Dildar Kajari - 9 books and stories free download online pdf in Marathi

दिलदार कजरी - 9

९.

पाऊल पडेल का पुढे?

दिलदार परतला. समशेर त्याची जणू वाटच पाहात होता. नाही म्हटले तरी समशेरला या प्रेमकहाणीत तसा रस वाटायला लागला होता. नेहमीच्या मारधाडीपेक्षा हे अधिक रम्य वाटायला लागले होते. दिलदारच्या दिलाची हाक नि भूक अशी गोड वाटेवर घेऊन जाणारी असेल तर हे दरोडेखोरीचे आयुष्य म्हणजे फुकट.. दिलदारच्या प्रयत्नात एक काव्य आहे. एक नाजूक भावना आहे. भले त्याचे ते स्वप्न पूर्ण होईल किंवा न होईल.. पण ती वाट वेगळी आहे. बंदुकीच्या दस्त्याहून गुलाबाच्या पाकळ्यांत जास्त ताकद आहे की काय? गुरूजींना पळवून आणले ते ही प्रेमाने बोलत होते.. त्यांना या बंदुकीच्या गोळ्यांची गरज भासत नव्हती. आणि गावातील लोक? ते ही असेच कोणाला धाकदपटशा न दाखवता जगतात.. आजवर पोलिसांनी पकडले नाही, कदाचित कधीच पकडले जाणार नाही पण मनाच्या पाठीशी ही सतत भीतीची भावना असतेच ना.. मुक्त कधी जगायला मिळणारच नाही का?

बाहेरच्या जगातील वाऱ्याची झुळूकही अशा बदलाला कारणीभूत होऊ शकते? खरेतर टोळीतील कोणालाही याहून दुसरा पर्यायच कधी दिला गेला नसेल तर त्यात त्यांची तरी चूक काय होती?

समशेरच्या मनात असे विचारांचे वादळ उठले असतानाच दिलदार तिथे पोहोचला. दिलदारच्या तोंडावरचे हासू पाहूनच तो समजायचे ते समजला..

"काय मग? मोहीम फत्ते?"

"आजची तरी.."

"कितीजणांचा केलास खातमा?"

"खातमा? ही मोहीम वेगळी .. तुझी वेगळी .."

"छे! तू असा.. दिलदार.. दिसायला गुलजार.. सायकलीवर स्वार.. नक्कीच गावातील मुलींच्या ह्रदयाला तुडवत आला असणार तू.. आमच्या मोहिमेत कोणी गेले तर समोर दिसते तरी.. तुझ्या मोहिमेत कोणाला कळणारही नाही .."

"तुझे काहीतरीच.."

"काहीतरीच? मग असा बन ठन कर का गेलास.. आपल्या तंबूत आजवर आरसा कोणी पाहिला नसेल .. दिलदार ए यार आरशासमोर किती वेळ उभा होता?"

"तुझे काहीतरीच.."

"मग मी खोटे सांगतोय .. आज सकाळची गोष्ट.. मी उठवले स्वप्नातून .. मग हा दिलका राजा नदीत घुसून किती घासूनपुसून बाहेर पडला.. नि हे साफसूफ कपडे घालून.. सायकलीला टांग मारता झाला.. ये वादियां ये फिजाएं गवाह हैं.."

"तू आता बस हां.."

"मग काय म्हणत होती भाभी?"

"भाभी? पण हुशार रे ती.. तिच्या मावशीने हाक मारली तर माझी चिठ्ठी लपवली तिने.."

"काय सांगतोस.."

"खरंच!"

"ते नाही .. तू तिला सांगितलेस.. चिठ्ठी तुझी आहे, पहिल्याच भेटीत.."

"छे रे.. इतकी हिंमत नाही यार. उद्या जाईन परत."

"मग आज आता जेवायची गरज नाही.. कोंबडीचे मटण आहे.. पण तुझे पोट तर कजरी दर्शनाने भरलेले दिसतेय.. तुडुंब!"

दिलदारचे पोट भरले असेल पण मन भरले नव्हते. कजरीशी बोलण्याची ती तीन चार मिनिटे त्याने जणू ध्वनिमुद्रित करून साठवून ठेवली होती. दिवसभर ती टेप त्याच्या मनात नि कानात वारंवार सुरू होत होती. त्यामुळे तो मध्येच हसत होता स्वतःशीच.. दुरून पाहणाऱ्यास वाटावे की नक्कीच मेंदूत कुठला तरी घोटाळा झाला आहे. पण तंबूत तो एकटाच होता.. संध्याकाळी संतोकसिंग त्याचा समाचार घ्यायला येईपर्यंत.

"खूप दिवसांनी इकडे येणे केलेत तात?"

"हुं. तुला भेटून खूप दिवस झाले. आम्ही शहरात काय गेलो.. तुम्ही अजून सरदारासारखे वागताना दिसत नाहीत."

"आम्हाला या डाक्या दरोड्यांत रस वाटेनासा झालाय.. बंदुका घेऊन भीती पसरवत फिरणे.. मुडदे पाडणे नि लुटालूट करणे.. नि मग पसार होऊन डोंगर दऱ्यातून लपून छपून बसणे.."

"खामोश! आपल्या ठाकूरांची उज्ज्वल परंपरा आहे. तो वारसा मिळाला आहे त्याचा अभिमान बाळगा. आपल्या सात पिढ्यांनी डाकू म्हणून नाव कमावले. आपले खापर पणजोबा गब्बरसिंग.. आजही त्यांचे नाव ऐकून गावातील लोक चळाचळा कापतात. त्यांचे काम मानसिंग म्हणजे तुमच्या पणजोबांनी पुढे नेलं.. आम्ही मेहनतीने संतोकसिंग डाकू झालो. दिवस-रात्र, उन्ह-पाऊस कसली तमा न बाळगता डाकूगिरीचा आदर्श उभा केला. आणि आमच्या पुढील पिढीने ते मातीमोल करायचे ठरवलेले दिसते. देवीच्या मनात काय आहे न कळे.."

"पण आम्ही डाकू नाही बनू शकत. आमच्या रक्तातच ते नाही .."

"संतोकसिंगाचे शुद्ध सात्विक डाकूगिरीचे रक्त तुमच्या धमन्या नि नसानसांतून वाहात आहे.. हे विसरू नका. आमच्या कीर्तीला काळिमा फासू नका.. प्रत्येक बापाला वाटते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा .. ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आम्ही चंबळच्या खोऱ्यात या भागावर राज्य करतो. इकडे पोलिसही नजर वाकडी करून पाहात नाहीत. आता तर आम्ही राजकारणात उडी घेतली की अमरत्वाचा पट्टा मिळेल जणू. आणि तुम्ही आमचे दिल तोडत आहात.. आमच्याहून आपल्या मातेचे शिक्षकी रक्त अंगात जास्त खेळत असावे.. आम्ही कळकळीने सांगत आहोत, अजून सुधारण्यास वाव आहे. हे चुकीचे विचार तुमचे आयुष्य बरबाद करतील. सुधारा अजून आणि ठाकूर घराण्याचे नाव मोठे करा.. एक गब्बरसिंगानंतर तुमचे नाव झाले पाहिजे. बायाबापडे नुसता तुमचा चेहरा डोळ्यांसमोर आला की कापले पाहिजेत थरथर.. अजून वेळ गेली नाही.."

संतोकसिंगाने अजूनही कितीतरी बडबड केली. दिलदारची सकाळच्या अत्यानंदात बुडालेल्या दिलाची नौका सत्यस्थितीच्या समुद्रात बुडण्यापासून वाचवण्याचा एक प्रयत्न बाप म्हणून आणि डाकूवर्गातील एक बापमाणूस म्हणून संतोकसिंगने केला. अर्थात दिलदार मनाने तेव्हा कजरीच्या गावी, कजरीच्या जवळ होता. त्यामुळे ते शब्द पालथ्या घड्यावर पडून वाहून गेले नि दिलदार बापाच्या इतक्या त्राग्यानंतरही कोरडाचा कोरडाच राहिला. एरवी तो चिडला असता. संतापला ही असता कदाचित. दोघांची खडाजंगीही झाली असती. पण आज त्याला कसलाच फरक पडणार नव्हता. वैतागून संतोकसिंग निघून गेला नि दिलदार शांतपणे उद्याच्या तयारीला लागला. तयारी म्हणजे मानसिक तयारी.. कजरीशी काय काय बोलायचे हे ठरवणे.. तिला अजून एखादी चिठ्ठी लिहावी का? ते ठरवणे.. कजरी विचारानंदात बुडून जाणे..

रात्री दिलदार मोठ्या अपेक्षेने झोपी गेला. हुकुमी स्वप्नात कजरीचा हुकुमी प्रवेश व्हायलाच हवा.. पण मध्यरात्र काय की पहाट काय.. आज स्वप्न पडले पण ते कजरीचे नाही.. तर संतोकसिंग त्याला घोड्यावरून कुठल्यातरी गावात डाका टाकायला घेऊन जात होता.. लहान मुलांना शाळेत बळजबरी सोडतात तसे. दिलदार नाही नाही म्हणत असतानाही संतोकसिंगाने त्याच्या खांद्यावर बंदूक दिलेली.. शेवटी नाइलाज को क्या इलाज म्हणत दिलदार जायला निघतो.. घोड्यावरून टापा टाकत दिलदार ऐटीत निघालेला .. लोक सगळीकडे स्तब्ध उभे.. त्याला घाबरून.. दिलदारचा गुलजार चेहरा हळूहळू उग्र होत जातो.. हवेत दिलदार चार गोळ्या झाडतो.. इतक्यात समशेर धावत येतो सांगत.. सरदार, कोणीतरी कजरी नावाची मुलगी भेटायला आलीय..

.. स्वप्नात कजरीचा प्रवेश होणार इतक्यात त्याची झोप मोडली.. घामाने डबडबून तो उठला..

पहाटेचे असो की नसो, हे स्वप्न काही खरे होणार नाही. आणि असे व्हायला लागले तर मात्र काही खरे नाही .. संतोकसिंगाने त्याला बळजबरीने डाकूत्व बहाल केले तर पर्याय कोणता? आजवर कजरीबद्दलचे प्रश्न डोक्यात घर करून असायचे.. त्यात हा नवीन .. अजून एक प्रश्न! प्रश्नांची संख्या वाढतेय.. उत्तर कोणाचेच ठाऊक नसावे?

सकाळी नदीत स्वत:ला घासूनपुसून काढताना विचार आला त्याच्या मनात .. कजरीला चिठ्ठी वाचून काय वाटले असेल? चार शब्दांची चिठ्ठी .. तिने वाचलीच नाही तर? पण ज्या पद्धतीने तिने ती चिठ्ठी लपवली, ती वाचणारच ती चिठ्ठी एवढे नक्की. मग तिला काय वाटेल? रागावेल की आतुरतेने दुसऱ्या चिठ्ठीची वाट बघेल? आरशासमोर उभा राहून स्वतःला न्याहाळताना मागून समशेर येऊन कधी उभा राहिला त्याला ध्यानातही आले नाही.

"बन ठन के चली.. दूल्हे राजाकी सवारी .. गुलजार तू दिलदार .. करके रूप संवार .. अब होंगे सायकल पर सवार .."

"चुप रे.. काल सरदार आलेले.. लंबेचौडे प्रवचन दिले.. डाकूपंथ सोडून वाममार्गी लागू नको म्हणाले .. त्यात नवीन ते काय म्हणा.."

"मग तू काय करणारेस..?"

"समशेर, तुला म्हणून सांगतो.. माझी आई गेली ना तेव्हा तिला मनातल्या मनात मी वचन दिलेय.. मी डाकूगिरी करणार नाही. तिला शेजारच्या कुठल्यातरी गावातून जबरदस्ती पळवून आणलेले.. पूर्ण आयुष्य फक्त माझ्यासाठी तिने जंगलात असे काढले. मी तिला दिलेले वचन पाळणार. तिने मला तसे सांगितले नाही कधी. पण तिची इच्छा तीच असणार. आणि आपले तर असे आहे.. मेरा वचन गंगा की कसम .."

"पण तुझ्या वचनाबद्दल तर कोणालाच ठाऊक नाही."

"भले ते कोणालाच ठाऊक नसेल.. मला स्वत:ला तर ठाऊक आहे. आईला ठाऊक असणार, इकडे या जंगलात मला डाकूगिरी सोडून जगण्यासाठी दुसरे काहीच करण्यासारखे नाही. म्हणून तिने ते वचन घेतले नसणार. पण मी दिलेले वचन पाळणारच. त्यात कजरी मिळाली तर अधिक उत्तम .."

दिलदारच्या मनातील विचारचक्रे सायकलीच्या चाकाबरोबर फिरत राहिली. हातात वेशांतर म्हणून घेतलेल्या चिठ्ठ्या नि कजरीला परत लिहिलेली चार शब्दांची चिठ्ठी .. कालच्या चिठ्ठीतला मजकूर आठवून त्याला खुदकन हसू आले.. त्यात लिहिलेले एवढेच.. 'तू मला फार आवडतेस' .. मोजून चार शब्द.. आजच्या चिठ्ठीतही चारच शब्द.. 'खरंच.. फार म्हणजे फारच..' चिठ्ठी सांभाळून ठेवत तो गावात पोहोचला.

अशा चार शब्दी चिठ्ठीने त्याची ती मायना काय लिहावा नि शेवटी काय लिहू.. ही समस्याच सोडवून टाकली. विचार करून तो स्वतःवरच खूश झाला. गावाजवळ आला तेव्हा आज स्वागताला तोच पोस्टमन उभा असल्याचे दुरून पाहिले नि ब्रेक लावून तो मंदगतीने पुढे होऊ लागला .. त्याला संस्कृत येत असते तर तो नक्कीच प्रथमग्रासे मक्षिकापात: म्हणाला असता.. असली पोस्टमन निघून गेला नि हा नकली प्रवेशता झाला. फक्त एका व्यक्तीची चिठ्ठी ने आण करणारा.. व्यक्तीगत पोस्टमन!