perjagadh - 29 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - २९

२९.सात बहिणींचे अगोदरचे वास्तव्य....

पेरजागडापासून काही अंतरावरच नवतळा नावाचे एक छोटेसे गाव होते.ज्यात माना जमातीचे एक कुटुंब वास्तव्य करत असे.मोलमजुरी करणे आणि पोट भरणे हेच त्यांचं उदरनिर्वाहाचे साधन होतं.मुलाच्या हव्यासापोटी एका पाठोपाठ एक अशा सात मुली त्यांना जन्मास आल्या.आधीच्या युगात असं होतं की वारसान जपायला मुलांचं महत्त्व तितकंच जपलं जायचं. ज्याचं बळी कित्येकदा मुलगी किंवा तिची आई व्हायची.त्यामुळे समाजात काय रूप दाखवणार? जेव्हा माझा वारस नसणार, ही चिंता त्याला सतावू लागली होती.

काबाडकष्ट करायला दोन हात असायचे.आणि खायला आठ तोंड.त्यामुळे अन्नाविषयी आणि कपड्याविषयी नेहमीच घरात रडारड चालायची.त्यामुळे कुणाला काय करावे? काहीच सुचत नव्हते.अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वादविवाद वाढायचे.बऱ्याच वेळा असं व्हायचं, की नुसतं पाणी पिऊन झोपावं लागायचं.बऱ्याचदा बहिणींना वाटायचं की हा जन्म म्हणजेच श्राप आहे. माऊलीकडे बघत त्या कशातरी दिवस कंठू लागल्या होत्या.

पूर्वीच्या काळात मजदुरीची किंमत म्हणजे खूपच कमी होती.आज आपण लहानग्याला भेट तरी पाच ते दहा रुपयांच्या वरचे पैसे देतो.त्यावेळेस एक रुपया ही आमदनी सबंध दिवसाचं कष्ट होतं.रोजी मिळाली तर ठीक नाहीतर उपासमारीची बरीच वेळ यायची.कित्येकवेळा उपासाचे खापर सातही बहिणींच्या कपाळावर फोडले जायचे.त्यांच्या ओझं असण्याच्या कित्येक प्रसंगांना त्या पोटात डांबून ठेवत आलेल्या होत्या.नेहमी सारखेच त्यांचे वडील मजदुरीसाठी बाहेर कामाला गेले.पण त्यादिवशी दिवसभर काबाडकष्ट करूनही त्यांना आमदनी मिळाली नाही.पोटाच्या भिकेला गडमडता जरासं पीठ बाकी मिळालं. तेव्हढ्यापुरती समाधान मानून थकलेला बाप घरी आला.

"आज कितीतरी दिवसांनी पिठाचे आयते खाणार या आशेने गपचूप मायला म्हणाला..."

"आज मजुरी काही मिळाली नाही.पण सांज पुरता पीठ मिळाला आहे.त्या सातही बहिणी झोपलेल्या आहेत.त्यांना कळू न देता,याचे खमंग आयते बनव.तोपर्यंत मी उद्याच्या कामासाठी गावात फेरफटका मारून येतो."

ठीक आहे,या...म्हणत माऊली कामाला लागली.फाटक्या लुगडयाच्या चींधीला गुंडाळून,तुटक्या चुलीवर तो छिद्रे असलेला तावा मांडला.सगळ्या हांडक्यांना पुन्हा पुन्हा पालथं घालून जे काही मिळालं ते सगळं मिळवून तिने ताव्यावर पहिला आयता टाकला.त्याचा चर्रर्र असा आवाज स्वयंपाकाच्या पडवीतून सातही बहिणी झोपलेल्या होत्या त्या खोलीत घुटमळला.

त्यासरशी एका बहिणीची झोपमोड झाली.तिने पडवीत नजर टाकली.सुगंध तिच्या नाकात दरवळू लागला.त्यासरशी ती उठून बसली.मधावर भिरभिरणाऱ्या त्या मधुमाशांसारखी ती पडवीत आली.डाव्या गुडघ्यावर हनुवटी ठेवून विस्तव सरकवताना माऊली तिला दिसली.त्यासरशी ती म्हणाली...

" आई काय करत आहेस?"

"आवाजाने माऊली दचकली,पण ती एकटीच आहे असं गृहीत धरून तिला म्हणाली..."

"आज बाबांना मजुरी मिळाली नाही.बदल्यात थोडंसं पीठ मिळालं आहे.त्याचेच आयते बनवतेय.त्यांना कामावर जावं लागते.तू हा आयता घे आणि गपचुप खाऊन घे.आणि कुणालाही न सांगता झोपून जा..."

"हो आई.. असं म्हणून ती बहीण तो आयता घेऊन ती इतर बहिणी झोपलेल्या होत्या तिथे गेली.नुकताच ताव्यावरून काढलेला आयता थोडा गरम होता.त्यामुळे फार वेळ ती हातात धरू शकत नव्हती.तो आयता कुठे ठेवावे तिला सुचले नाही, त्यामुळे तिने तो आयता दुसऱ्या बहिणीच्या पोटावर ठेवला."

"गरमागरम आयत्याच्या चटक्यासरशी ती दुसरी बहीण चटकन झोपेतून जागी झाली.त्या आयत्याला बघताच तिच्याही तोंडाला पाणी सुटले.ती पहीलीला म्हणाली कुठून आणलास हा आयता?"

"आई आतमध्ये बनवत आहे? पहिली बहीण म्हणाली."

" ऐकताक्षणीच दुसरी बहीण पडवीत गेली.नुकताच दुसरा आयता माऊलीने ताव्यावर ठेवला होता.ज्याच्या खमंग सुवासाने दुसरी बहीण स्वतःला आवरू शकली नाही.आणि जलदगतीने ती आत गेली."

"आई काय करत आहेस?"

"परत माऊली दुसऱ्या बहिणीकडे बघून दचकली.पण ती एकटीच आहे असं बघून ती परत म्हणाली,आज बाबांना मजुरी मिळाली नाही,बदल्यात थोडंसं पीठ मिळालं आहे.त्याचेच आयते बनवतेय.त्यांना कामावर जावं लागते.तू हा आयता घे आणि गपचुप खाऊन घे आणि परत कुणालाही न सांगता झोपून जा."

"हो आई... असं म्हणून तीही बहीण तो आयता घेऊन इतर बहिणी झोपलेल्या होत्या तिथे गेली.पहिल्या बहिणीला जसा आयता गरम असल्यामुळे चटका लागला होता.तसाच त्याही बहिणीला हाताला तो चटका लागला.त्यासरशी तिने तो आयता तिसऱ्या बहिणीच्या पोटावर ठेवला."

गरमागरम आयत्याच्या चतक्यासरशी तिसरी बहीण चटकन झोपेतून जागी झाली.त्या आयत्याला बघताच तिच्याही तोंडाला पाणी सुटले.तिने दुसऱ्या बहिणीला कुठून आणलेस म्हणून विचारले...अशा प्रकारे सातही बहिणींनी पडवीत जाऊन सात आयते आणून खाल्ले.माऊलीने भगुल्यात बघितले.पीठ जरासाच वाचला होता.एकसुद्धा आयता होणे माऊलीला अवघड वाटत होते.ती ओशाळली आणि बापाला काय सांगावे हा प्रश्न तिच्यासमोर दाटला गेला.बाप तिच्यावर ओरडेल यात काही शंका नव्हती.त्यामुळे तिला घाबरल्यासारखे सुद्धा वाटू लागले होते.कारण ती मुलींनाही नाही म्हणू शकत नव्हती.तेव्हढ्यात तिला एक कल्पना सुचली आणि तिने चुलीतली राखड ओंजळभर चाळली आणि पिठात टाकली.

आज पोटभरून आयते खायला मिळणार, म्हणून जिभल्या चाटत,लांब लांब पावले टाकत बाप दाराशी येऊन खिळला होता.त्याने आधी खोलीत नजर टाकली.सातही बहिणी ढाराढुरर झोपल्या होत्या.म्हणजे आता त्यांचा त्रास नाही असं म्हणत थोड्याशा आनंदाने बाप माऊलीजवळ आला आणि माऊलीने आयते त्याच्या पुढ्यात केले.

आयते बघताच बापाला आता खातो की मग खातो असं झालं होतं.आणि तो एखाद्या जनावरासारखा त्यावर तुटून पडला.पहिलाच घास घशात कोंबत आहे तेव्हढ्यात त्याला रेव लागली.त्यासरशी त्याने माऊलीकडे बघितले.माऊली बिचारी शरमली आणि घडलेली सर्व हकीकत बापाच्या पुढ्यात कथन केली आणि डोळ्यांव्दारे आसवे टिपू लागली.शेवटी नशिबाला दोष देत पुन्हा बाप उपाशीपोटी पाणी पिऊन झोपला गेला.

असे बरेचसे प्रसंग यायचे ज्यामुळे कधी बहिणीचे मन दुखायचे तर कधी वडिलांचे.पण हा एक संसारमयी वृक्ष होता यात कुणाला दोष देण्यात तर काही अर्थ नव्हता.कारण बहरलेलं ते झाड स्वतःच्याच वाकलेल्या फांद्यांना,गाळणाऱ्या पानांना,पडणाऱ्या फळांना काय म्हणू शकणार?जसं नशिबात आहे ते तर घडतंच राहणार.फक्त नशीब बदलवण्याच्या प्रयत्नांती असणे हे मात्र महत्त्वाचे आहे.

पोटभरून जेवण करणे हे त्या काळचे स्वप्न होते.आजच्या आयुष्यात मोबाईल घेतलं,कपडे घेतले,टीव्ही घेतली तरी माणूस समाधानी नसतो. इच्छांचा हिशोब काही त्याचा संपत नाही.पण त्या काळात सगळ्यात महत्त्वाचं होतं जेवण.पोट जे पाच बोटांचं मथडं असलं तरी आयुष्यभर भरत नव्हतं. त्यादिवशीचा प्रसंग वडिलांना फार महागात गेला होता.त्यामुळे त्या दिवशी त्यांना विट आला होता.सात मुलींना आता पोसणे त्याला जीवावर आल्यागत वाटत होतं.त्यामुळे प्रत्येकाने काहीतरी काम करून यावे असा त्याचा विचार होता.पण मुलींसाठी तितकंसं कामही गावात मिळेनासे होतं.

गावच्या पाटलाकडे जळणासाठी काही लाकडे लागणार होती.तितकीच एक एक पैशाची मिळकत म्हणून बापाने सातही बहिणींना जंगलात नेले. खरंतर जंगलात नेणे हा एक बहाणा होता.सातही बहिणींना जंगलात सोडून देणे असाच विचार बापाच्या डोक्यात घुटमळत होता.त्यामुळे जंगलात जाताना तो दाट खोलात जायचा आणि बहिणींच्या नजरेतून ओझळ व्हायचा.पण बहिणीही त्याच्या मागावर असायच्या.त्यामुळे वडिलांचा विचार साधण्याच्या मार्गावर नव्हता.ज्यामुळे एक फायदा असा झाला की बहिणी जंगलापासून परिचित झाल्या.कित्येक पायवाटा त्यांनी डोळ्यात नेमून ठेवल्या.आता वाळलेल्या काटक्यांसाठी त्याच पुढाकार घेत असत.

एके दिवशी सरपण जमा करण्यासाठी त्या जंगलात गेल्या.झरीच्या टोकावरून त्यांना येताना सायंकाळ झाली.झरीची डोंगररांग उतरली की बेलदेव आणि तिथून नवतळा असं ते पायी अंतर होतं.रोजच्या सरावानुसार सगळ्या बहिणींनी आपापल्या सरपणाच्या मोळ्या बांधल्या आणि अंधार दाटू लागल्यामुळे त्या इतस्ततः बघू लागल्या.आत्ताच्या सात बहिणीच्या गडावर त्यांना एक प्रकाश दिसत होता.तो प्रकाश त्यांना इतका दिव्य वाटला की क्षणभर त्या प्रकाशाकडे एकवटल्या.कारण इतक्या दूर अंधाराला चिरत असणारा प्रकाश हा काही साधासुधा नाही हे तेव्हा त्यांनाही उमगले होतं.त्यांना त्या प्रकाशाबद्दल बरीच उत्सुकता होती.त्यांनी बराच वेळ त्या प्रकाशाबद्दल विचार केला की तो कशाचा असेल? कोण राहत असेल?

नेहमी हसतखेळत येणाऱ्या बहिणी आज विचारमग्न होऊन होत्या.दिवस बदलत गेले.ऋतुमानानुसार जंगलही बदलत गेले.पण बहिणीच्या त्या मनातून तो प्रकाश काही जाईना.आणि पुन्हा सरपणासाठी त्यांना जंगलात सुद्धा जायला मिळाले नाही.गेले कित्येक दिवस त्या प्रकाशामुळे बेचैन होऊन घुटमळत राहिल्या.त्यांना फक्त इतकेच माहिती झालं होतं की त्या गडावर कुणी पिरबाबा असतो.त्यामुळे त्या गडाला "पिरजागड" असे म्हणतात.त्या पिरबाबाची भेट घ्यावी असा त्यांचा विचार चालू होता.त्यासाठी त्या आणखी मिळेल त्या माहिती जतन करू लागल्या होत्या.आणि त्या प्रकाशाबद्दल उत्सुक राहिल्या होत्या.

पुढे सातही मुलींच्या वास्तव्याला कंटाळलेला बाप मुलाच्या आशेपोटी थकला होता.पूर्वीच्या काळात रिटावर (राहतो ती जागा, स्वतःचं घर वगैरे) वारस असायचा.वंशावळ चालविण्यासाठी गरज होती ती वारसदाराची, त्यामुळे बुजुर्ग मंडळींच्या सल्ल्यानुसार वडिलांनी दुसरे लग्न केले.

आधीच्या वास्तव्याला आधीच तडजोड होती.आता त्यात पुन्हा एक भरीस पडली होती.या वेळेस नवीन माऊलीची फार छान चिंता बाप करू लागला होता.कारण त्याला तिच्याकडून एका मुलाची एका वारसदाराची अपेक्षा होती. बघता बघता नवीन माऊलीला दिवस गेले.आणि काही दिवसांनी त्या पडक्या पडवीत एका लहानग्याचे सुरेख रडणे कानावर आले.त्यावेळेस घर कसं त्याच्या आवाजाने प्रफुल्लित वाटत होतं.सातही बहिणी आम्हाला भाऊ मिळाला म्हणून आनंदाने नाचू लागल्या.आज सगळ्यात जास्त आनंदात होता तर तो बाप होता.आज त्याच्या आनंदाला सिमा उरली नव्हती.कधी नव्हे ते आज बापाने वाण्याकडून उधारी गूळ आणि शेंगदाणे आणले होते.आणि जिथे तिथे तो गोड आनंद वाटला होता.

इवल्याशा भावाला बघायला सातही बहिणींनी एकच गर्दी केली पडवीत.लहानगा देवझोपेत तल्लीन होता.झोपेत त्याचं हसणं त्या बहिणींना एक करमणूक वाटत होती.त्यामुळे प्रत्येकजण त्या लहानग्याच्या ओठाला, गालाला हात लावून, डिवचून आपापले प्रेम व्यक्त करत होत्या.अचानक पडवीत आल्या आल्या बापाने सगळ्या बहिणींना दटावत तिथून हुसकावून लावले.बिचाऱ्या बहिणींना यातलं काही कळलं सुद्धा नाही.पण भाऊ आल्याचा त्यांना जितका आनंद वाटला होता, तितकाच त्यांच्या दुःखांचा पण बंधारा सजला होता.इथून त्यांच्या जीवनाचा अंधःकार चालू झाला होता.

जेव्हा कधी त्या भावाच्या लाडापोटी त्याच्याजवळ जायच्या.तेव्हा नवीन आई वडील सारखं त्यांना दटावत असत.जणू यांची सावलीसुद्धा त्याच्या अंगावर पडता कामा नये अशी ती काळजी घेत भावाची.जुन्या दिवसांवर आता विरजण पडलं होतं.मुलगा झाला तेव्हापासून एक भरभराटी घरात झाली होती.भावासाठी खेळणी,विजार इतकंच काय, त्याला खायला कमी पडू नये म्हणून दुधापासून ते गोड धोडपर्यंत सगळं काही नियमित असायचं.ज्यामुळे बहिणींकडे असलेला दुर्लक्ष आणखी वाढू लागला.उशिरा का असोना त्यांना मिळणारे कापड, तसेच तुटक आहार यांचा आणखी अभाव पडू लागला.पण त्या कधीच उर्मटपणे बोलल्या नाहीत.निदान आपल्यामुळे भावाचे लालन पालन सुधारत आहे,आपल्यासारखे त्याचे हाल नाही ह्यावर त्या समाधानी होत्या.

पण जसे जसे दिवस पालटत गेले.त्यांचं अंतर मात्र तितकाच वाढत राहिला.हळूहळू पलटणारा भाऊ आता रांगु लागला,नंतर बसू लागला,उभा होण्याच्या धडपडीत पडू लागला,धावू लागला.कधीकधी बहिणींच्या मांडीवर निजू लागला,अंगाई ऐकू लागला.त्यांच्यासोबत हसू खेळू लागला.आईवडिलांच्या समोर अंतर वाढले असले तरी बहीण भावांचा तो एकोपा त्यांच्या नसण्यावर अगदी डोळ्यात भरण्यासारखा होता.व्यक्त नसले तरी अव्यक्त प्रेमाचे क्षण मुक्यामुक्यानेच वेदना संवेदना देत होते.

दिवसामागून दिवस नेहमीसारखेच प्रगतीच्या थाऱ्यावर निघत होते.आणि तसतसेच घराच्या त्या आर्थिकतेची पण सुधारणा होत होती.पण ती भावापुरतीच मर्यादित होती.बहिणींसाठी दरिद्री अजूनही ताजीच होती.तेच उरलेलं शिळे अन्न,आणि तेच फाटके पण शिवलेले कपडे. रिटे लावून धुतलेले केस,पण कधी तेल मिळाला नाही तर गुंता डीवचलेला असायचा.हातापायांना काही जखमा असायच्या ज्यात पाणकणीस चींधीने बांधलेली असायची.कधी लक्ष असायचीच तर नालीच्या काठावर बसून वाण्याच्या दुकानाकडे.एखादे वडील आपल्या मुलाला काही खायला घेऊन द्यायचे. आलिंगणाला कशी घट्ट मिठी द्यायचे.त्यांच्या प्रेमाला कित्येकदा असोना ईर्ष्या वाटायची.कधी कपाळावरचं नशीब म्हणून घृणा वाटायची.पण ते बोबडे बोल पुन्हा त्यांच्या अविचारांना परावृत्त करत जगण्याला एक आधार देऊन जातं.ते म्हणतात ना दलदलीत उगवलेलं एक कमळ अख्ख्या दलदलीला सुशोभित करतं अगदी त्यासारखे.

उनाडक्या करता करता भाऊ दहा ते बारा वर्षाचा झाला.आता बहिणींच्या सोबतीने तो थट्टा करू लागला होता.त्यांच्यात लपीछुपी,लंगडी खेळू लागला होता.कधी वडिलांनी दुकानातून त्याला खायला काही घेवून दिले, तर त्याचे तो लपून सात हिस्से करायचा आणि मिळून मिसळून खायचा.लपून का असोना पण बहिणींच्या प्रती त्याचे निरागस भाव ओतप्रोत जागवून द्यायचा.कधी कधी त्याच्या नितळ चेहऱ्याकडे बघितल्यावर बहिणींना कसे गहिवरून यायचे.कारण सुखदुःखाच्या वेशीवर तो अशा पद्धतीने उभा होता,की त्याला धरूनही जगावेसे वाटेना की त्याला सोडूनही जगावेसे वाटेना हीच त्यांची शोकांतिका होती.कधी काळी आम्ही नसल्यावर याचं काय होणार?हाच विचार त्यांच्या मनात येत होता.कारण आता त्या उपवर झाल्या होत्या.एक न एक दिवस लग्न करून त्यांना जाणेच होतं.

पण बहिणींच्या मनातून एकच वस्तू उतरत नव्हती.आणि ते म्हणजे तो प्रकाशकिरण.त्या दिवशी सायंकाळी गडावर उमडलेला प्रकाशकिरण.कित्येकदा त्यांना स्वप्नातही अगदी तोच प्रसंग आठवायचा.त्यासाठी त्या बऱ्याचदा जंगलात गेल्या पण त्या वेळेपर्यंत कधी त्यांचं राहणं झालं नाही की कधी त्याविषयी कोणता पुरावा मिळाला नाही.त्यामुळे बऱ्याचदा त्या उत्सुकतेने वंचित राहायच्या.

पण त्यानंतर जी गोष्ट घडली ती त्यांच्या आयुष्यात घडणारी एक खूप मोठी गाथाच झाली.कारण बहिणींच्या आयुष्याला वळण आणणारी ती एकच गोष्ट होती.जी आजही त्यांच्या काळजावर घाव घालणारी होती.आणि निश्चितच त्या वेळेस ते घडणं अगदी साहजिक होतं.

त्या दिवशी घरी थोडासा वाद चालला होता.म्हणजे मधल्या लहान बहिणीचे कपडे बऱ्याच प्रमाणात फाटले होते.आणि नवीन कपडे मिळतील ही आशा पण नव्हती.पण त्या जुन्याच कपड्यांना शिवायला एक सुई सुताचं बिंडल लागत होतं.ज्याच्यासाठी एक प्रकारची शिफारस बहिणींनी वडीलाला घातली होती.पण उलट वडिलांने त्यांच्यावरच डाफरत त्यांना म्हणलं की,तुमच्यासाठी माझ्याजवळ काही नाही,राहायचं असेल तर रहा अन्यथा निघून जा,मला तुमची काही आवश्यकता नाही.

वडीलांच्या शब्दाला प्रत्युत्तर न देता त्या आत खोलीत आल्या आणि हमसून हमसून रडू लागल्या.याही परिस्थितीत त्यांना काय करावे हेसुद्धा सुचत नव्हतं.बिचाऱ्या स्वतःच्याच नशिबाला कोसत राहिल्या होत्या.त्यांच्या भावनेची आज पुन्हा एकदा चिता सजली होती.त्यांच्या असण्याचे ओझं त्यांना फार आधीच वाटत होतं.पण आता त्यांची जाणिव इतकी घट्ट झाली होती की आता कृतिशील व्हायला वेळ लागणार नव्हता.पण जन्मदात्यांशी असं नास्तिक होणं एका क्षुल्लक गोष्टीसाठी हे त्यांना योग्य वाटत नव्हतं.

अचानक बाहेरून आलेल्या लहानग्या भावाची जाणीव झाली.त्याला हे सगळे नको कळाया.उगाच पुन्हा काही प्रसंग ओढवेल म्हणून डोळ्यातले आसवे पुसून त्या जागेवरच खिळल्यागत बसून राहिल्या.सगळ्या घराला शांत बघताना भावाला जरा अपरिचित वाटलं.घर धुंडाळत कोपऱ्यात बसलेल्या बहिणींपाशी तो आला.आणि त्यांना खेळण्यासाठी आग्रह करू लागला.पण नुकतंच काय घडलंय याची जाणीव त्या निरागस हृदयाला कुठे होती?बहिणींनी नाही म्हणत असताना सुद्धा त्यांचं हात धरून तो खेचाखेची करत होता.आणि नेमकं त्याच प्रयत्नात तो धपकन जमिनीवर पडला.

सारवणीने बरबटलेली जमीन असली तरी छोट्या छोट्या खड्यांनी त्याला जरासे खरचटले.त्यामुळे तो रडायला लागला.त्याला लागलेय असं म्हणून सातही बहिणी गहीवरल्या, आणि त्यांनी त्याला धावत जाऊन उचलले पण तो रडायचा थांबेना, आणि बहिणींचे हात झिडकारत तो धावत धावत वडिलांकडे गेला.त्याला रडताना बघून वडीलाने त्याला काय झाले? असं विचारलं.जखमेकडे बोट दाखवत बहिणींनी ढकललं असं तो हुंदक्यासरशी सांगू लागला.

जख्मेकडे बघताच वडिलांचे डोळे मोठे झाले आणि त्याचा रागाचा पारा आणखीनच वाढला.आणि त्याला घेऊन तडक तो बहिनींकडे आला.आणि जोरजोरात ओरडू लागला.
तुम्हाला सुई सुताला पैसे दिले नाही,म्हणून काय माझ्या पोराला माराल काय? तुमच्या भरवश्यावर जर त्याला ठेवलं तर तुम्ही तर त्याला मारायलाही संकोच करणार नाही.हे काही नाही,मला तुमची काही गरज राहिलेली नाही आता,आणि असून किंवा नसून मला तुमचा काही उपयोग पण नाही.तुमच्या जन्मापासून नुसतं तुमचं ओझं अंगावर वावरतोय.त्यामुळे निघून जा तुम्ही माझ्या घरातून.पुन्हा तुमची सावली माझ्या मुलावर पडता कामा नये.

बहिणींनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला.पण वडील काही मानायला तयारच नव्हते.एकेक बहिणींचा हात धरत त्याने सगळ्या बहिणींना घराच्या बाहेर काढले.आणि दरवाजा त्यांच्या तोंडावर किर्र किर्र करत जोरात आपटला.आणि सगळ्यांना तंबी दिली की यांना जर कुणी घरात घेतलं तर माझ्यासारखा वाईट कुणी भेटणार नाही.आजपासून त्यांना घरात अजिबात जागा नाही.