Trading Psychology books and stories free download online pdf in Marathi

ट्रेडिंग सायकॉलॉजी (शेअर मार्केट)

शीर्षक : ट्रेडिंग सायकॉलॉजी

लेखक : Paay Trade

एकूण प्रकरणे : ७

प्रकरण १ : जीवन प्रवास


"नमस्कार ! माझ्या या कार्यशाळेत आपलं स्वागत आहे. आपण यापूर्वी अनेक विडिओ बनवले आहेत जसे की, ९९% लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गमावतात, स्टॉप लॉस, एका ट्रेडरचा विशिष्ट प्रवास, पोजिशन साईझ, ट्रेनिंग घोटाळेबाज वगैरे वगैरे. अनेकांनी माझे विडिओ पाहिले आहेत; आपण त्या सगळ्याबद्दल चर्चा करणारच आहोत . आज आपला पहिला दिवस म्हणून मी माझा काही अनुभव शेअर करणार आहे, आणि मी माझ्या आयुष्याबद्दलची छोटीशी गोष्ट सांगणार आहे. अर्थातच! मी एक भारतीय आहे! तर मला शेवटी तुम्हाला काही सल्लाही द्यायचा आहे! कारण आपल्या सर्वांना इतरांना सल्ला द्यायला नेहमीच आवडतं; पण आपल्याला इतरांचा सल्ला ऐकायचा नसतो!"

"मी माझे जीवन एक शालेय शिक्षक म्हणून सुरू केले. अनेक लोक जेव्हा माझ्याशी चर्चा करतात तेव्हा ते मला नेहमी विचारतात की, सर तुम्ही सुद्धा एक शालेय शिक्षक म्हणून सुरुवात केलीत, एका सामान्य परिस्थितीमधून; मग तुम्ही आम्हाला का बरं शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देत नाही ? तुम्हाला सांगतो, हे असे लोक, ज्यांच्याकडे ५० हजार ते १ लाख या दरम्यान गुंतवणुकीसाठी पैसे असतात, ते एवढेच पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात आणि त्यांना इथं येऊन मुकेश अंबानीला मागे टाकायचं असतं ! मला तुम्हाला सांगायचं आहे की, तुमच्या आयुष्यात एक पर्व असे असते जिथे फक्त गुंतवणुकीसाठी पैसा साठवायचा असतो; आणि दुसरे पर्व असे असते जिथे तुम्हाला तो पैसा वाढवायचा असतो. मी हे नेहमी सांगायचो की चाळीशीच्या वयापर्यंत तुम्हाला पैश्यासाठी काम करायचं असतं आणि त्यानंतरच्या आयुष्यात पैशाला कामाला लावलं पाहिजे. मात्र तुम्हाला फक्त वीस, तीस, चाळीस हजारची रक्कम घेऊन शेअर बाजारात यायचं असतं आणि त्याला व्यवसाय बनवून वाढवायचं असतं. हे अशा प्रकारे एवढासा पैसा घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये फक्त जुगार खेळू शकता; तुम्ही एक व्यवसाय म्हणून शेअर मार्केट करू शकत नाही. जेव्हा मी एक शिक्षक म्हणून काम करत होतो; मी बिर्ला कंपनीत काम करत होतो (बिर्ला कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या शाळेत) . खूप चांगला पगार होता, केंद्र सरकारचा पगार होता. मग २९ वर्षाचा असताना मला सिंगापूरला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी आली. सिंगापूर हा असा देश आहे जिथे शिक्षकांना सर्वात जास्त पगार दिला जातो. तिथे माझा पहिल्या महिन्याचा पगार हा मला भारतात मिळणार्‍या पगारापेक्षा २० पटीने अधिक होता. तर असे मी वयाच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत खूप मेहनत केली आणि पैसा जमवला; आणि मग त्यानंतर मी शेअर मार्केटकडे आलो. मी खूप थोडासा पैसा घेऊन शेअर मार्केटमध्ये आलोच नाही, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. माझी आई मला सांगायची, पैसा आपल्याला असे म्हणत असतो की एक लाख रुपये जमवेपर्यंत तू मला सांभाळ, खरतर तेव्हाच्या काळी एक लाख रुपये खूप मोठी रक्कम होती. ती म्हणायची एकदा का तुझ्याकडे एक लाख जमा झाले की, मग पैसाच तुझा सांभाळ करेल. मी हेच सांगतोय की, आयुष्याच्या पहिल्या पर्वात तुम्ही पैशासाठी काम केले तर आयुष्याच्या दुसर्‍या पर्वात पैसा तुमच्यासाठी काम करेल. म्हणून माझ्या आयुष्याच्या पहिल्या पर्वात मी पैशासाठी काम केले; मी पुरेसा पैसा जमवला, मी त्यासाठी खूप मेहनतीने काम केले. मी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत काम करत असे. म्हणून छोटीशी रक्कम घेऊन शेअर मार्केटमध्ये येताना जास्त महत्वकांक्षी बनून येऊ नका; तुम्ही पैसा जमवण्यासाठी आधी मेहनत करा. चिंता करू नका शेअर मार्केट कुठेच जाणार नाही, ते इथेच असणार आहे. मी गमतीने म्हणत असतो की, एकवेळ तुम्ही असाल किंवा नसाल पण शेअर मार्केट इथेच असेल. अनेक लोक येथे येतात, काही सट्टेबाजीसारखे ट्रेड घेतात आणि पैसे घालवून बसतात; अर्थातच मार्केट अशा लोकांना बाहेर टाकतं. त्यांच्याकडे पैसा नसेल तर मग ते पुन्हा येऊ शकत नाहीत. तर हा सगळा माझा पहिला सल्ला आहे तुमच्यासाठी."

"काही लोक विचारतात की, सर एवढा पैसा जमवण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही; मग अशावेळी मी पार्ट टाइम म्हणून शेअर बाजार करू शकत नाही का ? हो करा; पण सेकंडरी मार्केट मध्ये करू नका. फ्युचर आणि ऑप्शनमध्ये करू नका. तुमच्याकडे छोटीशी रक्कम असेल तर तुम्ही एका चांगल्या IPO मध्ये गुंतवण्याचा विचार करा. जर तुम्ही चांगल्या IPO मध्ये गुंतवले तर चांगला नफा मिळेल, जर IPO मिळालाच नाही तरीही चिंता करण्याचे कारण नाही कारण तुमचा पैसा बँकेत सुरक्षित असणार आहे. मी लोकांना नेहमी सांगतो की, दोन प्रकारचे लोक असतात जे शेअर बाजारात पैसे कमवू शकतात. एक म्हणजे अत्यंत मूर्ख आणि दुसरे अत्यंत चतुर लोक. या दोघांच्या अधले-मधले लोक शेअर बाजारात पैसा कमवत नाहीत. मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करतो, जेव्हा मी बिर्लाच्या शाळेत काम करत होतो माझी गुंतवणूक रक्कम खूप थोडी होती आणि मी IPO साठी apply करायचा विचार केला. पहिला IPO ज्याच्यासाठी मी १९८७-८८ मध्ये apply केलं होतं तो म्हणजे L&T चा IPO होता. तेव्हा मी ५० रुपयांना ते खरेदी केले आणि दुसर्‍याच दिवशी ते १०० रुपयांना ट्रेड करत होते म्हणून मी ते सर्व लगेच विकून टाकले. मी माझे पैसे दुप्पट केले असं वाटून मी खुश होतो. जर मी ते शेअर होल्ड केले असते तर ? तेव्हा ते फक्त हजार-दोन हजार रुपये मी गुंतवले होते; आणि आता त्याचीच किंमत ५० ते ६० लाख झाली असती. म्हणून आता मला वाटतं की, जेव्हाही एखाद्या IPO मध्ये आपल्याला शेअर मिळतात आणि त्याची किंमत नंतर वाढते तेव्हा आपले गुंतवलेले पैसे परत येतील इतकेच शेअर त्यावेळी विकून टाकायला हवे. मग उरलेले शेअर आपल्यासाठी मोफत असल्यासारखेच आहेत; ते तसेच राहू द्या. अशाप्रकारे तुमच्याकडे पाच ते सहा कंपनीचे शेअर असतील तर त्यातील एक-दोन शेअर तरी भविष्यात मल्टीबॅगर बनू शकतात. मी शेअर विकून टाकण्याची चूक केली, माझ्याकडील सर्व शेअर त्यावेळी विकले, मात्र तुम्ही असे करू नका. हा माझा दूसरा सल्ला आहे."

"शेअर बाजारात कमी हेच अधिक आहे. बघा तुम्हाला हे समजतं का. होय, कमी हेच अधिक आहे; फक्त शेअर बाजारातच नाही तर कोणत्याही मार्केटमध्ये असंच आहे. तुम्हाला तुमचा पैसा गुंतवायचा आहे; आणि असा किती पैसा आहे तुमच्याकडे ? ५ लाख ? १० लाख? २५ लाख? ५० लाख? १ करोड? तरीही हा पैसा कमीच आहे. समजा तुमच्याकडे १० लाख रुपये आहेत आणि तुम्ही वर्षाकाठी जरी १००% परतावा मिळवलात तरी तुम्ही फक्त १० लाख रुपयेच कमवत आहात; ही काय मोठी रक्कम नाही. परंतु तुम्ही फक्त २० ते ३०% वार्षिक परतावा निरंतर मिळवत गेलात तर तुम्ही भरपूर पैसा कमवाल आणि जेव्हा आजूबाजूचे लोक हे पाहतील तेव्हा ते नक्कीच तुमच्याकडे मदतीसाठी येतील आणि तुम्ही त्यांची मदत करून, त्यांना काही फीस चार्ज करून आणखी पैसे कमवू शकता. आता, समजा कोणीतरी एक व्यक्ति जो की काहीतरी व्यवसाय करतो, तो म्हणतो की, मी एका दिवसाला १०००% परतावा मिळवतो. लोक याच्यावर विश्वास ठेवतील का ? नाहीच ठेवणार ! कारण अगदी साधं आहे, एखादा असा जास्त पैसा कमवतोय म्हणजे तो जास्त रिस्क घेतोय. जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त रिक्स घ्यावी लागते आणि कमी रिस्क सोबत तुम्ही कमीच पैसे मिळवणार. म्हणून कोणी असे म्हणत असेल की मी खूप परतावा मिळवतो, एक तर तो खोटं सांगतोय किंवा तो खूप जास्त रिस्क घेतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का ? अशा खूप रिस्क घेणार्‍या व्यक्तींवर लोक विश्वास ठेऊन आपला पैसा त्याच्याकडे देतील ? आता, मी सुद्धा फक्त १० हजारात तुम्हाला १० करोड रुपये मिळवून देतो असे म्हटले आणि सांगितलं की त्या दहा हजारची एक बंदूक विकत घेऊन ती बंदूक एखाद्या बँक मॅनेजरच्या डोक्याला लावून त्याच्याकडून १२ करोड लुटेन आणि त्यातले २ करोड मी घेईन व उरलेले १० करोड तुम्हाला देईन; तर अशा रिस्कसाठी तुम्ही तयार असाल का ? शक्यच नाही ! सांगायचा मुद्दा एवढाच की, नेहमी लक्षात ठेवा, कमी हेच अधिक आहे. निरंतर असा २० ते ३०% परतावा मिळवणे हे शेअर मार्केटमध्ये सट्टेबाजी करून पैसा कमवण्यापेक्षा अनेक पटींनी चांगले आहे. असा निरंतर पैसा कमवण्यासाठी तुमच्याकडे संयम असायला हवा, चिकाटी असायला हवी. तुमच्याकडे प्रतिभा असेल; पण ती इतरांना माहीत असायला हवी, जेव्हा तुमच्याकडे प्रतिभा, बुद्धिमत्ता आहे हे लोकांना माहीत होतं तेव्हा जास्त लोक तुम्हाला ओळखायला लागतात आणि तेव्हाच तुम्ही झपाट्याने प्रगती करू शकता. यासाठी काही वेळा अनेक वर्ष लागतील. माझेच उदाहरण घ्या, मी शेअर मार्केटमध्ये २००७ साली खर्‍या अर्थाने सुरुवात केली; तोपर्यंत मी ऑप्शन सेलिंगबद्दल पुरेसे ज्ञान मिळवले होते. तरीही माझी गुंतवणूक अगदीच थोडी होती. असं असतानासुद्धा मी लोकांची कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली होती. आत्ताचीच गोष्ट आहे, माझा एक मित्र गमतीने मला म्हणाला की, सांग बरं अशी कोणती गोष्ट आहे जिची किंमत अगदी काही वर्षात ३ हजारापासून ५० हजारपर्यंत गेली आहे ? मला वाटलं तो कोणत्यातरी शेअर बद्दल विचारात असावा. मी म्हणालो की, मला त्या शेअरबद्दल माहीत नाही. तेव्हा त्याने उत्तर दिले की, काही वर्षापूर्वी तू ३ हजार रुपये घेऊन लोकांची कार्यशाळा, शिकवणी घेत होता, आता तुझ्या कोर्सची फी ५० हजार रुपये आहे; मी याच्याबद्दल बोलत आहे. तो म्हणाला की, ३ हजारापासून ५० हजार म्हणजे १६ पटीने वाढ; मित्रा तू खरा मल्टीबॅगर आहेस ! त्याचं हे बोलणं ऐकून मलाही हसू आलं. मला आठवतंय मी एका लोकल न्यूज पेपरमध्ये जाहिरातही दिली होती. मी त्यावेळी फक्त ३ हजारात कोर्स घेत होतो; अनेक वेळा मी मोफतही घ्यायचो आणि तरी लोक माझ्याकडे येत नव्हते. म्हणून मित्रांनो, लोक तुम्हाला ओळखेपर्यंत, तुमची ओळख निर्माण होईपर्यंत तुम्हाला संयमाने त्या क्षणाची वाट पाहावीच लागेल. २०१८ मध्ये मुंबईमध्ये ट्रेडर्स कार्निवल या समारंभात मी गेलो. तिथे मला भाषण देण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर मी CNBC न्यूज चॅनल वर दोन-तीनदा झळकलो, मनी कंट्रोलमध्ये माझ्यावर आर्टिकल छापून आले; तेव्हापासून मी कधीच मागे वळून पाहिले नाही. माझे वय सध्या ५७ वर्ष आहे; मी तुम्हाला सांगतो की, मी मागच्या दोन वर्षात जेवढा पैसा कमवला आहे तो पैसा मी त्याअगोदरच्या संपूर्ण आयुष्यात कमवलेल्या पैशापेक्षाही जास्ती आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचा रस्ता तयार करा, त्यावर चालत रहा; कदाचित हवं ते मिळविण्यासाठी अनेक वर्ष लागतील, वाटेत अनेक अडथळे येतील; पण त्यावर चालत रहा. एक दिवस असा येईल जेव्हा लोक तुम्हाला ओळखू लागतील."

"तर मी माझा प्रवास या आपल्या पहिल्या भेटीतच तुम्हाला सांगितला, सल्ला दिला; खरं तर मला स्वतःला इतरांचा सल्ला घ्यायला आवडत नाही तरिही मी तुम्हाला आज सल्लाच सल्ला दिला आहे; तुम्ही तो शांतपणे ऐकून घेतलात म्हणून तुमचे खूप खूप आभार !"

प्रकरण २ : एक लाख ते एक करोड

"नमस्कार ! माझ्या कार्यशाळेत आपलं स्वागत आहे ! तुम्हाला सांगतो, अनेक वेळा अगदी छोट्या-छोट्या संधी शोधून काही लोक माझ्या ट्वीटचा वेगळा अर्थ लावतात; आणि जसे काय मी ट्रेडिंग करणार्‍या सामान्य लोकांच्या विरोधात आहे असे चित्र तयार करण्याचा जाणून-बुजून प्रयत्न करतात. पण खरंतर मी असा आहे जो सामान्य लोकांना त्यांच्या चुकांपासून वाचवण्यासाठी खूप प्रयत्नशील असतो. जरी मी एक ऑप्शन सेलर असलो आणि ऑप्शन विकत घेणार्‍या लोकांकडून पैसे कमवत असलो तरीही मी लोकांना उघडपणे सांगतो की, तुम्ही ऑप्शन खरेदी करू नका. मी नेहमी सांगत असतो आणि हे सर्वांना माहिती आहे की, सरकार सांगते तुम्ही सिगारेट ओढू नका आणि तरीही लोक ती ओढतात आणि सरकार अतिरिक्त कर लावून ती विकण्यास परवानगी देते. मी सुद्धा उघडपणे सांगतो की, ऑप्शन विकत घेऊ नका. मी माझ्या एका विडियोमध्ये आधीच संगितले आहे की, एका ऑप्शन बायरला एका ऑप्शन सेलरपेक्षा दहापटीने चतुर असावे लागते. अनेक लोक अनेक प्रकारे ट्रेडिंग करतात त्याबद्दल मला बोलायचे नाही; मला इतकच सांगायचं आहे की ऑप्शन बायरला पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते."

"मला तुम्हाला एक ट्वीट दाखवायचे आहे जे माझे मित्र, श्री. विवेक बजाज यांनी केले होते. त्यात त्यांनी विचारले होते की १ लाख गुंतवणुक करून ट्रेडिंग करत ते १ करोड बनवायला किती काळ लागेल ? या प्रश्नाचे उत्तर अनेक लोकांनी दिले. त्यात १६% लोकांनी आम्ही १ लाखचे १ करोड फक्त पाच वर्षापेक्षा कमी काळात करू असे उत्तर दिले, २७% लोकांनी दहा वर्षाच्या आत आम्ही ते करू असे उत्तर दिले तर उर्वरित लोकांनी दहा वर्षाहून अधिक काळ लागेल असे उत्तर दिले. म्हणजे १६% + २७% = ५१% लोकांच्या मते दहा वर्षाच्या आत १ लखाचे १ करोड होऊ शकतात. आता याच उत्तराला धरून आपण काही गणितं मांडू. दहा वर्षात १ लाखचे १ करोड म्हणजे १०० पटीनं वाढ, याचा अर्थ त्यापुढील दहा वर्षात आणखी १०० पटीनं वाढ होऊन १ करोड चे १०० करोड व्हायला हवेत आणि आणखी दहा वर्षात त्याचे १०,००० करोड व्हायला हवेत. मला असा माणूस दाखवा ज्याने ३० वर्षात एका लाखाचे दहा हजार करोड केले आहेत ? किंवा अशी किती माणसं आहेत ज्यांची संपत्ती १०,००० कोटी आहे ? अगदीच बोटावर मोजण्याइतकी ! मागील तीस वर्षात तरी कोणी असा व्यक्ति झाला आहे का ज्याने असे पैसे वाढवले ? तीस वर्षापूर्वी माझा पगार ३ हजार रुपये होता, मग समजा मी त्यावेळी ३ हजार गुंतवले असते तर ते पुढील दहा वर्षात शंभर पट म्हणजे ३ लाख व्हायला हवे होते, त्यापुढील दहा वर्षात ३ करोड आणि त्यापुढील दहा वर्षात ३०० करोड ! मग तुम्हीच विचार करा तुम्ही असा माणूस कुठे पाहिला आहे का ? मी तरी अश्या व्यक्तिला माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिले नाही की, ज्याने ३ हजार शेअर बाजारात गुंतवून त्याचे ३०० करोड केले आहेत. मला अनेक लोक माहीत आहेत ज्यांच्याकडे १०० करोडपेक्षा जास्त पैसा आहे; पण त्यांनी असे ३ हजार गुंतवून तेवढे पैसे मिळवले नाहीत. निश्चितच त्यांनी खूप मोठी रक्कम गुंतवून हा प्रवास केला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, कंम्पौंडिंग करून पैसा कमवणे हे पुर्णपणे, तंतोतंतपणे गाठले जाऊ शकत नाही. कंम्पौंडिंग वगैरे या गोष्टी तुम्ही विसरूनच जा, त्याआधी तुम्हाला टॅक्स देखील द्यायचा आहे हे विसरू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॉफिट कमवाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ३०% पर्यंत टॅक्स द्यायचा आहे आणि कमाईची रक्कम ५ कोटीपेक्षा जास्त झाली तर मग चक्क ४२% पर्यंत टॅक्स द्यावा लागू शकतो. हा टॅक्स दिल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात परतावा मिळवायचा आहे हे ध्यानात ठेवा. मग विचार करा टॅक्स देण्याआधी तुम्हाला किती प्रचंड कमाई करावी लागेल ! हे मोठ्या प्रमाणात अशक्यच आहे. अनेक लोक अशी मोठी अपेक्षा करून शेअर बाजारात येतात; आणि या तुमच्या अपेक्षेचा फायदा घेऊन काही लोक तुम्हाला फसवण्यासाठी बसले आहेत. असे फसवणूक करणारे लोक केवळ एक्सेल मध्ये गणितं मांडून अमके-तमके टक्के परतावा मिळवून देऊ अशी चित्रं सादर करत असतात आणि हे लोक तुम्हाला ऑप्शन बायिंगच शिकवतात. तुम्ही म्हणाल की, सर तुम्ही सुद्धा ऑप्शनचे कोर्स घेताच की ! हो, आम्ही कोर्स घेतो; परंतु आम्ही केवळ जास्त पैसा असलेल्या लोकांनाच शिकवतो. कारण आम्हाला माहिती आहे की केवळ २५ ते ५० हजार गुंतवून करोड रुपये कमवणे शक्य नाही. मात्र तुमची फसवणूक करु इच्छिणारे लोक तुम्हाला २५ हजार इतकी कमी रक्कम सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये गुंतवायला सांगतील. हे सर्व पाहून मला तामिळ फिल्मचा एक फेमस डायलॉग आठवतो, 'लोकांना फसवायचे असेल तर त्यांच्यातील लोभाला प्रोत्साहन द्या.' मला हा डायलॉग खूप आवडतो; म्हणून मी तो अनेक वेळा सांगत असतो. लोक तुमच्या लोभाला प्रोत्साहन देतील, आणि तुमच्याकडील पैसा त्यांच्याकडे खेचतील. म्हणून लोभी होऊ नका, ज्या क्षणी तुम्ही लोभी झालात, त्याक्षणी लोक तुम्हाला फसवतील. तुम्ही त्यांच्यासाठी सोपे लक्ष्य बनता."

प्रकरण ३ : एका ट्रेडरचा विशिष्ट प्रवास

"नमस्कार ! आज आपला विषय म्हणजे एका ट्रेडरचा विशिष्ट प्रवास असा आहे. मला जसं माहिती आहे त्याप्रमाणे दोन क्षेत्र अशी आहेत जी खूप आकर्षक आहेत. एक म्हणजे चित्रपट क्षेत्र आणि दुसरं म्हणजे शेअर मार्केट. चित्रपट क्षेत्र हे शेअर मार्केटपेक्षा अधिक आकर्षक वाटतं, पण तिथे प्रवेशासाठी काही अडथळे आहेत. एखादा छोट्या शहरातील व्यक्ति लगेच जाऊन चित्रपटात अभिनय करू शकत नाही. त्याला आधी शहरात यावे लागते, दिग्दर्शकांना भेटावे लागते आणि आणखी बरंच काही करावं लागतं. याउलट मोबाइल app मुळे, इंटरनेटमुळे आणि इतर सुविधांमुळे शेअर बाजारात ट्रेडिंग करणे सोपे झाले आहे; कोणीही जगातील कोणत्याही भागातून ट्रेडिंग करू शकतो. म्हणूनच लोक शेअर मार्केटकडे आकर्षित होत आहेत. परंतु सुरूवातीला त्यांना काहीच माहिती नसते, त्यांचे ज्ञान हे बिजनेस चॅनलवर जे दाखवतात तेवढेच मर्यादित असते; आणि तुम्हाला तर माहितीच आहे की या बिजनेस चॅनलची पातळी कशी आहे. मग असे नवे लोक गूगलवर सर्च करतात, मित्रांना विचारतात, कसेतरी आपले डिमॅट व ट्रेडिंग अकाऊंट चालू करतात आणि पहिल्यांदाच ते काही शेअर्स खरेदी करतात. आता तुम्हाला शेअर बाजाराचा स्वभाव सांगतो, एखादा शेअर त्याचा ९९ टक्के प्रवास हा त्याच्या १० टक्के कालावधीत करतो, उरलेल्या ९० टक्के काळात त्याचा भाव तितकासा बदलत नाही. तुम्हाला माझी टाटा पॉवरची स्टोरी माहितीच असेल, मी ते शेअर्स दहा वर्षापासून होल्ड केले होते आणि जेव्हा मी ते कंटाळून विकून टाकले नेमके त्यानंतरच तीनच महिन्यात त्याची किंमत तीनपट झाली ! असेच उदाहरण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या बाबतीत देता येईल; त्याचा शेअर भाव २००७-८ पासून २०१७ पर्यंत काहीच वाढला नाही आणि २०१७ पासून २०२० पर्यंत तो ४००% वधारला. तर शेअर मार्केटचा स्वभाव हा असा आहे; खुप काळापर्यंत ते आपल्याला चांगला परतावा देत नाही. हे नवे लोक जे मार्केटमध्ये येतात ते काहीसे मुद्दल घेऊन आलेले असतात आणि खूप उत्सुक असतात; आणि काही थोड्याशाच काळात त्यांचा उत्साह निघून जातो कारण शेयरचा भाव पाहिजे तितका वाढत नाही. मग अशा वेळी या नव्या लोकांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगबद्दल माहीत होतं, आता ते त्याबद्दल परत उत्साही होतात. ते पाहतात की फक्त १० टक्के मार्जिन मनी देऊन एक टक्के जरी किंमत वाढली तरी आपल्याला १० टक्के नफा होतो, हे खूप भारी वाटते; पण कोणीच उलट विचार करत नाही की, एक टक्का भाव खाली आला तर आपले १०% नुकसान होईल. जेव्हा मी हा उलट प्रश्न अशा लोकांना विचारतो तेव्हा ते म्हणतात की, 'आम्हाला का बरं नुकसान होईल? आम्ही स्टॉप लॉस लावू ना !' अशा लोकांचा स्टॉप लॉस नेहमी हिट होत राहतो आणि ते पैसे गमावतात. काही काळ लोटल्यानंतर मग ते विचार करू लागतात की यार माझ्यासोबत नेमकं काय चुकीचं होतंय ? मग ते आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सोशल मिडियावर येतात; मी तुम्हाला सांगतो की सोशल मिडियावर बहुतेक लोक हे इतरांना सल्ला द्यायलाच बसले आहेत. मी गमतीने म्हणतो की मला दोन सासवा आहेत; एक म्हणजे माझी खरी सासू आणि दुसरी म्हणजे सोशल मिडिया ! कारण लोक तिथे नेहमी सल्ला देत असतात ! मग सोशल मिडियावरील लोक सांगतात की, तुम्हाला इंजिनियर बनण्यासाठी ४ वर्ष शिकावं लागतं, डॉक्टर बनण्यासाठी ५ वर्ष शिकावं लागतं, मग शेअर मार्केट बद्दल काहीही न शिकता तुम्ही कसंकाय शेअर मार्केटमध्ये येता ? मग हे ऐकून या नव्या लोकांनाही ही असंच वाटतं की हो यार हे खरंच आहे; आणि मग शिकण्यासाठी एखाद्या शिक्षकाची शोधाशोध सुरू होते. अशा वेळी जो व्यक्ति सोशल मिडियावर जास्तीत जास्त प्रॉफिट दाखवतो तो यांना खूप चांगला शेअर मार्केटचा शिक्षक वाटतो. मग ते त्याचा क्लास जॉइन करतात. मग त्या क्लास मध्ये बर्‍याच टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात; आणि तो शिक्षक म्हणतो की आम्ही एक सॉफ्टवेअर बनवले आहे ज्यातून तुम्ही सहज ट्रेडिंग करू शकता; त्याची किंमत वर्षाला फक्त ६० हजार आहे. हे सगळं पाहून हे नवे लोक खुप खुश होतात की हे किती सोपं होईल ! मग हे लोक ते सॉफ्टवेअर खरेदी करतात, त्या सॉफ्टवेअर मध्ये इंडिकेतर पाहून ट्रेडिंग करतात आणि अचानक एके दिवशी एखादी वाईट बातमी येते व मार्केट कोसळू लागते, मग त्या सॉफ्टवेअरने आदल्या दाखवलेले इंडिकेटर पाहून पूर्वीच खरेदी केलेल्या शेअरमध्ये प्रचंड नुकसान होते. मग परत हे लोक विचार करू लगतात की, यार माझ्यासोबत नेमकं काय चुकीचं होतंय ? परत ते या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी सोशल मिडियावर येतात; आणि त्यांना आता नवीनच काहीतरी ज्ञान, सल्ला मिळतो. सांगायचा मुद्दा एवढाच की आपण चुकतो आहोत हे कळण्यापर्यंत खूप मोठा तोटा नवीन लोक सहन करतात."

"शेअर मार्केटचे दोन मोठे ब्रोकर आहेत. त्यापैकी एक म्हणजे झिरोधा. झिरोधाचे CEO नितिन कामत यांनी एकदा एक माहिती शेअर केली होती. त्यांच्या त्या माहितीमुळे अनेकांची तोंडं वाकडी झाली होती कारण सत्य नेहमी कडू असतं. अनेक वेळा लोक मलाही कमेंट करून म्हणतात की, सर तुम्ही सामान्य लोकांचा उत्साह कमी करता. या अशा लोकांना मी काय उत्तर देऊ ? सामान्य लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेमकं काय करावं ? मी त्यांना खोटी माहिती देऊ का ? की तुम्ही दहा हजार, वीस हजार घेऊन शेअर मार्केटमध्ये येऊन ऑप्शन ट्रेडिंग करा आणि इथे जे करोडो रुपयेवाले मोठे मूर्ख लोक आहेत ते त्यांचा पैसा गमावतील व तुम्हाला तो पैसा कमवता येईल ? हे खरं आहे की, शेअर बाजारात कोणीतरी पैसा गमवला तरच दुसर्‍या कोणालातरी पैसा मिळतो; शेअर मार्केटमधून जर सर्व सामान्य लोकांना पैसा कमवायचा असेल तर सर्व करोडपती लोकांनी स्वतःचा पैसा गमवल्याशिवाय ते शक्य नाही. मी एक उदाहरण देऊ इच्छितो, समजा मी एक भाजीचे दुकान सुरू केले आणि माझ्या बाजूला मुकेश अंबानीनेही भाजीचे दुकान सुरू केले तर कुणाचा धंदा चालणार आहे ? अर्थातच अंबानीचा ! कारण त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि ते ज्याप्रकारे दुकान बनवतील, चालवतील त्याप्रकारे मी चालवू शकणार नाही. म्हणून कोणत्याही धंद्यात सर्वच लोक हे मानतात की ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याची कमी पैसेवाल्यांच्या तुलनेत जिंकण्याची शक्यता अधिक आहे. आता याला काही अपवाद असतात; पण अपवाद वगळता सगळीकडे असेच चित्र आपल्याला दिसते. तुम्हाला काय वाटते की हे करोडो रुपये असणारे लोक शेअर मार्केटमध्ये येऊन पैसे गमावतील ? असा विचारही करू नका, ते तुमच्यापेक्षा नक्कीच हुशार आहेत, म्हणूनच तर त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत. लक्षात ठेवा की प्रत्येकाला आपला बिजनेस करायचा असतो. बिजनेसचे जे न्यूज चॅनल आहेत त्यांनाही आपला बिजनेस करायचा असतो; म्हणूनच तर प्रत्येक असे न्यूज चॅनल तुम्हाला ऑप्शन खरेदी करा हे सांगते. मी उद्या याच चॅनलवर जाऊन लोकांना तुम्ही ऑप्शन सेल करा हे सांगायचे ठरवले तर हे न्यूज चॅनलवाले मला चॅनलवर दाखवायचे बंद करतील. कारण जास्त लोकांनी चॅनल पाहिला तरच त्यांना जाहिरीती मधून पैसे मिळतील. ऑप्शन सेल करायला जास्त पैसे लागतात आणि हे जास्त पैसेवले लोक खूपच कमी आहेत; कमी पैसेवाले लोक जास्त आहेत म्हणूनच त्यांना फक्त ऑप्शन बाय करण्यासाठी ते प्रोत्साहित करू इच्छित असतात. तर मला हे सांगायचं होतं की, झिरोधाचे CEO म्हणाले होते की शेअर बाजारात एक टक्के लोकांपेक्षाही कमी लोक बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळवतात. आणखी एक ब्रोकर म्हणजे फायर, फायरचेही CEO म्हणाले होते की, शेअर मार्केट मध्ये ९०% लोक त्यांचे ९०% मुद्दल हे पहिल्या ९० ट्रेड मध्ये गमवतात. आता त्यांनी जे सांगितले त्याच्या नंतर काय होते ते मी सांगतो. नवे लोक हे अशाप्रकारे जेव्हा ९०% मुद्दल गमावतात तेव्हा ते असा विचार करतात की माझे आधीच ९०% नुकसान झाले आहे; आता राहिलेल्या १०% मुद्दलाचा वापर करून मी माझे गेलेले ९०% परत मिळवणार ! मी तुम्हाला सांगतो की अशाप्रकारे जुगार खेळून कोणीही गेलेला पैसा परत मिळवू शकत नाही; ज्या लोकांनी असा गेलेला पैसा त्याच मार्गाने परत मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणखी पैसा गमावला आहे. मग ज्या लोकांनी असा ९० टक्के पैसा गमावला आहे ते माझ्याकडे येतात आणि मी जेव्हा सांगतो की हळू हळू परतावा कमवत जा तेव्हा ते विचारतात की सर हे काय तुम्ही मूर्खपणाचे बोल बोलत आहात; असा हळू हळू आमचा गेलेला पैसा कधी परत मिळणार? अशा लोकांना मी सांगतो की याचा विचार तुम्हाला ते ९०% गमावण्यापूर्वी यायला हवा होता; आता असा प्रश्न विचारून काही उपयोग नाही."

"तर मित्रांनो हा असा असतो एखाद्या नव्या ट्रेडरचा विशिष्ट प्रवास. जर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचे ट्रेडर असाल तर मला आशा आहे की हा विडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल. म्हणून मी म्हणतो, शेअर मार्केटमध्ये येण्याआगोदर पुरेसे कौशल्य मिळवले पाहिजे. सुरूवातीला तुम्ही फक्त तुमचे मुद्दल वाचवण्यावर भर द्या. हळू हळू तुम्हाला परतावा मिळत जाईल आणि मग काही काळानंतर जेव्हा एक चांगला परतावा तुम्हाला मिळेल तेव्हा थोडीशी रिक्स वाढवा ती सुद्धा हळू हळू."

प्रकरण ४ : ९९ टक्के पैसे गमावतात

"हे सत्य आहे की बहुतेक लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गमावतात. अर्थातच, सोशल मीडियाची गोष्ट वेगळी आहे तिथे लोक पैसे कमवत आहेत असे भासवतात; पण मला माहित नाही की त्यापैकी किती लोक खरोखर शेअर मार्केटमधून पैसे कमवतात. होय हे सत्य आहे की 99 टक्के हून अधिक लोक शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे गमावतात. म्हणून मला लोकांचं नेमकं कुठे चुकतंय, काय चुकतंय याबद्दल सांगण्याची गरज वाटली. मला माहित आहे की अनेक जण असा प्रश्‍न विचारतील की 'सर हे तुम्हाला कसं माहिती की शेअर बाजारात 99% ट्रेडर पैसे घालवून बसतात?' हा प्रश्न काही चुकीचा नाही. मी या प्रश्नाचे उत्तर देणारच आहे. मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की झिरोधा हा सध्या भारतातील सगळ्यात मोठा शेअर मार्केटचा ब्रोकर आहे. भारतातील जास्तीत जास्त लोकांचे ट्रेडिंग व डिमॅट अकाउंट त्यांच्याकडे आहे. याच झिरोधाने काही वर्षापूर्वी एक खेळ सुरू केला होता. त्याचं नाव होतं झिरोधा सिक्स्टी डेज चॅलेंज. समजा तुम्ही या खेळामध्ये सहभाग घेतला आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केलीत. मग तुम्ही सुरुवात केलेल्या दिवसापासून पुढचे 60 ट्रेडिंग सेशन जर तुम्हाला एक रुपयाचाही प्रॉफिट झाला तरीदेखील तुम्हाला या खेळातील एक विजेता म्हणून झिरोधा कडून सर्टीफिकीट मिळत होतं. होय या साठ दिवसाच्या शेवटी एकत्रितपणे तुम्हाला फक्त एक रुपयाचा प्रॉफिट झाला तरी या खेळात तुम्ही विजेता ठरला असता. तर असा हा खेळ होता, जो झिरोधाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काही काळाकरिता सुरू होता. त्यांनी त्या खेळातील सर्व विजेत्यांचे फोटो आणि नाव त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केले होते. त्या सर्व विजेत्यांना त्यांचे ब्रोकरेज रिफंड केले होते.आणि त्याच वेळी त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे दोन लाख इतके अॅक्टिव ट्रेडर आहेत; ते असे म्हणत असले तरी मला वाटतं त्यातील निम्म्या लोकांनीच या खेळात सहभाग घेतला असेल. म्हणजे एक लाख लोकांनी या खेळात सहभाग घेतला. मी तेव्हा पाहिलं आहे की त्यांच्या त्या वेबसाइटवर एक हजारच्या आसपास इतक्याच लोकांना ते विजेत्याचं सर्टिफिकीट मिळालं होतं. होय, एक लाख पैकी केवळ एक टक्के लोकांनाच ! हा खेळ प्रत्येक तीन महिन्याला नव्याने सुरू होत असे; तुम्ही पुन्हा नव्याने त्यात सहभाग घेऊ शकत होता. एखाद्याने पुन्हा सहभाग घेऊन पुन्हा समजा काही प्रॉफिट कमवला तर पुन्हा एकदा त्याला सर्टिफिकीट मिळत असे. मी त्यांच्या वेबसाईटवर तेव्हा पाहिलं आहे की, अशा प्रकारे पुन्हा पुन्हा सहभाग घेऊन केवळ १०० पेक्षा कमी लोक या खेळात चार वेळा जिंकले होते. मग तुम्ही विचार करा की किती कमी लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून प्रॉफिट मिळवतात. मी यापूर्वीच सांगितलं आहे की, याच झिरोधाचे CEO नितिन कामत एका आर्टिकलमध्ये म्हणाले होते की, शेअर मार्केटमध्ये केवळ 1% लोक बँक एफडीपेक्षा अधिक परतावा कमवतात. आणखी एका ब्रोकर कंपनीचे CEO म्हणाले होते की ९०% लोक त्यांचे ९०% मुद्दल पहिल्या ९० ट्रेडमध्ये गमावतात."

"आता आपण हे पाहू की मला नेमकं या सगळ्यातून काय सांगायचं आहे. समजा, एक कॉलेज आहे जिथं ९९% मुलं नापास होतात; अशा कॉलेजमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचे-मुलीचे अॅडमिशन कराल का ? तुमचं उत्तर नाही असंच असणार आहे; मग हेच लॉजिक शेअर मार्केटसाठी लागू होतं. तुम्हाला हे माहीत आहे की शेअर मार्केटमध्ये ९९% लोक पैसे गमावतात तरीही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यावं असं का वाटतं ? मी एक स्टोरी तुम्हाला सांगतो, माझा शालेय जीवनातील एक मित्र आहे, त्याला एका सरकारी विमा कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहे; त्याच्या पत्नीलाही सरकारी नोकरी आहे. मी त्याची एकदा विचारपूस केली; त्याचं सगळं चांगलं चाललं होतं. त्यांनही माझी विचारपूस केली; मला मी काय करतो त्याबद्दल विचारलं, तेव्हा मी सांगितलं की मी शेअर मार्केट ट्रेडिंग करतो. मी त्याला म्हटलं की तूसुद्धा शेअर मार्केटकडे का येत नाही? तेव्हा मला म्हणाला, 'अरे भाऊ, मला आणि माझ्या बायकोला सरकारी नोकरी आहे, चांगला पगार आहे; मला शेअर मार्केट सारख्या रिस्की ठिकाणी यायची आवश्यकता नाही.' त्याचं हे म्हणणं त्याच्या दृष्टीकोणातून योग्यच होतं, मी त्याला परत त्याबद्दल विचारलं नाही. तीन वर्षांनंतर एक दिवस अचानक त्याचा फोन आला की, 'मला शेअर मार्केट शिकवशील का?' मी चकित होऊन त्याला याचं कारण विचारलं तेव्हा कळलं की त्याने एका खासगी कंपनीत जास्त पगार मिळाला महणून नोकरी सुरू केली आणि एका वर्षातच त्याला ती खासगी नोकरी गमवावी लागली. त्याला मागील काही महिन्यांपासून नोकरी नव्हती. तो मला म्हणाला की त्याची बायको महिन्याला पन्नास हजार कमवत आहे आणि मी मात्र एकही रुपया कमवत नाही हे पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटते. आणि हे असं चाललं होतं म्हणून आता तो मला म्हणत होता की मी त्याला शेअर मार्केट शिकवावं म्हणजे तो त्याच्या बायकोच्या पगाराएवढे पैसे कमवू शकेल. तो म्हणाला की त्याच्याकडे २५ लाख इतकी सेव्हिंग आहे; ते पैसे त्याला शेअर बाजारात गुंतवायचे आहेत. मी त्याला शिकवण्यास साफ नकार दिला. माझा नकार ऐकून तो बुचकळ्यात पडला; तेव्हा मी म्हणालो, 'अरे मित्रा तुझ्या आयुष्यात एक काळ होता जेव्हा तू रिस्क घेऊ शकत होतास; आता तो काळ नाही, जेव्हा तू एक चांगले व पैशाने भरपूर असे जीवन जगत होतास तेव्हा तू थोडी रिस्क घेऊ शकत होता; आता तुला नोकरी नाही, तुझ्या आयुष्यात समस्या आहेत, म्हणून हा रिस्क न घेण्याचा काळ आहे .' मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की भारतात शेअर मार्केटचे सर्वात जास्त अकाऊंट कोणत्या काळात उघडले गेले आहेत? कोरोंनाच्या काळात ! जेव्हा लोकांकडे नोकरी नव्हती, धंदा बंद होता नेमकं तेव्हाच लोकं शेअर मार्केटकडे वळली, अगदी चुकीच्या वेळी. असा काळ रिस्क घेण्याचा नसतो. मी असं ऐकलं आहे की या काळात तब्बल एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी अकाऊंट उघडली. मित्रांनो, तुम्ही जेव्हा आरामदायी जीवन जगत असाल तेव्हाच थोडीशी रिक्स घेऊन त्यात थोडेसे नुकसान झाले तरी तुम्ही ते सहज सहन करू शकता, म्हणून अशा वेळीच अगदी थोडीशी रिस्क घ्या जेव्हा तुम्ही एक चांगले जीवन जगत असाल. शेअर मार्केट हे असं क्षेत्र आहे जिथे ९९% लोक पैसे गमावतात हे विसरून चालणार नाही. मग तुम्ही स्वतःला विचारायला हवं की तुमच्यात असं काय आहे की तुम्हाला वाटतं तुम्ही या १% यशस्वी लोकांमध्ये मोडता? तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळालं नाही तर तुम्ही इकडे न आलेलच बरं आहे.; अन्यथा तुम्ही तुमचे पैसे गमावणार हे निश्चित. जोपर्यंत तुमच्याकडे चांगले कौशल्य येत नाही, पुरेसा पैसा तुम्ही कमवत नाही, तोपर्यंत तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करूच नका. इथे प्रत्येकवेळी भाग्य काम करत नाही; एखादा दूसरा व्यक्ति त्याच्या भाग्याने येथे पैसे कमवतो याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण कमवू शकतो. सिनेमाचे उदाहरण द्यायचे झाले तर तिकडेही प्रत्येक जण रजनीकांत बनत नसतो. रजनीकांत लाखात एकच असतो हे आपल्याला वारंवार लक्षात ठेवले पाहिजे."

प्रकरण ५ : झीरो सम गेम

"नमस्कार ! आपण मागे पाहिलं आहे की, शेअर बाजारात ९९% लोक पैसा गमावतात. मग याचा अर्थ असा होतो काय की, त्या ९९% लोकांचा संपूर्ण पैसा १ टक्के लोकांकडे जातो ? नाही ! ट्रेडिंग हा झीरो सम गेम नाही ! मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, माझे एक जवळचे नातेवाईक आहेत. ते एका क्लब मध्ये जात असत, आणि तेथे जाऊन जुगार-पत्ते खेळत असत. त्या क्लबमध्ये ते व आणखी नऊ लोक एका गोलाकार टेबलाभोवती डाव खेळायला बसत. प्रत्येकजण शंभर रुपये डावात लावत असे, म्हणजे दहा जणांचे एकूण हजार रुपये टेबलवर असत; पण विजेत्याला फक्त नऊशे रुपये मिळायचे. उरलेले शंभर रुपये क्लबच्या मालकाला मिळायचे. कारण तो क्लब चालवायला त्याला काही खर्च येत असे जसे की, जागेचे भाडे, लाईट बिल, चहा, नाश्ता, नोकरांचा पगार आणि नंतर स्वतःसाठी काही कमाई त्याला मिळवायची असते. मग जेव्हा हे अशाप्रकारचे दहा लोक निरंतर अनेक वर्षासाठी त्या क्लबमध्ये जाऊन जुगार खेळतात, अगदी २० ते ३० वर्ष निरंतर तेव्हा त्यांचा बराच पैसा त्या क्लब मालकाला मिळतो. माझ्या ओळखीतले असे लोक आहेत ज्यांनी अशाप्रकारे अनेक वर्ष जुगार खेळला आहे. अशा खेळत संभाव्यता काम करते. समजा हे लोक दहा हजार वेळा जुगार खेळले असतील, तर अशी शक्यता असते की प्रत्येकजण एक हजार वेळा जिंकेल. इथे या दहा जणांच्या हे लक्षात येत नाही की दहा हजार वेळा आपण जुगार खेळला आणि प्रत्येक वेळी शंभर रुपये प्रमाणे या संपूर्ण काळात दहा लाख रुपये क्लबच्या मालकाला मिळतात. म्हणजे सरासरी त्या प्रत्येक खेळाडूला एक लाखाचे नुकसान होते. माझ्या एका नातेवाईकने इतका जुगार खेळला की त्याने आतापर्यंत वीस-पंचवीस लाख रुपये गमावले आहेत. फक्त त्यानेच नाहीत तर त्याच्या बरोबर जे-जे जुगार खेळायचे त्या सर्वांनी लाखो रुपये गमावले आहते. म्हणून याचप्रकारे ट्रेडिंग सुद्धा झीरो सम गेम नाही. कारण तुम्ही बायर असाल आणि मी सेलर असेल तर आपण दोघेही ब्रोकरेज देतो, आपण दोघेही GST देतो, आपण दोघेही सेक्युरिटी ट्रानजॅकशन टॅक्स देतो, आपण दोघेही सेबी चार्जेस देतो, टर्नओवर चार्जेस देतो, मग अशाप्रकारे अनेक मार्गानी आपला पैसा बाहेर जातो. मग याचे जर गणित मांडायचे झाले तर मला वाटते दरवर्षी पन्नास-साठ हजार करोड रुपये मार्केटमधून बाहेर जातात. म्हणून ट्रेडिंग हा झीरो सम गेम नाही हे ध्यानात ठेवा. हा खरंतर वजा पन्नास हजार करोडचा गेम आहे."

"आता समजा एका व्यक्तीने एक कसिनो चालू केला आणि तिथे हजार लोकांनी येऊन जुगार खेळला; प्रत्येकाने शंभर रुपये हारले. म्हणजे कसिनो चालवणार्‍याला हजार जणाचे प्रत्येकी शंभर प्रमाणे एक लाख रुपये मिळाले. मग याचा अर्थ त्या कसिनो मालकाने खूप पैसे कमावले असा होतो का? नाही ! कारण त्याने तो कसिनो सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी खूप मोठी रक्कम गुंतवली असेल. कदाचित त्याने एक करोड रुपये भांडवल या धंद्यात गुंतवले असेल. मग या तुलनेत त्याचे उत्पन्न अगदीच थोडे आहे; केवळ एखादा टक्का. माझेही असेच होते. मी एक ऑप्शन सेलर असल्यामुळे मला दहा रुपयाचा ऑप्शन सेल करण्यासाठी शंभर रुपये मार्जिन मनी आधी गुंतवावा लागतो, मग समजा एक निफ्टिचा चा लॉट जो की सध्या ७५ क्वांटिटीचा आहे, तो मला १० रूपयाच्या प्राइसला शंभर लोकांना विकायचा आहे म्हणजे एकूण शंभर लॉट विकायचे आहेत तर मला तब्बल साडेसात करोड इतका मार्जिन मनी माझ्या खात्यात ठेवावा लागतो. मग समजा या ऑप्शनचा भाव महिन्याअखेरीस शून्य रुपये झाला आणि मी सेलर असल्याने मला एका लॉटमागे ७५० रूपयांचा फायदा झाला तर शंभर लॉटचे केवळ ७५ हजार मी कमावतो. विचार करा मी गुंतवले साडे सात करोड आणि त्याच्या तुलनेत एक टक्काही कमावत नाही."

"या दोन गोष्टी आपण विचारात घ्यायला हव्यात. कोणीही अफाट प्रॉफिट कमावत नाही, जे आम्ही कमावतो असे दाखवतात त्यांची तुम्ही पडताळणी करायला हवी. शेअर बाजार तुम्हाला वाटतो तितका ग्लामरस नाही."

प्रकरण ६ : यशाचं मुख्य कारण

"एकदा एक माणूस एका चर्चमध्ये नोकरी मागण्यासाठी जातो; पण तेथील फादर त्याला काम देत नाही. तो माणूस बाहेर येतो आणि त्याला तहान लागलेली असते म्हणून ज्यूस प्यावासा वाटतो. तो एखादे ज्यूसचे दुकान शोधू लागतो; पण एकही ज्यूसचे दुकान सापडत नाही. त्याच्या लक्षात येतं की, इथे कुठलेच ज्यूसचे दुकान नाही. त्याच्या मनात विचार येतो की आपणच इथे एखादे ज्यूसचे दुकान टाकले तर? आणि तो लवकरच तिथे एक छोटेसे दुकान सुरू करतो. लोकांना नाश्ता, ज्यूस विकू लागतो. काही काळानंतर तो एक जगप्रसिद्ध उद्योगपती बनतो ज्याची अनेक दुकाने सगळीकडे आजही चालतात. त्याच्या उद्योगसमूहाचे नाव Seven-Eleven असे आहे. त्याला एकदा एका मुलाखतीत विचारले जाते की जर तू उद्योगपती नसतास तर काय बनला असतास? त्यावर तो म्हणाला की मी एका चर्च मध्ये एक साधा नोकर असतो. या गोष्टीतून मला हे सांगायचं आहे की, आयुष्यात कधी कधी अनियोजित यश आपल्या वाट्याला येत असतं जे कितीतरी पटींनी अधिक असतं, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते."

"तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक गोष्ट सांगतो, मी जेव्हा बारावीला होतो तेव्हा मला IIT चे कॉलेज असतात हे देखील माहीत नव्हतं. तुम्ही विचार करा माझं काय पातळीचं ज्ञान होतं ! तेव्हा दक्षिण भारतात खूप बेरोजगारी होती, म्हणून मी आखाती देशांत एक साधा un-skilled कामगार म्हणून जायचे ठरवले. मी पासपोर्टही बनवला; पण मला तेथे कामावर घेतले नाही. तेव्हा मी १९ वर्षाचा होतो. मग मी गणितात माझे पदवीचे शिक्षण घेतले. मला या पदवीच्या आधारावर एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली; ती खूप मोठी शाळा आजही आहे. त्याच वेळी गुजरातमधून एक नोकरीची संधी आली परंतु मला त्यावेळी ती नोकरी मिळाली नाही. त्यानंतर एक वर्षानंतर माला पुन्हा त्याच नोकरीसाठी ऑफर लेटर आले. तो खूप चांगला जॉब होता. शिक्षक म्हणून खूप पगार मिळणार होता. केंद्र शासनाच्या सर्व सुविधा मिळणार होत्या. परंतु मला थोडेही हिन्दी येत नव्हते म्हणून मी ते ऑफर लेटर कचर्‍यात फेकून दिले. नेमकं त्याच वेळी माझ्या एका मित्राचे पत्र मला आले. त्याने पत्रात लिहलं होतं की, त्याला नोकरीची गरज आहे; मग मी थोडा विचार केला आणि सगळ्यात पहिलं ते ऑफर लेटर कचर्‍यातून उचलून आणलं. मी विचार केला की माझी सध्याची नोकरी मी सोडली आणि गुजरातला गेलो तर माझ्या मित्राला माझ्या सध्याच्या शाळेत नोकरी भेटू शकते. मी माझ्या मित्राची मदत करण्यासाठी माझी ती नोकरी सोडली आणि गुजरातला गेलो. तिथे गेल्यावर मला सांगण्यात आले की, तुम्हाला हिन्दी येत नसले तरी तूर्तास तुम्ही इंग्लिशमध्ये शिकवा आणि हळू हळू हिन्दी शिका. हे ऐकून मी लगेच तीथे रुजू झालो. मी पहिल्यांदाच दक्षिण भारत सोडून बाहेरच्या राज्यात आलो होतो. तिथे आधीच एक तामीळ शिक्षक होते, त्यांना हिन्दी येत होतं; ते आता माझ्याच फ्लॅटवर राहायला आले आणि म्हणून मग मी त्यांच्याकडून हिन्दी शिकू लागलो. तसही ती इंग्रजी माध्यमातील शाळा होती म्हणून जास्त हिन्दी बोलावं लागत नसे. परंतु दुसरीकडे माझ्या मित्राने माझ्या जागी पूर्वीच्या शाळेत मुलाखत दिली आणि त्याला ती नोकरी मिळू शकली नाही. मी सगळं त्याला मदत व्हावी म्हणून केलं आणि त्याला मदत झाली नाही, असो. मी आता गुजरातमध्ये नोकरी करू लागलो. याआधी माझे ज्ञान केवळ तामीळनाडु पुरते मर्यादित होते. गुजरातला आल्यामुळे मला संपूर्ण भारताबद्दल आणखी माहिती मिळाली. नंतर मी तेथे ट्यूशनही घेऊ लागलो. आता मला चांगला पैसा मिळू लागला होता. गुजरातमध्ये माझ्या ज्ञानात खूप भर पडली, माझा आत्मविश्वास बराच वाढला आणि म्हणूनच नंतरच्या काळात मी सिंगापूरला शिक्षकाची नोकरी स्वीकारू शकलो. या गोष्टीतून मला एवढच सांगायचं आहे की मी माझ्या मित्राची मदत करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि म्हणून आज मी इथपर्यन्त आलो आहे. आपली मूल्यं आपल्याला सर्वकाही मिळवून देतात. म्हणून तुमची मूल्यं सगळ्यात महत्वाची आहेत."

प्रकरण ७ : ट्रेडिंगचे जादुई सूत्र

जपानी लोक हे खूप मेहनती लोक आहेत. इतकच नाही तर इतर अनेक गोष्टींमध्ये ते खूप चांगले आहेत. एकदा एका जपानी व्यक्तीने त्याच्या सामानासोबत एक साबण विकत घेतला, घरी जाऊन पाहिले तर त्या साबणच्या खोकड्यात साबणच नव्हता. त्याने ते दुकानदाराला कळवले व ही गोष्ट त्या साबण बनवणार्‍या कंपनीपर्यन्त पोहोचली. कंपनीच्या मालकाने या घटनेला खूप गांभीर्याने घेत त्यांच्या सर्व इंजीनियर टीमला बोलावले. त्याने सर्वाना सांगितलं की तुम्ही काहीतरी उपाय शोधा पण हे असे परत व्हायला नको. सर्व इंजीनियर कामाला लागले. अनेक प्रयत्नांनी त्यांनी एक स्कॅन मशीन बनवली. ती मशीन त्यांनी एका कन्वेयर बेल्ट जवळ लावली, ज्या बेल्ट वरून साबण पुढे जात असत. एखाद्या बॉक्समध्ये साबण नसेल तर ती मशीन बरोबर स्कॅन करून इंडिकेटर देत असे. त्यांनी ती मशीन चालवण्यासाठी एका कामगाराला बोलावले व त्याला काम कसे करायचे ते सांगितले. हे सर्व पाहून कामगार बुचकळ्यात पडला, त्याने विचारले की या असल्या मशिनची काय गरज आहे? एका साबणचे वजन साधारणतः १०० ग्राम असते आणि खोकड्याचे वजन ५ ग्राम. मग ज्या खोकड्यात साबण नसेल ते तर वजनाने सहज कळेल. या कन्वेयर बेल्टशेजारी एक मोठा फॅन लावला तर रिकामी खोकडी वार्‍याने आपोआप बाजूला होतील ! त्या कामगाराची ती युक्ति सर्वांना खूप छान वाटली, आणि शेवटी एक हाय वेलोसिटी फॅन तिथे बसवण्यात आला. म्हणजे ती स्कॅन मशीन बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले ते वाया गेले. ही खूप फेमस गोष्ट आहे.याच्यातून हे शिकायचं की फक्त खूप शिक्षण असलेले लोकच एखाद्या समस्येचे निराकरण करू शकतात असे नाही. कमी शिकलेले लोक सुद्धा चांगले निराकरण सुचवू शकतात. हीच गोष्ट मी शेअर मार्केटशी जुळवून पाहिली तर इथेही अनेक लोक माझे अमके-तमके शिक्षण झाले आहे हे सांगत असतात. आम्ही अमक्या तमक्या युनिवर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे असे ते मिरवत असतात. मला अशा लोकांना एवढच सांगायचं आहे की बाबांनो तुम्हाला-मला माहिती आहे की कोणी कुठून शिकून आलाय पण शेअर मार्केटला काय माहिती कोण किती शिकलाय ? तुम्ही नीट निरीक्षण करा, शेअर मार्केटमध्ये जे लोक खूप यशस्वी आहेत त्यांचे शिक्षण फारसे झालेले नाही."

"दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जर उघड डोक्याने विचार केला तर तुम्हाला अनेक समस्यांचे अगदी सोपे निराकरण सापडेल. लोक मात्र उलट वागतात, त्यांचा कंपनीकडे पाहण्याचा दृष्टीकोणच गुंतागुंतीचा असतो, मग यामुळे गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतात व शेवटी उत्तरही गुंतागुंतीचे मिळते. आपल्या वैयक्तिक जीवनातही अनेक लोक असेच आहेत जे विनाकारण गोष्टी गुंतागुंतीच्या बनवतात. सर्व समस्यांची उत्तरे ही साधी सरळसुद्धा असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मी एक शेअर मार्केट ट्रेनर आहे; मी अनेकदा पाहतो की काही लोक अत्यंत कृत्रिम भाषेचा वापर करतात. साधी गोष्ट अवघड करून सांगतात व मग लोकांना वाटते की समोरचा व्यक्ति किती गहण विषय समजावून सांगत आहे. मी असे करत नाही; मी साधी सरळ भाषा वापरतो. अनेक लोकांनी माझा वर्कशॉप जॉइन केला आहे; त्यांना हे माहीत आहे की मी साध्या स्ट्रॅटजीचा वापर करून पैसा कमावतो. तुम्हाला तामीळ फिल्म इंडस्ट्री माहीत असेल, तिथे कमल हसन हा बेस्ट अभिनेता आहे; पण रजनीकांतने त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमावला. कारण अनेक वेळा साध्या गोष्टीच जास्त प्रभावी ठरतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की, गोष्टी सहज व सोप्याच असतात; आपणच त्यांना विनाकारण गुंतागुंतीच्या बनवतो. लक्षात ठेवा, साधेपणा नेहमी जिंकतो."

प्रिय वाचकहो, आपल्या प्रतिक्रिया रेटिंग देऊन व कमेन्ट करून नक्की नोंदवा, आम्हाला प्रोत्साहन मिळेल. वरील संपूर्ण प्रकरणे म्हणजे भारतीय शेअर बाजारातील एका मोठ्या व्यक्तीने त्यांच्या कार्यशाळेत आमच्याशी केलेला संवाद आहे. त्यांचे हे अनुभवाचे बोल सर्व मराठी गुंतवणूकदारांपर्यन्त पोहोचावे म्हणून ही सर्व प्रकरणे मी येथे लिहली आहेत. आपला अमूल्य वेळ या साहित्यासाठी दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! ट्रेडिंगची बेस्ट स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी भेट द्या paaytrade (डॉट) blogspot (डॉट) com आणि आमच्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी व्हा!