Laghukathaye - 7 - Janataa Raajaa books and stories free download online pdf in Marathi

लघुकथाए - 7 - जाणता राजा

८ जाणता राजा

“राजन्, क्षमा असावी, अशा ऐरणीच्या प्रश्नावर सारी राज्यसभा थांबली असताना आपणास असं तातडीने आत बोलावून घेतलं. पण मलाही तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. ही सतीची वस्त्रं आणली होती. युद्धावर जाण्यापुर्वी आपणच सर्व राण्यांना ती बहाल करावीत.”

“हा काय प्रकार आहे राणीसरकार? तुमच्या सारख्या सुजाण राणीस हे असे अविचारी वागणे शोभत नाही. आम्हास विजयतिलक करावयाचा सोडून तुम्ही सतीची वस्त्रे मागवलीत? धिक्कार असो. तुम्हीच अशी इथे हार मानलीत हे सर्वोपकर्णी झाले तर सैनिकांचं मनोधैर्य कसं खच्ची पडेल हे आम्ही तुम्हास सांगण्याची गरज का पडावी परम? “

“खरय राजन्, माझं हे वागणं आपल्याला आततायी पणाचं वाटणं साहाजिकच आहे पण जे अटळ आहे त्याची तयारी करणं हेच शहाणपणाचं नाही का? गुप्तहेर संदेश घेऊन आले , चौदा सहस्त्र घोडे, एक सहस्त्र ऐरावत व कित्येक सहस्त्र सैनिक घेऊन शत्रू चालून आलाय. चारी बाजूने आपण वेढले गेलोय. गडावर रसद फक्त एक पंधरवड्याची बाकी असताना आपण खुल्या मैदानात चार हात करण्याचा निर्णय घेता आहात. मग आम्ही राण्यांनी आमचे कर्तव्य करण्याची तयारी नको करायला?”

“परम, आपण जाणता, पळपुट्याचं जीवन जगण्यापेक्षा शौर्याने मृत्युला सामोरं जाणं आम्हास प्रिय आहे. आणि तरीही स्त्री मोहात आम्हास पाडू पाहता? आपणाकडून आमची ही अपेक्षा नव्हती .

आम्ही आपणास पट्टराणीचा मान दिला ते आपले केवळ सौंदर्य पाहून नव्हे तर आपल्या बुद्धीमत्तेने आम्हास अधिक आकर्षित केले म्हणून. पण आज आम्हास आमच्या त्या निर्णया च्या योग्यअयोग्यतेबद्दल शंका वाटावी असे हे वर्तन आहे आपले.”

“राजन्, आपल्या मनात तशी शंका आली हे योग्यच झाले. आता आम्हास मोकळेपणाने बोलता येईल. आपण अत्यंत कुशल योद्धा, शौर्यात आपला हात धरणारा अजून तरी जन्माला आलेला नाही. जनहित सतत आपल्या मनात अग्रेसर असते असे आपला शत्रूही मानतो. मग आज आपण एवढे स्वार्थी कसे झालात राजन्?”

(ताडकन उठत) “परम!. राणीसरकार ... आपण एका राजाशी बोलत आहात हे विसरू नका.

आपली ही मजाल?”

“क्षमा असावी महाराज, पण एवढा बलाढ्य शत्रू, सर्व शक्तीनिशी चौफेर वेढा देवून बसला असता, केवळ आपल्या शौर्याचे गोडवे गाईले जावेत म्हणून असा आत्मघातकी निर्णय घेऊन तुम्ही काही शेकडा सैनिकांना घेऊन खुले युद्ध करू म्हणता, याच्या परिणामाचा विचारही आपल्या मनास शिवत नाही यांस स्वार्थ नाही तर काय म्हणावे राजन्? आपण केवळ योद्धा नव्हे तर राजे आहात याचा आपणांस विसर पडला म्हणावे का? राजास सर्वप्रथम जनतेचे हित महत्वाचे, त्यासाठी त्याचे शौर्य कामी यावे, त्याचे कौशल्य त्याने वापरावे.

आज युद्धभुमीवर कित्येक शत्रुपक्षातील सैनिकांना आपण वीरगती द्याल यात कुणाच्याच मनात शंका नाही पण त्याचबरोबर आपल्यापैकी कोणीही परत येणार नाही हे सांगण्यास कोणत्याही ज्योतिषाची गरज ही नाही. आपल्या मागे आम्हीच नव्हे तर सगळी प्रजा पोरकी होईल. नुसतीच पोरकी नव्हे तर जालीम शत्रू तिचे लचके तोडेल . पुन्हा कधीही या राज्याचा तुटलेला कणा सांधला जाणार नाही.

शत्रूच्या या हल्ल्याला मुत्सद्दी पणानेच उत्तर देणे योग्य हे आपणही जाणता. पण आपला अहं आपणास तसे करू देत नाही. आपल्यासारख्या राजासमोर स्पष्ट बोलण्याची हिम्मत आज राजसभेत कोणाकडेच नाही.

आपल्या बाबतीत युद्धभुमीवर अनेक चमत्कार होतात असे राजसभेचे मानकरी व प्रजा मानते. बऱ्याचदा अत्यंत कठीण परिस्थितीतून आश्चर्यकारकरित्या आपण विजय मिळवलाही आहात. पण कठीण परिस्थिती व अशक्य परिस्थीतीतला फरक आपण ही जाणता व मी ही जाणते.

अंतीम निर्णय आपलाच असेल राजन्. आपण जो निर्णय घ्याल त्यात मी आपल्याबरोबर असेन हे वेगळे सांगायला नकोच.

परत एकदा क्षमा मागते आपली, असे मधेच आपणांस राजसभा सोडून यावे लागले.”

“बराच वेळ झाला. राजसभा खोळंबलीय. येतो आम्ही.”

परम चे डोळे अश्रुंनी भरलेले. “राजन्... म्हणजे आपण ... निर्णय नाहीच बदलणार का? मग आम्हास आपणास एकवार पाहून तरी घेऊ देत. आपल्या मागे आम्ही येऊच पण तरीही!”

“परम, आपण आम्हास विजय तिलक करावा. युद्ध तर करूच. पण तुम्हास वाटते तसे फुकाचा शौर्याचा अभिमान बाळगणारे आम्ही नव्हे. एक वेगळीच खेळी आहे. निश्चिंत असावे. याहून अधिक सांगण्यास वेळ नाही.”

“पण डोळे पुसा बरं, नाहीतर थांबा, आम्हीच पुसतो आमच्या अंगरख्याने, हेच सुंदर छाप आम्हास सतत तुमची आठवण करून देतील युद्धभुमीवर व आश्वस्तही करतील की काही बरेवाईट घडलेच तर या राज्याची धुरा सांभाळण्यास आमची परम सक्षम आहे!”