EPF baddal sampurna mahiti books and stories free download online pdf in Marathi

EPF बद्दल संपूर्ण माहिती

आता काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत!

EPF कसा काढायचा ?


नमस्कार मित्रांनो! आजच्या डिजिटल युगात पीएफचे पैसे काढणे पूर्वीपेक्षा बरेच सोपे झाले आहे. तुम्ही दोन प्रकारे PF चे पैसे काढू शकता.

1) तुम्ही तुमच्या ईपीएफ कार्यालयाला भेट देऊन ऑफलाइन फॉर्म सबमिट करू शकता

2) ऑनलाईन फॉर्म भरून

आपण पहिली पद्धत देखील वापरू शकता, परंतु बहुतेक लोकांच्या बाबतीत असे घडते की ते एका ठिकाणी राहतात आणि त्यांचे ईपीएफ कार्यालय खूप दूर असते. तसेच ऑफलाइन फॉर्म भरणे सोपे काम नाही. कोणीतरी कसाबसा फॉर्म भरला तरी, त्याला त्या फॉर्मवर त्याच्या कंपनीची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा लागतो, याचा अर्थ या ऑफलाइन प्रक्रियेत बऱ्याच चकरा माराव्या लागतात. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, सही व शिक्का देण्यासाठी कंपनीचे अधिकारी लाच मागतात आणि त्रास देऊन सामान्य जनतेची लूट करतात. अनेक वेळा पीएफ अधिकारी देखील लोकांना त्रास करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळेच लोक त्यांच्या कष्टाचे पैसे सहज काढू शकतील ते ही भ्रष्टाचाराला बळी न पडता याची व्यवस्था करण्यात आली आणि ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली. तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पैसे सहज काढू शकता. हा पैसा तुमच्या बँक खात्यात जमा होतो, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या सर्व शक्यता इथेच संपतात.


नोकरीवर असताना PF चे पैसे काढू शकतो का ?

होय, आपण ते काढू शकता! याला पीएफ अॅडव्हान्स म्हणतात. खालील प्रकरणांमध्ये तुम्ही पीएफ अॅडव्हान्स काढू शकता:

1) जर तुम्ही आजारी असाल

2) तुमच्या / तुमच्या मुलांच्या लग्नासाठी (जर सेवा 7 वर्षांपेक्षा जास्त असेल)

3) आपले घर खरेदी किंवा बांधण्यासाठी (जर सेवा 5 वर्षांपेक्षा जास्त असेल)

4) तुम्हाला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही

5) तुमच्यावर नैसर्गिक आपत्ती आली आहे

6) तुमच्या / तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी (जर सेवा 7 वर्षांपेक्षा जास्त असेल)

7) कोरोना विषाणूमुळे, लॉकडाऊनमुळे आर्थिक दुर्बलता असल्यास

तुम्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुमच्या जमा केलेल्या पीएफ रकमेच्या 75% पर्यंत पैसे Advance म्हणून काढू शकता.

लक्षात ठेवा की हे अॅडव्हान्स प्रत्येक बाबतीत वारंवार काढता येत नाही, म्हणून जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच अॅडव्हान्सचे पैसे काढा, अन्यथा ते तसे सोडून द्या कारण पीएफ विभाग दरवर्षी 8% पेक्षा जास्त व्याज देते, जे खूप जास्त आहे.


EPF चे पैसे किती दिवसात बँक अकाऊंट मध्ये जमा होतात ?

जर तुम्ही अॅडव्हान्स काढला असेल तर 7 ते 15 दिवसांच्या आत पैसे बँक खात्यात जमा होतात.

जर तुम्ही अंतिम सेटलमेंट केले असेल तर 15 ते 20 दिवसांच्या आत पैसे बँक खात्यात जमा होतात.


पैसे काढण्यासाठी काय आवश्यक आहे ?

सर्वप्रथम, तुमचा केवायसी असणे आवश्यक आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात तुमचे आधार, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते इत्यादी माहिती जोडणे आवश्यक आहे.

तुमच्या आधारमध्ये मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही आधार केंद्राला भेट देऊन हे काम करू शकता. हे काम पोस्ट ऑफिसमध्ये केले जाते.

तसेच, आपले ऑनलाइन पीएफ खाते सक्रिय करणे आवश्यक आहे. जर ते सक्रिय नसेल तर तुम्ही यूएएन नंबरच्या मदतीने ते सक्रिय करू शकता. तुम्ही ते सक्रिय केल्याशिवाय पैसे ऑनलाइन काढू शकत नाही.

यूएएन क्रमांक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या कंपनीकडे हा नंबर मागू शकता.


UAN नंबर नाही आणि कंपनी पण तो देत नाही मग काय करू ?

प्रत्येक कंपनीने तुम्हाला UAN क्रमांक देणे आवश्यक आहे. जर कोणी दिले नाही, तर तुमच्या आधार किंवा पॅन कार्डच्या मदतीने किंवा पीएफ नंबरच्या मदतीने जाणून घेऊ शकता.


आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक नाही आणि पीएफ नंबर पण माहीत नाही, मग काय करू ?

या प्रकरणात, आपण आपल्या कंपनीकडून आपला यूएएन किंवा पीएफ क्रमांक मागू शकता. जर तो देत नसेल तर तक्रार करण्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही.


कंपनीने PF खात्यात पैसे जमा केले नाही, आता काय करू ?

या प्रकरणात, आपण आपल्या बँक खात्याचा रेकॉर्ड (ज्यामध्ये पगार जमा केला गेला आहे) जोडून ईपीएफओ विभागाकडे तक्रार दाखल करू शकता. या प्रक्रियेसाठी तुम्हाला UAN किंवा PF क्रमांक माहित असणे आवश्यक आहे.


EPF किती कट होतो ?

तुमच्या वेतनातून सुमारे 12% पीएफ रक्कम तुमच्या पीएफ खात्यात दरमहा जमा केली जाते. हे 12% तुमच्या बेसिक पगाराच्या आधारावर मोजले जाते. महिन्यासाठी 1800 रुपये अशी मर्यादा आहे, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही मर्यादा काढून अधिक पैसे जमा करू शकता.

तुमची कंपनी देखील तुमच्या PF खात्यात 12% PF जमा करतो, म्हणजेच एकूण 24% रक्कम तुमच्या खात्यात दरमहा जमा केली जाते. यापैकी 8.33% रक्कम तुमच्या पेन्शन फंडात जाते, जी तुम्ही अॅडव्हान्स काढू शकत नाही म्हणजे तुम्हाला उर्वरित 15.67% वरून अॅडव्हान्स मिळतो.


पेंशन ची रक्कम कधी मिळते ?

जेव्हा तुम्ही 10 वर्षापूर्वी तुमची सेवा सोडता आणि पीएफची अंतिम सेटलमेंट करू इच्छिता, तेव्हा तुम्हाला तुमच्या पीएफसह पेन्शनची रक्कम मिळते. अंतिम सेटलमेंटसाठी, तुम्हाला फॉर्म 19 आणि फॉर्म 10C भरावा लागेल. यासह, आयकरसाठी फॉर्म 15G देखील भरायचा आहे.

जर तुम्ही 10 वर्षे पेक्षा जास्त सेवा करत असाल तर तुम्हाला दरमहा पेन्शन रकमेच्या बदल्यात पेन्शन मिळते. तुम्ही 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर ही पेन्शन सुरू केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म भरावा लागेल.


पेन्शन कधीपर्यन्त मिळते ?

जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला दरमहा पेन्शन मिळत राहील. जर कोणी पेन्शन सुरू झाल्यानंतर मरण पावले आणि त्याची पत्नी हयात असेल तर त्याच्या पत्नीला ही पेन्शन रक्कम आयुष्यभर मिळत राहील. जर कुणाची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तो सेवेदरम्यान मरण पावला आणि त्याची मुले लहान असतील (25 वर्षापेक्षा लहान), तर त्याची पत्नी विम्याची रक्कम तसेच आजीवन पेन्शन मिळवू शकते, त्यासोबतच मुले 25 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या नावाचीसुद्धा पेन्शन एकत्रच मिळते.

लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाचे नामांकन पीएफ खात्यात जोडण्यास विसरू नका. जर नामांकन नसेल, तर कुटुंबाला पैसे मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

EPFO ही एक सार्वजनिक हित संस्था आहे, प्रत्येक व्यक्तीने आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक महिन्याला त्याच्या पीएफची रक्कम जमा करावी.


फक्त सरकारी नोकरी वाल्यांनाच पेंशन मिळते का ?

नाही, प्रत्येक व्यक्ती जो कुठेही काम करतो आणि त्याचा पीएफ जमा होतो, त्या व्यक्तीला EPFO ​​चे सर्व फायदे मिळतात. म्हणूनच तुम्ही कोणत्याही कंपनीत काम करत असलात तरी तुम्हाला निवृत्तीनंतरही पेन्शन मिळत राहील.


PF खात्यात जन्म तारीख चुकीची झाली, काय करू ?

यासाठी तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा जसे की जन्माचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र (टीसी), पॅन कार्ड, यापैकी एक पुरावा जोडून दुरुस्तीसाठी ऑफलाइन फॉर्म भरून ईपीएफओ कार्यालयात पाठवावा लागेल.

हा फॉर्म आपल्या कंपनीने स्वाक्षरी केलेला आणि शिक्का मारलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे काम सोडल्यानंतर, जन्मतारीख बदलणे एक कठीण काम आहे.

म्हणूनच, जर तुम्ही आता सेवेत असाल, तर कृपया तुमच्या पीएफ खात्यात योग्य नाव, जन्मतारीख टाकण्यात आली आहे की नाही ते तपासा. जर ते चुकीचे असेल तर त्वरित दुरुस्त करा.


PF नाव चुकले, काय करू ?

जर तुमच्या नावाचे कोणतेही स्पेलिंग चुकीचे असेल किंवा तुमच्या वडिलांचे किंवा तुमचे नाव चुकीचे असेल तर तुम्ही ते केवायसीद्वारे सहज दुरुस्त करू शकता.

जर पूर्ण नाव म्हणजे तुमचे, वडिलांचे, आडनाव हे तिन्ही चुकीचे असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकत नाही.

जर तुम्ही ती व्यक्ती तुम्ही आहात हे सिद्ध करू शकत असाल, तरच तुम्ही तुमच्या EPFO ​​कार्यालयात ऑफलाइन अर्ज करून नाव दुरुस्त करू शकता.

जुन्या कंपनीचा PF नव्या कंपनीत कसा ट्रान्सफर करायचा ?

जर तुमच्या दोन्ही कंपनीचा यूएएन क्रमांक समान असेल तर तुम्ही यूएएन द्वारे सहज लॉग इन करू शकता आणि ट्रान्सफरसाठी ऑनलाइन विनंती करू शकता.

या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असतील तर कृपया कमेन्ट नोंदवून कळवा.