Dildar Kajari - 20 books and stories free download online pdf in Marathi

दिलदार कजरी - 20

२०.

ये मेरा प्रेमपत्र..

प्रेमपत्र म्हटले की त्याचा एक साचा असतो. तीच प्रेमाची गोड गुलाबी भाषा, प्राणसखा नि प्राणप्रिये.. जिवलग आणि जिवलगे.. ह्रदयाची धडकन नि काळजाची धडपड असले काही नि अजून काही नाही. त्यात सध्या झुरणे किती जोरात सुरू आहे याचे शाब्दिक चित्रण नि एखाद्या राजकीय नेत्यानेच दाखवावीत अशी भावी सुखी आयुष्याची सत्तर एम एम ची डाॅल्बी साउंड फिल्मची स्वप्ने! प्रत्येक नवथर नि नवोढ युगुलाला ते नवे नवे नि हवे हवे वाटते. आजवर असली दिव्य प्रीती कुणी न केली न कोणी या पुढे करेल यावर त्यांचा गाढ विश्वास असतो. पहिल्या प्रेमाला प्रेमपत्रातच प्रेमाचे कढ नि प्रेमाच्या उकळ्या फुटून ते प्रेम उतू जात असते. अगदी बाहेर सांडून चुलीचा चर्र चर्र आवाज ऐकू येईल इथवर ओसंडून वाहणारे ते पहिले प्रेम. त्यात कागद गुलाबी असेल.. लाल शाईने कुणी लिहिल.. रक्ताचा भास व्हावा म्हणून. कुणी त्यावर ह्रदयाच्या आकृत्या काढतील.. आजवर कुणी मेंदूचे चित्र प्रेमपत्रात काढलेले पाहिलेत कुणी? कारण मेंदूचे त्यात कामच नाही मुळी. खरेतर वैद्यकीय नि शास्त्रीय दृष्टीने हे सारे रासायनिक बदल मेंदूत होतात. ह्रदयाचे काम फक्त धडाधड धडधड वाढवणे. पण प्रेमी युगुलांचे रसायन म्हणा की जीव म्हणा या शास्त्रांशी काहीच घेणेदेणे नसते. त्यामुळे खरे काम मेंदू करत असला तरी प्रेमपत्रात भाव मिळतो तो फक्त ह्रदयाला. ते काही असले तरी दिलदारचे 'प्रेमपत्र' मात्र या सर्वांना अपवाद होते. अधूनमधून स्वतःच्या दिलकी पुकार नि प्रेमाचे हुंकार जरी असले तरी आपल्या पहिल्या पूर्ण प्रेमपत्रात सत्य परिस्थितीचेच वर्णन अधिक होते. दिलदारच्या दिलाच्या स्थितीहून तेच जास्त. आपल्या जन्मापासून आजवरची कहाणी थोडक्यात पण खरीखुरी कथन केलेली त्याने. कजरीने पत्र एकदा वाचले. दोनदा वाचले नि रात्रभर पारायणे केली.. माडीवरच्या तिच्या खोलीच्या वर छोटा झरोका होता. तिकडून दूरवरचे सारे स्पष्ट दिसायचे. त्या झरोक्यातून भविष्य दिसले असते तर? हा डाव मांडला खरा. पुढे काय मांडून ठेवलेय नशिबात?

कजरी आज नि आजपासून येणार नाही याबाबत दिलदारची खात्री होती. आपली सत्यस्थिती माहिती झाल्यावरही येण्यासाठी ती खचितच वेडी नाही. पण हे सत्य सांगितल्यावर त्याला एका बाजूने हलके वाटत होते. नि कजरी आलीच नाहीतर यापुढे टोळीच्या शरणागतीचा कठीण विषयही टाळता येईल याबद्दलही सुटल्यासारखे वाटत होते. आयुष्यातले एक प्रकरण संपले. त्यातून गुरूजी भेटले. काही नाही तरी कजरी कित्येक दिवस भेटली नि बोलली. लिहिणे वाचणे शिकून झाले.. आता काही दिवस वाट पाहून सायकल गुरूजींना परत करणे एवढेच एक काम उरले.. आपल्या विचारांच्या तंद्रीत तो स्वत:च्या नकळत नदीकिनारी पोहोचला..

नदीचे पाणी शांत होते, संथ होते. हिरवीगार झाडे आजूबाजूला. मध्ये तो कजरीचा आवडता खडक. त्या दगडाखाली त्याची चिठ्ठी ठेवण्याची जागा. त्या जागेवर गेले कित्येक महिने तो चार शब्दी चिठ्ठी ठेऊन जायचा. आज चिठ्ठी नव्हती. जे लिहायचे ते आधीच लिहून झालेले. नवीन सांगावे असे काय बाकी होते आता? थोडा वेळ गेला आणि त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. दुरून त्याला कजरी येताना दिसत होती. त्याने निरखून पाहिले, पाठून कुणी चार दोन माणसं तर येत नाहीत, त्याला झोडून काढायला. पण नाही, कजरी एकटीच होती. एका डाकूंच्या सरदाराचा डाकूपुत्र समोर आहे आणि ही पुजारी कन्या न घाबरता पुढे एकटीच येत आहे. त्याच्या पत्रात लिहिलेले त्याने कुणाही मुलीला पळवून घेऊन जाणे हा पर्याय बाद झाला आहे. जर प्रेमाने मन जिंकता आले तरच पुढची गोष्ट. हे सगळे वाचूनही कजरी येत आहे नि ती ही न घाबरता एकटी..

"आलीस तू? येशील असे वाटले नव्हते .."

"तुला काय वाटले? मला ठाऊक नव्हते? पोस्टमन तू नि दिलदार ही तू.. मला आधीपासून माहित आहे.. दिलदार. अगदी पहिले पत्र आणून दिलेस तेव्हापासून .."

"कसे काय?"

"कसे काय? तू म्हणालेलास ना.. तशी मी आहे हुशार समज.."

"ती तर आहेस तू. पण माझ्यासारख्या बरोबर? तू डाकूंच्या टोळीला भितेस.. आणि हा प्रत्यक्ष तुझ्यासमोर मी उभा आहे.."

"खरेय.. तुझ्यासमोर मी उभी आहे. मला पहायचे होते पोस्टमन बाबू किती प्रामाणिक आहे. तू लिहिलेल्या गोष्टी मला आधीच ठाऊक आहेत.. कशा ते आता विचारू नकोस.. सांगेन. पण फक्त माझा हात पाहून भविष्य तितके सांग. म्हणजे काय होईल पुढे ते कळेल तरी.."

"मी? मी काय ज्योतिषी आहे?"

"अर्थात आचार्य.. तू आला होतास ना आचार्य बनून."

"तुला ते ही ठाऊक होते?"

"तू आरशात पाहतोस का रे? तुला मी कुठल्याही रूपात ओळखेन. तुला सांगू तुला पहिल्या दिवशी पाहिले नि मी म्हटले, हाच माझा दिलवर दिलदार..'

"खरेच? पण का?"

"हा प्रश्न मी पण विचारू शकते.."

"तुझ्याशी कोण जिंकू शकणार आहे. मी सांगू आजपासून तू येणार नाहीस हे समजून आलेलो. पण तू आलीस. तुला सारे ठाऊक असूनही तू आलीस.. माझा विश्वास बसत नाही. हे स्वप्न आहे की सत्य? काढ तर मला एक चिमटा.. म्हणजे मला खात्री पटेल.."

"चिमटा? तो तर मी आनंदाने काढेन. चिमटाराणी म्हणतात मला.."

"चिमटाराणी? चिमटाराणी?"

"काय रे? हे काय चिमटाराणी म्हणून ओरडतोयस?"

समशेर दिलदारला उठवत होता..

"ही कोण नवीन चिमटाराणी?"

दिलदार दचकून उठला. म्हणजे सारे ते स्वप्नच होते. अर्थात. स्वप्नातच हे शक्य आहे. खरोखरीच असे काही होईल?

झोप नि स्वप्न मोडून दिलदार उठला. नदीच्या पाण्यात डुंबताना त्याला अचानक वाटून गेले.. कजरीला खरेच सारे ठाऊक तर नाही? काहीही असो पण उद्या येईन असे म्हणालेली ती. पण कितीही तिची कल्पनाशक्ती ताणली तरी प्रत्यक्ष एका डाकूंच्या टोळीतील कुणी डाकिया म्हणून आला तर ती तो धक्का पचवून येईल?

नदीकिनारी दिलदार पोहोचला तेव्हा मात्र त्याला धक्का बसला .. कजरी खरोखरीच समोर उभी होती. वाट पाहात ..

"आलास? मला वाटलं तू काही आता येणार नाहीस.."

"काय? मला वाटलं तूच येणार नाहीस.."

"तेच! तुला वाटेल आता मी येणार नाही, म्हणून तू येणार नाहीस. पण मी तुला म्हटलेले.. काहीही असो चिठ्ठीत, मी येणारच.. कारण मला माहिती होते त्यात काय असणार आहे."

"म्हणजे? तुला सगळे माहिती?"

"हुं.."

"तरीही?"

"हुं.."

"आधी मला चिमटा काढ.. हे खरेय की स्वप्न..? आणि तुझे नाव चिमटाराणी आहे का?"

"काय? चिमटाराणी?"

ते रात्रीचे स्वप्न, स्वप्न नव्हतेच. म्हणजे स्वप्नच होते, पण जे घडले ते त्या स्वप्नाप्रमाणेच असावे? अर्थात चिमटाराणी शब्द सोडून!

मग प्रेमाच्या गप्पा झाल्या. दिलदारला अगदी काय पाहिलंस माझ्यात हा प्रश्न ही पडला नि तो त्याने विचारलाही. कजरीने लाजत मुरडत काही उत्तरे दिली, काही टाळली. अर्थात तिची हुशारी न कळण्याइतका दिलदार कमी हुशार नव्हता. पण ह्या अनपेक्षित प्रेमाच्या पावसात तो चिंब भिजत होता. त्या वर्षावात न्हाऊन निघत होता. हा असा दिवस उगवेल याची कधी कल्पनाही त्याने केली नव्हती. पुढे अजून कितीही अडथळे आले तरी ते पार करण्याची हिंमत त्याला आली होती. त्या मंतरलेल्या संध्याकाळी सारे काही सोनेरी दिसत होते.. आता मागे वळणे नाही. एका डाकूच्या मुलाला एका प्रतिष्ठित घरची कोणी सुंदरी मनोमन वरू शकते.. तर या जगात काहीही घडू शकतेच..

हे सारे घडले कसे? कजरीने त्याची उत्सुकता फार ताणली नाहीच. सारी कथा सांगितली.. अगदी कथाकथन केल्यासारखी. सारे ऐकून म्हणाला, असे ही या दुनियेत घडू शकते.. तर अजूनही चमत्कार होऊ शकतील.. दिलदारला आश्चर्याचे धक्के बसत राहिले. त्याचा विश्वास बसणार नाही असे.. एकामागून एक..