Dildar Kajari - 11 books and stories free download online pdf in Marathi

दिलदार कजरी - 11

११

केल्याने वेशांतर

गुरूदासपूर तसे मोठे गाव. नदीतीरावर वसलेले, त्यामुळे सुपीक जमिनी, हिरवी शेते आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटून आलेल्या सुबत्तेच्या पाठोपाठ लोकांना मग खुणावू लागते ती कला नि कलाकारी.. दशावतारी नि नौटंकीचा मिलाफ असणारी कला तिथे सादर होई. आणि सर्व पात्रे साकारणारा मेकपमॅन ही त्याच गावचा.. हिंमतलाल. समशेर त्याचे नाव ऐकून होता.. नि मग गुरूदासपुरातून येता येता हाती लागेल तसा एक ज्योतिषी .. कुडमुड्या असेल तर अधिकच उत्तम .. दोघांना उचलून आणायचे.. दिलदारची सक्त ताकीद .. हिंसेच्या बळावर आणून चालणार नाही. प्रेमाने समजावून तर ते येणार नाहीत. समशेरच्या गाठीशी तसा मास्तरांना उचलण्याचा अनुभव होताच.. त्यात ही नवीन भर!

- आणि मग दुपारपर्यंत हिंमतलाल आणि एक रस्त्याच्या कडेला बसलेला ज्योतिषी भैरव, दोघे डोळ्यांवरच्या पट्ट्या कधी निघतील याची वाट पाहात दिलदार नि समशेरच्या समोर उभे होते!

डोळ्यावरच्या पट्ट्या निघाल्या तेव्हा हिंमतलाल नि भैरव दोघेही थरथर कापत होते.. समोर दोन डाकू.. समशेरचे एक ठीक होते. दिलदारला अशी त्याची गणती डाकूंत केलेली आवडणार नसली तरी प्रेमात सारे क्षम्य म्हणून त्याने याबद्दल स्वतःच स्वतःला माफी दिलेली. डोंगरदऱ्यातील संतोकसिंग टोळीचा लौकिक दूरवर पसरलेला. पण आपल्याला पळवून ह्या टोळीबहाद्दरांना काय मिळणार? बहुतेक त्यांचा गृहपाठ चुकला असणार .. असा विचार येईतोवर दिलदारचा आवाज कानी पडला..

"भैरव.. पंडित भैरवलाल, ज्योतिष सांगणार .. नक्की सांगणार की.."

भैरव त त प प करत म्हणाला,"मी साधा कुडमुड्या ज्योतिषी .. चूक झाली असेल तर माफ करा.."

"चूक? कसली चूक?"

"काय करणार? पोटापाण्याचा व्यवसाय आहे हुजूर .. करावं लागतं.. भविष्य सांगावं लागतं.. लोकांना आवडेल ते नाही सांगितले तर कोण देईल पैसा? दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून पाय आखडतात. धुळीचा त्रास अलग. पण नाईलाज आहे हुजूर .. घरी छोटे छोटे बालबच्चे आहेत.."

"भैरव.. गप्प .. तू या दिलदारला ज्योतिष विद्या शिकवायची. ती ही आज आणि उद्या.. दोन दिवसांत .."

"दोन दिवसांत?"

"दोन दिवसांत शिकवून तयार करायचे याला. खराखुरा ज्योतिषी वाटायला हवा.."

"हुजूर पण तुम्ही माझ्याच गावात ज्योतिषी म्हणून येणार? माझ्याच पोटावर लाथ मारू?"

"तुला काय वाटतं? हा डाकूगिरीचा चांगला व्यवसाय सोडून आम्ही तुझ्या गावात ज्योतिष सांगणार म्हणून रस्तोरस्ती फिरू? स्वतःचे भविष्य तरी पाहायचे होतेस."

"पण खरं सांगतो हुजूर .. मला सोडून द्या.. मला ज्योतिष विद्या येत नाही .. हे ज्योतिषीपण फक्त पोटासाठी .."

"ज्योतिष विद्या? पोटासाठी? आमची बात अलग.. आम्हाला शिकायची त्या ह्रदयासाठी."

"ह्या दिलदारला ज्योतिष विद्या नाही, फक्त ज्योतिष भाषा शिकायची आहे.. ह्याला फक्त ज्योतिष्यासारखे बोलायला शिकवायचे.. गुरूचा उंचवटा नि शनिचा कोप.. प्रकोप .. सप्तमातला चंद्र आणि दशमातला सूर्य.. असलं काहीतरी .."

"कशासाठी हुजूर?"

"दिलदार.. सांग कशासाठी .."

"भैरव.. नस्त्या चौकशा नकोत. तू फक्त मला ज्योतिषी भाषा शिकव.. जलदीने .. वेळ कमी आहे.. ती शिकवलीस की परत तू तुझ्या रस्त्यावर येशील. हा समशेर तुला सोडून येईल. घोड्यावरून.. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही .. दिलदारचा शब्द आहे हा.."

"धन्यवाद हुजूर .. डाकूलोकांचं वचन म्हणजे गंगा मैया की कसम.. ऐकून आहे मी.."

"छान. त्या गंगा मैयाची शपथ घेऊन असे शिकव की दुसऱ्या कुणा ज्योतिषालाही ओळखू येऊ नये.."

"जी हुजूर. शिकवतो.."

हिंमतलाल हे कसलं नवीनच नाटक होऊ घातलंय याचा विचार करत बाजूला उभा होता. पण या नाटकात आपली भूमिका काय याचा त्याला पत्ता लागत नव्हता. पण ज्या पद्धतीने दोघे बोलत होते, बहुधा मामला वेगळाच काही असावा आणि बहुधा जिवाला तरी धोका नसावा असेच त्याला वाटत होते. तरीही प्रत्यक्ष गावोगावी ज्यांच्या नुसत्या नावालाही लोक घाबरतात त्या डाकूंच्या टोळीने अपहरण करावे.. भीती तर वाटणे स्वाभाविक होते.. तोंडाने शब्द न काढता तो उभा होता..

"आणि तू हिंमतलाल.."

"जी हुजूर .. काही चुकी झाली तर माफी.. मला बालबच्चे नाहीत.. पण माझी सगाई झालीय.. नंतर बालबच्चे होतील.. त्यांचा विचार करून मला सोडून द्या सरकार .."

"गप बस.. ह्या दिलदारकडे नीट बघ.."

"कशासाठी हुजूर?"

"आता याला ओळखता येणार नाही असा ज्योतिषी बनवायचा आहे.. स्वतः त्यालाही आरशात ओळखू येऊ नये असा.. फक्त दाढीमिशा नि केस दे..'

"कशासाठी हुजूर?"

"तोच प्रश्न परत परत? चौकशा नकोत. कपडे सांग.. समज नाटकाचा मोठा शो आहे.. आणि मेकप सोपा पाहिजे.. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.."

"आता करून देतो हुजूर .."

"आता नाही .. उद्या. तोवर त्या तंबूत बस.. पळून जायचा प्रयत्न करू नकोस .. उद्या तुला मीच सोडून येईन .."

"जी हुजूर .."

"तोवर या दिलदारची शिकवणी सुरू होईल.."

"पण हे सगळे हुजूर कशासाठी?"

"परत विचारलेस?"

"नाही, पोलिस मागे लागतील माझ्या? माझे तर अजून लग्नही नाही झाले. अजून वय तसे झाले नाही .."

"आता बडबड करशील तर.. तुझा ओरिजिनल मेकप बिघडवून टाकेन.."

"समशेर.. शांत.. हिंमतलाल.. आणि भैरव.. इकडे तुम्ही शांतपणे आपले काम करा.. उद्या दोघे आपापल्या गावी असाल.. फक्त मला ही ज्योतिषभाषा शिकव.. कोणाला शंका येऊ नये की मी ज्योतिषी नाही इतपत.. आणि हिंमतलाल, अशी दाढी दे लांब नि केस की कोणी ओळखू नये.. तुमच्यावर पुढचे सारे अवलंबून आहे.."

हिंमतलाल आणि भैरवलाल.. दिलदारच्या प्रेमकहाणीतील पुढच्या भागात येऊन जाणारी पाहुणे कलाकार मंडळी. भैरवला भीती होती ती त्याचे तोकडे ज्ञान उघडे पडण्याची .. पण दिलदारला ज्ञान नकोच होते. हवी होती ती ज्योतिषाची परिभाषा. अगदीच कोणासमोर आपले अज्ञान उघडे पडून भांडे फुटू नये इतपत. चार दोन ग्रहांची नावे घेतली की कोणाचाही ग्रह व्हावा की हा ज्योतिषी आहे. भैरवलाल कुंडली उघडून बसला. त्यातील ग्रहांना वाटून दिलेली घरे.. समजावून सांगू लागला. एकेक ग्रह असा आपल्या चौकटीतल्या गृहात कसा राहात असेल? कुंडली काही दिलदारच्या पचनी पडेना.. त्यापेक्षा हस्तसामुद्रिक बनणे बरे.. नाहीतर चेहरा वाचन.. किंवा खरेतर दोन्ही. म्हणजे कजरीला समोर ठेऊन भविष्यकथनाच्या निमित्ताने बघत राहता येईल.. तिच्या खोल खोल डोळ्यांत बघत बसावे.. आणि हात हाती घेऊन त्यावरील रेषा बघाव्यात .. मग भविष्य उज्वल असणारच.. हे सांगायला कोणी ज्योतिषी कशाला हवा? हिंमतलाल हिंमत एकवटून सारे पाहात अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होता.. एकदा तयारी झाली की ज्योतिषाच्या वेशात पुजारीबुवांच्या घरावर चढाई करायची आणि कजरीचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करायचा.. या वेशांतराच्या नाटकामागे असे काही नाटक असेल असे त्या नाटकातील मेकपमॅनच्या मनात मात्र येणे शक्य नव्हते हे खरे..

भैरवकडून मग ज्ञानाचे तुषार गोळा केले गेले.. हिंमतलालने मोठ्या हिमतीने केसांचा टोप नि दाढी बसवली.. ती काढावी नि घालावी कसे ते शिकवले. दोन दिवस त्या जंगलातील पाहुणचार घेऊन झाला. डोळ्यांवर पट्ट्या बांधून दोघांची पार्सले सुखरूप गुरुदासपुरी रवाना करण्यात आली.

मग रात्रभर दिलदार चंद्र सूर्य आणि ग्रहताऱ्यांची नावे घोकत बसला.. हाताच्या रेषांची नावे नि त्यांचे हातावरील जाळे .. त्याबद्दल असंबद्ध वाटू नये इतपत बोलता येणे आवश्यक.. बाकी ऐन वेळेची कसरत.. वेळ निभावून, नाहीतर मारून नेणे महत्त्वाचे .. बाकी समशेर म्हणतो तसे.. 'रघुपति राघव कजरी कजरी' आणि काय!

त्यानंतर दिलदार गाढ झोपी गेला.. सात पिढ्यांत कोणी असे वेशांतर केले नसावे. पण दिलदार ते करणार होता. त्यासाठी शांत डोके असणे महत्वाचे. म्हणून जास्त विचार न करता दिलदार अंथरूणावर पडलस. कजरी आख्यानाचा दुसरा अध्याय सुरू होणार होता..