ALIBI - 3 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ॲ लि बी. ( प्रकरण ३ )

Featured Books
  • Wheshat he Wheshat - 2

         وحشت ہی وحشت قسط نمبر (2)   تایا ابو جو کبھی اس کے لیے...

  • Wheshat he Wheshat - 1

    Wheshat he Wheshat - Ek Inteqami Safar
    ترکی کی ٹھٹھورتی ہوئی...

  • مرد بننے کا تاوان

    ناول: بے گناہ مجرمباب اول: ایک ادھورا وجودفیصل ایک ایسے گھر...

  • مرد بننے کا تاوان

    ناول: بے گناہ مجرمباب اول: ایک ادھورا وجودرضوان ایک ایسے گھر...

  • صبح سویرے

    رجحان ہم ہمت کے ساتھ زندگی کا سفر طے کر رہے ہیں۔ کندھے سے کن...

Categories
Share

ॲ लि बी. ( प्रकरण ३ )

ॲलिबी
प्रकरण ३

आपल्या कॉटवर पाणिनीआडवा पडून वाचत होता.कंटाळून दिवे बंद करण्याच्या विचारात होता तेव्हाच फोन वाजला, कपाळाला आठ्या पडून त्याने तो उचलला, तर सौम्या चा आवाज आला.

“ हॅलो सर, संध्याकाळच्या पेपर चं काय?

“ काय त्याच्या बद्दल?” -पाणिनी” म्हणजे तुम्ही वाचला का तो?” -सौम्या

“ नुसतीच नजर टाकली त्यावरून.काय विशेष?” –पाणिनी

“अमर हुबळीकर हॉस्पिटल ची हिशोब पुस्तके तपासण्यासाठी ऑडीटर ची नेमणूक केली गेली आहे.हुबळीकर कुटुंबातील एकाने हॉस्पिटल च्या संचालकांवर गैर कारभाराचा आरोप केलाय.देणगी पोटी मिळालेले निधी एका ट्रस्ट मध्ये आणले जातात आणि त्याचे ट्रस्टी आहेत,अजित टोपे.राजेंद्र पळशीकर आणि प्रकाश पसरणीकर.” सौम्या ने उत्तर दिले.

पाणिनी थोडा वेळ विचारात गुंतला.” जेव्हा पळशीकर म्हणाला की उद्याच्या पेपरात मला त्याच्या विषयी कळेल तेव्ह्या त्याला काय म्हणायचं होत त्याचा अंदाज मला आता आला “

“ मी झोपायच्या तयारीत होते, पेपरातली ही बातमी बाजूला काढून उद्या तुम्हाला दाखवायला ठेवली होती पण अत्ता मी जो फोन केलाय तो त्या साठी नाही, रेडिओ वरील बातम्यात मी ऐकले की पोलिसांना रिकाम्या जागेत एक गाडी सापडली त्याच्या सीट कव्हर ला रक्ताचे डाग लागले होते,गियर च्या जवळ तळाला एका माणसाचा रक्ताळलेला कोट खुपसलेला आढळला. या कोटाच्या डाव्या बाजूला बंदुकीच्या ओळीच्या आकाराचे भोक पडलेले होते, आणि ती गाडी अजित टोपे च्या नावाने आहे ! कोटाच्या उजव्या खिशात हातरुमालावर अजित टोपे चे नाव होते आणि त्यावर लिपस्टिक चे डाग होते. पुढची तपासणी अस दाखवते की टोपे दुपार नंतर कोणालाच दिसलेला नाही.त्याच्या सेक्रेटरी ने सांगितलं की कुठे जातो हे न सांगता तो बाहेर गेला.”

पाणिनीने ती माहिती पचवली.” आता खरच काहीतरी घडायला लागलय ! “ -पाणिनी

“ तुम्हाला ओजस शी बोलायचं असेल ना? जोडून देऊ का?” -सौम्या .

“ नको, मी स्वतः चं लावीन त्याला नंतर.” -पाणिनी

“ रहस्य गडद झालं ! “ सौम्या उद्गारली.

“ रहस्य गोठल अस म्हण सौम्या. विरजण लावल्यावर जसे घट्ट दही बनते तसे. आपल्याला लौकरच त्या टेंबे बाई कडून काहीतरी ऐकायला मिळेल, त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.” -पाणिनी

“ मला तर लफडी वाढतील असं वाटतय” -सौम्या .

“ मी वेगळ्या पद्धतीने विचार करतोय,” पाणिनीम्हणाला.” त्या हॉस्पिटलवर जो गैर व्यवहाराचा आरोप झालायत्याचा परिणाम म्हणून टोपे ट्रस्टी किंवा पदावर असलेल्या सगळ्याच संस्थेचे ऑडीट करायला कोर्ट आदेश देईल.त्यात आपला बाब्रस ट्रस्ट सुद्धा येईलच, त्याचा आपल्याला फायदा होईल.टोपे हे सहज सहजी होऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला त्याच्या जागी दुसरा ट्रस्टी घुसवणे,आणि ट्रस्ट च्या प्रशासाकाकडून हिशोब पुस्तके अद्ययावत करून घेणे सहज शक्य होईल.”

“ मला काळजी वाटत्ये ती त्या लिपस्टिक च्या डागाची ! ती लिप्स्टिक जिची असेल, तिच्या कडे त्या नोटेचा उरलेला तुकडा नसेल ना याची सारखी शंका येत्ये मला. “ एका चेटकिणीचा मी पाठलाग करतोय , आणि हातात नोटेचा तुकडा धरून मला खिजवणाऱ्यासुंदर स्त्री मध्ये तिचे रुपांतर झालंय– असे स्वप्न मला पडतंय सध्या ! पाणिनीम्हणाला.

“त्यापेक्षा तरुण मुलीचे चेटकिणीत रुपांतर झाले असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. ! सौम्या गमतीने म्हणाली.” तुम्हाला आणखी काही मदत लागणारे का?”

“ नाही , गुड नाईट सौम्या “ -पाणिनी.

त्याने तो फोन ठेवला आणि लगेच ओजस च्या ऑफिस चा नंबर फिरवला.

“ मी पाणिनी पटवर्धन बोलतोय, ओजस शी लगेच संपर्क करता येईल का? तातडीचे आणि महत्वाचे काम आहे.त्याला निरोप द्या की मला घराच्या नंबर वर लगेच फोन कर.”

“ठीक आहे ,पटवर्धन, पुढील पंधरा मिनिटात तुमच्याशी तो बोलेल अशी मी व्यवस्था करतो.” त्याचा रात्रपाळीचा फोन ऑपरेटर म्हणाला.

पाणिनी अंथरुणातून उठला, पायात स्लीपर घातली, एक सिगारेट शिलगावली, आणि मन एकाग्र करून उभा राहिला.पायात अंतर ठेऊन तो उभा होता, डोळे जमिनीवरील कार्पेट वर खिळले होते.मधूनच सिगारेट चे झुरके मारत होता.तेव्हढ्यात फोन घणघणला, पलीकडून कनक बोलत होता.” पाणिनीतुला रात्री फोन करावा की उद्या सांगाव याचाच मी विचार करत होतो, मला त्या टोपे बद्दल काही माहिती मिळाली आहे.”

“ काय आहे ती?” –पाणिनी

“ थोडी इकडची तिकडची ,थोडी चर्चेतील आणि काही अनुमान काढण्याजोगी.”

“थोडक्यात गोषवारा सांग.” -पाणिनी

“ टोपे ची दोन लग्न झाली.पाहिले ,मीरा बाब्रस शी.आधीची मुलगी असलेली विधवा.त्यांनी चार पाच वर्षे संसार केला.नंतर ती गेली, त्याने हर्षिता नावाच्या एका नटी बरोबर लग्न केले.ती साधारण अठ्ठावीस च्या आसपासची होती.साधारण सहा महिने ते एकत्र राहिल्यावर तिने त्याला सोडले.त्याने तिच्यावर व्यभिचाराचे आरोप केले आणि तिने त्याच्यावर क्रूर पणाचे आरोप करून घटस्फोट मागितला. एक दिवस अचानक तो खटला संपलाच. अफवा अशी होती ही त्याच्या वकिलांनी तिच्या वकीलांना तिच्या बद्दल असं काही रहस्य सांगितलं की जे लोकांसमोर येणे तिला परवडण्यासारखे नव्हते, त्यामुळे माघार घेऊन तिने चांगली मुलगी व्हायचं ठरवलं.ती परत निघून जाणार नाही आणि तो घटस्फोट देणार नाही असा समझोता झाला.” ओजस क्षणभर थांबून पुन्हा सांगू लागला.

“ टोपे ब्रोकरेज चा धंदा करतो,एका बँकेच्या संचालक पदावर आहे, हुबळीकर हॉस्पिटल च्या ट्रस्टी पैकी एक आहे .पण आदिती हुबळीकर, ला तो अजिबात आवडत नाही. आदिती ही हुबळीकर कुटुंबातील नात आहे, गरीब आहे पण स्वाभिमानी आहे, हॉस्पिटल आणि कुटुंबा बद्दल तिला अभिमान आहे. ती कुठेतरी सेक्रेटरी म्हणून नोकरी करते.पण हुबळीकर कुटुंबातील स्त्री म्हणून तिला सामाजिक स्थान आहे, आठवडाभर काम करून सुट्टीत श्रीमंत मित्रांबरोबर बोटीवर घालवते.तिचे मित्र तिला मोठया पगाराची नोकरी देऊ शकतात पण ती इच्छुक नाहीये.” –ओजस

पाणिनीने नंतर त्याला सौम्या ने फोन वरून सांगितलेली गाडीत सापडलेल्या टोपे च्या कोटाची ,त्याला पडलेल्या बंदुकीच्या गोळीच्या भोकाची हकीगत सांगितली.

“ मी त्या गाडीच्या तपासातील पुढील प्रगती बद्दल काही माहिती काढू का?” –ओजस

“अगदी तसच नाही नेमकं पण पोलिसांच्या मागे राहून काही समजतंय का बघ आणि मला अद्ययावत ठेव.” -पाणिनी

“ फोन करून सांगू पुन्हा?”- ओजस

“ नको, मला झोपायचं आहे आता, सौम्या ने मला आधीच जागरण करायला लावलय फोन करून ! “ -पाणिनी

“ अरे हो, तुला सांगायचं म्हणजे, तू ज्या माणसावर नजर ठेवायला सांगितलं होतंस तो माणूस टोपे बरोबर त्या हॉस्पिटल च्या संस्थेवर संचालक म्हणून आहे, तुला माहित्ये ना?”-ओजस

“ हो आहे कल्पना.” -पाणिनी

“ त्यातून काही निष्पन्न होणारे?”-ओजस

“ मला नाही वाटत. या सगळ्यात मी कुठे बसतो हे मला अजून लक्षात येत नाहीये.फार खर्च न करता जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळव. आणि हो अजून एका गोष्टीत मला रस आहे, तो राजेंद्र पळशीकर. त्याला कळता काम नाही की मी काही तपास करतोय त्याच्या बद्दल.त्याचं कोणाशी काय चाललंय मला हवंय.आज दुपारी मी त्याला फोन करायचा प्रयत्न केला. तो नव्हता, त्याची सेक्रेटरी म्हणाली की तो कधी परत येईल काही सांगता येत नाही. ती फारच मोघम बोलत होती.“ -पाणिनी

“ त्याचं लग्न झालंय?” ओजस ने विचारले.

“ माहीत नाही पण झालं असेल तर माझी खात्री आहे की त्याची बायको ही चार चौघात उठून दिसणारी नसावी.” -पाणिनी

“त्याचं जर लग्न झालेलं असेल आणि त्याची काही लफडी असतील तर तो ती गुलदस्त्यातच ठेवत असे. अशा स्थितीत मला पुढचे दोन दिवस तरी लागतील माहिती काढायला.”-ओजस

“ मला उद्या दुपारी दोन वाजे पर्यंत ती हव्ये कनक.” -पाणिनी

“ठीक आहे बघतो मी”- कनक ओजस म्हणाला.

पाणिनीने फोन ठेवला, आणि झोप येई पर्यंत पुस्तक वाचायला घेतलं,पण त्यातही मन रमेना तेव्हा खिडकी जवळ उभा राहून सिगारेट पेटवली. पुन्हा लाईट घालून आडवा झाला. तासाभराने केव्हा तरी त्याला झोप लागली.दुसऱ्या दिवशी दहा ला तो ऑफिसात पोचला तेव्हा एखादा दगड उतारावरून घरंगळत यावा त्या प्रमाणे एका पाठोपाठ एक अनेक घटना घडायला सुरुवात झाली होती.हुबळीकर हॉस्पिटल च्या ट्रस्ट च्या फंडात नेमकी कशामुळे तूट आली हे ऑडीटर नी शोधून काढले होते.ते गोंधळून गेले होते कारण चेक च्या काउंटर फाईल,लेजर्स गायब झाले होते. जी काही हिशोब पत्रके सापडली त्यावरून सुमारे दोन लाख रक्कम ट्रस्ट मधून बाहेर काढली गेली होती.आणि त्याचा हिशोब लागत नव्हता. रक्कम काढायचे व्यवहार टोपे आणि अन्य दोन ट्रस्टीं पैकी एक अशा सहीने होत असत, त्यापैकी पळशीकर हा शहरा बाहेर गेल्याचं बोलले जात होते, तो कुठे भेटेल हे त्याच्या ऑफिस मधले लोकही सांगू शकत नव्हते.टोपे हा तर रहस्यमय रित्या गायब झाला होता.त्या गाडीत सापडलेल्या काही गोष्टींचे आधारे पोलीस त्याला शोधायचा प्रयत्न करत होते पण ते व्यर्थ गेले होते.

तिसरा ट्रस्टी, प्रकाश पसरणीकर याने हा प्रकार कळल्या पासून स्वतःचे काही सहकारी ऑडीटर च्या मदतीला दिले होते.त्याने सांगितले की टोपे ने वेळोवेळी त्याला चेक्स वर सह्या करण्यासाठी बोलावले होते.टोपे आणि पळशीकर हेच नेहेमी चेक वर सह्या करायचे.छोट्या छोट्या रकमेच्या चेक्स वर सह्या करणे हा दैनंदिन व्यवहाराचा एक भाग होता आणि टोपे ची सही असताना फार काही बघायची गरज नसायची.मोठया रकमेचे चेक्स चे बाबत मात्र सविस्तर छाननी केली विशेषतः टोपे च्या बरोबरीने जेथे प्रकाश च्या सह्या असायच्या त्या बाबतीत जायची कारण ते चेक्स हे ट्रस्ट च्या विविध गुंतवणुकीसाठी दिलेले असायचे.ट्रस्ट च्या फंडाचे हिशोब टोपे च ठेवायचा , त्याचा अहवाल तो वेळोवेळी सादर करायचा.

आदिती हुबळीकर ने टोपे वर गुन्ह्र्गारी स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता,प्रकाश ला भोळसट आणि अकार्यक्षम माणूस म्हटले तर पळशीकर ला प्रामाणिक आणि सरळसोट असल्याचे मत दिले होते.ट्रस्ट च्या हिताचे नसलेले कोणतेही चेक्स पळशीकर समोर सही करता ठेवण्याचे साहस टोपे ने केले नसते असे तिचे म्हणणे होते.

“ तर मग सौम्या, पळशीकर ला हेच पेपर ला येईल आणि मी ते वाचावे असे सुचवायचे होते पण त्याच्या अपेक्षेपेक्षा ते चौवीस तास उशिरा आले.” -पाणिनी.

“ सर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की,.टोपे गायब आहे,पोलिसांना चकवा देण्यासाठी तो रक्त लागलेला कोट गाडीत ठेवलेला असू शकतो, पळशीकर पण संपर्कात नाही, प्रकाश मात्र सहकार्य करतोय पण, तरीही आदिती हुबळीकर ही पळशीकर च्या बाजूने ठाम आहे.” -सौम्या .

“ वा वा सौम्या, याचा अर्थ तुला असं म्हणायचं आहे का की पळशीकर मार्फत अंदर की बात काय आहे याची माहिती आदिती ला मिळाली होती?” –पाणिनी

“ मला म्हणायचंय की आदिती कडे त्या नोटेचा तुकडा नसेल कशावरून?’ -सौम्या ने अंदाज व्यक्त केला आणि पाणिनीस्वतः मधे न बोलता तिला मुभा देतोय हे लक्षात येताच ती पुढे म्हणाली,

“ एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला जेवढे ओळखते त्या वरून मी सांगते की ती आदिती , पळशीकर च्या प्रेमात असावी तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास लोकांसमोर येण्यासाठी तिने असे वक्तव्य केले आहे.काय होईल लक्षात घ्या की एक ट्रस्टी,पळशीकर हा हुबळीकर कुटुंबातीलच कोण्या एका आदिती बरोबर चोरून प्रेम करतोय ! “ -सौम्या .

“ पण चोरून कशाला करेल तो? सरळ पुढे जाऊन . तो तिच्याशी लग्न करू शकतो की ! म्हणजे त्याचे आधीच लग्न झाले नसेल तर”- पाणिनी

“ त्याचे कारण अजून तरी आपल्या समोर आले नाही. पण मला सारख वाटतंय की आदिती कडे त्या नोटेचा तुकडा असावा “ – सौम्या

तेवढ्यात ओजस ने त्याच्या विशिष्ट पद्धतीने दारावर केलेली टकटक ऐकू आली.

“ कनक आलाय सौम्या, आत येऊ दे त्याला सौम्या, “ पाणिनीम्हणाला. “ जसजसा मी विचार करत जातोय तसतसा मला तू म्हणत्येस ते पटायला लागलंय. याचा दुसरा अर्थ असा की बाब्रस चे प्रकरण घ्यायला पळशीकर ची संमती असेल.पण त्या टेंबे बाई बद्दल माझ्या मनात काही कल्पना आहे. – पाणिनी

“ काय आहे ?” – सौम्या.

“ मी नंतर सांगतो.” –पाणिनी

“ टोपे च्या प्रेम प्रकरणाबद्दल तुला काही माहिती घ्यायला आवडेल पाणिनी?” आत येत येताच थेट मुद्द्याला हात घालत ओजस ने विचारले.

“ काहीतरी हाती लागलंय?” –पाणिनी

“ टोपे जर गायब असेल तर त्याला सर्वात शेवटी भेटलेल्या माणसाकडे मी बोट दाखवीन.” –ओजस

“काय समजलंय तुला?” –पाणिनी

“टोपे ने त्याच्या एका जवळच्या मित्राला तीन दिवसापूर्वी सांगितले होते की तो त्याच्या बायकोला सापळ्यात अडकवणार आहे. तो तिला टेकडी च्या उतारा वरील बंगल्यात नेणार आहे आणि तेथे गेल्यावर ती त्याला बळजबरीने बाहेर काढेल अशी वेळ तिच्यावर आणणार आहे.त्यात काहीतरी कायदेशीर मुद्दा आहे आणि तो त्याचा फायदा घेणार आहे.त्याची बायको काहीतरी निमित्तच शोधत्ये घरातून बाहेर पडायला “ –ओजस

“ सौम्या त्या गेयता बाब्रस ला फोन वर घे.मी यात नेमका कुठे आहे कळू दे मला.” –पाणिनी

“ तिचा काय संबंध याच्यात?” –ओजस

“ ती एक मोठी कहाणीच आहे.ती टोपे च्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. प्रत्यक्षात ती नाहीये. दत्तक विधानाचा त्यात मुद्दा आहे.आणखी नवीन काय ओजस ?” –पाणिनी

“ पळशीकर च्या मैत्रिणी बद्दल मला अजून काही माहिती काढता नाही आली.” –ओजस

“ त्याचं लग्न झालंय ?

“नाही, अविवाहित आहे, मुरलेला व्यावसायिक आहे,साधा सरळसोट आहे, विरक्त आहे,त्याचे मित्र म्हणतात,तो थंड,शांत,आणि तर्कास अनुसरून वागणारा आहे. तुला वाटतंय पाणिनी की ‘ दिल की धडकन’ चा मामला असावा?” –ओजस

सौम्या आत येत म्हणाली, “ गेयता बाब्रस फोन वर आहे, फोन उचला सर.”

“ हॅलो पटवर्धन, “ एक गोड आवाज कानात आला.आवाजात एक श्रीमंती पणा जाणवत होता. “ टेंबे बाई नी मला सांगितले की आज दुपारी दोन वाजता तुमच्या बरोबर भेट ठरली आहे.”

“ होय. दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्यात, तुम्ही पेपर वाचलाच असेल.”

“ हो, काय अर्थ आहे या सर्वाचा?”

“ सध्या माझ्याकडे पेपरात आलेल्या बातमी खेरीज वेगळी माहिती नाहीये पण मी शोधायला बाहेर पडणार आहे.त्या टेंबे बाई काय करताहेत तुझ्या वतीने ते तुला माहीत असेल, तुझी त्याला संमती आहे?”

‘ हो अर्थातच आहे ,पटवर्धन.”

“ मी घ्यायचे ना तुझे वकील पत्र ? “

“ नक्कीच, टेंबे बाई माझ्या वतीनेच हे पाहत आहेत.”

“तुला पळशीकर माहीत आहे?’

ती जरा अडखळली, “ तो टेंबे बाईंचा मित्र आहे. त्यानेच त्यांना तुमच्याकडे पाठवले.”

“ त्यामुळे ,मी आता अस समजतो की तुला टोपे पण माहिती असावा.”

“हो अर्थात माहित्ये.”

“तुमचं एकमेकांशी कसं आहे?”

“ आमचे मैत्रीचेच संबंध होते.मी जरा त्या विषयात माहिती घ्यायला सुरुवात करे पर्यंत मला त्याचा कधीच संशय नाही आला.पण मी काही चौकशी करत्ये म्हटल्यावर तो एकदम सटकला च माझ्यावर.तो म्हणाला ती टेंबे बाई माझ्या मनात विष कळवते आहे.प्रत्यक्षात तसे काही नाहीये हे मला माहीत आहे.माझा त्या बाईंवर शंभर टक्के विश्वास आहे.मी तुम्हाला सांगणार नाही ,पटवर्धन, पण माझ्या सर्व गोष्टी हाताळण्याचा तिला अधिकार आहे.” –गेयता

“ आभारी आहे तुझा,” पाणिनीम्हणाला.” हेच सर्व मला माहीत करून घ्यायचं होत. ता मग दुपारी दोन ला भेटू आपण.” एवढे बोलून पाणिनीने फोन ठेऊन दिला.

“सौम्या , मला त्या वर्तमान वाल्यांना फोन लाऊन दे ,आपल्या जाहिरातीला काही उत्तर आलंय का विचारून बघूया” –पाणिनी

सौम्या ने फोन लावून पाणिनीला जोडून दिला. “ पाणिनीपटवर्धन बोलतोय. मी एक जाहिरात दिली होती छोट्या जाहिराती मधे, त्याला उत्तर आलंय का मला बघायचं होत.”

“ जरा थांबा , मी त्या विभागाकडे चौकशी करतो.” पलीकडून उत्तर आलं. नंतर फोन मधून पावलांचे आवाज आले ,कोणी तरी कोणाला काहीतरी विचारल्या सारखे आवाज आले, पण शब्द कळत नव्हते..थोड्याच वेळात पलीकडून बोलणारा म्हणाला, “ हो, आलंय साधारण तासापूर्वी एक तरुणी पाकीट ठेऊन गेली , त्यात लिहिलंय, म यांचे साठी, ‘ ठीक आहे जा पुढे “

“ उद्या आम्ही ही जाहिरात छापणार आहोतच त्यामुळे तुमच्या पासून हे गोपनीय ठेवण्य सारखे काही नव्हतंच.”

“ खूप खूप आभार” पाणिनी त्याला म्हणाला.आणि फोन ठेवला.” चला आता कनक ओजस महाशय, कामाला लागा. त्या टोपे ने त्याच्या बायकोला जिथे ठेवलंय, त्या टेकडी वरच्या बंगल्यात, तिथे आपल्याला जायचय”

( प्रकरण ३ समाप्त.)