन पाहिजे.."

"पण आम्हाला मनाची तयारी .."

"होईल. ज्यावेळी लुटलेल्या मालास तुमचा हात लागेल त्यावेळी तुम्हाला जाणवेल .. मेहनतीचे फळ हे नेहमीच गोड असते. जिवावर उदार होऊन लुटलेल्या त्या पैशांचा स्पर्श होईल तेव्हा तुम्ही अंतर्बाह्य बदलून जाल. आणि मग मनाची तयारी आपोआप होऊ लागेल .. या गोष्टीची झिंगच वेगळी. गावोगावी आपल्या नुसत्या नावालाही घाबरणारे घाबरट लोक पाहिले की आपण त्या देवाच्या खालोखाल नंबर दोन वर.. डेप्युटी देव झाल्यासारखे वाटेल. गगनास हात पोहोचतील.. आतंक पसरवणे हे आपले नीयत कर्म. डाकूधर्माचे पालन करा. अधिक काय सांगावे?"

"पण आम्हाला वाटते असे कशाला ..?"

"कशाला? तुम्ही असे विचारावे? डाकू धर्म वाढवण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या. जिवाची पर्वा न करता काल परवा पर्यंत घोड्यावरून दहशत फिरवत वणवण फिरलो. एका गुहेतून दुसऱ्या गुहेत भटकत राहिलो. एका ठिकाणी न थांबता ही जागोजागी फिरतीची नोकरी असावी असा व्यवसाय पकडला.. आणि तुम्ही म्हणता कशाला? आम्ही कमवून जमवून ठेवू पण ते किती वर्षे पुरेल? आणलेले दाणापाणी संपुष्टात आले की मग खाणार काय? आपण एकटे नाही. इतकी सारी डाकूंची फौज आहे सोबत. त्यांची जबाबदारी आहे आपल्यावर. डाकूधर्म सोडला तर या सगळ्यांस पोसणार कोण?"

"तात,तसं काही नाही. जो चोच देतो तो चारा देतो. जो बंदुकीच्या गोळ्या देतो तो बंदूक ही देईल.. किंवा जो बंदूक देतो तो गोळ्या ही देतो .. आम्ही डोंगरावरच्या घंटाई देवीच्या दर्शनास जाऊन आलो.."

आता संतोकसिंगास खरा पेच पडला. म्हणजे राजकारणात जाण्याबाबत नाही, तर दिलदारसिंगच्या छातीतल्या कोमल हृदयाबद्दल. घंटाईदेवी त्यांची कुलदेवता. पण स्वतः संतोकसिंग कधी देवदेव करत बसला नव्हता. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. उगाच देवाला नवस नि पूजाअर्चा यात वेळ दवडू नये असे एखाद्या संतसज्जनांनी सांगावेत असे त्याचे विचार. आणि हा दिलदारसिंग अजून करियरला सुरूवात होते न होते तो देवादिकाच्या नादी लागावा?

जे जे होईल ते पहावे.. उसासा टाकत संतोकसिंग त्यादिवशी तळमळत झोपी गेला. पुत्राबद्दलची माया नि चिंता खात असणाऱ्या पित्यास निद्रा येणार कशी. पहाटे कधीतरी डोळा लागला असावा.. स्वप्नात संतोकसिंग राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेत होता. इकडे दिलदारच्या दिलात सुधारणा झालेली. घोड्याच्या टापांच्या आवाजात खांद्यावर बंदूक टाकून डाकू दिलदार शेजारच्या गावागावातून लुटालूट करत होता.. स्वप्न पहाटेचे. सत्यात येणारच.. पहाटे जाग आली तसे समाधानाने त्याने डोळे उघडले.