Poems Collection.... - 3 - Final Part books and stories free download online pdf in Marathi

कविता संग्रह.... - 3 - अंतिम भाग

परंपरा मराठी मनाची...🙏🚩

वाट असते सुख - समृद्धीच्या क्षणाची
नेहमीच असते स्तुती त्या मराठी बाणाची
पूर्वजांनी जपली ती टिकवून ठेवूया परंपरा
करेल उर्जावान प्रत्येकाच्या ही अंतर्मना

साधी पण तितकीच निर्मळ असते ही
वाईटांचा तितक्याच शौर्याने नाश करणारी अशी ती
गुढी पाडवा ते रंगपंचमी असा असतो सणांचा क्रम
खरंच नवऊर्जा निर्माण करणारे सण असतात उत्तम

नशीबवान आम्ही जे लाभले आम्हास हे भाग्य
जन्मेल जो या महाराष्ट्र भूमीत नसेल त्यास अभाग्य
वंदन करते त्या पूर्वजांना ज्यांनी केली निर्मिती या सुखमय क्षणांची
आदराने जपतो आम्ही परंपरा मराठी मनाची...🙏


✍️ खुशी ढोके🚩

__________________________________________________________________________________________


गुढी - सुखमय संकल्पनांची...❤️

गुढी नवचैतन्याची
सुख - समृद्धीची
नात्यांतील गोडव्याची
परस्पर संवादाची

गुढी नवऊर्जेची
नवऊर्जेतून नाविन्याची
नैराश्यविरहित जगण्याची
आयुष्यातील उमेदीची

गुढी सुखमय क्षणाची
त्यातील क्षणिक आनंदाची
अदृश्य प्रेमाची
अबोल प्रेमळ सहवासाची

गुढी निःस्वार्थ भावाची
नकळत वाटणाऱ्या काळजीची
जाणवणाऱ्या सुखमय क्षणाची
हरवलेल्या निर्मळ मनाची

चला मग उभारुया गुढी
या सुखमय संकल्पनांची...🤗


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


माय माई खाऊ देई...🥺

माय मायी बायरून येतानी मले दिसली
हातात काई तरी लपवतानी मले ते दिसली
लोकं तिले नाव ठेवतील म्हून
एकटीच सामटितून खिसकतानी दिसली

(अर्थ: बाहेरून येताना त्याची आई त्याला हातात काही लपवताना दिसली. कोणी बघायला नको म्हणून, गल्लीतून हळूच नजरेला येणार नाही अशी पळताना (खिसकताना) दिसली. कारण लोकं आपल्याला कमी समजायला नको हा तिचा प्रयत्न!!)

सन नसल कोनता
जई तूनं करुन नसल मले घातलं
माय माई व तुले
माया डोड्यातल सारं दिसलं

(अर्थ: असा कुठलाच सण नसेल जेव्हा तिने त्याला खायला नसेल दिले. त्याच्या डोळ्यातले भुकेचे सगळे भाव तिला दिसले)

जवा कई कोणी तरन काडे
पैकं नवतं घरात पन मायी मायच मले करून वाडे
गोड - धोड करून घालाची येपत नवती तूयी
तरी बी माय तूनं मनली नाई कदि बी "मी नायी"

(अर्थ: जेव्हा कधी कोणी तळण काढतो (तळणाऱ्या पदार्थांना विदर्भात तरन म्हणतात आणि तरन हा पाहुणचार असतो) घरात पैसे नसून त्याची आईच त्याला जेवायला घालते. गोड - धोड करून घालायची तितकी त्यांची एपत नसून त्याच्या आईने त्याला कधीच नाही म्हटलं नाही.)

बापाची सावली माय तूच बनलीस
लानपनी बाप गेला सोडून पन तू नाई हारलीस
खावा - पेवाचं भान तुले तूयच नवतं माय
काऊन तूनं खुद ले इतलं गांजलं व बाय

(अर्थ: बालपणीच वडिलांची सावली हरवली तेव्हा ती सावली बनून कधी ना हरली. खायचं भान हरपून स्वतःला तिने लांब ठेवलं फक्त त्या तिच्या बाळासाठी.)

माय तू मायी व करते काम रात - दिस
कोनी नाई माय इतकं मायं तुया परीस
लोकासाठी असल खाचे वस्तू येग - येगडे
पन माय तुया हातच्या वरन - भातात सुख आये व सगडे

(अर्थ: रात्र - दिवस राबणाऱ्या आईसारखं त्याचं कोणीच नाही. लोकांसाठी खाद्य पदार्थ असतील आगळे - वेगळे पण, त्याला त्याच्या आईच्या हातच्या वरण भातातच सगळे सुख वाटतात.)

काय सांगू माय मी यायले माया आवडने वाला खाऊ
दिस भर कमून राती देतेस भात मऊ - मऊ
तुया मेनत - पान्यातला घास देतेस पईलं मले
सांग मंग माय त्याच्या परीस लागल का काई गोड मले...

(अर्थ: काय सांगणार तो त्याचा आवडता पदार्थ कारण, त्याची आई दिवस - रात्र राबून खाऊ घालते त्याला. तिच्या मेहनतीचा घास ती त्याला देते मग त्यापेक्षा त्याला काय गोड लागेल बरे?.)

वैदर्भीय / वऱ्हाडी बोलीभाषेतील एका मुलाचा, त्याच्या आईच्या मेहनतीने कमावून खाऊ घातलेल्या साध्या खाद्य पदार्थांत शोधलेला आनंद सांगायचा प्रयत्न केलाय.

विदर्भात "ळ" चा उच्चार "ड" असतो.
"ण" चा उचार "न" असतो.


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


वेशभूषा आमुची...😎🚩🙏

गर्व आमुचा, आमुची वेशभुषा
डोक्यावर मराठी फेटा
कपाळी चंद्रकोरचा नशा
वेगळीच असते धून नववारीची
अशीच नाही शान आमुच्या महाराष्ट्राची

नाकी नथ, गळ्यात आहे ठुशी
प्रश्न नाही मनी मी दिसते कशी?
देश गाजवतो आमचा मराठी बाणा
विषय नाय करायचा फक्त जय महाराष्ट्र म्हणा

काय सांगायचं या वेशभूषेची वेगळीच हो नशा
विषय का आपला आपल्या उंच आहेत आशा
वेशभूषेत - वेशभूषा आहे एकच आमुची
आदराने केले परिधान तर ही वेशभूषा आहे सर्वांची...

आदराने....😎

जय महाराष्ट्र....🙏


🚩 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________









अपयशाला द्यावे उत्तर..😎


वी. दा. करंदीकरांच्या "आयुष्याला द्यावे उत्तर" या रचनेला अनुसरून, मी काही ओळी शब्दबध्द केल्या आहेत. कृपया समिक्षेत हा माझा छोटा सा प्रयत्न कसा वाटला कळवावे.🙏

हाणून पाडावा तोकडा विचार, त्यात हरलो तरी बेहत्तर
न डगमगता परत जोमाने, अपयशाला द्यावे उत्तर

पराभवाचा करतील उपहास, न थांबता एक ही क्षणभर
स्व: कर्माने ध्येय गाठूनी, अपयशाला द्यावे उत्तर

स्व:घोषित मार्गदर्शन मोफत, न मागता मिळे भूतलावर
ऐकून जनाची - करून मनाची, अपयशाला द्यावे उत्तर

ध्येयपूर्तीच्या वाटा किचकट, क्षणिक परिस्थितीही बिकट
प्रयत्नरत मार्ग तो निवडूनी, अपयशाला द्यावे उत्तर

सहनशीलता संपत येई, धिर ही तो सुटत जाई
न डगमगता आत्मनिर्भर, अपयशाला द्यावे उत्तर

ताकद अपयश पचवण्याची, देई शक्ती लढण्याची
उराशी जिद्द घेऊनी कणखर, अपयशाला द्यावे उत्तर



खुशी ढोके


__________________________________________________________________________________________