Jawahar Diaries - Part 3 books and stories free download online pdf in Marathi

जव्हार डायरिज - पार्ट ३

रात्री गाढ झोप लागल्यामुळे सकाळी उठल्यावर छान फ्रेश वाटत होतं.. आज दोन तीनच पर्यटन स्थळे बघायची असल्यामुळे आम्ही आरामात आवराआवर केली.. नाश्त्याची वेळ झाल्यामुळे आधी नाश्ता करून घेतला.. नाष्ट्यामध्ये ब्रेड ऑमलेट, भुर्जी , पोहा असे दोन तीन प्रकार होते.. आम्ही पोटभर नाश्ता करून पॅकिंग करायला घेतले.. आता चेक आऊट करून , दोन तीन पॉइंट बघून मग परत मुंबई असा आमचा प्लॅन होता.. प्रकृति ॲग्रो फार्म पॅकेजमध्ये राहणे, दोन वेळचे जेवण, नाष्टा आणि संध्याकाळचा हाय टी याचा समावेश होता.. तुम्ही एकस्ट्रा काही मागवले तर आपल्याला त्याचे बिल द्यावे लागते. तुमचा ड्रायव्हर असेल तर त्याचे पण एकस्ट्रा पैसे मोजावे लागतात..
आम्ही आवराआवर करून चेक आऊट केले.. रुपेश आणि उज्ज्वलचे मनापासून आभार मानले .. खूप चांगली सर्व्हिस दिली दोन्ही भावांनी..
आज आम्हाला जव्हार पॅलेस आणि हनुमान पॉइंट ही दोन ठिकाणे पाहायची होती.. गाडी आम्ही जव्हार शहराकडे वळवली.. प्रकृति ॲग्रो फार्म पासून हनुमान पॉइंट साधारण पाच कि. मी. वर आहे.. या ठिकाणी अगदी वर पर्यंत गाडी जाते.. टेकडीच्या माथ्यावर विस्तृत असे पठार आहे.. आणि त्या पठारावर हनुमानाचे मंदिर आहे.. याला काट्या हनुमान असे स्थानिक लोक म्हणतात.. आम्ही हनुमानाचे दर्शन घेवून आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो.. हे ठिकाण उंचावर असल्यामुळे खालच्या दरीचा सुंदर नजारा ईथुन दिसतो.. उजव्या हाताला जव्हार पॅलेस दिसतो.. सगळीकडे हिरवळ असल्यामुळे फोटो शूट करण्यासाठी परफेक्ट ठिकाण होते..
आता आम्हाला जव्हार पॅलेस कडे जायची ओढ लागली होती कारण हनुमान पॉइंट वरून तो एवढा छान दिसत होता तर जवळून किती सुंदर असेल!
जव्हार पॅलेस जाण्यासाठी आपल्याला आलो त्याच रस्त्याने दोन तीन की. मी.पाठी यावे लागते.. गाडी पॅलेस पर्यंत जात नाही.. बाहेरच रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून आम्ही पॅलेसकडे कच्या रस्त्यावरून चालत चालत निघालो.. मध्ये मध्ये बऱ्याच पायवाटा डावीकडे आणि उजवी कडे जातात..पण पॅलेस कडे जाण्यासाठी सरळच चालत राहायचे.. पंधरा ते वीस मिनिटांची पायपीट केल्यावर पॅलेस आम्हाला दिसायला लागला.. त्याची भव्यता लांबूनच आपल्या नजरेत भरते.. हा पॅलेस राजा यशवंतराव मुकणे यांनी १९४० मध्ये राजपरिवाराच्या राहण्यासाठी बांधला होता.. हा राजवाडा भारतीय आणि पाश्चिमात्य स्थापत्याचा उत्तम नमुना आहे.. आम्ही गेलो तेंव्हा त्याची डागडुजी चालू होती त्यामुळे राजवाडा आतून बघण्याचे भाग्य आम्हाला मिळाले नाही.. राजवाडा चारही बाजूंनी फिरून बाहेरून बघता येतो.. राजवाड्याच्या आजूबाजूला घनदाट झाडी आहे.. ईथे तुम्ही राजवाड्याचा पॅनोरोमिक व्ह्यू मध्ये छान फोटो काढू शकता.. मला फोटोग्राफीच जास्त कळत नाही.पण आमच्या आर्याने राजवाड्याचा पॅनोरोमिक व्ह्यू खूप सुंदर काढला..
आता आमची मुंबई ला परत जायची वेळ झाली.. जव्हार मधलं जेवढं बघून घेता येईल तेवढं शांतपणे बघितलं.. आम्हाला दाभोसा धबधबा जाता आलं नाही कारण कोरोना मुळे गावकऱ्यांनी पर्यटकांना तिथे प्रवेश बंद केला होता..
चलो.. आता घरी जायची वेळ झाली होती.. आम्ही काल जयसागर डॅम बघायला गेलो होतो तेंव्हा तिथे एकांनी सांगितले की मुंबई ला जाताना चारोटी मार्गे जा आणि जाताना धामणी डॅम बघून जा.. आमच्या कडे अजून बराच वेळ शिल्लक होता आणि येताना आम्ही विक्रमगड मार्गे आलो होतो तर जाताना चारोटी मार्गे जाऊया म्हणजे हा पण रस्ता बघून होईल असा विचार मनात आला.. आता मी गाडी धामणी डॅमच्या दिशेला वळवली.. रस्ता शांत , निर्मनुष्य आणि निसर्गाने नटलेला होता..मी निसर्गाचा आस्वाद घेत , गाणी ऐकत ऐकत गाडी चालवत होते.. जव्हार ला येण्याचे दोन्ही मार्ग सुंदर आहेत.. एकूण काय, संपूर्ण जव्हारच सुंदर आहे.. ईथे अजून शहरीकरण झाले नसल्यामुळे जंगले,झाडे तिथलं वनवैभव अजून टिकून आहे..
तासभर गाडी चालवल्या वर आम्ही धामणी डॅम जवळ आलो.. ईथे परत तोच प्रॉब्लेम आला.. कोरोना मुळे डॅम च्या अगदी जवळ जायचा गेट बंद होता.. तिथे असणाऱ्या पहारेदाराला विनंती केली पण त्याने काही आत सोडलं नाही,, हा, पण त्याने एक सल्ला दिला की " थोडे पुढे जा , तिथे एक पूल आहे त्यावरून तुम्हाला डॅम चा फ्रंट व्ह्यू दिसेल" अश्या प्रकारे ,त्या पुलावरून, लांबूनच धामणी डॅम बघून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवली.. हा डॅम खुपचं मोठा आहे.. काल बघितलेले दोन डॅम त्या मानाने खूपच छोटे होते..
डॅम बघून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो.. चारोटी मार्गे मुंबईला परतत असल्यामुळे अहमदाबाद हाय वे वर गाडी चालवताना मला मजा येत होती..
बाकी काही नाही पण या ट्रीप मुळे मला ड्रायव्हिंगचा कॉन्फिडन्स आला..