Kaal Ratra Hota Hota - 1 books and stories free download online pdf in Marathi

काळ रात्र होता होता... - 1

काळरात्र होता होता...

१.

पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. धोधो पाऊस पडून गेला होता, तरीही पावसाची बारीक संततधार सुरूच होती.

आज रोजच्या पेक्षा थोडं लवकरच काम उरकले होते. निदान आज तरी घरी लवकर पोहोचू या खूशीत अॉफिसमधून बाहेर पडलो, पण रस्त्यावर वाहनांची हू म्हणून गर्दी दाटलेली. रात्रीचं लुकलुकणाऱ्या काजव्यांचे मोहोळ नजरेसमोर घोंघावत रहावं, तसं वाहनांच्या लाईटच्या उजेडात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारीक तुषार चमकून डोळे दिपवून टाकत होते.

घरी लवकर पोहोचण्याच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले होतेच, पण वाहनांच्या दाट गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत राहणे तेवढेच आपल्या हातात होते.

दिवसभर कमी अधिक पाऊस पडतच होता, त्यामुळे हवेत कमालीचा गारठा पसरलेला होता. अंगात अगदी कमी वेळात थंडी संचारली होती. गावाकडे लोक जसं 'शिवकळा येण्यासारखी थंडी आहे' असे म्हणतात, तशी बोचरी थंडी होती. अशा थंडीत दातांचं थडथडणं काही केल्या थांबत नव्हते.

त्या दिवशी रोज ठरलेल्या वेळेपेक्षा कित्ती तरी उशिराने घरी पोहोचलो. या जास्तीच्या वेळात घरापर्यंत पोहचण्यासाठी जी धडपड करावी लागली; ती केरात उलट्या पडलेल्या झुरळासारखी होती. जेवढी धडपड करावी तेवढी थोडीच.

जुन्या छपराच्या वळचणीतून पावसाचं पाणी थेंब थेंब ठिपकावे, तसं डोक्यात मुरून उरलेलं पाणी केसातून खाली ठिबकत होते. अखेर कपडे व मन कर्दमलेल्या अवस्थेतच मोठ्या कष्टाने घरापर्यंत येऊन पोहोचलो.

घराचा दरवाजा उघडला. आत गेलो. आतून दरवाजा बंद करून घेतला आणि 'पोहचलो बुवा एकदाचं' म्हणून एक मोऽठ्ठा सुस्कारा सोडला.

इतका वेळ पावसात भिजल्यामुळे नाक जवळजवळ बंदच होत आले होते. घशात खवखवायला लागलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा टॉवेलने भिजलेलं डोकं व तोंड कोरडे करून घेतले.

आता मात्र पावसात भिजलेल्या पाखरासारखी माझ्या मनाची अवस्था झाली होती, जो जो कोरडं व्हायची धडपड करावी, तसतशी अधिरता वाढत गेल्यासारखी.

पण इतकं अंतर अशा भेदरलेल्या मनःस्थितीत चालत येऊन कंटाळा आला होता. आहे त्या स्थितीतच खुर्चीवर बसून क्षणभर विश्रांती घ्यावी आणि मग चिखल पाण्यामुळे खराब झालेले कपडे बदलून निर्धास्त होवू, असे ठरवले.

खुर्चीवर आरामशीर बसून योगसाधनेत डोळे झाकतात, तसे क्षणभर डोळे मिटून घेतले. इतक्या वेळपर्यंत डोक्यात कालवाकालव करणारी दुनिया हळूहळू भुईसपाट होत होती.

इतक्यात, मोबाईलची रिंग वाजली आणि शांतता भंग पावली. फोन उचलायची देखील इच्छा नव्हती, तरीही डोळे मिटलेल्या अवस्थेतच फोन उचलून कानाला लावला.

"असशील तसा निघून ये.",

घाबरलेल्या सुरातल्या आवाजाने माझे निद्रा अवस्थेतले डोळे खाडकन उघडले. अक्षरशः काळजाचं पाणी पाणी झालं. हात पाय गळून पडले.

कोण आहे हा ?,
हा इतक्या तातडीने कुठे बोलवत आहे मला ?,
आणि याने मला का म्हणून फोन केला असावा ?,
काय घडलं असावं ?
अशा एक ना अनेक काळजीत पाडणाऱ्या प्रश्नांनी मला खडबडून जागे केले.

अचानक कानावर पडलेल्या अशा शब्दांमुळे तिकडून कोण बोलत आहे, काय झालंय, याची विचारपुस करण्याचंही भान मला उरले नाही. मी तसाच सुन्न अवस्थेतच असताना तिकडून पुन्हा आवाज कानावर पडला,

" मी गणेश! तुझा अॉफिस सहकारी. तू एकमेव असा माणूस आहे; जो माझ्या काळजाच्या अत्यंत जवळचा आहेस, म्हणून मी तुला फोन केलाय. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. ताबडतोब निघ."

मागे एकदा, गणेशने नवीन चार चाकी गाडीची खरेदी व नवीन घराचा 'गृहप्रवेश सोहळा' एकाच दिवशी करण्याचं आयोजन केले होते, त्या निमित्ताने त्याने आमच्या अॉफिस सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका दिली होती, पण मला तो ना भेटायला आला; ना निमंत्रण पत्रिका दिली.
कदाचित कामाच्या गडबडीत तो मला निरोप द्यायला विसरला असेल.

पण एक प्रश्न अनुत्तरितच राहतो, तो म्हणजे, ' गणेश मला इतका जवळचा मानतो, तर आपल्या जवळच्या माणसाला आपल्या आनंदाच्या क्षणांत सहभागी करून घ्यायची त्याला आठवण कशी होऊ नये ?! '

मला या 'सोहळ्याची' नंतर बातमी समजली होती, पण माझा स्वाभिमान म्हणा कि अहंकार; मी त्या सोहळ्यासाठी गेलो नाही. त्यामुळे त्यांचं घर कुठे आहे, हे खरंच मला माहीत नव्हते.

शिवाय तिकडे जायचं म्हणजे पुन्हा त्या पावसात नको असणाऱ्या चिखलाच्या किचकिचीतून जावं लागणार होतं. त्यासाठी माझं मन कधीच तयार होणार नव्हते.

" काय झालं, गणेश? ! , जरा सविस्तर सांगशील का?",
खूप वेळ पावसात भिजल्यामुळे माझ्या आवाजात थोडासा बदल झाला होता. घराबाहेर न पडता इथूनच काय करता येईल का, हे जाणून घेण्यासाठी 'काय झालं असेल' याची चाचपणी करीत मी थोडं धीराने बोललो.

"इथं सगळं न सांगण्यासारखं घडत आहे, पण आता डोक्यावरून पाणी चाललंय, त्यामुळे सांगावंच लागेल. आत्ताच माझं न् माझ्या बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय. म्हणे, 'मला सुख हवंय'... अरे, कोणतं सुख तिला कमी पडलंय?, घर आहे, गाडी आहे. वेळ जात नाही म्हणून मी नको म्हणत असतानाही ती नोकरी करत आहे. तिच्या मनाला वाटेल तसे ती वागत आहे. तरीही मी एका शब्दानेही तिला दुखावले नाही. तरीही!!!...",
तो खूपच घाईघाईने वैतागून बोलत होता.

"शांत हो गणेश, अरे हा तुमचा घरगुती वाद आहे. तो तुमचा तुम्हालाच सोडवला पाहिजे. त्यात मी किंवा बाहेरचा कोणी तिथे येऊन काय करू शकतो! त्यातल्या त्यात स्वतःच्या बायकोला नवराच जास्त समजू शकतो; समजूत घालू शकतो. बरोबर ना!", मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो.

" तुला तर माहितीये, दिवसभर अॉफिसमध्ये डोक्याला किती तान असतो. तरीही घरी आल्यानंतर तिने माझी सेवा करावी, असा कधीच आग्रह धरला नाही. तिला कसलीही फर्माईश केली नाही. मला जे हवं नको ते मी स्वतः करतो. तिला त्रास नको म्हणून तिच्या घरगुती कामातही कधी लुडबुड करत नाही. ती जे चार घास बनवून देईल; ते जसे असतील तसे मुकाट्याने कुरबुर न करता खातो. अलीकडे ती रोज वैतागते, खूप राग राग करते. तरीही ' तिला त्रास होत असेल, म्हणून ती आपल्यावर चिडत आहे, नाहीतर विनाकारण का म्हणून ती आपला राग राग करेल !' अशी स्वतःच्या मनाची समजूत काढून निमुटपणे सहन करीत राहतो. बघ ना, तरीही आत्ता..... हा कुठला न्याय!", त्याच्या पुढच्या शब्दांची जागा इतका वेळ कंठात अडवून ठेवलेल्या गहिवरण्याने घेतली.

अॉफिसमध्ये माझ्याशी अतिमहत्वाच्या कामाव्यतिरिक्त चुकुनही न बोलणारा गणेश! आज भडभडून बोलत होता. वर्षानुवर्षे छातीत कोंडून राहिलेला श्वास मोकळा करावा तसा.

क्रमशः