दिलदार कजरी - 14 in Marathi Novel Episodes by Nitin More books and stories Free | दिलदार कजरी - 14

दिलदार कजरी - 14

१४.

पुनर्भेट

"यार समशेरा, माझा विश्वास बसत नाही हे सगळे घडले त्यावर.. म्हणजे मी खरोखरच ज्योतिषी बनून गेलो नि कोणाला संशय न येता सगळे काम करून आलो.. आणि कजरी भेटेल असे शेवटपर्यंत वाटत नव्हते. ती भेटली अगदी शेवटी. आणि महत्त्वाचे म्हणजे ती पण पोस्टमनची वाट पाहाते आहे.."

"पण तिला कदाचित तो पोस्टमनच आवडला असेल तर?"

"तर? आयुष्यभर पोस्टमनच्या वेशात सायकलीवरून फिरत राहीन.. तू कहे अगर जीवनभर सायकल चलाता जाऊं.. उद्या पोस्टमनचे काम परत आहे.."

"मग तुझे ज्योतिषी बनण्याचे सगळे सामान देऊन येतो परत.."

"नाही दोस्त नाही. पुढे कधी कशी गरज पडेल सांगता येत नाही. सगळे साहित्य हाताशी असलेले बरे.. सध्या मात्र चलो बुलावा आया है.. कजरीने बुलाया है.. आणि मला वाटतं तिचं एक नाव मालती असावे. पाळण्यातले असणार. नाकात सांगितलेले.."

"नाकात?"

"त्यांची पद्धत तशीच आहे म्हणे. नाव ठेवताना नाकात सांगतात .."

"तेवढयात त्या बाळाला जोरात शिंका आली तर?"

"ते नाही विचारले .. उद्या विचारतो रसीलाबेनला.."

"एक ध्यानात ठेव दिलदार.. तुझा पोस्टमन त्या आचार्याला ओळखत नाही. जे आचार्यास ठाऊक ते पोस्टमनला नाही आणि दिलदारच्या दिल खोलून लिहिलेल्या चिठ्ठीत काय आहे तेही पोस्टमनला ठाऊक नाही. एकात एक बोलशील नि गोंधळ घालून ठेवशील.."

"हे खरेय तुझे. पण आज मी ज्योतिषी होऊन गोंधळ होऊ नाही दिला.. उद्या आणि नंतरही अखंड सावधान राहिन. ते गाणं आहेच.. मोहब्बत की राहोमें चलना संभलके .."

"त्या सिनेमापायी वाया गेलास तू दिलदार.. नहीं तो तुम भी थे कुछ काम के.."

"खरंय तुझं. आज कजरीशी बोललो ना.. आज मी खूश आहे.. जे हवे ते माग.. कजरी सोडून .."

रात्रभर कजरीचे विचार करत नि दिवसभरच्या संभाषणाची आठवण काढत दिलदार पडून राहिला. विचार करताना त्याला जाणवले ते हे.. कजरी मुद्दाम घराबाहेर लपली असणार, एकतर कोणी ज्योतिषी घरी आला हे तिला कसे ठाऊक? नि त्या चिठ्ठीबद्दल सगळ्यांसमोर ती विचारणार तरी कशी होती? थोडक्यात लक्षणे चांगली आहेत.. चार शब्दांच्या चिठ्ठीने चार मैलांपर्यंत मजल मारली गेली आहे. रस्ता लांबचा आहे, पण त्यादिशेने गाडी सुटली तर आहे.. आता तिचा वेग तसाच ठेवला तरी आपल्या प्रेमाच्या गावी पोहोचता येईल.. फक्त एक अडथळा आहे तो लीलाच्या लग्नाचा. तिच्याशिवाय कजरीचा नंबर यायचा नाही .. एका दृष्टीने ते बरेच आहे, जोवर लीलाचे होत नाही तोवर कजरीच्या लग्नामागे कोणी काही जात नाही. तोवर दिलदार आपले नवनवीन मार्ग शोधत राहिल. आजवर अशक्य वाटेल अशी गोष्ट तर झाली. सासरेबुवांकडे दूध नि केळी खाऊन आला.. थोडा धीर असता तर जेवूनही आला असता.. जेवणाचे काय.. जावयाला बोलावतील तेव्हा जेवणाशिवाय थोडीच सोडणार आहेत? दिलदारच्या विचारांचा वारू असा धावत होता. विचार करता करता कजरीचा आवाज कानात परत परत ऐकू येत होता नि तिचे ते काळेभोर डोळे.. ओठांवरचे हसू आठवून दिलदारच्या तोंडावर हसू पसरत होते.. सकाळी परत नदीत डुंबताना त्याला कालची भेट तुझी माझी स्मरून कधी एकदा परत सायकलीवर स्वार होतो असे झाले .. शेवटी सायकलीवर टांग पडली.. तो धुंदीत निघाला नि थोडे अंतर गेल्यावर ध्यानात आले, त्याच्या वेशांतराचा भाग असलेली पत्रे घ्यायलाच तो विसरला..

आज सारे काही ठीक वाटत होते. तो स्फूर्तीदाता पोस्टमन दिसला नाही. मंदिराबाहेर सायकल ठेऊन तो आत शिरला. देवळातील घंटी वाजवून हात जोडून उभा राहिला. किलकिल्या डोळ्यांनी प्रार्थना करत उभा राहिला, कजरी येण्याची वाट पाहात. थोड्याच वेळात कजरी बाजूच्या वाटेने हळूच बाहेर पडताना दिसली नि तो बाहेर पडला. सायकलीवरून थोडा दूर जाऊन थांबला नि पाठोपाठ कजरी पोहोचली.

"किती दिवसांनी आलात?"

"मी? मध्ये आलो तर तुम्ही नव्हता. माझा तो मित्र बिचारा उदास बसला आहे. वाट पाहात.."

"ते मी गावी गेलेले. पण मला ठाऊक होते, आज तुम्ही येणार .."

"ते कसं काय?"

"काल एक पंडितजी आलेले. त्यांनी सांगितले."

"कोण?"

"मावशी सांगत होती. काशीचे आचार्य लाल कोणीतरी होते."

"आचार्य लाल? काशीचे? फार मोठा माणूस. माझ्या माहितीतले आहेत ते.. ते म्हणतात तसेच होते असे ऐकून आहे."

"आहेत. मोठे पंडित आहेत. पण गंमत म्हणजे त्यांचा आवाज अगदी तुमच्या सारखा आहे.."

"असू शकतो. एकासारख्या एक गोष्टी जगात असतात. सृष्टी निर्मात्याने दुनिया अशी बनवली आहे कमालीची .. जशा तुम्ही.."

"काय?"

"मी म्हणत होतो जशा तुम्हीच स्वतः पाहिल्या.."

पहिल्या भेटीतली तीन चार नि काल ऐकलेली काही वाक्ये.. या जोरावर कजरी दोघांचा आवाज एक सारखा आहे या निष्कर्षाला पोहोचली देखील? चांगलीच हुशार आहे.. सांभाळून रहावे लागेल. अखंड रहावे सावधान .. आणि काय?

"आणि काय म्हणाले पंडितजी?"

"अजून काही नाही."

"अरे हां.. ही चिठ्ठी. तुमची. तुम्हाला काही चिठ्ठी द्यायची असेल तर?"

"नाही. नको.. पण एक विचारू?"

"एक नाही .. शंभर विचारा की!"

"तुमचा तो मित्र..?"

"त्याचे काय?"

"नको. काही नाही .. नंतर कधीतरी .."

"हे पहा कजरीदेवीजी.."

"देवी वगैरे काय एकदम .."

"ठीक हे पहा कजरी, तुम्ही त्याच्याबद्दल तर काही विचारूच नका.. माझा मित्र आहे नि त्याचे काम करतो मी.. पण मला त्याचा स्वभाव नाही आवडत.."

"पण काल पंडितजी म्हणाले.. तो तर.."

"काय? त्यांचे काही चुकत नाही. मोठा माणूस. पण माणसाने कसे सगळे उघडपणे करावे.."

"अहो असं काय करता.. असतो एकेकाचा स्वभाव .. पण मला सांगा.."

"काय?"

"काही नाही, नंतर कधीतरी .. पण तुम्ही हरिनामपुराहून इतक्या सहज कसे काय येता?"

"यावं लागतं. मित्र म्हटल्यावर .."

"पण तुम्ही तिकडून आलात.. त्या दिवशी पण तिकडून गेलात.. म्हणजे.."

"हरीनामपुराचा रस्ता हरीनाम घेता घेता पार करतो.. त्यात ही सायकल आहे ना साथीला.."

"पण हरीनामपुर त्या उलट्या दिशेला आहे ना.. तुम्ही इकडून न जाता तिकडून.."

"ते काय आहे.. तिकडे पण एक पत्र पोहोचविले .."

"पण आजपण तिकडून आलात ते?"

कजरीचे लक्ष बारकाईने दिसतेय.. दिलदार सायकलीवरून आला तेव्हा तर ती कुठे दिसत नव्हती, पण तिला मात्र दिलदार दिसत असावा?

"तुम्ही कसे पाहिलेत? तुम्ही तर नव्हतात तेव्हा?"

"वाड्याच्या माडीवरून दिसते सारे.. मी बघत होते.."

"अहो तिकडून एक जवळचा रस्ता आहे.. डोंगरातून.."

"बाप रे!"

"का? सायकलीवरून जाता येते.."

"ते नाही हो.. पण तिकडे डाकूंचे राज्य आहे.. डाकू संतोकसिंगची टोळी खूपच धोकादायक आहे ना.. म्हणजे ऐकून आहे मी.."

दिलदारला उभ्या उभ्या घाम सुटला..

"मला तर डाकूंची भीती वाटते. कधी कोणाला लुटतील.. गावं लुटतील सांगता येत नाही. तुम्ही सांभाळून जा.. त्यांचा भरवसा नाही काही.."

"छे हो.. आणि माझ्याकडे लुटून नेण्यासारखे आहे तरी काय? जे होतं ते तुम्हाला आधीच दिलंय.."

"म्हणजे?"

"ते पत्र हो.."

"चला.. काहीतरीच.. पण सांभाळून हां. त्या डाकूंना दयामाया नसते.."

"पण त्यांत पण कोणी चांगला असेल ना हो सज्जन..?"

"सज्जन डाकू? जाऊ देत. नको त्या गोष्टी. मला भीती वाटते नुसता विचार करून. आमच्या ताईच्या गावाला गेलो ना.. त्याच्या बाजूच्या गावातून एका नाटकात काम करण्याऱ्याला पळवून नेलं होतं दरोडेखोरांनी. त्या संतोकसिंगच्या टोळीचे काम म्हणे.."

"बाप रे.. हाल करून मारले असेल नाही?"

"कोणास ठाऊक.. दुसऱ्या दिवशी परत आणून टाकले गावात .."

"बाप रे.. मग?"

"मला बाकी काय माहिती नाही .. पण तो परत आला इतके खरे.. घाबरलेला म्हणे.. काही सांगायला तयार नव्हता .."

"तुम्हाला बरे इतके सारे ठाऊक?"

"गावातील गोष्टी त्या, पटापट पसरतात .."

"हे खरेय.. बरं काही निरोप?"

"नाही काही. त्याला मी नाही भेटले. तो कशाला कोणाला निरोप देईल?"

"त्याचा नाही. तुमचा काही निरोप?"

"नाही .. परत याल तुम्ही?"

"चिठ्ठी घ्यायला येईन ना.. कधी येऊ?"

"मला नाही ठाऊक.."

"ठीक आहे.. चिठ्ठी द्यायला तर येईन.. उद्या.."

"तुमची सायकल विमानासारखी उडते का हो? हरिनामपूर इतके दूर.. जाणार कधी .. येणार कधी?"

"सवय आहे हो.. काम म्हणजे करायला हवे.. नाही का?"

कजरीचा निरोप घेऊन दिलदार सायकलीवर टांग टाकून निघाला. परत त्याच रस्त्यावरून.. संतोकसिंगच्या टोळीने कमवलेले नाव आता असे 'कामी' येत होते.. डाकूंना घाबरणारी ती.. केवढी मोठी मजल मारायची आहे.. की हा नादच सोडून द्यावा? समशेर म्हणाला तसे.. इस रात की सुबह नहीं? कजरी भेटली, बोलली.. पण आज येताना त्यामुळे अधिकच तो उदास होत सायकल रेटत परतला.. पुढे काय.. त्याला कळणे अशक्यच होते.. आजवर मोठया हिंमतीने सारे घडवून आणले.. डाकूंच्या नावाने कापणारी ती.. एका डाकूसुताशी सूत जुळवेल इतक्या सहज? करावे तर काय? नि कसे? आजवर एकही डाका घातला नसेल, नि डाकूगिरीचे करियरही करायचे नसेल.. पण तरीही ओळख मात्र डाकू दिलदारसिंग हीच राहणार ना?

Rate & Review

I M

I M 4 months ago